रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (23:17 IST)

लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्यावरून काय वाद सुरू झालाय?

लता मंगशेकर यांचं स्मृती स्थळ दादर येथील शिवाजी पार्क याठिकाणी उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे, तर शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मारक बनवावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
राम कदम म्हणाले, "शिवाजी पार्क याठिकाणी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. या ठिकाणी त्या पंचतत्त्वात विलिन झाल्या. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं स्मृती स्थळ शिवाजी पार्कवर बनवावं अशी मागणी मी केली आहे."
यासंदर्भात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. लता मंगेशकर यांचं स्मृती स्थळ भव्य बनवावं अशी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांची मागणी आहे असंही ते म्हणाले.
नाना पटोले यांनी आज (7 फेब्रुवारी) मंगेशकर कुटुंबाची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
 
"लता मंगेशकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं. जगभरातील लोकांना या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरणात राहिलं," असं ते म्हणाले.
 
शिवसेनेची भूमिका काय?
काँग्रेस आणि भाजपच्या या मागणीला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. या मुद्याचं राजकारण करू नका असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
"लतादीदी कायम स्मरणात राहतील. काहींनी त्यांच्या स्मारकाची मागणी केली आहे. परंतु त्या मागणीची गरज नाही. याचं राजकारण करू नका," असंही राऊत यांनी म्हटलं.
पुढे त्यांनी म्हटलं, "त्यांचं स्मारक करणं सोपं नाही. त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही त्याचा विचार करावा लागेल. देशाने याचा विचार करावा,"
 
लता मंगेशकर यांचं रविवारी (6 फेब्रुवारी) निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सिनेसृष्टीतील कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.