गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (12:15 IST)

जे काही भाजपच्या पोटात तेच कंगनाच्या मुखात

सध्या वाचाळ अभिनेत्री कंगना रनौत वरून राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. आता शिवसेने नंतर कॉँग्रेस महाराष्ट्र ने देखील वादात उडी घेतली आहे. 
 
“भारतीय जनता पक्षाच्या जे पोटात आहे तेचअभिनेत्री कंगनाच्या मुखातून गेल्या काही दिवसांपासून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा कंगनाला पुढे करून अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही,” असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
 
“मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे,” असे थोरात म्हणाले.
 
“ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. असे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळेकंगना प्रकरण काही दिवस् तरी तापणार हे उघड आहे.