जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी
मुंबई उपनगरातील जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली असून मंगळवारपासून सुरू होणार्या जेईई आणि नीट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. या प्रस्तावामुळे मुंबई उपनगरातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे, तर नीट परीक्षाही १३ सप्टेंबरला होणार आहे. या दोन्ही परीक्षेत महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून त्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. त्यावर रेल्वे मंत्र्याकडून सकारात्मकता दर्शवली आहे.