बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By संदीप पारोळेकर|

अडखळत का होईना मुंबई धावली!

PR
PR
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलची 'वेळापत्रकानुसार' धावणे, ही ख्याती असली तरी त्याला मात्र 2009 वर्षात बट्टा लागला. रूळावरुन लोकल घसरणे... ओव्हरहेड वायरी तुटल्याच्या घटना...रूळ ओलांडताना होणारे अपघात...कर्मचार्‍यांचा संप...पाईप लाईन लोकलवर कोसळणे...तर चालती लोकल बंद पडून जाम लागणे, अशा अनेक कारणांमुळे कित्येकदा 'मुंबई लोकल'सह मुंबईकरांचा खोळंबा झाला आणि 2009 वर्ष सरले....

2009 वर्षांत मुंबई लोकलमागे जणू अपघाताचे 'शुक्लकाष्ट' लागले होते, असेही म्हणायला हरकत नाही. त्याचा परिणाम मात्र लोकलने दररोज प्रवास करणार्‍या 60 लाख प्रवाशांच्या वेळापत्रकावर झाला होता. घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईत लोकल गाड्यांचे मोठे महत्त्व आहे. या गाड्यांच्या वेळापत्रकावरच येथील लाखो चाकरमान्यांचे वेळापत्रक अवलंबून असते.

चकाचक दिसणार्‍या जर्मन बनवटीच्या लोकलने 2009 या वर्षांत दगा द्यायाला सुरवात केली. नव्याने दाखल झालेल्या लोकल निकृष्ट दर्जाच्या आहेत, त्याचा चांगला प्रत्यय प्रवाशांना यंदा आला. निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रिक मोटर, त्यामुळे वारंवार नादुरुस्त होणार्‍या पेन्टोफॅनमुळे ओव्हरहेड वायर तुटण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, हे खुद्द कारशेडमधील तंत्रज्ज्ञांनी मान्य केले आहे.

PR
PR
दरम्यान, लोकलचे चालक (मोटरमन) यांनी अचानक फुकारलेल्या संपाचा फटका ही प्रवाशांनाच बसला होता. कारण ते या संपाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करून मोटरमनच्या आंदोलनाची माहिती प्रवाशांपासून लपविली होती. त्यामुळे प्रवाशांना जी कसरत करावी लागली, ती त्यांच्या कायमचीच लक्षात राहणार आहे. काहींना ऑफिसातच रात्र काढावी लागली होती तर काहींना नोकरीवर पोहचण्याची व घरी येण्याची वेळ पाळता आली नव्हती.

मुळात लोकल गाड्यांची संख्या वाढत आहे व त्यांना हाकणारे 'सारथी' (मोटरमन) मात्र, आहे तेवढेच आहेत. त्यांना ओव्हरटाईम करून रेल्वेची वेळ काढून न्यावी लागत आहे. अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढणार नाही‍ तर काय? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जाणे स्वाभाविक आहे.

PR
PR
या वर्षात ओव्हरहेड वायर वारंवार तुटणे व नादुरूस्त रेल्वेचे सांधे हे लोकलच्या झालेल्या लहान- मोठे अपघातास कारणीभूत आहे. या अपघातांमुळे 'वेळापत्रक' विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. सीएटीत प्रवेश करणारी लोकल फलाटावर आदळणे, माटुंग्या दोन लोकलची टक्कर होणे तर ठाण्याच्या कोपरी पुलावरील पाण्याची पाईपलाईन मुंबईच्या लोकलवर कोसळून झालेल्या अपघातात दोन मोटारमनवर मृत्यू ओढविला होता. या अपघाताचा तपास अजून फाईलबंदच आहे.

एकूणात 2009 वर्ष हे 'मुंबई लोकल'सह मुंबईकरांचे 'टाइम' खराब करणारे वर्ष ठरले. आगामी येणार्‍या 2010 या वर्षात मुंबई लोकलसह मुंबईकरांच्या मागची 'ईडापिडा' जाओ अशीच आपण प्रार्थना करू या..!