शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:05 IST)

मोदींच्या भेटीत काय चर्चा झाली? पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…

sharad panwar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी भेट का घेतली याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, मोदी यांची भेट घेण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमानुसार काम करीत नाहीत. राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेच्या १२ आमदारांसाठीची नावे पाठवली आहेत.

अद्याप त्यावर त्यांनी निर्य घेतलेला नाही. ही बाब प्रलंबित ठेवली आहे. मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला असे प्रलंबित ठेवणे अयोग्य असल्याचे मी मोदी यांना सांगितले असे पवार म्हणाले.भेटीचे दुसरे कारणही पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे. राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. राऊत हे पत्रकार आणि खासदार आहेत. या कारवाईद्वारे त्यांच्यावर अन्याय झाल्याची बाब पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
 
अन्य प्रश्नांवरही पवार यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्यात तिळमात्रही शंका नाही. तसेच, हे सरकार उत्तम काम करीत असल्याने निवडणुकीनंतरही महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असेही ते छातीठोकपणे म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत पवार यांनी शिवसेना खासदार राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून जोरदार कारवाई सुरू आहे. आता तर देशमुख यांच्यामागे सीबीआयच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. असे असतानाही पवार यांनी आपल्या दोन मंत्र्यांऐवजी राऊत यांच्याविषयी मोदी यांच्याकडे शब्द टाकला आहे. त्यामुळे ही बाब अनेकांना खटकली आहे. तसेच, यावरुन अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.