बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:27 IST)

शिवसेना : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोमणा, चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल

uddhav thackeray
धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
 
एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर शिवसेनेचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र अखेर, शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळेल, असं आयोगाने म्हटलं.
 
"2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना 23.5% मते मिळाली होती," असं या प्रकरणात दिलेल्या आदेशात आयोगाने म्हटलं आहे.
 
2018 साली शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यांची आयोगाकडे नोंद नाही. 2018 च्या पक्षघटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाची सर्वोच्च समिती आहे ज्यात 13 सदस्य होते. पण ती प्रतिनिधी सभेमार्फत अस्तित्वात आली.
 
27 फेब्रुवारी 2018 रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही. त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोटीची शहानिशा होऊ शकली नाही. अखेर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत या निष्कर्ष ग्राह्य धरावा लागला, असं आयोगाच्या आदेशात म्हटलं आहे.
 
शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रियाही समोर आली.
 
"अखेर सत्याचा विजय झाला. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. या घटनेच्या आधारावरच आमचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निर्णय हा मुद्द्यांवर आधारीत आहे. याबाबत निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, निवडणूक आयोगावरील आमचा विश्वास उडाला आहे. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल."
 
"खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह 40 बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला," असं राऊत यांनी म्हटलं.
 
"जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि शिवसेनेला पुन्हा उभी करुन दाखवू, असंही त्यांनी म्हटलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो."
 
तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
ते म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निकाल हा अतिशय अनपेक्षित असा आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आयोगाने एवढी घाई का केली, हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगाने तो निकाल दिलेला असला तरी उद्ध ठाकरे याबाबत सुप्रीम कोर्टात जातील, असं माझं मत आहे.
 
महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे, असं पवार म्हणाले.
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना नरेंद्र मोदींनी घोषणा करावी की देशाचं स्वातंत्र्य संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे.
 
आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत, जिथे सरकारची दादागिरी चालू आहे. अगदी न्याययंत्रणा आपल्या नियंत्रणाखाली कशी येईल, याबाबत कायदेमंत्री बोलत आहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार पाहिजे आहेत.
 
असं सुरू असेल, तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत, हे बोलण्याचं धाडस सर्व यंत्रणांना सोबत घेऊन एकटे लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवलं पाहिजे.
 
आजचा हा निर्णय अत्यंत अनपेक्षित असा आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे. तो निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये, असं मी आधीच म्हटलं होतं.
 
पक्ष कुणाचा हे केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या आकड्यांवरून ठरवायला लागलो, तर कुणीही धनाढ्य माणूस निवडून आलेले आमदार-खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा, राज्याचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतो, हेसुद्धा मी मागे म्हटलं होतं.
 
चोराला राजमान्यता देणं हे काहीजणांना भूषणावह वाटत असेल. पण शेवटी चोर हा चोरच असतो. त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
इतके दिवस त्यांची निवडणुका घेण्याचीही तयारी दिसत नव्हती. पण ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव त्यांनी शिंदे गटाला दिलं आहे, आता महिना दोन महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता दिसत आहे, असं ठाकरे म्हणाले.
 
या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल येईल, याची आम्हाला खात्री आहे, असंही ठाकरे यांनी म्हटलं.
 
शिवसेनेची स्थापना
शिवसेना हा फक्त एक पक्ष नाहीये तर ती एक धगधगती राजकीय चळवळ असल्याचं दावा शिवसेनेनी वेळोवेळी केला आहे.
 
मुंबईतील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुणांना आवाज मिळवून देण्यासाठी या संघटनेचा जन्म झाल्याचे शिवसेनेच्या संस्थापकांनी म्हटले होते.
 
आपल्या कुंचल्यातून राजकीय फटकारे मारणाऱ्या बाळ ठाकरे नावाच्या तरुण व्यंगचित्रकाराने या पक्षाची स्थापना केली.
 
19 जून 1966 रोजी शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी 'मी माझा बाळ या महाराष्ट्राला देतोय' असं सांगत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना अशी संकल्पना मनात ठरवून प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना शिवसेना असं पक्षाचं नाव सुचवलं होतं.
 
हे नाव कसं सुचलं याबाबतची आठवण उद्धव ठाकरेंनी ( 9 ऑक्टोबरच्या) भाषणात देखील सांगितली.
 
"बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा मार्मिकमधून मराठी माणसांचे प्रश्न मांडत होते. तेव्हा प्रबोधनकारांनी त्यांना विचारलं की एखादी संघटना काढण्याचा विचार आहे की नाही. त्यावर बाळासाहेबांनी म्हटलं हो, तसा विचार करतोय. तेव्हा प्रबोधनकार म्हणाले. संघटनेचे नाव काय ठरवले, बाळासाहेबांनी उत्तर देण्याच्या आतच प्रबोधनकार म्हणाले 'शिवसेना.' मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचं नाव शिव-छत्रपतींच्याच नावावरुन हवं. असं प्रबोधनकार म्हणाले आणि शिवसेना हे नाव ठरलं," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
 
बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते आणि मार्मिकमध्ये त्यांचे वाचा आणि थंड बसा या नावाने येणारे सदर देखील गाजले होते.
 
त्यांच्याच कुंचल्यातून साकारलेला 'डरकाळी फोडणारा वाघ' ही या संघटनेची ओळख होती.
 
सुरुवातीला केवळ नियतकालिकांमधून प्रश्न मांडण्यात आले आणि नंतर शिवसेनेने हा संघर्ष रस्त्यावर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात नेला.
 
'हटाव लुंगी बजाव पुंगी' हा मंत्र घेऊन बेरोजगार शिवसैनिक भगवा झेंडा फडकवत मुंबईतील रस्त्यावर उतरले आणि दाक्षिणात्य लोकांविरुद्ध आंदोलन करून आपला हक्क मिळवला.
 
बाळासाहेब ठाकरे यांची परखड भाषणे त्यांची स्टाईल यामुळे वेगाने संघटनेला लोकप्रियता मिळत गेली.
 
समाजकारण आणि राजकारणाचा फॉर्म्युला
80% समाजकारण आणि 20% राजकारण हा फॉर्म्युला शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी दिला.
 
मुंबईत असलेल्या शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून शिवसैनिक लोकांसोबत जोडले गेले. त्यांचे छोट्यातले छोटे प्रश्न सोडवून शिवसेनेनी समाजकारणाचे ध्येय गाठले पण आता पुढचं ध्येय हे राजकारण होतं.
 
1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद करण्यात आली. तत्पूर्वी निवडणूक लढवायची तर पक्षाला चिन्हं हवं.
 
डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची ओळख होती. पण निवडणूक आयोगाकडून तेच चिन्ह मिळतं जे मुक्त चिन्हांच्या यादीत आहे. निवडणूक आयोगाकडून मुक्त चिन्हांची यादी प्रकाशित केली जाते. त्यातीलच एक चिन्ह पक्षाला घ्यावे लागते.
 
याआधी म्हणजेच 1967 साली संघटनेच्या स्थापनेनंतर वर्षभराने शिवसेनेने पहिल्यांदा ठाण्यात महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. ठाण्यातील निवडणुकीसाठी शिवसेनेनी ढाल तलवार हे चिन्ह घेतलं होतं.
 
शिवसेनेचे उमेदवार हे कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवत होते.
 
1968 च्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचारात मिरवणुकीत हाती धनुष्यबाण घेतलेले राम लक्ष्मण प्रसिद्ध झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेनी ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवली होती अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी दिली.
 
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी एकेठिकाणी सांगितले की "निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेकडून एक मिरवणूक काढण्यात आली होती. लहू आचरेकर आणि ऑर्थर डिसुझा नावाचे कार्यकर्ते या मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनले होते. तेव्हा त्यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण होता. शिवसेनेची आपल्या प्रचाराची ही अनोखी स्टाईल तेव्हा गाजली होती. पहिली निवडणूक असूनही शिवसेनेने मुंबईत आपली चांगलीच छाप सोडली."
 
बाळासाहेबांच्या शिवसेनेला खरं यश पहिल्यांदा 1970 साली मिळालं.
 
परळचे कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक लागली होती. त्याकाळात डाव्या विचारांच्या संघटनांच्या विरोधात
 
शिवसेना आक्रमक झाली होती. या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. तर बाळासाहेबांनी परळचे नगरसेवक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली.
 
कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येमागे शिवसेनेचा हात आहे अशा चर्चा सुरू असल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली.
 
शिवसैनिकांनी प्रचारात आपल्या जीवाचं रान केलं. डाव्यांना विजयाची खात्री असताना देखील निकालानं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्राला हादरा दिला. कारण कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई पराभूत झाल्या होत्या. 1679 मतांच्या फरकानं वामनराव महाडिक विजयी झाले. त्यांच्या रूपात शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेत पोहचला.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या वामनरावांचं चिन्ह होतं उगवता सूर्य. त्यांच्या विजयामुळेच शिवसेना नावाच्या पक्षाचा राजकीय उदय झाला असं देखील बोललं गेलं.
 
या विजयानंतर शिवसेनेची पाळेमुळे मुंबईत रुजत गेली. मात्र पक्ष अजूनही मुंबईच्या बाहेर आपलं अस्तित्व निर्माण करू शकला नव्हता. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून त्यांना अधिकृत चिन्ह देण्यात आलेलं नव्हतं.
 
म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या निवडणुकांना वेगवेगळी चिन्हे मतदारांना सामोरे गेले. यात कधी 'उगवता सूर्य' कधी 'धनुष्यबाण' तर कधी 'ढाल तलवार' यांचा समावेश होता.
 
सत्तरच्या दशकात शिवसेनेने कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याचा देखील प्रयोग केला.
 
बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला देखील पाठिंबा देऊ केला होता.
 
पक्ष अनेक स्थित्यंतरे पहात होता मात्र अजूनही राजकीय जम बसायचा होता.
 
रेल्वे इंजिन
1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनाला आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होतं.
 
बाळासाहेब हे स्वतः चित्रकार असल्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार यंत्रणा खुबीने राबवली. प्रचाराचा श्रीगणेशा करताना त्यांनी श्रीफळ वाढवितानाच रेल्वे इंजिनाचीही पूजा केली होती.
 
मुंबईमध्ये कोकणी माणसांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रचार करताना "कोकण रेल्वेला शिवसेनेचं इंजिन लावा" अशी साद घालण्यात आली.
 
मात्र जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेच्या रेल्वे इंजिनाची धूळधाण उडाली. शिवसेनेवर पराभवाची नामुष्की आली. मात्र त्यांचे रेल्वे इंजिन हे चिन्ह घराघरात पोहोचलं.
 
जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की, "याच निवडणुकांच्या आठवणींमुळे बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या मनात सुद्धा रेल्वे इंजिन हे चिन्ह बसलं होतं. त्यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी आपल्या पक्षासाठी रेल्वे इंजिन हेच चिन्ह निवडलं. पुढे शिवसेनेप्रमाणेच त्यांनी देखील निवडणुकांतील अपयशाला कंटाळून इंजिन हे पक्षचिन्ह बदललं."
 
ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी आपल्या पक्षात अनेक आमूलाग्र बदल केले. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे भाजपशी युती आणि हिंदुत्वाची ओढलेली शाल. फक्त मराठीच्या मुद्द्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचता येणार नाही हे ओळखून शिवसेनेने कट्टर हिंदुत्व ही आपली ओळख निर्माण केली.
 
1984 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर शिवसेनेने चक्क भाजपच्या कमळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले. यात वामनराव महाडिक, मनोहर जोशी अशा दिग्गजांचा समावेश होता. पण याचा देखील शिवसेनेला विशेष असा फायदा झाला नाही.
 
1988 साली पहिल्यांदा वापरला धनुष्यबाण
1988 साली झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलं. या निवडणुकीवेळी त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण.
 
बाळासाहेबांच्या बेधडक भाषणांमुळे एकेकाळी निजामशाहीच्या प्रभावाखाली असलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा भगवा झेंडा झळकू लागला.
 
1989 सालच्या लोकसभेवेळी शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणुका लढवल्या. पक्षाला अधिकृत परवानगी नसल्यामुळे शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती.
 
यातील परभणी मधून उभे असलेले उमेदवार प्राध्यापक अशोक देशमुख यांनी धनुष्यबाण या चिन्हाची निवड केली होती. त्यांनी या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करत जोरदार प्रचार केला.
 
याचाच परिणाम तब्बल 66 हजारांच्यावर बहुमत घेऊन त्यांचा विजय झाला. धनुष्यबाणामुळे मिळालेल्या यशानंतर शिवसेनेने आपलं चिन्ह धनुष्यबाण करावं असं ठरलं.
 
'रामाचे आयुध हीच बनली शिवसेनेची ओळख'
जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की, "तो काळ आयोध्येच्या राम मंदिर आंदोलनाचा होता. बाबरी मशीद पाडून तिथे प्रभू रामाचं मंदिर उभं राहावं यासाठी शिवसेना देखील आक्रमक होती. हिंदुत्वाची आपली ओळख घट्ट व्हावी शिवाय प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद म्हणून शिवसेनेनं धनुष्यबाण हेच पक्ष चिन्हं फायनल केलं."
 
मतदारांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी आयोगाने हेच चिन्हं आम्हाला द्यावं अशी मागणी शिवसेनाप्रमुखांनी केली.
 
शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, अॅड. बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह सुपूर्द केलं.
 
पुढे जवळपास तीस वर्षे याच चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणुका लढवल्या. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेडेगावात गेलं तर शिवसेनेच्या शाखेचा बोर्ड आणि त्यावर धनुष्यबाणाचे चिन्हं झळकताना दिसतं.
 
'खान हवा की बाण हवा'
निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. त्यातूनच 'खान हवा की बाण हवा' अशा घोषणा देखील निघाल्या.
 
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि एक वेळा भाजपसोबत तर एक वेळा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन केले.
 
मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं. या बंडानंतर मात्र सेनेचा पायाच खचून गेला असल्याची स्थिती निर्माण झाली. शिवसेनेवर खरा अधिकार कोणाचा याचा संघर्ष दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानापर्यंत पोहचला.
 
या वादातूनच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. अखेर, एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
Published By -Smita Joshi