शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:28 IST)

‘लस महोत्सव नक्की करू पण…’ आधी लस तर द्या- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘आम्ही महोत्सव करू. आधी लस तर द्या असे पाटील म्हणाले.
 
राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर जयंत पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले, ‘लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्सव करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला. तसेच लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र, केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी दिसत आहे, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्राची कोरोना लसींची मागणी सुमारे 40 ते 50 लाख होती. मात्र, केंद्राकडून फक्त साडेसतरा लाख लसींचा पुरवठा करण्यात आला. या लसी लगेच संपतील. पंतप्रधान मोदी यांनी जे जे सांगितले ते ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही तेही केले. त्यावर टीका केली नाही. मात्र, आता देशात कोरोना लसीचा पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.