शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 एप्रिल 2022 (14:43 IST)

साईसच्चरित - अध्याय २०

sai satcharitra chapter 20
॥ श्रीणगेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
ॐ नमो जी गुरु मानससरा । प्रसादवाक्यमुक्ताकरा । अनन्यभक्त - मराळनिकरा । चरणीं थारा तुजपाशीं ॥१॥
सदाश्रया महा उदारा । घालूनि प्रसाद मुक्तचारा । देऊनि निजविश्रांति आसरा । येरझारा चुकविसी ॥२॥
काय तो साई सिद्धाश्रम । दर्शनें निवे संसारश्रम । निकटवर्ती भवभ्रम । दवडी अविश्रम सहवासें ॥३॥
साई मूळ निराकार । भक्तकाजालागीं साकार । करोनि मायानटीचा स्वीकार । खेळला साचार नट जैसा ॥४॥
ऐसिया साईस आणूं ध्यानीं । क्षणभर जाऊं शिरडीस्थानीं । दोनप्रहरच्या आरतीमागुनी । लक्ष लावूनि पाहूंया ॥५॥
माध्यान्हीं आरतीपाठीं । येऊनि मशिदीच्या कांठीं । महाराज अति कृपाद्दष्टीं । उदी वांटीत भक्ताम्स ॥६॥
भक्तही प्रेमळ उठाउठी । घालीत समचरणीं मिठी । उभ्यानें मुख न्याहाळितां द्दष्टी । भोगीत वृष्टि उदीची ॥७॥
बाबाही भरभरोनि मुष्टी । घालीत भक्तांच्या करसंपुटीं । अंगुष्ठें लावीत तयांच्या ललाटीं । प्रेम पोटीं अनिवार ॥८॥
“जा भाऊ जा जेवावयास । जा अण्णा जा तूं खा सुग्रास । जा अवघे जा निजस्थानास” । प्रत्येकास वदत ते ॥९॥
आतां जरी तें पाहूं न मिळे । परी ते सर्व गतसोहळे । शिरडीस त्या त्या स्थानीं त्या त्या वेळे । द्दढ ध्यानबळें दिसतात ॥१०॥
असो ऐसें करूनि ध्यान । अंगुष्ठापासूनि मुखावलोकन । प्रेमें घालूनि लोटांगण । कथानुसंधान चालवूं ॥११॥
गताध्यायाचिया अंतीं । कथिलें हेतें श्रोतयांप्रती । कीं बाबांहीं मोलकरिणीहातीं । अर्थ श्रुतीचा उकलविला ॥१२॥
ईशावास्य - भावार्थबोधिनी । आरंभिली होती गणुदासांनीं । आशंका उपजतांच सद्नुरुचरणीं । घातली नेऊनि शिर्डीस ॥१३॥
बाबा तैं वदले जें वचन । तुझ्या या शंकेचें निवारण । करील काकांच्या घरची मोलकरीण । जाशील परतोन ते समयीं ॥१४॥
तेंच कीं सांप्रत कथानुसंधान । आतां येथूनि चालवूं आपण । श्रोतीं होइजे दत्तावधान । होईल श्रवण अविकळ ॥१५॥
संस्कृत भाषानभिज्ञार्थ । ईशावास्योपनिषदर्थ । ओंवींद्वारा पदपदार्थ । संकलितार्थ विवरावा ॥१६॥
ऐसी आस्था धरोनि मनीं । ईशावास्य - भावार्थबोधिनी । प्राकृत भाषा सुगम साधनीं । गणुदासांनीं आरंभिली ॥१७॥
गूढार्थप्रचुर हें उपनिषद । भाषांतर झालें पदप्रपद । विना अंतर्गत रहस्यबोध । होई न आनंद मनातें ॥१८॥
चहूं वेदांचें जें सार । तेंच उपनिषदांचें भांडार । हरिगुरुकृपा नसलियावर । अति दुस्तर गांठावया ॥१९॥
म्हणेल कोणी मी सज्ञान । आपुल्या मतें करोनि यत्न । करीन उपनिषदांचें आकलन । प्रतिपादन यथार्थ ॥२०॥
तरी तें कल्पांतींही न घडे । हें तों गुरुकृपा नसतां सांकडें । गुप्तप्रमेय हातीं न चढे । मार्गीं अवघडे पदोपदीं ॥२१॥
तेंच जो गुरुपदीं जडे । तया नाहीं अणुमात्र सांकडें । तयाचिया द्दष्टीपुढें । आपेंआप उघडे गूधर्थ ॥२२॥
आत्मज्ञानाचें हें शास्त्र । जन्ममरणोच्छेदक शस्त्र । जे निरभिमान नि:संगमात्र । तेच सत्पात्र विवेचना ॥२३॥
ऐसियांची कांस धरितां । क्षणांत उपजे अर्थबोधकता । बुद्धीची जाई प्रतिबद्धकता । होय विशदता गूढार्थीं ॥२४॥
ईशावास्य प्राकृतीं आणीतां । दासगणूंची हेच अवस्था । परी साईनाथें कृपा करितां । तद्दुर्गमता विराली ॥२५॥
गीर्वाणभाषेचें अल्पज्ञान । तत्रापि आचार्य विद्यारण्य । वंदूनि साईबाबांचे चरण  ओंवीलेखन आदरिलें ॥२६॥
गणुदास - वाणी दुग्धधारा । प्रसाद साईंचा तयांत शर्करा । तेथील माधुर्यपरंपरा । क्षणैक आदरा जी श्रोते ॥२७॥
असो हें बोधिनी - दिग्दर्शन । ह्रद्नतार्था करा मूलावलोकन  । या मत्कथेचें अनुसंधान । आहे कीं आन अवधारा ॥२८॥
निजभक्त करितां ग्रंथावलोकन । आढळे जधीं दुर्बोध वचन । महाराज करिती समाधान । वोलल्यावीण कैसें पां ॥२९॥
हाच या कथेचा हेत । श्रोतयां व्हावा तात्पर्यैं विदित । इतुकेंचि माझें मनोगत । दत्तचित्त परिसा जी ॥३०॥
ओंवीबद्ध टीका केली । विद्वज्जनांसी मान्य झाली । गणुदासांची मनीषा फिटली । आशंका राहिली पैं एक ॥३१॥
मांडिली ती पंडितांसमोर । ऊहापोह केला थोर । परी होईना समाधानपर । शंका निर्धार कोणाही ॥३२॥
इतुक्यांत शिरडीस कांहीं कारणें । दासगणूंचें घडलें जाणें । आशंकेचें निवारण होणें । सहजपणें झालें कीं ॥३३॥
घेऊं गेले साईंचें दर्शन  । मस्तकीं धरिले श्रींचे चरण । करूनियां साष्टांग वंदन । सुखसंपन्न जाहले ॥३४॥
संतकृपेचें अवलोकन । संतमुखींचें मधुरवचन । संतांचें तें सुहास्य वदन । कृतकल्याण भक्तगण ॥३५॥
केवळ संतांचें दर्शन । करी सकल दोषांचें क्षालन । जयांसी त्यांचें नित्य सन्निधान । काय तें पुण्य वर्णावें ॥३६॥
कां गणू कोठूनि आगमन । पुसती बाबा वर्तमान । कुशल आहे ना समाधान । चित्त प्रसन्न सर्वदा ॥३७॥
गणुदास देती प्रत्युत्तर । असतां आपुलें कृपाछत्र । किमर्थ व्हावें म्यां खिन्नांतर । आनंदनिर्भर असें मी ॥३८॥
आपणही हें सर्व जाणतां । लोकोपचारार्थ प्रश्न करितां । मीही जाणूनि आहें चित्ता । कुशलवृत्ता का पुसतां ॥३९॥
स्वयें मजकरवीं आरंभ करवितां । पुढें तो रंगारूपास येतां । मध्येंच ऐसी मेख मारितां । कोणाही उकलितां उकलेना ॥४०॥
ऐसें परस्पर चाललें भाषण । करीत गणुदास पादसंवाहन । ईशावास्य - भावार्थबोधन । संबोधें प्रश्न पूसिला ॥४१॥
ईशावास्य - भावार्थबोधिनी । लिहूं जातां अडखळे लेखणी । शंका कुशंका राहती मनीं । बाबा त्या उकलूनि सांगाव्या ॥४२॥
साद्यंत घडला जो जो प्रकार । केला बाबांच्या पायीं सादर । आशंका ही दुर्निवार । मांडिली समोर बाबांच्या ॥४३॥
गणुदास विनवी साईनाथा । माझे ग्रंथपरिश्रम वृथा । ही या ईशावास्याची कथा । आपण सर्वथा जाणतां ॥४४॥
आशंका दूर झाल्याविना । ग्रंथाचा या उकल पडेना । महाराज देती आशीर्वचना । प्रसन्नमना असें तूं ॥४५॥
“काय रे यांत आहे कठिण । जातां आलिया स्थळीं परतोन । त्या काकांची मोलकरीण । शंका निवारण करील कीं” ॥४६॥
काका ते भाऊसाहेब दीक्षित । बाबांचे एक प्रेमळ भक्त । कायावाचामनें सतत । गुरुसेवानिरत सर्वदा ॥४७॥
प्रख्यात मुंबापुरी नगरी । तेथूनि अल्प अंतरावरी । पारलें नाम ग्रामाभीतरीं । राहती हरिभाऊ हे ॥४८॥
खरें नांव तयांचें हरी । आईबापें ठेविलें घरीं । जन म्हणती भाऊसाहेब जरी । बाबांचें परी तिसरेंच ॥४९॥
महाजनीस बडे काका । निमोणकरां म्हातारे काका । भाऊसाहेबांस लंगडे काका । बंब्या काकाही म्हणती ते ॥५०॥
आईबापें ठेविती एक । राशीचें तें असतें आणिक । टोपण नांवेंही मारिती हांक । रीती ही अनेकपरीची ॥५१॥
महाराज ठेवितां नामें निराळीं । तींच मग चालती वेळोवेळीं । जाणों तीच मग बिरुदावळी । प्रेमसमेळीं धरिजेती ॥५२॥
कधीं भिक्षु कधीं काका । बाबांनीं पाडिला हाचि शिक्का । त्याच नामें शिरडींत लोकां । प्रसिद्ध काका जाहले ॥५३॥
आश्चर्य वाटलें गणुदासा । आश्चर्य सकळांचे मानसा । काय काकांची मोलकरीण ऐसा । उलगडा कैसा करणार ॥५४॥
मोलकरीण ती मोलकरीण । काय तिचें असावें शिक्षण । ती काय ऐसी विचक्षण । वाटे विलक्षण हें सारें ॥५५॥
कोठें श्रुतीची अर्थव्युत्पत्ति । कोठें मोलकरणीची मति । महाराज ही तों थट्टा करिती । जन वदती एणेंपरी ॥५६॥
महाराज केवळ विनोद करिती । ऐसेंच वाटलें सर्वां चित्तीं । परी बाबांच्या विनोदोक्ति । सत्यचि गमती गणुदासा ॥५७॥
परिसूनि त्या साईंच्या बोला । साई बोलले अवलीला । सकृद्दर्शनीं वाटलें जनाला । दासगणूला तें सत्य ॥५८॥
साई बोलले अवलीला । परी बोलामाजील लीला । सदा सर्वदा पहावयाला । आतुर झाला जनलोक ॥५९॥
असो वा नसो विनोद वाणी । कदा न ती होणें निष्कारणी । बाबांच्या एकेका अक्षरागणीं । असती खाणी अर्थाच्या ॥६०॥
बाबा जें जें वाचे वदत । बोल नव्हत तें ब्रम्हालिखित । एकही अक्षर न होई व्यर्थ । साधील कार्यार्थ वेळेवर ॥६१॥
ही द्दढ भावना दासगणूची । असो कैसीही ती इतरांची । निष्ठा जेथें जैसी जयाची । फळ तयासी तैसेंच ॥६२॥
जैसी भावना तैसें फळ । जैसा विश्वास तैसें बळ । अंत:करण जैसें प्रेमळ । बोधही निर्मळ तैसाच ॥६३॥
ज्ञानियांचा शिरोमणी । मिथ्या नव्हे तयाची वाणी । निजमक्ताची पुरवावी मागणी । ब्रीद हें चरणीं बांधिलें ॥६४॥
गुरुवचन नव्हे अन्यथा । मन लावूनि परिसा ही कथा । हरेल सकळ भवव्यथा । साधनपंथा लागाल ॥६५॥
परतले गणुदास पारले ग्रामीं । काकासाहेब दीक्षितधामीं । उत्कंठा काकांची मोलकरीण कामीं । पडते कैसी मी पाहीन ॥६६॥
दुसरे दिवशीम प्रथम प्रहरीं । गणुदास असतां शेजेवरी । साखरझोंपेच्या आनंदाभीतरीं । तैं नवलपरी वर्तली ॥६७॥
कोणी एक कुणब्याची पोरी । गात होती मंजुळ स्वरीं । खोंचली ती सुंदर लकेरी । जिव्हारीं गणुदासांच्या ॥६८॥
दीर्घ आलापयुक्ता तें गान । जयांत मंजुळ पदबंधन । परिसोनि तल्लीन झालें मन । लक्ष देऊन ऐकती ॥६९॥
खडबडूनि जागे झाले । गीतार्थबोधनीं लक्ष वेधलें । सावचित्तचि ऐकत राहिले । प्रसन्न झाले अभ्यंतरीं ॥७०॥
म्हणती ही आहे कोणाची पोर । गातसे गंभीर आणि सुस्वर । ईशावास्याचें तें कोडें थोर । उकलिलें पार की इनें ॥७१॥
असो हीच ती मोलकरीण । पाहूं तरी आहे कोण । जिच्या असंस्कृत वाणीमधून । श्रुत्यर्थखूण पटविली ॥७२॥
बाहेर जाऊनि जों पाहती । खरेंच कुणब्याची पोर होती । ती काकांच्या मोरीवरती । घाशीत होती बासनें ॥७३॥
शोधांतीं कळली नवलपरी । होता तेव्हां दीक्षितांचे घरीं । नाम्या गडी तयांचे चाकरी । बहीण ही पोरी तयाची ॥७४॥
हीच ती काकांची मोलकरीण । गीतें या झालें शंकानिवारण । रेडयामुखीं वेदगायन । संतीं काय न केलें जी ॥७५॥
ऐसें तें पोरीचें गायन । झालें दासगणूंचें समाधान । बाबांच्या थट्टेचेंही महिमान । आलें कीं कळून सकळांतें ॥७६॥
कोणी म्हणती गणुदास । बैसले होते देवपूजेस । काकांचे येथें देवघरास । तदा या गीतास परिसिलें ॥७७॥
असो तें जैसें असेल तैसें । तात्पर्यार्थ एकचि असे । महाराज निजभक्तां शिकविती कैसें । अनेक मिसें अवलोका ॥७८॥
“ठाईच बैसोनि मजला पुसा । उगीच कां रानोमाळ गिंवसा । पुरवितों मी तुमचा धिंवसा । एवढा भरंवसा राखावा ॥७९॥
असें मी भरलें सर्वांठायीं । मजवीण रिता ठाव नाहीं । कुठेंही कसाही प्रकटें पाहीं । भावापायीं भक्तांच्या” ॥८०॥
असो ती आठा वरसांची पोर । कांसेस एक फाटकें फटकूर । परी नारिंगी साडीचा  बडिवार । गाई ती सुस्वर गीतांत ॥८१॥
“काय त्या साडीचा भरजर । काय त्या साडीचा कांठ सुंदर । काय मौजेचा तिचा पदर” । यांतचि ती चूर गातांना ॥८२॥
खायाला मिळेना पोटभर । चिंधी न वेढाया बोटभर । परी कोणाच्या नारिंगी साडीवर । हर्षनिर्भर ती दिसली ॥८३॥
पाहूनि तियेचा दैन्य स्थिति । आणि मनाची रंगेल वृत्ति । कींव उपजली गणुदासांप्रती । काय निवेदिती मोरेश्वरा ॥८४॥
पहा हो हिचें अंग उघडें । द्या कीं तिला एकादें लुगडें । रुजू होईल ईश्वराकडे । पुण्यही घडेल तुम्हांतें ॥८५॥
आधींच मोरेश्वर कृपामूर्ति । वरी दासगणूंची विनंती । सुंदर साडी खरेदी करिती । आनंदें अर्पिती पोरीतें ॥८६॥
नित्य खाणारी जी कदन्न । तिला लाधावें पंचपव्कान्न । तेवीं ती मुलगी सुप्रसन्न । जाहली पाहून ती साडी ॥८७॥
दुसरे दिवशीं ती ल्याली साडी । फेर धरी ती खेळे फुगडी । दिसली इतर पोरींवर कडी । मोठी आवडी साडीची ॥८८॥
तीच पुढें दुसरे दिवशीं । साडी ठेवुनी पडदणीसी । गुंडाळी पूर्वील फटकुरासी । परी हिरमुसी दिसेना ॥८९॥
नाहीं ल्याली, केली जोगवण । तथापि तिचें पूर्वील दैन्य । गणुदासा भासे झालें विच्छिन्न । भावनेच्या भिन्नत्वें ॥९०॥
नवी साडी ठेविली सदनीं । जरी आली फाटकें नेसुनी । तरी दिसेना खिन्न मनीं । नव्हती कीं उणीव साडीची ॥९१॥
असमर्थपणें फाटकें लेणें । समर्थपणेंही तैसेंच करणें । या नांव दैन्य संपन्नपणें मिरवणें । भावनेगुणें सुखदु:ख ॥९२॥
हेंच तें गणुदासांचें कोडें । एणेपरी जेव्हां उलगडे । ईशावास्याचें केणें सांपडे । ठायींच पडे अर्थबोध ॥९३॥
ईशेंच आच्छादिला जेथें सारा । हा अवघा ब्रम्हांडाचा पसारा । तेथें तयावीण उघडा थारा । कोण विचारा मानी या ॥९४॥
तेंही पूर्ण हेंही पूर्ण । पूर्णापासाव उद्भवलें पूर्ण । पूर्वांतूनि काढितां पूर्ण । राहील पूर्णचि अवशेष ॥९५॥
पोरीचें दैन्य ईश्वरी अंश । फटकून साडी हेही तदंश । दाता देय दान हेंही अशेष । एकचि ईश भरलेला ॥९६॥
‘मी माझें’ हें पार दवडावें । निरभिमानत्वें सदा वर्तावें । त्यागपूर्वक भोग भोगावे । अभिलाषावें नच कांहीं ॥९७॥
ऐसी बाबांची अमोघ वाणी । प्रचीति मिळविली अनेकांनीं । आप्राणान्त शिरडी न सोडूनी । जनीं विजनीं प्रकटत ॥९८॥
कोणास मच्छिंदरगडावर । कोणास कोठेंही असो शहर ।  कोल्हापूर सोलापुर रामेश्वर । इच्छामात्र प्रकटत ॥९९॥
कोणास आपुल्या बाम्हावेषीं । कोणास जागृतीं वा स्वप्नविशेषीं । दर्शन देत अहर्निशीं । पुरवीत असोशी भक्तांची ॥१००॥
ऐसे अनुभव एक ना दोन । किती म्हणोनि करावे वर्णन । शिरडींत जरी वसतिस्थान । अलक्ष्य प्रस्थान कोठेंही ॥१०१॥
पहा ही पोर कोणाची कोण । य:कश्चित्‌ गरीब मोलकरीण । नारिंगी साडीवरी तिचें तें गायन । निघालें मुखांतून साहजिक ॥१०२॥
शंका म्हणूनि बाबांस पुसावी । या मोलकरिणीनें ती निरसावी । तीही काकांच्या इथें असावी । रचना ही मायावी नाहीं का ॥१०३॥
आधीं ही तेथें मोलकरीण । असावी हें कैसें बाबांस ज्ञान । तीही भविष्यकाळीं हें गाऊन । श्रुत्यर्थबोधन व्हावें कसें ॥१०४॥
परी तें झालें खास । वाटलें आश्चर्य गणुदासांस । आशंकेचा झाला निरास । ईशावास्य आकळलें ॥१०५॥
श्रोतियां मनीं येईल शंका । खटाटोप हा तरी कां इतुका ॥ स्वयेंच स्वमुखें बाबांनींच कां । फेडिली न आशंका तेथेंच ॥१०६॥
हें काय जागींच नसतें करवलें । परी तें नसतें महिमान कळलें । ईशें त्या पोरीसही आच्छादिलें । प्रकट हें केलें बाबांनीं ॥१०७॥
आत्मयाथात्म्य - निरूपण । हेंच सर्वोपनिषदांचें पर्यवसान । हेंच मोक्षधर्म - निष्कर्षण । गीतार्थ - प्रवचन तें हेंच ॥१०८॥
प्राणी भिन्न आत्मा अभिन्न । आत्मा कर्तृत्वभोक्तृत्वहीन । तो न अशुद्ध पापपुण्याधीन । कर्माचरण त्या नाहीं ॥१०९॥
मी जातीनें उच्च ब्राम्हाण । इतर मजहूनि नीचवर्ण । वसे ऐसें जोंवरी भेदज्ञान । कर्माचरण आवश्यक ॥११०॥
मी अशरीर सर्व्त्र एक । मजहूनि कोणी नाहीं आणिक । मीच कीं सकलांचा व्यापक । स्वरूपोन्मुख हें ज्ञान ॥१११॥
पूर्णब्रम्हास्वरूपच्युत । ऐसा हा जीवात्मा पूर्ववत । कधींतरी स्वस्वरूपाप्रत । पावावा निश्चित हें ध्येय ॥११२॥
श्रुति - स्मृति आणि वेदान्त । या सर्वांचा हाचि सिद्धान्त । हेंचि अंतिम साध्य निश्चित । च्युतासी अच्युतपदप्राप्ति ॥११३॥
‘सम: सर्वेषु भूतेषु’ । जोंवरी अप्राप्त हा स्थितिविशेषु । तोंवरी न भूतात्मा ह्रषीकेशु । ज्ञान प्रकाशूं समर्थ ॥११४॥
विहितकर्में चित्त शुद्ध । होतां होईल अभेदबोध । शोकमोहादि संसृतीविरुद्ध । प्रकटेल सिद्ध ज्ञान तें ॥११५॥
अखिल त्रैलोक्य सचराचर । आच्छादी जो ईश परमेश्वर । निष्क्रिय निष्कल जो परात्पर । तो अशरीर सदात्मक ॥११६॥
नामरूपात्मक हें विश्व । सबाह्य आच्छादी हा ईश । तो मीच मी भरलों अशेष । निर्विशेषरूपत्वें ॥११७॥
अस्तु वस्तुत: जें निराकार । मायागुणें भासे साकार । कामुकापाठीं हा संसार । तोचि असार निष्कामा ॥११८॥
हें यत्किंचित्‌ भूतभौतिक । जगत्‌ चेतनाचेतनात्मक । ईश्वरचि हा अद्वितीय एक । निर्धार नि:शंक करावा ॥११९॥
जगद्वुद्धीचा हा विवेक । जरी मनासी पटेना देख । तरी हें धनहिरण्यादिक । यांचा अभिलाख न करावा ॥१२०॥
हेंही जरी न घडे तरी । जाणावें आपण कर्माधिकारी । आमरणान्त शतसंवत्सरीं । कर्मचि करीत रहावें ॥१२१॥
तेंही स्ववर्णाश्रमोचित । यथोक्तानुष्ठानसहित । अग्निहोत्रादि नित्यविहित । चित्त अकलंकित होईतों ॥१२२॥
हा एक चित्तशुद्धीचा मार्ग । दुजा सर्वसंगपरित्याग । हें न आक्रमितां ज्ञानयोग । कर्मभोगचि केवळ ॥१२३॥
ही ब्रम्हाविद्या हें उपनिषद । सर्वां न देती अधिकारविद । वृत्ति न जोंवरी झाली अभेद । उपनिषद्बोध शाब्दिक ॥१२४॥
तरी तोही व्हावा लागे । जिज्ञासु आधीं तोच मागे । म्हणोनि बाबंहीं पाठविलें मागें । मोलकरीण सांगेल म्हणोनि ॥१२५॥
स्वयेंच बाबा हा बोध देते । तरी हें पुढील कार्य न घडतें । ‘एकमेवाद्वितीय’ नसतें । ज्ञान हें कळतें बाबांचें ॥१२६॥
मजवांचूनि आणीक कोण । आहे ती काकांची मोलकरीण । मीच ती ही दिधली खूण । ईशावास्य जाणविलें ॥१२७॥
परमेश्वरानुग्रहलेश । आचार्यानुग्रह विशेष । नसतां आत्मज्ञानीं प्रवेश । सिद्धोपदेशचि आवश्य्क ॥१२८॥
आत्मप्रतिपादक जें जें शास्त्र । श्रवणीं आणावें तें तेंच मात्र । प्रतिपाद्य जें तें मीच सर्वत्र । मजवीण अन्यत्र कांहींच न ॥१२९॥
होतां आत्मतत्त्वाचें विवरण । तोच मी आत्मा नव्हे आन । हें जयासी अभेदानुसंधान । आत्माही प्रसन्न तयासीच ॥१३०॥
असो आत्मनिरूपण होतां । ऐसेंच आत्मानुसंधान राखितां । ऐसीच निश्चल धरितां आत्मता । परमात्मा हाता येईल ॥१३१॥
पुढील अध्यायकथानुसंधान । विनायक ठाकूरादि कथा कथन । श्रोते करोत सादर श्रवण । परमार्थप्रवण होतील ॥१३२॥
ताही कथा ऐशाच गोड । ऐकतां पुरेल श्रोतियांचें कोड । महापुरुषदर्शनाची होड । पुरेल चाड भक्तांची ॥१३३॥
जैसा उगवतां दिनमणि । अंधार जाय निरसोनी । तेवीं या कथापीय़ूषपानीं । माया हरपोनी जातसे ॥१३४॥
अतर्क्य साईंचें विंदान । त्यावीण कोण करील कथन । मी तों एक निमित्त करून । तेचि तें वदवून घेतील ॥१३५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ईशावास्यभावार्थबोधनं नाम विंशोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥