शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (10:02 IST)

एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला जाऊन नेमकं काय साध्य केलं?

eknath shinde
गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदीराबाहेर मोठी पोलीस सुरक्षा होती. पावलोपावली कमांडो दिसत होते. मंदीराच्या बाहेर 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का स्वागता'चे होर्डींग्स लागले होते. मंदीर प्रशासनात काम करत असलेले पुजारी सकाळपासूनच तयारी करत होते. 
 
एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदीरात आल्यानंतर दर्शनासाठी उशीर होईल म्हणून गुवाहाटीत आलेले काही पर्यटक लवकर उठून मंदीरात आले होते. मुख्यमंत्र्यांचा 26 तारखेचा दौरा रात्रीच आला होता.
 
26 नोव्हेंबर. मुंबईतल्या दहशतवादी हल्याचा तो दिवस होता. सकाळी पोलीस मुख्यालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावून मुख्यमंत्री सहकुटुंब आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार, खासदारांसोबत गुवाहाटीला रवाना होणार होते.
 
180 जणांसाठी चार्टर्ड विमान बुक करण्यात आले होते. आमदार, खासदार सकाळीच विमानतळावर पोहचले होते. मुख्यमंत्री पोहचले की विमान निघणार होतं. साधारण 10 च्या सुमारास विमानाने गुवाहाटीकडे 'टेकऑफ' घेतला.
 
मुख्यमंत्र्यांना पोहचायला 1-1.30 वाजणार होता. ज्या मंदिरात एकनाथ शिंदे हे आमदार, खासदारांसह देवीच्या श्रध्देपोटी चार्टर्ड विमानाने येतायेत त्या मंदीराबाबत कुतूहल असणं साहजिक होतं.
 
एका दगडात कोरलेलं प्राचीन मंदीर बाहेरून भव्य आहे. मंदीर परिसरात प्रवेश केल्यानंतर तिथं शेकडो कबुतरं आणि बकरे दिसतात. काही कबुतरं अशीच सोडलेली तर काही टोपल्यांमध्ये विकण्यासाठी ठेवलेली होती. काही लोक हातात कबुतरं घेऊन फिरत होते. हे पाहताना या मंदीरात मागे बळी देतात अशी टीका ऐकली होती.
 
कामाख्या मंदीर प्रशासनाचे अध्यक्ष कविंद्र शर्मा यांना कबुतरं आणि ते म्हणाले, "हे शक्तीपीठ असल्यामुळे इथे कबुतरं आणि बकर्‍यांचे बळी देण्याची पद्धत आहे. ज्यांना बळी द्यायचा नाही ते मंदीर परिसरात देवीच्या चरणी कबुतरं किंवा बकरी अर्पण करून जातात. देवी सतीचा योनीचा भाग इथे पडल्यामुळे योनी कुंडाची पूजा या मंदीरात केली जाते."
 
भाजपचे नेतेही शिंदेंच्या दौऱ्यात
दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांचं विमान गुवाहाटी विमानतळावर उतरणार होतं. "कामाख्या देवीला जाऊन कोणाचा बळी देणार? मी ऐकलंय तिथे रेड्याचा बळी देतात," अशी टीका अजित पवारांनी केली होती.
 
एअरपोर्ट परिसरात एकनाथ शिंदेंचे 'कटआऊटस्' घेऊन 'आसामी शिवसैनिक' स्वागतासाठी पोहचले होते. आसाम पोलीसही तैनात होते. दीडच्या सुमारास आमदार, खासदार एअरपोर्टवरून बाहेर पडले.
 
पावणे दोनच्या सुमारास मुख्यमंत्री बाहेर आले. चाडेचार महिन्यांपूर्वी याच गुवाहाटीमध्ये 40 आमदारांसह बंड करून आलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून दाखल झाले होते.
सगळ्यांच्या गळ्यात 'गमछे' होते. माध्यमांशी बोलून बसेसमधून मुख्यमंत्री सर्व आमदार, खासदारांसह कामाख्या देवीच्या मंदीराकडे रवाना झाले. या नेत्यांमध्ये अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई हे मंत्री दिसले नाहीत. पण भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण, मोहीत कंबोज असे काही मोजके नेतेही दर्शनासाठी उपस्थित होते.
 
भाजपच्या नेत्यांनीही आम्ही दर्शनासाठी आल्याचं सांगितलं. पण साडेचार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी गुवाहाटीमधली जबाबदारी ही मोहीम कंबोज यांच्यावर दिली होती. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावरही भाजपचे नेते मोजके या सर्व आमदारांसह काय करत आहेत? खरंच दर्शनासाठी आले आहेत? व्यवस्था पाहण्यासाठी? की पुन्हा कुठल्या राजकीय वाटाघाटीसाठी हे प्रश्नांची पटतील अशी उत्तरं मिळाली नाहीत.
 
...आणि मुख्यमंत्री चिडले
साधारण 3 च्या सुमारास कामाख्या मंदीरात सर्वजण पोहचल्यानंतर एकनाथ शिंदेंना या दौऱ्याबाबत आम्ही विचारलं. तेव्हा ते म्हणाले, "आमची या देवीबाबत श्रध्दा आहे. राज्यात सरकार स्थापनेआधी देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो. सरकार स्थापनेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही मला आमंत्रित केलं होतं. त्यामुळे आज देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे."
 
कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार या अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता ते थोडे चिडले आणि म्हणाले, "जे लोक असा विचार करतात त्यांच्यावर मला बोलायचं नाही.”
त्यानंतर ते सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात पुढे निघून गेले. पोलिसांनी माध्यमांना बाहेरच रोखलं. आत दर्शनासाठी गेलेले नेते तासाभराने बाहेर येऊ लागले. उदय सामंत, प्रताप सरनाईक आणि काही नेत्यांनी दर्शन करून थेट परतीच विमान पकडलं.
 
साधारण दीड तासांनी मुख्यमंत्री मंदीराबाहेर आले. बाहेर आल्यावर बसमधून 'रेडीसन ब्लू' हॉटेलला रवाना झाले. पक्षाचे इतर नेतेही त्याच हॉटेलला थांबले होते. रात्री 8 वाजता आसामचे मुख्यमंत्री 'हिमंता बिस्वा सर्मा' एकनाथ शिंदेंना भेटणार होते. दिल्लीहून 'हिमंता बिस्वा सर्मा' गुवाहाटीत आले. साधारण दोन तास चर्चा केली.
 
दौरा धार्मिक की राजकीय?
पण या दौऱ्यातून साध्य काय झालं? याबाबत अधिक जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंना यांच्या मते, "धार्मिक दौरा तर होताच पण याबरोबरच आमदारांमधली अस्वस्थता, सरकारबद्दल सातत्याने होत असणारी टीका यावर सर्वांशी एकत्रित संवाद दौरा करून आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. या दौऱ्याला निश्चित राजकीय किनार होती."
लोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान या दौऱ्याचे विश्लेषण करताना म्हणतात, "एकतर आम्ही हिंदूत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला गेला. देशाचे पंतप्रधानही काशी विश्वनाथ मंदीराचं दर्शन मग पूजा असे 'इव्हेंट' सतत करत असतात. यातून लोकांमध्ये धार्मिक दौऱ्यांची चर्चा होते. इतर विषय मागे पडतात. तसचं काहीसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे केल्याचं दिसतंय.
 
“कधी ते शिर्डीला जातात, लगेच कामाख्या देवीला जातात. त्याचं नवस हा असेल तो भाग वेगळा. पण बाबा-बुवा, मंदीरं ही ठिकाणं अनेकदा वाटाघाटीचीही असतात. याआधी मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाणांनीही सत्यसाईबाबांसाठी पायघड्या घातल्या होत्या. तेही वादात सापडले होते.
 
"पण राज्याच्या राजकारणातले 90% राजकारणी हे त्यांच्या राजकारणासाठी देवदेवता, जोतिषी, बाबा-बुवा यांचा आधार घेताना दिसतात. त्यामुळे या दौऱ्याला पूर्ण धार्मिक दौरा म्हणता येणार नाही. यातून काही साध्य झालं की नाही, याचा लगेच निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही."
 
 
Published By- Priya Dixit