गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (10:09 IST)

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची जागा घेणारे संजय सिंह कोण आहेत?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शुक्रवारी मोठी घडामोड पाहायला मिळाली. या प्रकरणाची सूत्रं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आता संजय सिंह यांच्याकडे सोपवली आहेत.
 
संजय सिंह हे NCB मध्ये डीडीजी रँकवरील IPS अधिकारी आहेत.
 
आतापर्यंत या प्रकरणाचा तपास NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे करत होते. पण आता त्यांना हटवणं म्हणजे ही त्यांच्याविरोधातली दंडात्मक कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून NCB अधिकारी समीर वानखेडे हे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी होते.
 
पण, दुसरीकडे समीर वानखेडे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं असून मला हटवण्यात आलेलं नाही, तपास माझ्याकडे नव्हताच, असं ते म्हणाले आहेत.
 
NCB कडून यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, NCB महासंचालकांनी NCB मुख्यालयातील ऑपरेशन ब्रांचच्या अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं आहे. हेच पथक NCB मुंबई विभागीय पथकाच्या 6 प्रकरणांचा पुढील तपास करेल. या प्रकरणांचे संबंध रांष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही जुळलेले आहेत. त्यामुळे NCB ची ऑपरेशन ब्रांच या प्रकरणांचा आणखी खोलात जाऊन तपास करेल, असं NCB ने म्हटलं.

याशिवाय, कोणत्याही अधिकारी अथवा अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरून हटवण्यात आलं नाही. जोपर्यंत स्पष्ट आदेश देण्यात येत नाही, तोपर्यंत ते ऑपरेशन ब्रांचच्या तपासात सहकार्य करत राहतील. असंही NCB ने म्हटलं.
 
संजय सिंह कोण आहेत?
संजय सिंह हे ओडिशा कार्यक्षेत्राचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी CBI आणि नंतर NCB मध्ये सेवा बजावली.
आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला. ड्रग्जशी संबंधित प्रकरणांच्या तपासामध्ये संजय सिंह यांना चांगला अनुभव असल्याचं म्हटलं जातं.
संजय सिंह हे सध्या NCB मध्येच उपसंचालक (ऑपरेशन्स) पदावर कार्यरत आहेत. सिंह यांनी यापूर्वी ओडिशा ट्विन सिटीमध्ये विविध पदांवर काम केलं. पण ट्विन सिटीत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कामाची सर्वात जास्त चर्चा होते.
 
केंद्रीय तपास संस्थांमध्ये काम करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2008 पासून ते 2015 पर्यंत त्यांनी CBI मध्ये उपसंचालक पदावर काम केलं होतं.
 
2010 मध्ये ते CBI मध्ये कार्यरत असताना कॉमनवेल्थ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पथकाचं निरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
 
ओडिशा ट्विन सिटीमध्ये त्यांनी अँटी ड्रग्ज पथकाचं नेतृत्व केल्यानंतर NCB मध्ये त्यांची पोस्टींग होणं, ही महत्त्वाची घटना होती. त्यांनी 2020 मध्येच NCB मध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.
 
यासोबतच 2020 मध्ये NCB मध्ये त्यांनी काम सुरू करण्यापूर्वी गृहमंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं.
 
संजय सिंह यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची अनुशासनात्मक किंवा अपराधिक स्वरुपाची कार्यवाही प्रलंबित नाही. तसंच अँटी करप्शन डायरेक्टरेटकडेही त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचं प्रकरण दाखल नाही, असं या पत्रात म्हटलं होतं.
 
समीर वानखेडे काय म्हणाले?
NCB च्या या निर्णयानंतर समीर वानखेडे यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली.
 
आपण अजूनही आपल्या पदावर कायम आहोत, असं वानखेडे म्हणाले.
ते म्हणतात, मला तपासातून हटवण्यात आलेलं नाही. या प्रकरणांचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून व्हावा, अशी याचिका मी कोर्टात दाखल केली होती.
 
त्यामुळेच आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणांचा तपास दिल्ली NCB च्या एका विशेष पथकाकडून केला जाईल.
 
हा मुंबई आणि दिल्लीच्या NCB पथकांमधील एक प्रकारचा समन्वय आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
नवाब मलिक यांनी दिली प्रतिक्रिया
NCB च्या या निर्णयावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली.
"आर्यन खानचं अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणात समीर दाऊद वानखेडे यांची चौकशी विशेष पथकाकडून व्हावी अशी मागणी मी केली होती. आता राज्य आणि केंद्रात दोन विशेष पथकं बनवण्यात आली आहेत. आता वानखेडे यांच्या आयुष्यातील संशयास्पद पैलू उघड करून त्यांच्या खासगी सेनेबाबत जगाला माहिती कोण देईल, ते पाहूयात," असं त्यांनी म्हटलं.
 
राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळलं
ऑक्टोबरचा पूर्ण महिना आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्याचं दिसून आलं.
 
2 ऑक्टोबरला क्रूज ड्रग्ज प्रकरण समोर आलं. त्यावेळी समीर वानखेडे कसे कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत, याविषयी चर्चा होत होती.
आता हीच चर्चा वानखेडे हिंदू आहेत की मुस्लीम, त्यांचे कपडे किती महाग यांच्याविषयी सुरू झाली आहे.
 
या सर्व चर्चांना केंद्रस्थानी आणण्याचं काम मंत्री नवाब मलिक यांनी केलं. त्यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण बनावट असल्याचाही आरोप केला आहे.
 
गेला महिनाभर ते रोज कोणता ना कोणता व्हीडिओ किंवा फोटो ट्विट करून विविध प्रकारचे दावे किंवा आरोप करताना दिसून आले.
 
ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मलिक यांनी सर्वप्रथम 6 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती.
 
NCB जाणुनबुजून बॉलीवूड आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी लावला होता.
 
सुरुवातीला त्यांनी NCB च्या छाप्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी 2 ऑक्टोबरच्या रात्रीचा व्हीडिओ ट्विट करून खासगी गुप्तहेर किरण गोसावी आणि भाजप नेते मनिष भानुशाली हे त्या छाप्यात का सहभागी होते, असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
नंतर ते या प्रकरणात साक्षीदार असल्याचं NCB ने स्पष्ट केलं होतं.
 
पण नंतर साक्षीदार आरोपींना पकडून नेऊ शकतो का, त्याच्यासोबत फोटो घेऊ शकतो का, हा प्रश्न पुढे आला.
 
नवाब मलिक यांच्या आरोपांची ही तर सुरुवात होती. पुढे त्यांनी याप्रकरणात अनेक आरोप केले. त्यामध्ये काही आरोप हे खासगी स्वरुपाचेही होते.