शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (11:10 IST)

महाराष्ट्राच्या काही भागाला मान्सून हुलकावणी का देतो? पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय?

monsoon
जूनमध्ये महाराष्ट्र आणि भारतीय उपखंडात नैऋत्य मान्सूनची सुरुवात होते. तेव्हा पुण्यात राहणाऱ्या सोलापूर आणि मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना गावाहून आई-वडिलांचा फोन आला की एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘बाळा, पुण्यात पाऊस पडतोय का?’ समोरून उत्तर ‘होय’ असं आलं की लगेच दुसरा प्रश्न असतो. ‘मग आपल्याकडं का पडत नाही? आम्ही काय वैर केलंय या पावसाचं?’
 
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर धो-धो पाऊस पडत असताना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग मात्र पावसावाचून कोरडा जातो.
 
जून महिन्यात काही ठिकाणी अनेकदा पेरणी करण्याइतपतही पाऊस पडत नाही.
 
मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्यासाठी जुलै किंवा ऑगस्ट उजडावा लागतो. पण असं का घडतं?
 
या घटनेकडे शेतकऱ्यांनी कसं पाहायला हवं? जाणून घेऊयात. पण त्याआधी आपण थोडक्यात मान्सूनची गोष्ट थोडक्यात समजून घेऊ.
 
भारतीय उपखंडात बरसणारा मान्सून ही एक जागतिक पातळीवरची घटना आहे. केरळ आणि कोकणातून भारतात पडणाऱ्या रिमझिम पावासाची खरी सुरुवात विषुववृत्तीय वाऱ्यांमधून होते.
 
विषुववृत्ताला समांतर वाहणारे वारे आफ्रिकेच्या द्वीपकल्पीय प्रदेशाला धडकतात आणि तिथेही पाऊस पडतो. त्यानंतर पश्मिकेडून पूर्वेकडे या दिशेने वाहणारे वारे त्यांची दिशा बदलतात. ते पुढे मादागास्करहून ऑस्ट्रेलियाकडे सरकत असताना त्यांची दिशा नैऋत्य होते, म्हणजे दक्षिण-पश्चिम होते.
 
हेच वारे अंदमान मार्गे केरळ, कोकण आणि भारतात पाऊस घेऊन येतात.
 
भारतीय उपखंडाकडे मान्सून आगेकूच करतो, तेव्हा त्याच्या दोन शाखा निर्माण होतात. एक अरबी समुद्राकडे आणि दुसरी बंगालच्या उपसागराकडून पुढे भारतीय उपखंडात पसरते.
 
या दरम्यान, मात्र महाराष्ट्रातील काही प्रदेशांत पाऊस फार कमी पडतो. या भागाला त्याला पर्जनछायेचा प्रदेश म्हटलं जातं. ते आता आपण सजमून घेऊयात.
 
पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय?
तुम्ही जर साताऱ्याचे रहिवाशी असाल तर अनेकदा असं होतं की सातारा शहरात दमदार पाऊस होतो. पण माण-खटाव आणि जवळच्या परिसरात क्वचितच चांगल्या पावसाची हजेरी लागते.
 
कारण हा परिसर पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. अशीच घटना सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेशात होते.
 
जूनमध्ये बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वारे कोकणातून पुढे सरकते तेव्हा त्यांची टक्कर सह्याद्री पर्वतरांगांशी होते.
 
तेव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात विशेषत: घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडतो. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा अशा ठिकाणी तर विक्रमी पाऊस पडतो. पण तिथून 100 किमी दूरवरच्या प्रदेशात त्याचक्षणी ठिपकाही पडत नाही.
 
कारण मोसमी वारे पुढे सरकतात, पण तेव्हा त्यातील बाष्प कमी होतं आणि ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस अत्यल्प प्रमाणात हजेरी लावतो.
 
हा प्रदेश पर्जनछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे ही घटना अगदी स्पष्टपणे दिसून येते, असं पुण्यातील भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
महाराष्ट्र राज्य हे चार प्रदेशांमध्ये विभागले आहेत. यामध्ये किनार्‍यापासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ.
 
यापैकी 30% पेक्षा जास्त भाग पर्जन्यछायेखाली येतो. मराठवाडा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या 8 जिल्ह्यांचा समावेश होतो.
 
याशिवाय सोलापूर जिल्हा, सातारा जिल्ह्याचा काही भागही पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो.
 
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत सरासरी पर्जन्यमान कमी आहे आणि ते वारंवार अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी अनेकदा दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होते.
 
याचा अर्थ पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस पडतच नाही, असं नाही.
 
भारतात साधारण जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो. एरव्ही सामान्यतः सप्टेंबरच्या मध्यावर वायव्य भारतातून म्हणजे राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. यालाच इंग्रजीत 'मॉन्सून विड्रॉवल' असं म्हटलं जातं.
 
नेमकं याच काळात महाराष्ट्रातील पर्जनछायेच्या प्रदेशात पाऊस पडतो. पण परतीचा पाऊसही लांबणीवर गेला तर शेतकऱ्यांना रबी हंगामातली पेरणीही उशिरा करावी लागते.
 
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूननं महाराष्ट्रातून पूर्णतः माघार घेतलेली पाहायला मिळते.
 
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत. पृथ्वी 23.5 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
 
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
 
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो. हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं.
 
मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास परिस्थिती निर्माण करते. भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा आहे, उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्यापर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
 
परिणामी मादागास्कर ओलांडून हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात.
 
या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
 
ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं आणि हेच वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
 
Published By- Dhanashri Naik