शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (09:38 IST)

उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी आज अर्थात गुरुवारी सकाळी ६ वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली गेली आहे. चार गाळमोरीतून पाणी सोडण्यात आले असून त्यात आणखी वाढ करत तो ७ ते ८००० क्युसेक करण्यात आला आहे.
 
शहर पाणीपुरवठयाचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मे पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. या दोन दिवसात उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाऱ्यातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते.  टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मे पर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली. आता हे पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो.