गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (09:07 IST)

मंत्रीमंडळ विस्तार आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो, शिंदे-फडणवीस सरकारचे विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर

devendra fadnavis eaknath shinde
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर दिले. तसेच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या आमदाराला सभागृहातच थेट ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 
विधानसभा सभागृहात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही आहे. तरीही अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सजवण्यात आले आहेत. या बंगल्यांची आवश्यकता नसताना ते सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांवरती करोडो रुपयांचे कर्ज उभे करत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारी पैशांचा चुराडा होत आहे. हा पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका सुनील प्रतोद यांनी केली. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. 
 
तुम्हाला संधी हवी आहे का?
सुनील प्रभू यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मंत्रीपदाची ऑफरच देऊन टाकल्याचे म्हटले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडीच माहिती असते, आम्ही कधी मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. आम्ही अधिवेशनाच्या काळातही करु शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्हाला संधी हवी आहे का?, त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने रंगरंगोटी केली जाते. कोट्यवधी नाहीतर, जेवढे आहेत, त्याचा हिशोब पाठवून देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कीलपणे सांगितले.
 
 सत्तेवर असताना विदर्भासाठी काही केले नाही,
उद्धवजी आता नागपुरात येऊन काय करणार ?

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
 उद्धवजी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे विदर्भासाठी काही केले नाही, नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले नाही, तुमचा काळ संपला, आता नागपूरला येऊन काय करणार, असा खणखणीत सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.
भाजपा प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्याध्यक्षांच्या एक दिवसाच्या बैठकीचे सोमवारी नागपूर येथे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीला विदर्भात तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशन आयोजित केले नाही, विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केले नाही, सत्तेवर असताना त्यांनी विदर्भाच्या विकासाबाबत बेईमानी केली. महाविकास आघाडीला विदर्भ आणि मराठवाडा माफ करणार नाही. उद्धवजी सत्तेवर असताना अडीच वर्षे विदर्भात का आला नाहीत ? आता तुमचा काळ गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काळ आला.
त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलताना आधी आपण सत्तेवर असताना काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याचे घोर विरोधी आहात. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही म्हणून भावनिक मुद्दे मांडून संभ्रम निर्माण करत आहे.
ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले आणि परिवर्तन झाले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आजच्या दिवसभराच्या बैठकीत या विषयावर आणि संघटनात्मक बळकटीवर चर्चा करण्यात येत आहे. २०२४ साली निवडणुकीला सामोरे जाताना जनसामान्यांशी संपर्क साधून पक्ष संघटना बळकट करत आहोत. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील यासाठीची योजना अंमलात आणत आहोत.