गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:27 IST)

सिंगेश्‍वर - शिवमंदिर

बिहारातल्या साहरस जिल्ह्यात सिंगेश्‍वर नावाचे एक शिवस्थान-शिवमंदिर आहे. दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी ऋष्यश्रृंग   मुनीने या शिवाची स्थापना केल्याचे सांगतात. या देवस्थानाबद्दलची कथा अशी -
 
भगवान शिव एकदा श्लेष-आत्मक नावाच्या अरण्यात जायला निघाले, तेव्हा 'मी कुठे गेलोय ते कुणाला सांगू नकोस,' असे ते नंदीश्‍वराला बजावून गेले. ब्रह्म व विष्णू यांच्यासह इंद्र शिवाला भेटायला आले, तेव्हा नंदीश्‍वराला त्यांनी शिवाचा ठावठिकाणा विचारला, तर त्याने अर्थातच सांगितले नाही. मग ते शोधत शोधत श्लेष-आत्मक अरण्यात गेले. शिवांनी मुद्दाम हरणाचे रूप घेतले होते. तरीसुध्दा देवमंडळींनी त्यांना ओळखले व त्यांना पकडले. इंद्राने शिंगे पकडली, विष्णूने पाय पकडले, तर ब्रह्मदेवाने त्यांच्या अंगाला विळखा घातला. तरीपण त्यांना हिसडा देऊन हरीण त्यांच्या हातून निसटले. इंद्राच्या हातात मोडके शिंग तेवढे राहिले. त्याचेही तीन तुकडे झालेले होते. आता काय करणार? एवढय़ात आकाशवाणी ऐकू आली, 'देवांनो, शिव काही तुमच्या हाती लागणार नाही. शिंग हाती आलेय, तेवढय़ावरच समाधान माना.' मग शिंगाचा एक तुकडा इंद्र स्वर्गात घेऊन गेला. दुसर्‍या तुकड्याची ब्रह्मदेवाने तिथेच स्थापना केली. तिसरा तुकडा विष्णूने लोकांच्या कल्याणाकरिता पृथ्वीवरच स्थापला. पुढे मग त्याला सिंगेश्‍वर नावाने ओळखले जाऊ लागले. महाशिवरात्रीनिमित्त सिंगेश्‍वराची मोठी यात्र भरते.