॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
सूक्ष्माहूनि सूक्ष्म अत्यंत । महताहूनही अत्यंत मह्त । ऐसें आब्रम्हास्तंबपर्यंत । वस्तुजात हा साई ॥१॥
ऐसिया सद्वस्तूसी पाहीं । रंगरूपादि आकार कांहीं । देऊनि पाहों चर्मचक्षूंहीं । इच्छा ही उदेली अंतरीं ॥२॥
सूर्यास काडवातीची आरती । भक्तिभावें सौर करिती । किंवा गुळाचा करुनि गणपती । गूळ् निवेदिती गाणपत्य ॥३॥
अथवा महार्णवाच्या मधुनी । ओंजळीनें घेऊनि पाणी । अर्ध्यार्पण तयालागुनी । सकृद्दर्शनीं अनुचित ॥४॥
सूर्यार्णव महाप्रभाव । परी ते पाहती भक्तभाव । उचितनुचिता कैंच ठाव । भक्तगौरव त्यां काज ॥५॥
समानशीलव्यसनेषु सख्यम् । आहे जरी हा सामान्य नियम । तत्रापि हा देहात्मसंगम । अपवाद परम अनिवार्य ॥६॥
स्वभावें हे परस्पर भिन्न । परी दोघांचा स्नेह विलक्षण । एका न गमे दुजियावीण । वेगळे न क्षण राहती ॥७॥
तरी हा देह आहे नश्वर । आत्मा निर्विकार अक्षर । दोघांचें प्रेम अपरंपार । तेणेंच संसारपरिभ्रम ॥८॥
आत्मा तेंच शक्ती महत् । तियेहूनि सूक्ष्म अव्याकृत । तेंच आकाशा प्रकृति अव्यक्त । मायाही वदत तियेसचि ॥९॥
या सर्वांहूनि पुरुष सूक्ष्म । तेथेंच इंद्रियादिकांसी उपरम । तीच अंतिम गति परम । शुद्धब्रम्हा तें हेंच ॥१०॥
ऐसा आत्मा हा संसारी । भासे मायाकर्मानुसारी । असूनि स्वयें निर्विकारी । स्फटिकापरी निर्लेप ॥११॥
स्फटिक लाल काळा पिवळा । जैसा रंग तैसी कळा । परी तो सर्वां रंगां निराळा । विकारां वेगळा निर्मळ ॥१२॥
माळावरील जैसें मृगजळ । शुक्तिकाधिष्ठित रौप्य झळाल । पाहतां दोरीचें वेंटाळ । नसता व्याळ आभासे ॥१३॥
दोरीवरी सर्पारोपण । वस्तुगत्या अप्रमाण । तैसेंच मी देह हा अभिमान । मिथ्या बंधन मुक्तासी ॥१४॥
देहेंद्रिय मन:प्राण । आत्मा यांहूनही विलक्षण । स्वयंज्योति शुद्ध चैतन्य । विकारविहीन निराकृती ॥१५॥
देह बुद्धि मन प्राण । या सर्वांचा जंव अभिमान । तंव तें कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण । सुखदु:खभान अनिवार्य ॥१६॥
वटाकणिका सूक्ष्म किती । गर्भीं सांठवी वटवृक्षशक्ति । अगणित कणिका वृक्षांपोटीं । वृक्षकोटी तयांत ॥१७॥
ऐसे कणिकेगणित वृक्ष । आप्रलयान्त देतील साक्ष । ऐसेंच विश्व प्रत्यक्ष । अवलोका लक्ष देऊनि ॥१८॥
शाश्वतता निर्भयता मुक्तता । स्वतंत्रता परमात्मप्राप्तता । हीच जीवाची साफल्यता । इतिकर्तव्यता जन्माची ॥१९॥
मोक्ष नाहीं ज्ञानाविना । विना विरक्त न पवे ज्ञाना । संसार जों वाटेना अनित्य मना । स्फुरेना कल्पना विरक्तीची ॥२०॥
त्या अनित्यत्वाच्या वाटे । विश्वाभासें द्दष्टी फाटे । तेणें पांथस्थ मध्यें चाकाटे ॥ जावें कोठें आकळेना ॥२१॥
ऐसा हा विश्वाभास । चिन्मात्रीं मिथ्या मायाविलास । प्रपंचजात स्वप्नविन्यास । तदर्थ प्रयास कां व्यर्थ ॥२२॥
स्वप्नांतूनि जागृतींत । येतांच स्वप्न होय अस्तंगत । म्हणूनि जो निजस्वरूपीं स्थित । तया प्रपंचार्थ स्मरेना ॥२३॥
विना आत्मैक्यत्व विज्ञान । विना आत्मयाथात्म्य - प्रकाशन । तुटावया शोकमोहादि बंधन । जागृति आन असेना ॥२४॥
जरी सर्वांहूनि श्रेष्ठ ज्ञान । बाबा उपदेशीत रात्रंदिन । तरीही भक्तिमार्गाचें अवलंबन । सर्वसाधारण निवेदीत ॥२५॥
वदत ज्ञानमार्गाचें महिमान । मार्ग तो रामफळासमान । भक्तिमार्ग सीताफळ - सेवन । स्वल्प साधन रसमधुर ॥२६॥
भक्ति ही सोज्ज्वळ सीताफळ । ज्ञान हेंपरिपव्क रामफळ । एकाहूनि एक रसाळ । मधुर परिमळ तैसाच ॥२७॥
रामफळ गर्भींचा गीर । फळ काढूनि पिकवितां उगीर । वृक्षींच पिके तों धरी जो धीर । तयासीच मधुर लागे तो ॥२८॥
रामफळाची गोडी सरस । देठेंसीं परिपव्क होई जों तरूस । उगीर लागे पडतां भुईस । अति मिठास वर पिकतां ॥२९॥
वरचेवर जो पिकवूं जाणे । तेणेंच त्याचा आस्वाद घेणें । सीताफळ हे सायास नेणे । अल्पगुणें बहुमोल ॥३०॥
रामफळासी पतनभय । ज्ञानियाही नाहीं निर्भय । झाला पाहिजे सिद्धिविजय । लव हयगय कामा न ये ॥३१॥
म्हणुनि साइ दयाघन । बहुधा निज शिष्यांलागून । भक्ति आणि नामस्मरण । याचेंच विवरण करीत ॥३२॥
ज्ञानाहूनही श्रेष्ठ ध्यान । अर्जुनालागीं कथी भगवान । तुटावया भक्तभवबंधन । साईही साधन हें वदे ॥३३॥
असो येविषय़ींची कथा । पूर्वाध्यायीं वर्णितां वर्णितां । अपूर्ण राहिली ती मी आतां । कथितों श्रोतां परिसिजे ॥३४॥
वयोवृद्ध शक्तिक्षीण । म्हातारी एक मांडी निर्वाण । मंत्र मागावया साईंपासून । प्रायोपवेशन आरंभी ॥३५॥
पाहोनियां तियेची स्थिती । माधवरावांस पडली भीति । करुं गेले बांबांशीं मध्यस्थी । कथानुसंगती पूर्वील ॥३६॥
साईसंकल्प - विद्योती । उजळली ही चारित्रज्योती । मार्गदर्शक होवो तद्दीप्ति । मार्ग भावार्थी उमगोत ॥३७॥
बाबांचिया आज्ञेनुसार । माधवरावांनीं मजबरोबर । आरंभिली कथा सुंदर । तीच पुढारां चालवूं ॥३८॥
म्हणती पाहूनि म्हातारीचा निग्रह । बाबांनीं तीस दिधला अनुग्रह । फिरविला तियेचे मनाचा ग्रह । कथासंग्रह अभिनव ॥३९॥
पुढें बाबांनीं प्रेमळपणें । हांक मारिली तिजकारणें । “आई तूं कां गे घेतलें धरणें । कां तुज मरणें आठवलें” ॥४०॥
कोणीही असो प्रौढ बाई । तिजला हांक मारीत आई । पुरुषांस काक बापू भाई । गोड नवलाई हांकेची ॥४१॥
अंतरंग जैसें प्रेमळ । बोलही तैसेच मंजुळ । रंजल्यागांजल्यांचे कनवाळ । दीनदयाळ श्रीसाई ॥४२॥
असो तिजला हांक मारिली । आपुले सन्मुख बैसविली । निजगुरुत्वाची गुप्त किल्ली । प्रेमें दिधली निजहातें ॥४३॥
कराया भवसंतापसमन । भक्तचकोर - तृषापनयन । वर्षले जे बाबा चिद्धन । स्वानंदजीवन तें सेवा ॥४४॥
म्हणती “आई, खरेंच सांगें । हाल जीवाचे करिसी कां गे । फकीर मी केवळ तुकडे मागें । पाहीं अनुरागें मजकडे ॥४५॥
खरेंच मी लेक तूं आई । आतां मजकडे लक्ष देईं । सांगतों तुज एक नवलाई । परम सुखदाई होईल ॥४६॥
होता पहा माझा गुरु । मोठा अवलिया कृपासागरू । थकलों तयाची सेवा करकरूं । कानमंतरू देईना ॥४७॥
माझ्याही मनीं प्रबळ आस । कधीं न सोडावी तयाची कांस । तया मुखेंच घ्यावें मंत्रास । दीर्घ सायास करूनि ॥४८॥
आरंभीं तयानें मज मुंडिलें । पैसे मज दोनचि याचिले । ते मीं तात्काळ देऊनि टाकिले । बहु मीं प्रार्थिलें मंत्राक्षर ॥४९॥
माझा गुरु पूर्वकाम । दोन पैशांचें काय काम । कैसें म्हणावें त्या निष्काम । शिष्यांसी दाम मागे जो ॥५०॥
ऐसी न शंका येवो मना । व्यावहारिक पैशाची न त्या कामना । ही तों नाहीं तयाची कल्पना । कर्तव्य कांचना काय त्या ॥५१॥
निष्ठा आणि सबूरी दो न । हेच ते पैसे, नव्हते आन । म्यां ते तेव्हांच टाकिले देऊन । तेणें मज प्रसन्न गुरुमाय ॥५२॥
धैर्य तीच गे बाई सबूरी । सांडूं नको तिजल दूरी । पडतां केव्हांही जडभारी । हीच परपारीं नेईल ॥५३॥
पुरुषांचें पौरुष ती ही सबूरी । पाप ताप दैन्यता निवारी । युक्तिप्रयुक्तीं आपत्ति वारी । बाजूस सारी भय भीती ॥५४॥
सबूरीवरी यशाचा वांटा । विपत्ती पळवी बारा वाटा । येथ अविचाराचा कांटा । नाहीं ठावुका कोणाही ॥५५॥
सबूरी सद्नुणांची खाणी । सद्विचाररायाची हे राणी । निष्ठा आणि ही सख्या बहिणी । जीव प्राण दोघींसी ॥५६॥
सबूरीवीण मनुष्यप्राणी । स्थिति तयाची दैन्यवाणी । पंडित असो कां मोठा सद्नुणी । व्यर्थ जिणें हिजवीण ॥५७॥
गुरु जरी महा प्रबळ । अपेक्षी शिष्यप्रज्ञाच केवळ । गुरुपदीं निष्ठा सबळ । धैर्यबळ सबूरी ॥५८॥
जैसा दगड आणि मणी । उजळती दोन्ही घासितां सहाणीं । परी दगड राहे दगडपणीं । माणी तो मणी तेजाळ ॥५९॥
एकचि संस्कार दोघां उजळणी । दगडा चढेल काय मण्याचें पाणी । घडेल मण्याची सतेज हिरकणी । दगड निजगुणीं तुळतुळीत ॥६०॥
बारा वर्षें पायीं वसवटा । केला गुरुनें लहानाचा मोठा । अन्नवस्त्रासी नव्हता तोटा । प्रेम पोटांत अनिवार ॥६१॥
भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा । जयास शिष्याचा खरा जिव्हाळा । माझ्या गुरूसम गुरु विरळा । सुखसोहळा न वर्णवे ॥६२॥
काय त्या प्रेमाचें करावें वर्णन । मुख पाहतां ध्यानस्थ नयन । आम्ही उभयतां आनंदघन । अन्यावलोकन नेणें मी ॥६३॥
प्रेमें गुर्मुखावलोकन । करावें म्यां रात्रंदिन । नाहीं मज भूक ना तहान । गुरूवीण मन अस्वस्थ ॥६४॥
तयावीण नाहीं ध्यान । तयावीण न लक्ष्य आन । तोच एक नित्य अनुसंधान । नवलविंदान गुरूचें ॥६५॥
हीच माझ्या गुरूची अपेक्षा । कांहीं न इच्छी तो यापेक्षां । केली न माझी केव्हांही उपेक्षा । संकटीं रक्षा सदैव ॥६६॥
कधीं मज वास पायांपाशीं । कधीं समुद्र - परपारासी । परी न अंतरलों संगमसुखासी । कृपाद्दष्टीसीं सांभाळी ॥६७॥
कासवी जैसी आपुले पोरां । घालिते निजद्दष्टीचा चारा । तैसीच माझे गुरूची तर्हा । द्दष्टीनें लेंकरा सांभाळी ॥६८॥
आई या मशिदींत बैसून । सांगतों तें तूं मानीं प्रमाण । गुरूनें न फुंकले माझेच कान । तुझे मी कैसेन फुंकरूं ॥६९॥
कासवीची प्रेमद्दष्टी । तेणेंच पोरांसी सुखसंतुष्टी । आई उगीच किमर्थ कष्टी । उपदेशगोष्टी नेणें मी ॥७०॥
कासवी नदीचे एके तटीं । पोरें पैल वाळवंटीं । पालन पोषण द्दष्टाद्दष्टी । व्यर्थ खटपटी मंत्राच्या ॥७१॥
तरी तूं जा अन्न खाईं । नको हा घालूं जीव अपायीं । एक मजकडे लक्ष देईं । परमार्थ येईल हातास ॥७२॥
तूं मजकडे अनन्य पाहीं । पाहीन तुजकडे तैसाच मीही । माझ्या गुरूनें अन्य कांहीं । शिकविलें नाहींच मजलागीं ॥७३॥
नलगे साधनसंपन्नता । नलगे षट्शास्त्रचातुर्यता । एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरू ऐसा ॥७४॥
म्हणूनिज गुरुची थोर महती । गुरु हरिहरब्रम्हामूर्ति । जो कोण जाणे तयाची गति । तो एक त्रिजगतीं धन्य गा” ॥७५॥
येणेंपरी ती म्हातारी बोधितां । ठ्सली तियेचे मना ती कथा । ठेऊनि महाराजांचे पायीं माथा । व्रतनिवृत्तता आदरिली ॥७६॥
ऐकूनि ही समूळ कथा । जाणूनि तिची समर्पकता । सानंद विस्मय माझिया चित्ता । कथासार्थकता अवलोकितां ॥७७॥
पाहोनि बाबांची ही लीला । परमानंदें कंठ दाटला । प्रेमोद्रेकें गहिंकर आला । अंतरीं ठ्सला सद्बोध ॥७८॥
पाहोनि सगद्नद कंठ झाला । माधवराव वदले मजला । कां हो अण्णासाहेब गहिंवरलां । स्वस्थ बैसलां हें काय ॥७९॥
ऐशा बाबांच्या अगणित कथा । किती म्हणूनि सांगूं आतां । ऐसें माधवराव बोलत असतां । घंटा वाजतां ऐकिली ॥८०॥
रोज दुपारा जेवणा आधीं । भक्त जाऊनियां बैसती मशिदीं । करितां गंधाक्षत -अर्ध्यपाद्यादी । पूजा सविधी बाबांची ॥८१॥
तदनंतर ती पंचारती । बापूससाहेब जोग करिती । भक्तिप्रेमें ओंवाळिती । आरत्या म्हणती भक्तजन ॥८२॥
त्या आरतीची निदर्शक भली । घंटा घणघण वाजूं लागली । आम्हीं मशिदीची वाट धरिली । मनीषा फिटली मनाची ॥८३॥
माध्यान्हसमयींची ही आरती । नरनारी मिळूनियां करिती । स्त्रिया मशिदींत वरती । पुरुष खालती मंडपीं ॥८४॥
मंगल - वाद्यांचिया गजरीं । तासाचिया झणत्कारीं । आरत्या म्हणती उच्चस्वरीं हर्षनिर्भरीं तेधवां ॥८५॥
पातलों आम्ही मंडपद्वारीं । आरती चालली घनगजरीं । पुरुष मंडळीं वेष्टिली पायरी । रीघ ना वरी जावया ॥८६॥
माझ्या मनीं असावें खालीं । जोंवरी आरती नाहीं संपली । संपतांच मग बाबांजवळी । जावें मंडळीसमवेत ॥८७॥
म्हणोनि मीं जो मनीं आणीलें । माधवराव पायरी चढले । कराग्रीं धरूनि मजही ओढिलें । जवळी नेलें बाबांचे ॥८८॥
बाबा निजस्थानीं स्थित । स्वस्थमनें चिलीम पीत । समोर जोग पंचारती ओंवाळीत । घंटा वाजवीत वामकरें ॥८९॥
ऐशा त्या आरतीचे रंगीं । माधवराव बाबांचे दक्षिणभागीं । स्वयें बैसती मजही बैसविती । सन्मुख स्थिती बाबांचे ॥९०॥
मग शांतमूर्ति संतमणी । बाबा बोलती मंजुळ वाणी । दक्षिणा काय दिधली आणीं । शामरावांनीं मजप्रती ॥९१॥
बाब हे शामराव येथेंच असती । दक्षिणेऐवजीं नमस्कार देती । हेच पंधरा रुपये म्हणती । बाबांप्रती अर्पावे ॥९२॥
बरें असो केल्या का वार्ता । कांहीं वोललां का उभयतां । काय गोष्टी केल्या आतां । सांग समस्ता मजप्रती ॥९३॥
असो नमस्काराची कथा । केल्यास काय तयासी वार्ता । काय कैशा त्या समग्रता । परिसवीं आतां मजप्रती ॥९४॥
गोष्ट सांगावी ही उत्कंठा । आरतीचा तो गजर मोठा । परमानंद माईना पोटा । प्रवाहे ओठांतूनि तो ॥९५॥
बाबा जो तक्यास ओठंगले । गोष्ट ऐकावया पुढें झाले । मींही पुढें वदन केलें । करूं आरंभिलें कथन तें ॥९६॥
बाबा तेथें झाल्या ज्या वार्ता । सर्वचि वाटल्या गोड चित्ता । त्यातचि एक ती म्हातारीची कथा । अति नवलता तियेची ॥९७॥
शामरावें ती गोष्ट कथितां । दिसोनि आली आपुली अकळता । जणूं त्या कथेच्या मिषें मजवरता । केलात निश्चितता अनुग्रह ॥९८॥
तंव बाबा अति उत्सुकता । म्हणती सांग मज ती समग्र कथा । काय पाहूं कैसी नवलता । अनुग्रहता ती कैसी ॥९९॥
गोष्ट होती ताजी ऐकिली । शिवाय मनांत फारचि ठसलेली । बाबांस अस्खलित निवेदन केली । प्रसन्न दिसली चित्तवृत्ती ॥१००॥
ऐसें कथिलें सकल वृत्त । बाबाही ऐकत देऊनि चित्त । सवेंचि मग मातें वदत । जीवीं धरीत जावें हें ॥१०१॥
आणीक पुसती अति उल्हासता । किती ही गोड ऐकिली कथा । बाणली का ते तव चित्ता । खरीच सार्थकता मानली का ॥१०२॥
बाबा या कथाश्रवणांतीं । लाधलों मी निजविश्रांती । फिटली माझे मनाची आर्ती । मार्ग निश्चितीं मज कळला ॥१०३॥
मग बाबा वदती तयावरी । “कळाच आमुची आहे न्यारी । ही एकच गोष्ट जीवीं धरीं । फार उपकारी होईल ॥१०४॥
आत्मयाचें सम्यग्विज्ञान । सम्यग्विज्ञानाकारण ध्यान । तें ध्यानचि आत्मानुष्ठान । तेणेंच समाधान वृत्तीचें ॥१०५॥
होऊनि सर्वेषणाविनिर्मुक्त । ध्याना आणावा सर्वभूतस्थ । ध्यान होईल व्यवस्थित । प्राप्तव्य प्राप्त होईल ॥१०६॥
केवल जें मूर्त ज्ञान । चैतन्य अथवा आनंदघन । तेंचि माझें स्वरूप जाण । तें नित्य ध्यान करीं गा ॥१०७॥
जरी न आतुडे ऐसें ध्यान । करीं सगुणरूपानुसंधान । मनीं नखशिखान्त मी सगुण । रात्रंदिन आणावा ॥१०८॥
ऐसें करितां माझें ध्यान । वृत्ति होईल एकतान । ध्याता - ध्यान - ध्येयाचें भान । नष्ट होऊन जाईल ॥१०९॥
एवं ही त्रिपुटी विलया जातां । ध्याता पावे चैतन्यघनता । ही कीं ध्यानाची इतिकर्तव्यत । ब्रम्हासमरसता पावसी ॥११०॥
कासवी नदीचे ऐल कांठीं । तिचीं पिल्लें पैल तटीं । ना दूध ना ऊब केवळ द्दष्टी । देई पुष्टी बाळकां ॥१११॥
पिलियां सदा आईचें ध्यान । नलगे कांहींच करणें आन । नलगे दुग्ध ना चारा ना अन्न । मातानिरीक्षण पोषण त्यां ॥११२॥
हें जें निरीक्षण कूर्मद्दष्टि । ही तों प्रत्यक्ष अमृतवृष्टि । पिलियां लाधे स्वानंदपुष्टि । ऐक्यसृष्टि गुरुशिष्यां” ॥११३॥
होतां हा साईमुखें उच्चार । थांबला आरतीचा गर । “श्रीसच्चिदानंद सद्नुरुजयजयकार” । केला पुकार सकळांनीं ॥११४॥
सरला नीरांजनोपचार । सरली आरती सविस्तर । जोग म अर्पितां खडीसाखर । बाबा करपंजर पसरिती ॥११५॥
तयांत नित्यक्रमानुसार । खडीसाखर ती ओंजळभर । घालिती जोग प्रेमपुर:सर । नमस्कारपूर्वक ॥११६॥
ती सबंध शर्करा माझे हातीं । बाबा रिचविती आणि वदती । या साखरेवाणी होईल स्थिती । ठेवितां चित्तीं ही गोष्ट ॥११७॥
जैसी खडीसाखर ही गोड । तैसेंच पुरेल मनींचें कोड । होईल तुझें कल्याण चोखड । पुरेल होड अंतरींची ॥११८॥
मग मी बाबांस अभिवंदोन । मागितलें हेंचि कृपादान । हेंचि पुरे मज आशीर्वचन । सांभाळून घ्या मज ॥११९॥
बाबा वदती “कथा श्रवण । करा मनन आणि निदिध्यासन । होईल स्मरण आणि ध्यान । आनंदघन प्रकटेल ॥१२०॥
एणेंपरी जें परिसिलें कानीं । तें जरी तूं धरिसील मनीं । उघडेल निजकल्याणाची खनी । होईल धुणी पापाची ॥१२१॥
वार्याचा चालतां सोसाटा । समुद्रावरी उसळती लाटा । असंख्य बुद्बुद फेणाचा सांठा । आदळती कांठा येऊनि ॥१२२॥
लाटा बुडबुडे फेण भंणरे । एका पाण्याचे प्रकार सारे । हे सकळ द्दग्भ्रमाचे पसारे । शांत वारे होती तों ॥१२३॥
हे काय प्रकार म्हणावे झाले । किंवा म्हणावे कां नाश पावले । जाणोनि मायेचें सर्व केलें । झालें गेलें सरिसेंच ॥१२४॥
तैसीच सृष्टीची घडामोड । विवेकियां न तयाचें कोड । ते नाशिवंतीं न धरिती होड । साधिती जोड नित्याची ॥१२५॥
महत्त्वें ज्ञानापरीस ध्यान । तदर्थ लागे । यथार्थ ज्ञान । होतां न वस्तूचें साद्यंत आकलन । यथार्थ ध्यान आतुडेना ॥१२६॥
सम्यग्विज्ञान मूळ ध्यान । या नांव प्रत्यगात्मानुष्ठान । परी जो विक्रियारहित जाण । आणवे ध्याना कैसेनी ॥१२७॥
प्रत्यगात्मा तोचि ईश्वरू । आणि जो ईश्वरू तोचि गुरू । तिहींत भेद नाहीं अणुमात्रु । नागवे करूं जाई तो ॥१२८॥
होतां निदिध्यास परिपव्कता । ध्यान ध्याता विरोनि जातां । निवात दीपवत् चित्ता । शांतता ते समाधि ॥१२९॥
होऊनि सर्व्षणाविनिर्मुक्त । जाणूनि आहे तो सर्वभूतस्थ । होतां अद्वितीयत्वें अभय प्राप्त । मग तो येत ध्यानातें ॥१३०॥
मग अविद्याकृत कर्मबंध । तुटती तटातट तयाचे संबंध । सुटती विधिनिपेध - निर्बंध । भोगी आनंद मुक्तीचा ॥१३१॥
आधीं आत्मा आहे कीं नाहीं । अद्वैत कीं निराळा ठायीं ठायीं । कर्ता कीं अकर्ता पाहीं । साही शास्त्रें धुंडावीं ॥१३२॥
आत्मैकविज्ञान हेंचि । पराकाष्ठा असे ज्ञानाची । मोक्ष आणि परमानंदाची । उत्पत्ति साची तेथूनी ॥१३३॥
अंधास हत्तीचे वर्णनाकरितां । आणिला बृहस्पतीसमान वक्ता । वक्तृत्वें स्वरूप येईना चित्ता । वाचातीता न वर्णवे ॥१३४॥
वत्क्याचें वक्त्र श्रोत्यांचे श्रोत्र । आणितील काय गेलेले नेत्र । हस्तिस्वरूपावलोकनपात्र । केवळ नेत्रचि सत्यत्वें ॥१३५॥
नेत्र नसतां कैसा हस्ती । येईल अंधाचिये प्रतीतीं । तैसेच दिव्य नेत्र जैं गुरु देती । ज्ञानसंवित्ति तेधवां ॥१३६॥
साईस्वरूप यथार्थ ज्ञान । स्वयें जो परिपूर्ण विज्ञानघन । हेंच तयाचें ध्यान अनुष्ठान । हेंच दर्शन तयाचें ॥१३७॥
अविद्या - काम - कर्मबंध्न । यांचें व्हावया अशेष मोचन । नाहीं नाहीं अन्य साधन । गांठ ही बांधून ठेवा कीं ॥१३८॥
साई नाहीं तुमचा वा आमुचा । तो तों सर्वभूतस्थ साचा । सूर्य जैसा सकल जगाचा । हा सकळांचा तैसाच” ॥१३९॥
आतां परिसा तयांचे बोल । सर्वसाधारण आणि अनमोल । स्मरणीं ठेवितां वेळोवेळ । स्वार्थ सफळ सर्वदा ॥१४०॥
“नसल्या लागाबांधा कांहीं । कोणीही कोठेंही जातचि नाहीं । नरास काय पशुपक्ष्यांही । न करीं कुणाही हडहड ॥१४१॥
आल्यागेल्याचा आदर करीं । तृषितां जल भुकेल्या भाकरी । उघडयास वस्त्र बसाया ओसरी । देतां श्रीहरि तुष्टेल ॥१४२॥
कुणाला व्हावा असेल पैसा । तुझिया चित्तीं द्यावा कैसा । देऊं नको, परी वसवसा । श्वानाऐसा वर्तूं नको ॥१४३॥
कोणीही बोल बोलो शंभर । स्वयें नेदीं कटु उत्तर । धरितां सहिष्णुता निरंतर । सुख अपार लाधेल ॥१४४॥
दुनिया झालिया इकडची तिकडे । आपण व्हावें न मागें पुढें । ठायींच निश्चल राहूनि रोकडें । कौतुक तेवढें पहावें ॥१४५॥
तुम्हांआम्हांमधील भिंत । पाडूनि टाका पहा समस्त । मग जाण्यायेण्यास मार्ग प्रशस्त । अति निर्धास्त होईल ॥१४६॥
मीतूंपणाची भेदवृत्ति । हेच ते गुरुशिष्यांतर्गत भिंती । ते न पाडितां निश्चितीं । अभेदस्थिति दुर्गम ॥१४७॥
अल्ला - मालिक अल्ला - मालिक । वाली न त्यावीण कोणी आणिक । करणी तयाची अलोकिक । अमोलिक अकळ ती ॥१४८॥
तों जें करील तेंच होईल । मार्ग तयाचा तोच दावील । क्षण न लागतां वेळ येईल । मुराद पुरेल मनींची ॥१४९॥
ऋणानुबंधाचिया गांठी । भाग्यें आम्हां तुम्हां भेटी । धरूं परस्पर प्रेम पोटीं । सुखसंतुष्टी अनुभवूं ॥१५०॥
कोण येथें अमर आहे । कृतार्थ तो जो परमार्थ लाहे । नातरी श्वासेच्छ्वास वाहे । तोंवरी राहे जीवमात्र” ॥१५१॥
कानीं पडतां हें कृपावचन । सुखावलें माझें आतुर मन । तृषार्त मी लाधलों जीवन । आनंदसंपन्न जाहलों ॥१५२॥
असेल गांठीं प्रज्ञा अतुळ । तैसीच श्रद्धा मोठी अढळ । परी जोडाया साईसम गुरुबळ । दैवचि सबळ आवश्यक ॥१५३॥
पाहूं जातां यांतील सार । भगवंत बोलिले हाचि निर्धार । ये यथा मां हेचि उद्नार । अखिल भार कर्मावरी ॥१५४॥
यथाकर्म यथाश्रुत । जैसा अभ्यास तैसें हित । हेंचि या अध्यायांतील इंगित । हेंच बोधामृत येथींचें ॥१५५॥
“अनन्याश्चिंतयंतो माम्” । हेंच भगवद्नीतावर्म । ऐशा नित्ययुक्तांचा योगक्षेम । चालवी प्रकाम गोविंद ॥१५६॥
“अनन्याश्चिंतयंतो माम्” । हेंच भगवद्नीतावर्म । ऐशा नित्ययुक्तांच योगक्षेम । चालवी प्रकाम गोविंद ॥१५६॥
हा गोड उपदेस ऐकून । उभें राही स्मृतीचें वचन । “देवान्भावयतानेन” । मग ते तुजलगून कळवळती ॥१५७॥
तुम्ही जोर काढूं लागा । दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा । वाटी घेऊनि उभाच मी मागां । पृष्ठभागां आहें कीं ॥१५८॥
म्हणाल जोर म्यां काढावे । दुधाचे प्याले तुम्हीं रिचवावे । हें तों आपणा नाहीं ठावें । दक्ष असावें कार्यार्थीं ॥१५९॥
हे बाबांची प्रतिज्ञावाणी । प्रमाण मानूनि वर्ततील जे कोणी । इहपरत्र सुखची खाणी । गांठिली तयांनीं जाणावें ॥१६०॥
आतां आणीक विनवितों श्रोतां । क्षणैक सुस्थिर करावें चित्ता । परिसा एक स्वानुभवकथा । निश्चयपोषकता साईंची ॥१६१॥
करितां सद्वटीचें नियमन । महाराज देती कैसें उत्तेजन । परिसा ओंठ हालविल्याबांचून । अनुग्रहदान साईंचें ॥१६२॥
भक्तें अनन्य शरण व्हावें । कौतुक भक्तीचें अवलोकावें । मग साईंच्या कळेचे नवलावे । अनुभवावे नित्य नवे ॥१६३॥
असो प्रात:काळींचे प्रहरीं । सुषुप्तींतूनि येतां जागरीं । सद्वृत्तीची उठतां लहरी । तीच निर्धारीं वाढवावी ॥१६४॥
त्याच वृत्तीचा परिपोष । होतां होईल अति संतोष । बुद्धीही पावेल विकास । होईल मनास प्रसन्नता ॥१६५॥
ही एक आहे संतउक्ती । वाटलें तियेची घेऊं प्रचीती । अनुभवें घडळी मनास शांती । नवल चित्तीं वाटलें ॥१६६॥
शिरडीसारखें पवित्र स्थान । गुरुवारासम मंगल दिन । रामनामाचें अखंड आवर्तन । करावें मन जाहलें ॥१६७॥
बुधवारीं रात्रीं शय्येवरी । देह निद्रावश होई तोंवरी । मन रामस्मरणाभीतरीं । घालून अंतरीं राखिलें ॥१६८॥
प्रात:काळीं जाग येतां । रामनाम स्मरलें चित्ता । मग ते ऐसी वृत्ति उठतां । जिव्हेची सार्थकता जाहली ॥१६९॥
निश्चयें केली मनाची धारणा । सारोनियां शौचमुखमार्जना । निघालों साई - प्रातर्दर्शना । प्राप्त सुमना घेऊनि ॥१७०॥
सोडूनि दीक्षितांचें घर । पडतां बुट्टींच्या वाडयाबाहेर । पद एक मधुर औरंगाबादकर । म्हणतां सुंदर ऐकिलें ॥७१॥
पदाची त्या समयोचितता । ओवीरूपें कथूं जातां । जाईल मूळाची स्वारस्यता । होईल विरसता श्रोतियां ॥१७२॥
म्हणवूनि तें पदचि समूळ । अक्षरें अक्षर गातों मी सकळ । तेणेंच आनंदित होतील प्रेमळ । उपदेश निर्मळ मूळपदीं ॥१७३॥
॥ पद ॥
“गुरुकृपांजन पायो मेरे भाई । रामबिना कछु मानत नाहीं ॥ध्रु०॥
अंदर रामा बाहर राम । सपनेमें देखत सीतारामा ॥१॥
जागत रामा सोवत रामा । जहां देखे वहां पूरनकामा ॥२॥
एका जनार्दनीं अनुभव नीका । जहां देखे वहां राम सरीखा ॥३॥गुरु०॥”
आधींच मनानें केलें निश्चित । नियमावें रामनामीं चित्त । निश्चया जों प्रारंभ होत । पद हें देत द्दढता तया ॥१७४॥
तेणें नमासी झाले बोधन । या मन्निश्चयांकुरालागून । साई समर्थ करुणाघन । पदांबुसेचन करिती कां ॥१७५॥
घेऊनियां हातीं तंबुरी । साईंसन्मुख अंगणाभीतरीं । औरंगाबादकर उंच स्वरीं । म्हणतां ही लकेरी परिसिली ॥१७६॥
औरंगाबादकर बाबांचा भक्त । मजसम बाबांचे पायीं अनुरक्त । असतां अनेक पदें मुखोद्नत । हेंच कां स्फुरत ते वेळीं ॥१७७॥
माझें मनोगत कोणा न ठावें । हेंच पद कां तैं गाइलें जावें । जैंसें बाबांनीं सूत्र हालवावें । स्फुरण व्हावें तैसेंच ॥१७८॥
आम्ही सकळ केवळ बाहुलीं । सूत्रधार साई माउली । स्वयें न बोलतां उपासना भली । हातीं दिधली अचूक ॥१७९॥
अंतरींची माझी वृत्ति । प्रतिबिंबली जणूं बाबांचे चित्तीं । एणें मार्गें प्रत्यक्ष प्रतीति । वाटे निश्चितीं दाखविली ॥१८०॥
केवढी या नामाची महती । वर्णिलीसे संतमहंतीं । काय म्यां पामरें ती वानावी किती । स्वरूपप्राप्ति येणेनी ॥१८१॥
ही दो अक्षरें उलटीं स्मरला । तो कोळी वाटपाडयाही उद्धरला । वाल्याचा वाल्मीक होऊनि गेला । वाक्सिद्धी पावला नवलाची ॥१८२॥
मरा मरा उलटें म्हणतां । राम प्रकटला जिव्हेवरता । जन्माआधींच अवतारचरिता । जाहला लिहिता रामाचे ॥१८३॥
रामनामें पतितपावन । रामनामें लाभ गहन । रामनामें अभेद भजन । ब्रम्हासंपन्न या नामें ॥१८४॥
रामनामाच्या आवर्तनें । उठेल जन्ममरणांचें धरणें । एका रामनामाचिया स्मरणें । कोटिगुणें हे लाभ ॥१८५॥
जेथें रामनामाचें गर्जन । फिरे तेथें विष्णूचें सुदर्शन । करी कोटी विन्घांचें निर्दळण । दीनसंरक्षण नाम हें ॥१८६॥
साईंस उपदेशा न स्थळ । नलगे समय काळवेळ । बसतां उठतां चालतां निखळ । सहजचि सकळ उपदेश ॥१८७॥
येविषयींची गोड कथा । सादर श्रवण कीजे श्रोतां । प्रत्यया येईल साईंची सदयता । तैसीच व्यापकता तयांची ॥१८८॥
एकदां एक भक्त श्रेष्ठा । कोणाची कोणी बोलतां गोष्ट । स्वयें होऊनि कुतर्काकृष्ट । निंदासन्निष्ट जाहले ॥१८९॥
गुण राहिले एकीकडा । निंदा प्रवाहे मुखीं दुथडा । गोष्टीचा होवोनियां चुथडा । आला कीं उभडा पैशुन्या ॥१९०॥
असल्या कांहीं तरी कारण । असल्या कोणाचें गर्ह्य आचरण । करावें सन्मुख तयाचें प्रबोधन । कींव जाणून तयाची ॥१९१॥
निंदा कधींही करूं नये । हें तों प्रत्येक जाणे स्वयें । परी न वृत्ति जैं दाबिली जाये । ती ना समाये पोटांत ॥१९२॥
तेथूनि मग येईअ कंठीं । कंठांतूनि जिव्हेचे तटीं । तेथूनि हळू हळू ओठीं । सुखसंतुष्टीं प्रवाहे ॥१९३॥
नाहीं दुजा निंदकापरी । त्रिभुवनांतही कोणी उपकारी । निंदा जयाची तयाचें करी । परोपरी कल्याण ॥१९४॥
मळ काढिती कोणी रिठयानें । कोणी साबणादिकीं साधनें । कोणी शुद्ध निर्मळ जीवनें । निंदक जिव्हेनें काढिती ॥१९५॥
स्वीय मानसिक अधोगती । परोपकारार्थ जे साहती । अवर्णनीय ती महदुपकृती । निंदक निश्चिती अतिवंद्य ॥१९६॥
पावलोपावलीं सावध करिती । निंदामिषें दोष कळविती । भावी परांचे अनर्थ टाळविती । उपकार हे किती वानूं मी ॥१९७॥
बहुतांपरी साधुसंतीं । वर्णिलीसे जयांची महती । तया निंदकवृन्दाप्रती । करितों मी प्रणति साष्टांग ॥१९८॥
आली श्रोतिया अत्यंत चिळसी । निंदकही निघाले बहिर्दिशीं । मंडळी चालली मशिदीसी । दर्शनासी बांबांच्या ॥१९९॥
बबा पूर्ण अंतर्ज्ञानी । देती वेळींच भक्तांस शिकवणी । पुढें कैसा प्रकार तयांनीं । आणिला घडवुनी तें परिसा ॥२००॥
मंडळीसह जातां लेंडियेसी । बाबा पुसती तया भक्ताविसीं । मंडळी म्हणे ओढियापासीं । बहिर्दिशेसी गेलेती ॥२०१॥
कार्यक्रम आटोपल्यावरी । लेंडीवरूनि परतली स्वारी । ओढियावरूनि भक्तही माघारीं । फिरले घरीं जावया ॥२०२॥
भेटी होतां परस्परां । घडला जो वृत्तांत तये अवसरां । विनवीं श्रोतयां जोडूनि करा । तो अवधारा सादर ॥२०३॥
तेथेंच एका कुंपणाशेजारीं । यथेष्ट विष्ठामिष्टान्नावरी । एक ग्रामसूकरी मिटक्या मारी । बाबा निजकरीं दाविती त्यां ॥२०४॥
पहा त्या जिभेला काय गोडी । जनालोकांची विष्ठा चिवडी । बंधु - स्वजनावर चडफडी । यथेष्ट फेडी निज हौस ॥२०५॥
बहुत सुकृताचिये जोडी । आला नरजन्म ऐसा जो दवडी । तया आत्मन्घा ही शिरडी । सुखपरवडी काय दे ॥२०६॥
ऐसें बोलत बाबा गेले । भक्त अंतरीं बहुत खोंचले । प्रातर्वृत्त सर्व आठवलें । बोल ते टोंचले बहु वर्मीं ॥२०७॥
असो बाबा तों परोपरी । भक्तां बोधिती प्रसंगानुसारीं । यांतील सार सांठविल्या अंतरीं । कायहो दूरी परमार्थ ॥२०८॥
असेल जरी माझा हरी । तरी मज देईल खाटल्यावरीं । म्हणीची या सत्यता खरी । परी ती अन्नआच्छादनीं ॥२०९॥
परी ती जो परमार्था लावील । परमार्थ सर्वस्वीं नागवील । जैसें जो करील तैसें भरील । अमोल हे बोल बाबांचे ॥२१०॥
आणीकही बाबांचे बोल । परिसतां देतील स्वानंदा डोल । भावभक्तीची असलिया ओल । मुळें सखोल जातील ॥२११॥
“जलस्थलकाष्ठप्रदेशीं । जनीं वनीं देशीं विदेशीं । संचलीं मी तेजीं आकाशीं । एकदेशी मी नव्हें ॥२१२॥
औट हात देह परिमित । हेच मव्द्याप्ति जे मानित । त्यांस करावया निर्भ्रांत । मूर्तिमंत मी झालों ॥२१३॥
निष्कामत्वें अनन्यभजन । करिती जे माझें रात्रंदिन । ते प्रत्यक्ष माझें मीपण । दुजेपणविरहित ॥२१४॥
गूळ राहील गोडीवेगळा । सागर लाटांपासाव निराळा । तेजा सोडोनि राहील डोळा । मजवीण भोळा भक्त तैं ॥२१५॥
चुकावा जन्ममरणावर्त । ऐसें जयाचे मनीं निश्चित । प्रयत्नें रहावें धर्मवंत । स्वस्थचित्त सर्वदा ॥२१६॥
त्यागावे तेणें बोल वर्मीं । कोणासी छेदूं नये मर्मीं । सदा निरत शुद्ध कर्मीं । चित्त स्वधर्मीं ठेवावें ॥२१७॥
माझिये ठायीं मन बुद्धि । समर्पा स्मरा मज निरवधि । देहाचें कांहींही होवो कधीं । भय त्रिशुद्धि त्या नाहीं ॥२१८॥
जो पाहे मजकडे अनन्य । वर्णी परिसे मत्कथा धन्य । न धरी भावना मदन्त । चित्त चैतन्य लाधेल” ॥२१९॥
माझें नांव घ्या मज शरण या । हें तों सांगत गेले अवघियां । परी मी कोण हें जाणणिया । श्रवण मनन आज्ञापिलें ॥२२०॥
एकास भगवन्नाम - स्मरण । एकास भगवल्लीला - श्रवण । एकास भगवत्पाद - पूजन । आनान नियमन आनाना ॥२२१॥
कोणा अध्यात्म - रामायण । कोणास ज्ञानेश्वरी - पुरश्चरण । कोणास हरिवरदापारायण । गुरुचरित्रावलोकन कोणातें ॥२२२॥
कोणा बैसविती पायांजवळी । क्णास खंडोबाचे देउळीं । कोणाच्या विष्णुसहस्रनामावळी । बांधिती गळीं कळकळीनें ॥२२३॥
कोणास उपदेशिती रामविजय । कोणासी ध्यान नाममाहात्म्य । कोणासी छांदोग्य गीतारहस्य । विश्वसें स्वारस्य अनुभविजे ॥२२४॥
कोणास कांहीं कोणास कांहीं । दीक्षाप्रकारा सीमाच नाहीं । कोणा प्रत्यक्ष कोणा द्दष्टान्तांहीं । उपदेश - नवलाई अपूर्व ॥२२५॥
भक्त अठरा पगड जाती । धांवधांवूनि दर्शना येती । जयांस मद्यावर अति प्रीति । स्वप्नींही जाती तयांचे ॥२२६॥
वक्ष:स्थळावरी बैसती । हातींपायीं छाती दडपिती । स्पर्शाचा कानास खडा लावविती । भाक घेती तंव जाती ॥२२७॥
लग्नगृहीं भिंतीवरती । ज्योतिषी जैसे हरिहर काढिती । गुरुर्ब्रम्हादि मंत्र लिहिती । कोण्या भक्तार्थीं स्वप्नांत ॥२२८॥
कोणी चोरूनि लावितां आसनें । करूं आदरितां हठयोग - साधनें । बाबांस कळे तें अंतर्ज्ञानें । अचूक बाणें खोंचिती ॥२२९॥
कोणा अपरिचिता हातीं धरून । निरोप देती पाठवून । स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन । सबूरी धरून रहावें ॥२३०॥
कोणास प्रत्यक्ष निक्षूनि सांगती । आमुची तों मोठी कडवी जाती । सांगून पाहूं एका दो वक्तीं । शेवटची गती बहु कठिण ॥२३१॥
सांगूं एकदां सागूं दोनदां । न करी जो गुमान आमुचे शब्दा । त्या मग पोटचे पोरास सुद्धां । चिरूनि द्विधा फेकूं कीं ॥२३२॥
महानुभाव ते महामति । काय मी पामर वानूं चमत्कृति । कोणा दे ज्ञानप्राप्ति विरक्ति । सद्भाव - भक्ति कवणा दे ॥२३३॥
कोणास कांहीं व्यवहारीं प्रशस्त । वर्तनाची लावीत शिस्त । चुटका एक उदाहरणार्थ । श्रोतृवृन्दार्थ मी कथितों ॥२३४॥
एकदां बाबा भरदुपारीं । काय आलें नकळे अंतरी । राधाकृष्णीच्या घराशेजारीं । आली स्वारी अवचिता ॥२३५॥
समवेत होते कांहीं जन । म्हणती आणा आणा रे निसण । तों निसण । तों एकानें तात्काळ जाऊन । शिडी तैं आणून ठेविली ॥२३६॥
बाबा ती लावविती घरावरी । स्वयें चढती छपरावरी । कोणा न ठावें काय अंतरीं । योजना तरी हे काय ॥२३७॥
वामन गोंदकराचे घरा । शिडी लावविली ते अवसरा । चढले शिडीवरूनि छपरा । स्वयें झरझरा श्रीसाई ॥२३८॥
तेथून राधाकृष्णीचें छपर । शेजारींच घरासीं घर । तेंही वळंघूनि गेले सत्वर । काय हा चमत्कार कळेना ॥२३९॥
राधाकृष्णाबाईंस मात्र । तेच संधीस मोठा प्रखर । आला होता शीतज्वर । अत्यंत अस्थिर त्या होत्या ॥२४०॥
दोघें दोबाजूं धरूं लागत । तेव्हांच बाबा चालूं शकत । स्वयें एवढे असतां अशक्त । कोठूनि सामर्थ्य आलें हें ॥२४१॥
लगेच दुसरे बाजूची वळचण । वळंघोनियां तेथील उतरण । तेथेंही लाववोनि तीच निसण । आले उतरून खालती ॥२४२॥
पाय लागतां धरेसी । दोन रुपये निसणवाल्यासी । दिधले बाबांनीं अति दक्षतेसीं । अविलंबितेसीं तात्काळ ॥२४३॥
लाविली दों ठायीं शिडी । हीच काय ती श्रमाची प्रौढी । यदर्थ बाबा भरपाई एवढी । करिती फेडी तयाची ॥२४४॥
जनास सहजीं जिज्ञासा । निसणवाल्यास इतुका पैसा । बाबा देती तरी हा कैसा । म्हणती हें पुसा तयांस ॥२४५॥
केला एकानें तेधवां धीर । बाबा देती प्रत्युत्तर । कोणाच्याही श्रमाचा भार । फुकट लवभार घेऊं नये ॥२४६॥
कोणाहीपासूनि घ्यावें काम । परी जाणावे तयाचे श्रम । लावावा जीवास ऐसा नियम । फुलट परिश्रम घेऊं नये ॥२४७॥
कोणीं जाणावें खरें इंगित । बाबा हें कां ऐसें करीत । हें तों तयांचें तयां अवगत । संतान्तर्गत अति गूढ ॥२४८॥
परिसतां मुखींचे उद्नार । तेच सर्वस्वी आम्हां आधार । ठेवितां तैसा वर्तन - निर्धार । चालेल व्यवहार सुरळीत ॥२४९॥
असो पुढील अध्यायाची गोडी । याहूनि आहे अति चोखडी । एका मोलकरिणीची पोर भाबडी । कोडें उलगडी श्रुतीचें ॥२५०॥
गणुदास प्रासादिक हरिदास । उपकार करावया प्राकृत जनांस । ईशावास्य - भाषांतरास । करावया कांस घातली ॥२५१॥
साईकृपें ग्रंथ लिहिला । परी कांहीं गूढार्थ राहिला । तेणें मनास संशय पडला । कैसा फेडिला बाबांनीं ॥२५२॥
बाबा वदत शिरडींत बसून । पारल्यास जैं जासील परतोन । काकांच्या घरची मोलकरीण । शंका समाधान करील ॥२५३॥
ईशावास्य पद्मपरिसरीं । रुंजी घालील वाग्देवी भमरी । ते आमोद सेविती कळाकुसरी । श्रोतीं चतुरीं भोगिजे ॥२५४॥
असो पुढील अध्यायीं हें कथन । कर्ता करविता साई दयाघन । श्रोतां यथावकाश श्रवण । करावें कल्याण होईल ॥२५५॥
पंत हेमाड साईंस शरण । तैसाच भूतीं भगवंतीं लीन । श्रोतां देणें अवधानदान । साईनिवेदन गोड हें ॥२५६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाड्पंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । मदनुग्रहो नाम एकोनविंशोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥