उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता LIVE येणार, राजीनामा देणार का?
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जनेतशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे जनतेशी थेट बोलणार आहेत.
शिवसेनेनं प्रतोद म्हणून जारी केलेल्या आदेशाला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवत, स्वत:चा वेगळा आदेश जारी करत, रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून नेमलं. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखी धार आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असतानाच, उद्धव ठाकरे बोलणार आहेत.
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडावर आणि राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
"शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहे," असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयानं केलं आहे.