गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (20:47 IST)

पावसाचा अंदाज का चुकतो? रेड अलर्ट दिल्यावर पाऊस कुठे गेला?

8 जुलैला मुंबईत धो - धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या. 9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली.
आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं? अंदाज का चुकतात?
पावसाचा अंदाज व्यक्त करणं कशामुळे इतकं कठीण होतं?
सगळ्यात आधी काही मूलभूत गोष्टी समजून घेऊ.
 
हवामानाचा अभ्यास करून अंदाज वर्तवण्याचं काम करतो - भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department)
 
या हवामान विभागाच्या ठिकठिकाणी वेधशाळा (Observatory) आहेत जिथून त्या त्या भागासाठीचा अभ्यास केला जातो.
 
उदाहरणार्थ मुंबईत दोन वेधशाळा आहेत - कुलाबा आणि सांताक्रूझ.
 
IMD च्या वेबसाईटवरील माहितीनुसार भारतामध्ये 39 रेडिओसाँड्स आणि 62 पायलट बलून ऑब्झर्व्हेटरीज आहेत.
 
तर या वेधशाळा आणि उपग्रहांकडून मिळणारी माहिती (Satellite Data) यावरून हवामानाचा अंदाज बांधला जातो.
 
तो साधारण तीन प्रकारचा असतो.
 
Nowcast - पुढच्या 3-4 तासांचा अंदाज
Short Term Forecast - पुढच्या 3-5 दिवसांचा अंदाज
Long Term Forecast - मोठ्या कालावधीसाठीचा अंदाज. एकूणच मान्सून कसा असेल, याचा अंदाज या प्रकारात येतो.
हवामानाचा अंदाज कसा मांडला जातो?
हवामान ही एक क्लिष्ट गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक घटकांचा, परिस्थितींचा (conditions) एकमेकांवर आणि एकूणच वातावरणावर परिणाम होत असतो. याचंच विश्लेषण हवामान अभ्यासक करत असतात.
अवकाशातल्या उपग्रहांद्वारे मोठ्या भूभागातली हवामानाची परिस्थिती कळत असते. पण विशिष्ट जागेसाठीचा अंदाज बांधला जातो तो हवामान विभाग सोडत पांढऱ्या फुग्यांच्या मदतीने.
 
या फुग्यांना बांधलेल्या यंत्रांना रेडिओसाँड्स म्हणतात. यामध्ये Weather Sensors असतात. फुग्यांसोबत हे यंत्र किमान 40 किलोमीटर्स वर जातं आणि जमिनीपासून ते या 40 किलोमीटर्स पर्यंतचं तापमान, आर्द्रता (Humidity), हवेचा दाब (Air Pressure), वाऱ्याची दिशा आणि वेग ही माहिती हा फुगा पाठवत राहतो.
 
हे सगळे असे घटक आहेत ज्यात एकामध्ये बदल झाला तरी त्याचा हवामानाच्या एकूण परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो.
जीपीएस प्रणालीद्वारे हे अपडेट्स गोळा केले जातात. ही माहिती विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठीही महत्त्वाची असते.
 
जगभरातल्या वेधशाळा दिवसातून दोनदा, ठरलेल्या वेळी असे बलून्स सोडत असतात.
 
त्याशिवाय आकाशात उडणारी विमानं आणि समुद्रातील जहाजांवरील निरीक्षणांतूनही हवामानाची माहिती गोळा होत असते.
 
स्थानिक पातळीवर सर्वात महत्त्वाचं ठरतं ते डॉप्लर रडार. हे रडार विद्युत चुंबकीय लहरींद्वारे वातावरणाची सध्याची परिस्थिती काय आहे याची माहिती जमा करतं.
या माहितीचं विश्लेषण करून हवामानाचा अंदाज बांधला जातो. किती पाऊस पडला याचीही मोजणी वेधशाळा करते आणि याशिवाय ठिकठिकाणची ऑटोमॅटिक रेन फॉलिंग स्टेशन्सही किती पाऊस होतोय याची माहिती गोळा करत असतात.
 
आधुनिक हवामान यंत्रणांमध्ये AI चा वापरही विश्लेषणासाठी, अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जाऊ लागलाय.
 
हवामानाचा अंदाज का चुकतो?
भारत विषुववृत्ताजवळ असणारा ऊष्ण कटिबंधातला (Tropical) देश आहे. इथे वेगवेगळ्या प्रदेशांतलं हवामान वेगवेगळं असतं. त्यातही मान्सूनची हवामान प्रणाली ही अंदाज वर्तवण्यासाठी क्लिष्ट असते.
 
भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक डॉ. रंजन केळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मान्सूनचा संबंध हिंदी महासागराशी आहे. कारण मान्सून हा लोकल प्रकार नाही. ती वैश्विक स्तरावरची प्रक्रिया आहे. संबंध युरेशियाचा जमिनीचा खंड आणि संबंध हिंदी महासागर यांच्याशी जोडलेली ही प्रक्रिया आहे. आपण दुसऱ्या देशात पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एकाच प्रकारचं हवामान असतं. युरोप, इंग्लंड, अमेरिकेत 365 दिवस Westerly म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहत असते. त्याच्यामुळे तिथे अंदाज देणं फार सोपं असतं. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही परदेशात गेलो होतो, तिथे त्यांनी सांगितलं 4.35 वाजता पाऊस पडेल आणि तो पडला. आपल्याकडे तसं का होत नाही, हा प्रश्न विचारला जातो.
 
"उत्तर हे आहे, की आपल्याकडची जी हवा आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. ती खालून वर जाते. जिला इंग्लिशमध्ये कन्व्हेक्शन म्हणतात. आपले ढग एका ठिकाणी निर्माण होतात आणि तिथेच त्यांचा पाऊस पडतो. हा एक फार मोठा फरक आहे.
 
आपण सांगू शकत नाही की अमक्या ठिकाणचा ढग आणखी 10 मिनिटांनी तमक्या ठिकाणी जाईल. हा फार मोठा फरक आहे. आणि दोन-तीन दिवसांनी तो जाणं शक्य नाही कारण ढगांचं आयुष्यमानच काही तासांचं असतं. त्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावरची जी प्रक्रिया आहे तिचा स्थानिक स्वरूपात अंदाज द्यायचा हे आपल्यापुढे मोठं आव्हान आहे."
 
भारतातल्या हवामान खात्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे का?
हवामान विभागाकडची यंत्रणा अत्याधुनिक असण्यासोबतच ती पुरेशा प्रमाणात, ठिकठिकाणी उपलब्ध आणि कार्यरत असणंही महत्त्वाचं आहे. अमेरिकेमध्ये संपूर्ण देशभर पसरलेली 155 पेक्षा अधिक रडार्स आहेत. तर भारतामध्ये सध्या 35 रडार आहेत.
हवामान केंद्रांची - वेधशाळांची संख्या वाढली, ती फक्त शहरांत न राहता ग्रामीण भागांतही स्थापन झाली, तर त्याचा फायदा हवामानाचे अंदाज व्यक्त करण्यासाठी होईल.
 
यासगळ्यासोबतच वेळेमध्ये हे अलर्ट्स लोकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणाही विकसित करणं महत्त्वाचं आहे.
 
याबद्दल बोलताना डॉ. रंजन केळकर सांगतात, "कोणतीही गोष्ट सुधारण्याकरता हल्ली एक कॉमन उपाय सांगितला जातो - नवीन यंत्रणा उभारायची. पण यंत्रणेमधून सगळ्या गोष्टी उलगडतात असं नाही. कारण निसर्गाची रहस्यं प्रत्येक वेळी नवीन नवीन रुपात आपल्यासमोर उभी राहतात. आणि आपण एक रहस्य उलगडलं की दुसरं तयार असतं. निसर्ग आपल्याला आव्हान देतो - पहा, हे पण शोधून काढा. प्रत्येक घटनेकरता आपण जर एक एक यंत्रणा उभारायला लागलो, तर त्यात काही वाईट नाही. पण त्याच्यातून आपल्याला रहस्यांचा उलगडा होईलच, असं नाही."
 
भारतीय हवामान खात्याकडील तंत्रज्ञानाबद्दल बोलताना डॉ. केळकर म्हणाले, "जागतिक स्तरावरती हवामान शास्त्रामध्ये आपलं तंत्रज्ञान कुठेही कमी नाही, असं मी अभिमानाने म्हणू शकेन. कारण आपल्या डेटाची जगभरातल्या हवामान शास्त्रज्ञांसोबत देवाणघेवाण केली जाते. आपला डेटा चुकीचा असेल तर दुसरे लोक का घेतील? आपला डेटा जगभर मान्य केला जातो, याचा अर्थ जी व्यवस्था आहे ती अद्ययावत आहे. अर्थात तंत्रज्ञान नेहमी पुढे सरकत असतं आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे
 
Published By- Priya Dixit