"आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. आम्ही कुठल्याही संपत्तीवर दावा करणार नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
"मी अधिकृतपणे सांगतो आम्ही कुठल्याही संपत्तीवर दावा करणार नाही. कायद्यानुसार शिवसेना विधीमंडळ कार्यालय आम्हाला मिळालं", असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निर्णय मेरिटवर झालाय. त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही".
"निवडणूक आयोगाचा हा निकाल अत्यंत चुकीचा आहे. दोन तृतीयांश आमदारांना कोणत्या तरी पक्षात विसर्जित व्हायलाच पाहिजे असं घटना सांगते. मग निवडणूक आयोगाला इतकी घाई कशाला"? असा सवाल शिवसेना नेते ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी केला.
"सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्यापासून सुरु होत आहे. कल्लोळ वाढावा यासाठीच निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. माझ्या पक्षाचं नाव जरी चोरलं तरी ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. कारण हे दिल्लीश्वरांकडून त्यांना मिळू शकत नाही," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, "राष्ट्रीय हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. नाहीतर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. त्यानंतर लोकशाहीला छेद देणारा नंगा नाच या निवडणूकीनंतर सुरू होईल असं ते म्हणाले".
"निवडणूक आयुक्तांची निवड निवडणुकीने का झाली नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. हा निर्णय शिवसेनेला मान्य नाही.
"निवडणूक आयोगाने सांगितली म्हणून लाखो कागदपत्रं सादर केली. लोकप्रतिनिधींच्या पात्रतेवर आधी निर्णय व्हावा. शिवधनुष्य रावणाला पेललं नाही तर ते मिंध्यांना काय पेलणार"? असं ते म्हणाले.
"दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निकाल गुंतागुंतीचा व्हावा म्हणून हा निकाल?
सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी सुरू होते आहे. सुप्रिम कोर्ट योग्य तो निकाल देईल. आतापर्यंत एका गटाला असं नाव आणि चिन्ह कोणालाही दिलेलं नाही. चिन्ह गोठवण्यात आल्याचं अनेक वेळा दिसलेलं आहे. हा निकाल गुंतागुंतीचा व्हावा म्हणून तर निवडणूक आयोगाने हा निकाल तर नाही दिला?
अमित शहा मला वडिलांसारखे आहेत. आता किती लोक यांना वडिलांसारखे काय माहिती? माझे वडील तर हे चोरतच आहेत असं ते म्हणाले.
एक पक्ष त्यांनी संपवला, बाकीच्या कोणत्याही पक्षाबरोबर हे घडू शकतं असंही त्यांनी सांगितलं.
'बाळासाहेबांचा चेहरा आणि नाव लावण्याऐवजी स्वत:चं नाव आणि चेहरा लावावा'
"देशात अराजक माजवणं हाच त्यांचा हेतू आहे. बाळासाहेबांचा चेहरा लावत आहेत. स्वत:चं नाव लावावं किंवा वडिलांचं नाव लावून शिवसेना चालवून दाखवावी. माझं आव्हान आहे. शिवसेना कोणाची हे दसऱ्यादिनीच सिद्ध झालं आहे.
मला हा देश वाचवायचा आहे असा विचार नागरिकांनी केला आहे. मी भविष्यपत्र चालवत नाही, वर्तमानपत्र चालवतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या वतीने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं गेलं. आज (20 फेब्रुवारी) अभिषेक मनू सिंघवी यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी यासाठी सरन्यायाधीशांसमोर याचा उल्लेखही केला. परंतु कोर्टाने आज तातडीने सुनावणी घेतली नाही.
मंगळवारी (21 फेब्रुवारी) ठाकरे विरुद्ध शिंदे प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यावेळी पुन्हा या प्रकरणाचा उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे.ठाकरे गटाने निवडणूक आयोगाचा आदेश डागाळलेला असल्याची टीका केली आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर आयोगाने शहानिशा केलेली नाही असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Published By -Smita Joshi