सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (21:53 IST)

तेव्हा सरकारनं भाव वाढवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? शेतकरी संघटनेच्या नेत्याचा सरकारला सवाल

महाराष्ट्रासह विविध राज्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका टोमॅटोसह इतर भाज्यांना बसला आहे. राज्यासह देशभरात टोमॅटोचे भाव वाढले आहेत. पाच ते दहा रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आज जवळपास 150 ते 160 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
 
टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे शहरी भागात ओरड सुरु झाली आणि सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पण जेव्हा टोमॅटोचे भाव पडून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर होता, भरल्या शेतात बकऱ्या सोडत होता तेव्हा सरकारला जाग का आली नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.
 
तेव्हा सरकारनं भाव वाढवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? हा खऱ्या आमचा प्रश्न असल्याचे तुपकर म्हणाले. टोमॅटो ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळं त्याचे भाव वाढल्यानं एवढी ओरड करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त जावे यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
 
टोमॅटोच्या वाढलेले दर सरकारच्या डोळ्यात खुपायला लागले आहेत. ज्यावेळी राज्यात टोमॅटोचे दर पडले होते, त्यावेळी शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर होते, त्यावेळी सरकार कुठे होते असा सवाल तुपकरांनी केला.
 
टोमॅटो खाल्ले नाही म्हणून जगात कधी एकही माणूस मेला नाही. टोमॅटो ही जीवनावश्यक वस्तू नाही. ज्याला वाटेल त्यानं खावे असे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना चांगला दर मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे तुपकर म्हणाले.
 
टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही दिवसांपूर्वी भाव पूर्ण कोसळले होते. लागवड आणि दळणवळण खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो जनावरांना सोडला होता. ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करत पीक जपले त्या शेतकऱ्यांना टोमॅटो मालाने प्रतिकिलोला दीडशे रुपये बाजारभाव मिळवून दिला आहे. सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे, त्यांनी शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले असून उन्हाळी टोमॅटोची लागवड केल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor