नितीन सुलताने
गुजरातमधल्या राजकीय भूकंपानंतर आता महाराष्ट्रातही राजकीय बदलांच्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे या चर्चांना कारण ठरलंय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
औरंगाबादेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रावसाहेब दानवेंकडं पाहून भावी सहकारी असं म्हणताच, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे यानंतर पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य पूर्णपणे फेटाळून न लावता, येणारा काळच काय ते ठरवेल,असं म्हणत चर्चांना आणखी जागा शिल्लक ठेवली आहे.
ठाकरेंच्या या वक्तव्यापूर्वी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यात चर्चांना उधाण आलं होतं. पण शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सत्तेची नवी गणितं आखली जात असल्याच्या शक्यता व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे.
राज्यात खरंच अशाप्रकारे सत्तेची नवी समीकरणं पाहायला मिळतील का? या नेत्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? की ही उद्धव ठाकरे यांनी टाकलेली गुगली आहे? अभ्यासकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
एकत्र आलो तर...
शुक्रवारी राज्यातील राजकीय वर्तुळात, माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही पुन्हा एकदा युतीच्या चर्चा जोमानं सुरू झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच या चर्चेला तोंड फोडलं आहे.
औरंगाबादेत शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा सोहळा झाला. या सोहळ्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही संकेत दिले. त्यावरूनच चर्चांना सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या भाषणाची सुरुवात, "व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी..." या वक्तव्यानं केली.
विशेष म्हणजे त्यांनी, 'एकत्र आले तर भावी सहकारी' हे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडं पाहत केलं.त्यामुळं या चर्चांना अधिकच जोर आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही चर्चेला जागा ठेवणारं असंच वक्तव्य केलं. पत्रकारांनी त्यांच्या 'भावी सहकारी' या वक्तव्यावर त्यांना प्रश्न केला. त्यावर, "येणारा काळ काय ते ठरवेल.." असं उत्तर त्यांनी दिलं.
सत्ता मिळवण्याची घाई नाही-फडणवीस
दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लगेचच अशी काही शक्यता नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं,मात्र आज तसं होईल असं वाटत नसल्याचं फडणवीस म्हणाले.
"भारतीय जनता पार्टी, आम्हाला सत्ता पाहिजेच,अशा मानसिकतेमध्ये नाही.आम्ही सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करत आहोत.लोकांचे प्रश्न आम्ही मांडत आहोत."
"ते कशाप्रकारच्या लोकांबरोबर सरकार चालवत आहेत, हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं. हे सरकार कसं काम करतंय? त्यात किती भ्रष्टाचार होत आहे, याची जाणीव त्यांना झाली असेल,त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असावं,"असं फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनीही दिले संकेत
उद्धव ठाकरे यांच्या चर्चेचा संबंध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याशीही जोडला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी असंच संकेत देणारं वक्तव्य केलं होतं.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात, "मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल," असं विधान केलं होते. त्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य समोर आलं आहे.
मात्र, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं आहे. असं वक्तव्य करण्यामागं मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे समजायला मी मनकवडा नाही, असं ते म्हणाले.
आमचा मतदार एकच - दानवे
उद्धव ठाकरेंनी औरंगाबादेत रावसाहेब दानवेंसमोर हे वक्तव्य केलं. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना युती व्हावी ही जनतेची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.
"शिवसेना-भाजप समविचारी पक्ष असून राज्यातील जनतेलाही हा विचार मान्य आहे. आमचा मतदारही एकच आहे. त्यामुळे युती तुटल्याची खंत राज्यातल्या जनतेला वाटत आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो तर मतदारांना नक्कीच आनंद होईल," असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दानवे यांच्या काही कानगोष्टीही झाल्या. त्यावर बोलताना, "उद्धव ठाकरेंनी मला, मुंबईला येत जा, भेटत जा असं म्हटलं. काँग्रेसचा माणूस त्रास द्यायला लागला की, मी भाजपच्या नेत्याला बोलवत असतो," असं ते काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांसमोरच म्हणाल्याचंही दानवेंनी सांगितलं.
सरकार चालवत असताना मुख्यमंत्र्यांना सध्याच्या सहकाऱ्यांचे काही अनुभव आले असतील. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. त्यांनी शक्यता फेटाळलेली नाही, तशी आम्हीही फेटाळत नाही, असं म्हणत जशी वातावरण निर्मिती होईल, तसे निर्णय घेऊ असं दानवे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचं घोडं..
याचवेळी राज्यातील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही युती व्हावी अशी इच्छा असल्याचं सांगितलं. दोन्ही जुने मित्र आणि हिंदुत्ववादी पक्ष आहेत. जनतेलाही युती व्हावी असं वाटतं, असं ते म्हणाले.
युती झाली तर निश्चितच राज्याचा फायदा होऊ शकतो. केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त निधी मिळू शकतो. मात्र युती फिस्कटली त्याला मुख्यमंत्रिपदाचा विषय महत्त्वाचं कारण होता. त्यामुळं उर्वरित तीन वर्ष उद्धव ठाकरेच, मुख्यमंत्री राहणार असतील तर आम्ही दोन काय चार पावलं पुढं सरकू, असं सत्तार म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांनी पुढची तीन वर्ष तुम्हीच मुख्यमंत्री राहणार हा शब्द शिवसेनेला दिला, तर दोघांनी एकत्र यायला हरकत नाही," असं सत्तार यांनी स्पष्टपणे म्हटलं.
दावने यांनी मात्र दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्यावर निर्णय घेतील, असं स्पष्ट केलं.
भाजप नेत्यांचं युतीबाबत मत विचारलं असता, नेत्यांपेक्षा जनतेच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं असतं. त्यामुळं जनतेच्या मनात असेल तर तो दबाव पक्षाला नाकारता येत नाही, असंही दानवे म्हणाले.
ही तर केवळ करमणूक
राजकीय अभ्यासकांना मात्र या सर्व चर्चा पूर्णपणे निष्फळ असून केवळ गंमत-जंमत सुरू असल्याचं वाटत आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाईंनी तसंच मत व्यक्त केलं आहे.
मुळात भाजपचीच सध्या सत्ता हाती घेण्याची तयारी नाही. फडणवीसही स्पष्टपणे तसं बोलले आहेत. त्यामुळं आताच्या घडीला राज्यात सत्ताबदल होण्याची काही शक्यता नसल्याचं देसाईंनी म्हटलं.
"सध्याच्या घडीला युती होण्याची सूतरामही शक्यता नाही. सगळेच पक्ष केवळ गंमत जंमत म्हणून ही वक्तव्य करत आहेत," असं देसाई म्हणाले.
वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनीही सध्यातरी युती होण्याची काहीही शक्यता नसल्याचं मत स्पष्टपणे मांडलं आहे.
"गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांपासून खूप दूर गेले आहेत. अनिल देशमुखांसह सोमय्यांनी काढलेली भ्रष्टाचार प्रकरणं यामुळे त्यांच्यात वाढलेला दुरावा मोठा आहे. त्यामुळे हा केवळ एकमेकांची फिरकी घेण्याचा प्रयत्न असू शकतो," असं मत मेहता यांनी मांडलं.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ता मिळावी अशी भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे. पण त्यासाठी भाजपला शिवसेनेचे दोन तृतीयांश किंवा राष्ट्रवादीचे सगळे आमदार फोडावे लागतील. मात्र तेही सध्या शक्य नाही, असं देसाई म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांच्यात बैठका होत आहेत. मोदींच्या विरोधात एकवटण्याच्या चर्चा सुरू आहेत, अशा परिस्थितीत ही वक्तव्यं केवळ माध्यमांना चर्चा करण्याची संधी देण्यासाठी असल्याचं ते स्पष्टपणे म्हणाले.
मुंबई मनपा निवडणुकांवर अवलंबून
अद्वैत मेहता यांनी अशा प्रकारचे राजकीय बदल हे हे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांनंतरच होऊ शकतात असं मत व्यक्त केलं आहे. मुंबई मनपा ही शिवसेनेसाठी महत्त्वाची परीक्षा असेल, त्या निवडणुकांवर या सर्व गोष्टी अवलंबून असतील असं ते म्हणाले.
"कोरोना काळात मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. वेगळं व्यक्तिमत्व असलेला मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होत आहे. आरेचं वाचवलेलं जंगल आणि इतर काही कामांमुळं मुख्यमंत्र्यांचाही विश्वास वाढलेला आहे."
"मुंबई जिंकणं हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळं जसजशा मुंबई मनपा निवडणुका जवळ येतील, तसे हे प्रकार वाढणार आहेत. पण ठोस असं काही निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता अधिक आहे," असं मेहता म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिष्टमंडळाबरोबर मोदींची भेट घेतली तेव्हा मोदींशी स्वतंत्र चर्चाही केली होती. त्याशिवाय अधून मधून संजय राऊत मोदींचं कौतुक करत असतात. राजकारणात आपल्या इतर सहकारी पक्षांना दबावात ठेवण्याचा हा हातखंडा असतो. त्याच दृष्टीनं या वक्तव्याकडं पाहावं, असंही मेहता म्हणाले.
त्यामुळे सध्यातरी अशा प्रकारे लगेचच मोठे राजकीय बदल घडणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. मात्र, तसं असलं तरी राकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंही ते म्हणत आहेत.