शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (08:04 IST)

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद 'दिलं', असं भाजपचे नेते वारंवार का म्हणताहेत?

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. एकनाथ शिंदेंसोबत 39 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. असं असतानाही नव्या सरकारमध्ये शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आणि 106 आमदार असलेल्या भाजपनं उपमुख्यमंत्रिपद घेतलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनले.
 
राजकीय वर्तुळाला हादरवणारी ही घटना होती. या बंडानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हा अनेकांचा अंदाज फोल ठरला आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंपच झाला.
एकनाथ शिंदे हे भाजपच्या तुलनेत कमी आमदार पाठीशी असतानाही मुख्यमंत्री बनले, तर जवळपास तिप्पट आमदार पाठीशी असतानाही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले.
आता या घटनेला पाच महिने झाले. दरम्यानच्या काळात भाजपचे नेते मात्र मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे गेल्यानं काहीसे नाराज असल्याचे दिसून येते.
 
मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलंय – चंद्रकांत पाटील
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याभरातच म्हणजे जुलै 2022 मध्ये मुंबईजवळील पनवेलमध्ये महाराष्ट्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
 
या बैठकीत बोलताना महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अक्षरश: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलंय.
“नवीन सरकार येणं ही आपली मानसिक गरज होती. ती व्यवहारात आल्यानंतर असा एक नेता देण्याची आवश्यकता होती, की त्यातून योग्य मेसेज जाईल, त्यातून जे काही करतोय त्याला स्थिरता येईल. त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी, प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्त्वानं निर्णय घेतला की, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील.
 
दु:ख झालं आपल्याला, परंतु ते दु:ख पचवून सगळ्यांनी आपण हा सारा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
 
यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. भाजपमधून सारवासारवही झाली. तरी देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील वावर मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी दिसून येत नाही.
 
मी प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीस मुख्यमंत्रिपदी बसले पाहिजे - बावनकुळे
चंद्रकांत पाटलांनंतर भाजपचे आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पुन्हा असं विधान केलं, ज्यातून एकनाथ शिंदेंना दिलेल्या मुख्यमंत्रिपदावर भाजपअंतर्गत काय मत आहे, हे कळून यावं.
 
पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीस मुख्यमंत्री बनले पाहिजेत.
 
“पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी ताकद लावून त्यांना सर्वोच्च पदापर्यंत नेलं पाहिजे.
 
किमान मी महाराष्ट्र भाजपचा अध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसले पाहिजेत,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 
विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलण्याची उभे राहिले, तेव्हा ते म्हणाले की, “एक लक्षात ठेवा, चंद्रशेखर बावनकुळे नेहमी माझ्यासोबत का असतात, तर जिसके साथ तेली, वह बडा भाग्यशाली. त्यामुळे तुम्ही सोबतच राहा, म्हणजे आमचं भाग्य वरवरच जाणार.”
 
या विधानानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली.
‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी टीव्ही 9 मराठीशी बोलाना या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं.
 
ते म्हणाले, “2024 साली भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना बहुमतानं जिंकून येऊ. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई हे एकत्र बसून जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल.”
 
मात्र, तरी एक प्रश्न उरतोच की, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिल्याचा उल्लेख भाजपचे नेते वारंवार का करतायेत? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांकडून जाणून घेऊ.
 
‘कार्यकर्ते निराश होऊ नयेत म्हणून अशी विधानं’
वरिष्ठ राजकीय पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी दीपक भातुसे म्हणतात की, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देणं हीच मुळात तात्पुरती तडजोड आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी झालेलं बंड, सत्तांतरं होतं.
त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री बनवणं हा मुळातच त्याचा हेतू नव्हता. अशावेळी पदाधिकारी आणि नेत्यांनी मुख्यमंत्रिपदबाबत वारंवार उल्लेख करत राहणं सहाजिक आहे."
“तसंच, पुढच्यावेळी एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षापेक्षा नक्कीच भाजपच्या जागा जास्त असतील. दोन्ही मिळून बहुमताचा आकडा पार करत असतील, तर मुख्यमंत्री भाजपचाच असेल, हेही स्पष्ट आहे.”
 
दुसरं म्हणजे, जास्त जागा असूनही आपला उपमुख्यमंत्री असा जो संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेलाय, त्यामुळे कार्यकर्ते निराश होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना जागृत ठेवण्यासाठी अशी विधानं करत राहणं भाजपला अपरिहार्य आहे, असंही दीपक भातुसे म्हणतात.
‘मुख्यमंत्रिपद मॅग्नेट, त्यांचं आकर्षण सर्व पक्षांना असतंच’
राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांच्यशीही बीबीसी मराठीनं बातचित केली.
 
रविकिरण देशमुख म्हणतात की, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना उत्तेजित करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी अशी विधानं करत असतो. त्यात मुख्यमंत्रिपद हे मॅग्नेटसारखं काम करतं.
 
राज्यातले सर्व धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांशिवाय कुणीही करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचं आकर्षण प्रत्येक राजकीय पक्षाला असतं. त्यामुळे ते पद आपल्याकडे असावं असं वाटत असतं.”
 
देशमुख पुढे म्हणतात की, “2014 मध्ये भाजपनं 122 जागा जिंकल्यानंतर साहजिक मुख्यमंत्रिपद भूषवलं, मग 2019 मध्ये 106 जागा जिंकल्या, शिवाय अपक्षांचा पाठिंबा, इतकं असूनही संख्येनं अल्प असलेल्या फुटीर शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे, असं अनेकदा पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना वाटत असेल.
म्हणूनच चंद्रकांत पाटलांचं ‘मनावर दगड ठेवण्याचं’ विधान आलं असणार. यातून राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ निघणंही सहाजिक आहे.
“भाजप वरचढ असल्याचे दाखवण्यासाठी हे केलं जातंय, असा जो एक सूर आहे. तसं मला अजिबात वाटत नाही. कारण शिंदे गटातील आमदारांनाही याची कल्पना असेल की, भाजपच विद्यमान सरकारमध्ये मोठा पक्ष आहे.”
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकरही याच मताशी सहमत होतात की, पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याच्या उद्देशानेच ही विधानं झाल्याची दिसून येतात.
“भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विद्यामान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांसमोर ही विधान केलीत.
दोघेही संघटनेत काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आशावादी ठेवण्यासाठी अशी विधानं सहाजिक आहेत,” असंही मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.
 
Published By- Priya Dixit