रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (20:18 IST)

10वी आणि 12वीच्या परिक्षाही पुढे ढकलणार !

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर MPSC परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता नियोजित 10वी आणि 12वीच्या परिक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी "ट्विटर"वरून सांगितले.
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10वी आणि 12वीच्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेणे अशक्य दिसत असल्याने परिक्षा ऑनलाईन घेता येईल का? यादृष्टीने आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पालक यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांची मते जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीची प्राथमिकता ही तुमच्या आरोग्याच्या रक्षणाची आहे. त्यामुळे या परिक्षा घेतानाही तुमचे संरक्षण कसे करता येईल याबाबतची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
 
यासंदर्भात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकाळी ट्विट करत राज्यातील 10वी आणि 12वीच्या परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही जणांनी त्यांच्याकडे मागणी केल्याची माहिती दिली. तसेच यासंदर्भात मंत्रिमंडळातील सहकारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना यासंदर्भात कळविणार असल्याचे सांगत परिस्थिती पाहून त्या योग्य निर्णय घेतील असे सांगितले.