शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (14:40 IST)

.महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार ? जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार, पावसात खंड पडण्याची शक्यता

mansoon
काही दिवसापासून मोसमी वारे वाहू लागले असून निसर्ग नियमानुसार सात जूनला मृग नक्षत्रात पाऊस पडतो. तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात जूनला मोसमी पाऊस येणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधी पाऊस येणार, पावसाळ्यातील प्रत्येक महिन्यात किती आणि कसा पाऊस बरसणार याची मोठी उत्सुकता महाराष्ट्रवासियांना लागली आहे. आता यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने सविस्तर माहिती दिली आहे.
 
सध्या काही प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूर, सांगली सातारा भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असला तरी हा मोसमी पाऊस नाही. तर मान्सुन पुर्व पाऊस आहे. मात्र आता पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा बदलल्याने मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता आहे, तसे पुणे हवामान खात्याच्या वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
 
मोसमी पावसाचे केरळमध्ये २९ मे रोजी आगमन झाल्यानंतर आता पुढील काही दिवसांत त्याचे महाराष्ट्रातील आगमन होईल. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०३ टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे. कमाल तपमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर हा अंदाज आधारित आहे.
 
जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
 
मोसमी पावसाचा मुख्य प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य भारतात, जेथे शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे, तेथे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. त्यात राज्याचा काही भाग येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.
 
दरम्यान, येत्या चार आठवडय़ांसाठी पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे १० जूनपासून पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.