बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:09 IST)

साईसच्चरित - अध्याय १४

Sai Satcharitra Marathi adhyay 14
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम; ॥
जय साईनाथा संतवरा । जय जय दयाळा गुणगंभीरा । जय निर्विकारा परात्परा । जय जय अपारा निरवद्या ॥१॥
ठेवूनि अलक्ष्यीं द्दष्टीं । निजभक्तार्थ दया पोटीं । नानामिषें भक्तांसी भेटी । देऊनि संकटीं तारिसी ॥२॥
करावया दीनोद्धार । हाही एक लीलावतार । भक्तदुर्वासना दुर्धर । दुष्ट निशाचर वधावया ॥३॥
सद्भावें दर्शना जे जे आले । ते ते स्वानंदरस प्याले । अंतरीं आनंदनिर्भर धाले । डोलूं लागले प्रेमसुखें ॥४॥
एवंगुण साईसमर्थ । हीन हीन मी अतिविनीत । तयांचिया चरणाप्रत । साष्टांग प्रणिपात दीनाचा ॥५॥
आतां पूर्वकथानुसंधान । कृष्ण श्वान भक्षितां दध्योदन । जाहलें हिमज्वराचें निरसन । कथा निवेदन जाहली ॥६॥
दुर्धर वाखा आणि मोड्सी । अंगुली - तर्जन - तरणमात्रेंसीं । भर्जित भुईमूग सेवावयासी । देऊनि नाहींशीं जाहलीं ॥७॥
तैसाच एकाचा पोटशूळ । एकाचा कर्णरोग समूळ । एका क्षयरोग महाप्रबळ । कैसा निर्दळला दर्शनें ॥८॥
कैसे श्रीसाईकृपेंकरून । भीमानी जाहले सुखसंपन्न । साईंलागीं कृतज्ञा पूर्ण । चरणीं शरण अखंड ॥९॥
तैसाचि अभिनव हाही प्रकार । हाही अपूर्व चमत्कार । श्रोतियां श्रवणार्थीं बहु आदर । जाणोनि सादर करीतसें ॥१०॥
श्रोतीं नसतां सावधान । कैसें येईल वक्त्यासी स्फुरण । कैसें गुणा चढेल कथन । कैसें तें रसपूर्ण होईल ॥११॥
वक्ता काय करील कथन । सर्वथैव तो श्रोतयां आधीन । श्रोतेच तयाचे अवलंबन । रसवर्धन तेणेनी ॥१२॥
अधींचि हें संतचरित्र । स्वभावेंचि गोड बाह्याभ्यंतर । गोड संतांचे आहार विहार । सहजोद्नारही गोड ॥१३॥
चरित्र नव्हे हें स्वानंदजीवन । साईमहाराज दयाघन । प्रेमें भक्तांलागून । वर्षले साधन निजस्मरणा ॥१४॥
गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या । मार्गास लावीत निवृत्तीच्या । ऐशा प्रपंचपरमार्थाच्या ।सत्पुरुषांच्या या कथा ॥१५॥
हेतु तरी हेच असावे । कीं संसारीं सुखें वर्तावें । परी नित्य सावध राहावें । सार्थक करावें देहाचें ॥१६॥
अनंत पुण्याईच्या बळें । अवचटें जीवा नरदेह मिळे । त्यांतही परमार्थ जयां आकळे । भाग्यें आगळे ते एक ॥१७॥
तेथेंही जो करीना सार्थक । जन्मला भूभार तो निरर्थक । पशूहूनि काय अधिक । जगण्याचें सुख तयाला ॥१८॥
आहार निद्रा भय मैथुन । यांहूनि कांहीं न जाणे जो आन । तो नर केवळ पशूसमान । पुच्छ - विषाणविरहित ॥१९॥
काय या नरजन्माची महती । एणेंचि साधेल भगवद्भक्ती । पायीं लागतील चारी मुक्ति । निजात्मप्राप्ति एणेंचि ॥२०॥
मेघमंडळीं विद्युल्लेखा । संसार हा चंचल तिजसारिखा । एथें कालाहिग्रस्त लोकां । सुखाची घटिका दुर्मिळ ॥२१॥
माता पिता भगिनी भ्राता । दारा पुत्र सुता चुलता । नदीप्रवाहीं काष्ठें वाहतां । एकत्र मिळतात तैसे  हे ॥२२॥
दिसलीं क्षण एक एकवट । लाटेसरसी फाटाफूट । होऊनि पडे जैं ताटातूट । जुळेना तो घआट पुनश्च ॥२३॥
साधिलें न आत्महित जनीं । व्यर्थ शिणविली तयानें जननी । लागल्यावीण संतांचे चरणीं । होईल हानी जन्माची ॥२४॥
प्राणी जेव्हां जन्मास आला । तेव्हांचि मृत्युपंथा लागला । मग आज उद्यां कीं परवांला । विश्वासला नर फसला तो ॥२५॥
ठेवावें या मरणाचें स्मरण । देह केवळ काळाचें वैरण । ऐसें ह्या प्रपंचाचें लक्षण । सावधान असावें ॥२६॥
व्यवहारीं पाऊल ठेवितां चौकस । परमार्थ पावेल अप्रयास । म्हणूनि प्रपंचीं नसावा आळस । पुरुषार्थीं उदास असूं नये ॥२७॥
प्रेमें साईकथा परिसती । तयांसी होईल नि:श्रेयसप्राप्ती । साईचरणीं वाढेल भक्ति । सुखसंवित्ति लाधेल ॥२८॥
जयांसी साईंचें प्रेम पूर्ण । तयांसी हें कथांचें सांठवण । देईल पदोपदीं आठवण । साईचरणपंकजांची ॥२९॥
नि:शब्दाचें शब्दें कथन । अतींद्रियाचें इंद्रियें सेवन । कितीही करा हें कथामृतपान । पूर्ण समाधान दुर्लभ ॥३०॥
अतर्क्य संतांचें विंदान । अनिर्वचनीय तन्महिमान । तयाचें वाचे पूर्ण कथन । कराया कोण समर्थ ॥३१॥
नित्य पडतां या कथा श्रवणीं । साई दिसेल नित्य नयनीं । मनीं ध्यानीं दिवसारजनीं । स्मरणीं चिंतनीं राहील ॥३२॥
दिसूं लागेल जागृतिस्वप्नीं । आसनीं शयनीं आणि भोजनीं । सवेंहीं येईल गमनागमनीं । जनीं वनीं निरंतर ॥३३॥
ऐसा येतां निदिध्यासनीं । मन पावेल स्थिति उन्मनी । ऐसें होऊं लागतां अनुदिनीं । चित्त चैतन्यीं समरसेल ॥३४॥
आतां पुढील कथेची संगती । असे जी कथिली पूर्वाध्यायांतीं । करूं तिचा उपक्रम संप्रती । सादर श्रोतीं होईजें ॥३५॥
भावभक्तीची शिरापुरी । कितीही खा सदा अपुरी । जरी आकंठ सेविली तरी । तृप्ति न परिपूर्ण कधींही ॥३६॥
असो आतां ही दुसरी कथा । श्रोतां आपण सादर परिसतां । संतदर्शन सार्थकता । होईल द्दढता मनाची ॥३७॥
बाबा न बाह्यत: कांहींच करीत । स्थान सोडूनि कोठें न जात । परी बैसल्या स्थळीं सर्व जाणत । अनुभव देत सकळां जनां ॥३८॥
जे सत्तत्त्वही निजपिंडीं । तेंचि कीं अखिल ब्रम्हांडीं । कायेची करोनि कुरवंडी । अखंडित अवलोका ॥३९॥
त्या सत्तत्त्वासी जो शरण । सर्वांसाठीं तया एकत्व जाण । नानात्वाचें किलिया धारण । जन्ममरण - परंपरा ॥४०॥
नानात्व स्थापणारी बुद्धि । अविद्याच जाणावी त्रिशुद्धी । गुर्वागमें चित्तशुद्धि  । स्वरूपस्थिति तेणेनी ॥४१॥
अविद्येपासाव निवृत्ति । तीच एकत्वाची प्राप्ति । अणुमात्र असतां भेद चित्तीं । अनन्य स्थिति ती कैंची ॥४२॥
ब्रम्हादि - स्थावरान्त । जें जें उपाधिसमन्वित । अविवेकियां अब्रम्हावत्‌ । ओतप्रोत ब्रम्हा तें ॥४३॥
तें सकल विज्ञानगनस्वभाव । संसारधर्मा जेथ अभाव । नामरूपांचा पुसिला ठाव । निरवयव ब्रम्हा तें ॥४४॥
उपाधिस्वभावभेदें । अविद्यामोहादि प्रमादें । नानात्वीं हें चित्त लोधे । एकत्वबोधें स्वस्थ हो ॥४५॥
मी वेगळा जन वेगळे । ऐसें न जया कांहीं निराळें । अखंडैकरसपूर्ण जें भरलें । दुजें न उरलें तयातें ॥४६॥
नामरूप कार्य करणें । या सर्व उपाधि समजणें । नानात्व सर्वथैव त्यजणें । ब्रम्हा होणें तें हेंच ॥४७॥
मीच एक अवघा पाहीं । मजवीण रिता ठाव नाहीं । व्यापूनि अशेष दिशा दाही । नाहींच कांहीं मदन्य ॥४८॥
हेचि भावना द्दढ धरावी । माया भूल दूरी सारावी । मजवीण नाहीं वस्तु परावी । आवरावी निजद्दष्टि ॥४९॥
श्रोतयां सहज येई संशय । तरी हा भेद कैसा होय । जीव ज्ञाता, ब्रम्हा ज्ञेय । कोण उपाय हा जाया ॥५०॥
भेदबुद्धि रतिप्रमाण । अनन्यत्वा पाडी खाण । तात्काळ उत्पादी नानापण । जन्म - मरणकारणा ॥५१॥
अविद्या - तिमिरद्दष्टि । लोपतां लोपे सकळ सृष्टि । सस्वरूपैक भरेल दिठी । नानात्व उठाउठी पळेल ॥५२॥
शुद्धोदकीं शुद्धोदक । घालितां होतें निखिळ एक । पूर्वापर समरसे देख । ओळख नुरे भेदाची ॥५३॥
काष्ठाकार भिन्न भिन्न । परी तीं अग्निस्वरूपें अभिन्न । तो तो अविच्छिन्न आकारहीन । स्वयें विलीन निजरूपीं ।५४॥
ऐसेंच आत्मैक्य - विज्ञान । नलगे अन्य प्रतिपादन । आत्मा सर्वांभूतीं परिपूर्ण । रूपविहीन सर्वथा ॥५५॥
विपरी अध्यारोप निमित्त । तेणें भ्रमित सर्वदा चित्त । जन्ममरणादि दु:खें अनुभवित । प्राणी दुश्चित्त सर्वदा ॥५६॥
त्यागूनि नामरूपादि उपाधी । विशुद्ध विज्ञानरूप साधी । ऐशिया सिद्धासी माया ब बाधी । निजानंदीं रत सदा ॥५७॥
ऐसिया स्थितीचें उदाहरण । मूर्तिमंत श्रीसाईंचे चरण । भाग्यें लाभलें जयां दर्शन । धन्य धन्य जन ऐसे ॥५८॥
चंद्र उदकीं दिसे स्थित । परी तो जैसा उदकातीत । संत तैसेचि भक्तपरिवेष्टित । वस्तुत: अलिप्त तयांसी ॥५९॥
दिसे जरी परिवारिला भक्तीं । परी न कोठेंही आसक्ती । स्वस्वरूपीं चित्तवृत्ति । द्दश्यनिवृत्ति सर्वदा ॥६०॥
ऐसे हे महा साधुसंत । जयांच्या बोलांत वर्ते भगवंत । कांहीं न अप्राप्य तयां विश्वांत । कांहीं न अज्ञात तयांतें ॥६१॥
उपदेश देती आणि घेती । ऐसे गुरु - शिष्य असंख्य जगतीं । परी उपदेशासवें अनुभूति । देती हातीं ते विरळा ॥६२॥
पुरे आतां हें पूर्ववर्णन । करूं मुख्य कथावतरण । तदर्थीं श्रोते सोत्कंठ पूर्ण । श्रवणसंपन्न होवोत ॥६३॥
मोंगलाई नांदेड शहरीं । पारशी एक प्रख्यात व्यापारी । धार्मिक लोकप्रिय भारी । नाम निर्धारीं रतनजी ॥६४॥
धनसंपदेचे पसारे । गाडया घोडे शेतें शिवारें । वाडियांचीं मुक्तद्वारें । विन्मुख माघारें नच कोणी ॥६५॥
ऐसे बाह्यत: आनंदसागरीं । डुंबत असतां अहोरात्रीं । अंतरीं दुर्धर चिंतामगरी । सदैव घेरी शेटीतें ॥६६॥
हें तों ईश्वरी सूत्रचि पाहीं । निर्भिळ सौख्य नाहीं कुणाही । कोणास कांहीं कोणास कांहीं । हुरहुर राही पाठीसी ॥६७॥
कोणी म्हणेल मीच मोठा । सर्वैश्वर्यें मीच लाठा । चालूं लागेल उफराटा । नसता ताठा भरेल ॥६८॥
निर्व्यंगत्वा लागेल द्दष्ट । लव - व्यंगत्वाचें गालबोट । परमेष्ठी स्वकरेंच फांसी यथेष्ट । ऐसं हें स्पष्ट वाटतें ॥६९॥
रतनजी धनकनकसंपन्न । आलिया गेलिया घाली अन्न । दीनांचें विच्छिन्न करी दैन्य । सुप्रसन्न सर्वदा ॥७०॥
एवं शेट्जी सुखांत होते । घेतलें जरी हें जगाचिया चितें । परी वित्ताचें सौख्य विफल तें । पुत्रहीनातें सर्वथा ॥७१॥
कन्या - संपत्तीचा पसारा । एकामागूनि एक बारा । कोठूनि लाभेल सुखाचा वारा । मनासी थारा कैंचा त्या ॥७२॥
प्रेमावीण हरिकीर्तन । तालस्वरावीण गायन । यज्ञोपवीतावीण ब्राम्हाण । शोभा कवण तयाची ॥७३॥
आहे सकलकलाप्रवीण । नाहीं सारासार ज्ञान । भूतदयाहीन आचारसंपन्न । शोभा कवण तयाची ॥७४॥
भाळीं टिळे गोपीचंदन । गळां तुळशीमाळा भूषण । जिव्हा करी संतविडंवन । शोभा कवण तयाची ॥७५॥
अनुतापावीण तीथाटन । गळसरीवीण अलंकरण । पुत्रावीण गृहस्थददन । शोभा कवण तयाची ॥७६॥
एक तरी सुपुत्र - संतान ।  देईल काय नारायण । हेंच तया अनुदिन चिंतन । निश्चिंत मन होईना ॥७७॥
तेणें शेटजी सदा खिन्न । गोड न लागे अन्नपान । मनीं रात्रंदिन उद्विग्न । चिंतामग्न सर्वदा ॥७८॥
देवा माझा एवढा कलंक । धुऊनि कीजे मज निष्कलंक । देईं वंशा आधार एक । लज्जा राख प्रभुराया ॥७९॥
दासगणूंवर मोठी भक्ति । जीवंचें हार्द तयां निवेदिती । ते म्हणती जा शिरडीप्रती । मनेप्सित पावसी ॥८०॥
घेईं बाबांचें दर्शन । चरण तयांचें वंदून । करीं साद्यंत गुह्य निवेदन । आशीर्वचन देतील ॥८१॥
जा होईल तुझें कल्याण । अतर्क्य बबांचें विंदान । जाईं तयांसी अनन्य शरण । कृतकल्याण होशील ॥८२॥
मनास मानवला विचार । रतनजींचा झाला निर्धार । कांहीं दिन लोटलियावर । पातले शिरडीवर रतनजी ॥८३॥
गेले दर्शना मशिदीसी । घातलें लोटांगण साईपदासी । पाहोनि महाराज पुण्यराशी । प्रेम तयांसी लोटलें ॥८४॥
करंड फुलांचा सोडिला । सुमन हार काढूनि घेतला । प्रेमें बाबांच्या गळां घातला । फलभार समर्पिला चरणांतें ॥८५॥
होऊनियां अति विनीत । रतनजी अत्यादरयुक्त । बाबांपाशीं जाऊनि बैसत । प्रार्थना करीत ती परिसा ॥८६॥
जन पडतां महत्संकटीं । येती आपुल्या पायानिकटी । बाबा रक्षिती उठाउठी । म्यां हे गोष्टी ऐकिली ॥८७॥
म्हणोनि इथवर आलों भेटी । धरोनि मोठी उत्कंठा पोटीं । सादर करितों चरणसंपुटीं । परता न लोटीं महाराजा ॥८८॥
मग म्हणती बाबा तयांसी । येतां येतां आज येसी । दे काय मज दक्षिणा देसी । मग तूं होसी कृतार्थ ॥८९॥
येतां कोणीही दर्शनासी । लागतां चरण वंदावयासी । असो हिंदु यवन वा पारसी । दक्षिणा त्यापासीं मागत ॥९०॥
ती तरी काय थोडी थोडकी । रुपये एक दोन वा पंचकडी । मागत शत सहस्र लक्ष कोडी । स्वेच्छा परवडी दक्षिणा ॥९१॥
दिधली तरी आणीक आणा । संपली म्हणतां उसनी घ्याना । जेव्हां कोठें उसनीही मिळेना । तेव्हां मग याचना थांबवीत ॥९२॥
आणीक तयां भकां म्हणत । “फिकीर न करीं जा यत्किंचित । देईन तुजला रुपये मी मस्त । बैसें तूं निश्चिंत मजपाशीं ॥९३॥
दुनियेमें किसीका कोई है । और किसीका कोई है । अपना तो यहां कोई नहीं है । अपना अल्लाही अल्ला है ॥९४॥
करी जो मज जीव प्राण । ऐसियाचीच मज वाण । तो देतां मज एक गुण । देतोंमी शतगुण तयासी” ॥९५॥
असेना मोठा लक्षाधीश । तयासही दक्षिणा मागावयास । निर्धना घरीं जावयास । करीत आज्ञेस महाराज ॥९६॥
मोठा धनाढय अथवा रंक । गरीब दुर्बळ अथवा खंक । एक उणा वा एक अधिक । नाहीं ठाऊक साईंस ॥९७॥
वंदूनियां आज्ञा शिरीं । निरभिमान होऊनि अंतरीं । बाबांलागीं याचना करी । जाऊनि घरीं गरीबांच्या ॥९८॥
तरी या पोटीं हाच सारांश । दक्षिणेचें करूनि  मिष । बाबा शिकवीत निजभक्तांस । वरावयास सलीनता ॥९९॥
उपजेल कोणासही ऐशी शंका । साधूस तों पाहिजे धन कां । यदर्थीं विचार करितां निका । फिटेल आशंका मनाची ॥१००॥
साई जरी पूर्णकाम । दक्षिणेचें काय काम । कैसा असेल तो निष्काम । भक्तांसीं दाम मागे जो ॥१०१॥
जयासी गारा आणि हिरा । ताम्र - नाणें वा स्वर्णमोहरा । एकाचि परिमाणाचा विकारा । तो कां निजकरा पसरितो ॥१०२॥
उदरपूर्त्यर्थ मागती भिक्षा । वैराग्याची वरिली दीक्षा । तया विरक्ता निरपेक्षा । काय अपेक्षा दक्षिणेची ॥१०३॥
अष्टसिद्धि जोडिल्या करीं ।  जयाचे सदा तिष्ठती द्वारीं । नवनिधि जयाचे आज्ञाधारी । तया कां लाचारी द्रव्यार्थ ॥१०४॥
ऐहिकावरी मारूनि लाथ । आमुष्मिका न ढुंकून पहात । ऐसे जे सम्यग्दर्शी विरक्त । धन किमर्थ तयांना ॥१०५॥
जे संत साधु सज्जन । जे उत्तमश्लोकपरायण । भक्तकल्याणार्थ जयांचें जीवन । तयांसी धन कां व्हावें ॥१०६॥
साधूसी किमर्थ व्हावी दक्षिणा । तयांनीं असावें निरिच्छ मना । फकीर होऊनि लोभ सुटेना । नित्य आराधना पैशाची ॥१०७॥
प्रथमदर्शना घेती दक्षिणा । पुनर्दर्शना मागगी दक्षिणा । निरोप घेतां आणा दक्षिणा । क्षणोक्षणीं हें काय ॥१०८॥
आधीं पानीय उतरापोशन । पुढें हस्तमुख - प्रक्षालन । करोद्वर्तन तांबूलदान । तयामागून दक्षिणा ॥१०९॥
परी बाबांचा क्रम विलक्षण । करुं जातांचि चंदनविलेपन । किंवा अक्षताद्यलंकरण । दक्षिणाप्रदान कांक्षिती ॥११०॥
आरंभितांच पूर्वाराधना । बाबा आधींच मागती दक्षिणा । ॐ तत्सह्ब्रम्हार्पणा । तत्क्षणाच करणें ये ॥१११॥
तरी या शंकेचें निरसन । कराया नलगे महाप्रयत्न । होतां क्षणैक दत्तावधान । समाधान लाधाल ॥११२॥
धनाचा जो करणें संचय । धर्म घडावा हाचि आशय । परी क्षुल्ल्लक काम आणि विषय । यांतचि अतिशय वेंचे तें ॥११३॥
धनापासाव धर्म घडे । धर्मापासाव ज्ञान जोडे । स्वार्थ तरी तो परमार्थीं चढे । मना आतुडे समाधान ॥११४॥
आरंभीं बहुतकालपर्यंत । बाबा कांहींही नव्हते घेत । जळक्या काडयांचा संग्रह करीत । तोच कीं भरीत खिशांत ॥११५॥
असो भक्त वा अभक्त । कोणाहीपाशीं कांहीं न मागत । दिड्की दुगाणी ठेविल्या तेथ । तमाखू आणीत वा तेल ॥११६॥
तमाखूचें फार प्रेम । ओढीत विडी अथवा चिलीम । त्या चिलीमीची सेवाही नि:सीम । बहुधा निर्धूम्र नसे ती ॥११७॥
पुढें आलें कोणाचे मना । रिक्तहस्तें दक्षिणेविना । जावें कैसें संतदर्शना । तदर्थ दक्षिणा ते घेत ॥११८॥
दिडकी दिधल्या घालीत खिसां । ठेवितां कोणी ढबू पैसा । परत करीत जैशाचा तैसा । क्रम हा ऐसा बहुकाळ ॥११९॥
परी पुढें कांहीं कालें । साईबाबांचें माहात्म्य वाढलें । भक्तांचे थवे येऊं लागले । पूजन चाललें विधिपूर्वक ॥१२०॥
नाहीं पूजेची साङ्गता जाण । सुवर्ण - पुष्प - दक्षिणेवीण । हें तों नित्यपूजेचें विधान । पूजकां प्रमाण ठाउकें ॥१२१॥
राज्याभिषेकसिंचना । अथवा संपादितां पदपूजना । पूजक आणिती उपायना । तैसीच दक्षिणा गुरुपूजे ॥१२२॥
‘उच्चरिदिवि दक्षिणावंत । हिरण्यदा अमृतवंत । हेमदाता शुद्धिमंत’ । मंत्रवर्णांत हें बचन ॥१२३॥
सौमंगल्य गंधदानें । आयुश्यवर्धन अक्षतेनें । श्री ऐश्वर्य पुष्प - तांबूलार्पणें । दक्षिणेनें बहुधनता ॥१२४॥
गंधाक्षतपुष्प - तांबूल । पूजाद्रव्यांत जैसें मूल । तैसीच दक्षिणा सुवर्णफूल । बहुधन फल वितरिते ॥१२५॥
दक्षिणा लागे देवतापूजनीं । तैसीच तत्सांगतासिद्धयर्थ जनीं । व्रतोद्यापन वायनदानीं । हिरण्य लागे अर्पाया ॥१२६॥
जगाची ही घदामोड । पैशावरीच सारी मोड । अब्रूनुकसानीची ही फेड । फेडितात ही पैशानें ॥१२७॥
“हिरण्यगर्भ - गर्भस्थ” । इत्यादि मंत्र उच्चारीत । देवपूजेसही दक्षिणा संमत । संतपूजनींच कां नको ॥१२८॥
संतदर्शना जातां । आपापुल्या ज्ञानानुसारता । येतें कोणाच्या काय चित्ता । एकवासक्यता दुर्मिळ ॥१२९॥
भजनभावार्थ कोणा मनीं । कोणी संतपरीक्षेलागुनी । कोणी म्हणे मनींचें सांगुनी । देईल जनीं तो संत ॥१३०॥
कोणी प्रार्थिती दीर्घायुता । हस्ति - हिरण्य - संपत्ति - मत्ता । कोणी पुत्रपौत्रवत्ता । अखंडित सत्ता मागती ॥१३१॥
नवल बाबांची अगाध शैली । जावोत कोणी कराया कुटाळी । दुर्बुद्धीची होऊनि होळी । चरणकमळीं विनटत ॥१३२॥
हेंही भाग्य नसलिया संचितीं । अनुताप तरी पावत चित्तीं । होऊनि निरभिमान निश्चिती । द्दढ प्रचीती पावत ॥१३३॥
हे तों सर्व प्राकृत भक्त । सर्वथैव प्रपंचासक्त । दक्षिणादानें शुद्धचित्त । व्हावेत हें मनोगत बाबांचें ॥१३४॥
“यज्ञेन दानेन तपसा” ही श्रुति । आत्मज्ञानोत्सुकाहीप्रती । दक्षिणाप्रदान साधन युक्ती । स्पष्ट वचनोक्ति सांगते ॥१३५॥
भक्त स्वार्थी वा परमार्थी । दोघांसी व्हावी इष्टप्राप्ति । तरी दक्षिणा निजगुरूप्रती । निजहितार्थीं द्यावी कीं ॥१३६॥
प्रजापतीही देवां दैत्यां । मानवांसकट तीन अपत्यां । ब्रम्हाचर्यवास संपतां । उपदेश मागतां हेंचि वदे ॥१३७॥
‘द’ हा एकाक्षर उपदेश केला । काय एणें बोध झाला । तोही विचारूनि द्दढ केला । अभिनव लीला गुरुशिष्य ॥१३८॥
‘दान्त व्हावें’ देव समजले । ‘दया करा’ असुर समजले । ‘दान’ द्यावें मानव समजले । प्रजापति ‘भेलें भलें’ म्हणे ॥१३९॥
देवा नव्हेत कोणी अन्य । मानवचि परी स्वभावें भिन्न । अदान्त उत्तमगुणसंपन्न । देव हें अभिधान तयांचें ॥१४०॥
मानवांमाजीच आहेत असुर । जे हिंसापर दुष्ट क्रूर । मानवां गांजी लोभ दुर्धर । एवं त्रिप्रकार मानव ॥१४१॥
तरी लोभप्रधान नर । लोभगर्तेंतूनि काढावया वर । भक्तहितेच्छा ओढवी कर । कृपासागर साईनाथ ॥१४२॥
तैत्तिरीयोपनैषदनुवाक । एकादशीं श्रुतिही देख । दानप्रकार आज्ञापी अनेक । त्यांतील प्रत्येक परिसावा ॥१४३॥
देणें नित्य श्रद्धेनें द्यावें । विनाश्रद्धा दिधलें न पावे । राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावें । लज्जेनें द्यावें कांहीतरी ॥१४४॥
विवाहादि लोकाचार । तेथेंहीं देणें लागे अहेर । देऊनि राखावा मित्राचार । लोकव्यवहार - शिक्षा ही ॥१४५॥
बाबाही दकारें भक्तांप्रत । भक्तहितार्थ तेंचि मागत । करा दया दान व्हा दान्त । सौख्य अत्यंत लाधाल ॥१४६॥
अदान्तत्वादि दोषत्रय । करावया हा त्रिदोषक्षय । हा एकाक्षर स्वल्प उपाय  । शिष्यार्थ गुरुराय योजिती ॥१४७॥
काम क्रोध आणि लोभ । आत्मोन्नतीलागीं अशुभ । तयांचा जय अति दुर्लभ । यदर्थ सुलभ उपाय हा ॥१४८॥
जैसी ही श्रुती तैसीच स्मृती । तियेचीही ऐसीच अनुमती । तियेचें अवतरण श्रोतयांप्रती । द्दढ प्रतीत्यर्थ देतसें ॥१४९॥
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन: । काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥
 
श्रीमद्भगवद्नीता, अ. १६, श्लो, २१

काम क्रोध लोभ जाण । हीं नरकाचीं द्वारें तीन । यांचे पायीं आत्मविनाशन । यदर्थ निक्षून त्यागावें ॥१५०॥
परम दयाळू साई समर्थ । साधावया भक्तहितार्थ । तयांलागीं दक्षिणा मागत । शिक्षणही देत त्यागाचें ॥१५१॥
दक्षिणेची काय किंत । साधावया गुरुवचनार्थ । प्राणही द्यावया नाहीं जो उद्यत । तयाचा परमार्थ कायसा ॥१५२॥
खरेंच भक्तकल्याणावीण । बाबांस काय दक्षिणेचें कारण । स्वयें तयांचें नव्हतें जीवन । अवलंबून दक्षिणेवरी ॥१५३॥
पोटासाठीं भिक्षा मागत । दक्षिणेपोटीं नव्हता स्वार्थ । दक्षिणादानें शुद्धचित्त । व्हावेत निजभक्त हा हेत ॥१५४॥
उपरिनिर्दिष्ट वेदवचन । तदनुसार दक्षिणाप्रदान । आधीं घडवूनि आणिल्यावांचून । न घडे पूजन संपूर्ण ॥१५५॥
पुरे आतां हा दक्षिणा - ग्रंथ । विशद झाला तन्मथितार्थ । नाहीं अभिलाष ना स्वार्थ । भक्तस्वहितार्थ दक्षिणा ॥१५६॥
म्हणूनि आतां कथाभाग । पुढें निवेदूं यथासांग । ऐका रतनजी - दक्षिणाप्रसंग । कौतुक चांग साईंचें ॥१५७॥
श्रोतीं पूर्ण कृपापूर्वक । परिसिजे हें अद्भुत कथानक । साईस्वरूप कैसें व्यापक । कैसें अलोलिक देखिजे ॥१५८॥
शेटीपाशीं दक्षिणा मागतां । साई कथिती पूर्ववृत्तांता । परी तो नाठवे शेटीचे चित्ता । वाटली विस्मयता तयांसी ॥१५९॥
तीन रुपये चौदा आणे । त्वां मज दिधले ते मी जाणें । बाकी जे आणिले मजकारणें । ते मज दक्षिणे देईं गा ॥१६०॥
हेंचि बाबांचें प्रथमदर्शन । ऐकूनि बाबांचें हें वचन । रतनजी शेट विस्मयापन्न । करूं स्मरण लागती ॥१६१॥
शिरडीस पूर्वीं आलों नाहीं । कोणासवें न पाठविलें कांहीं । ऐसें असतां आश्चर्य पाहीं । महाराज साई वदती हे ॥१६२॥
नाहींच ऐसें कधीं घडलें । रतनजी मनीं बहु अवघडले । दक्षिणा दिधली पायां पडले । तयां नुलगडलें तें कोडें ॥१६३॥
तें तितुकेंचि राहूनि गेलें । प्रयोजन येण्याचें निवेदन केलें । पुनश्च पायीं लोटांगण घातलें । जोडूनि बैसले निजहस्त ॥१६४॥
शेटजी मनीं बहु धाले । म्हणती बाबा बरें केलें । पूर्वभाग्य उदया आलें । दर्शन झालें पायाचें ॥१६५॥
मी दुर्दैवी अल्पज्ञ । नेणें पूजा अर्चा यज्ञ । विधिवशें हें त्रिकालज्ञ । प्राज्ञदर्शन घडलें कीं ॥१६६॥
आपण जाणतां माझी चिंता । करा दूर ती कृपावंता । लोटूं नका या अनन्यभक्ता । पायांपरता दयाळा ॥१६७॥
दया उपजली साईनाथा । म्हणती चिंता न करीं वृथा । तव नष्टचर्ये येथूनि आतां । पाया उतरता लागला ॥१६८॥
प्रसाद उदीचा हातीं दिला । कृपेचाकर शिरीं ठेविला । ‘मनाची मुराद पुरवील अल्ला’ । आशीर्वाद दिधला शेटीस ॥१६९॥
मग आज्ञापन घेतलें । रतनजी परतोनि नांदेडा आले । जें जें जैसें घडलें । सविस्तर कथिलें गणुदासा ॥१७०॥
यथायोग्य झालें दर्शन । आनंदनिर्भर झालें मन । प्रसादपूर्वक आश्वासन । आशीर्वचन पावलों ॥१७१॥
यथास्थित सर्व झालें । परी एक नाहीं मज समजलें । महाराज हें काय वदले । कांहींही नुमजलें मजलागीं ॥१७२॥
“तीन रुपये चौदा आणे । त्वां मज दिले मी जाणें” । बाबांचें हें काय बोलणें । सांगा स्पष्टपणें मज सारें ॥१७३॥
कुठले रुपये कुठले आणे । कुठूनि पूर्वीं घडलें देणें । यांतील इंगित कांहींत नेणें । प्रथमचि जाणें शिर्डीचें ॥१७४॥
मज तों कांहीं उकल न पडे । भासे मज हें गूढ रोकडें । दुर्बोध केवळ हें मज कोडें । आपणा उलगडे तरी कां ॥१७५॥
हा तरी एक चमत्कार । दासगणू करिती विचर । काय असावें यांतील सार । मनाचा निर्धार होईना ॥१७६॥
आठवे पूर्ण विचारांतीं । एक अवलियाची मूर्ति । मौलीसाहेब जयां वदती । आठवली चित्तीं बुवांच्या ॥१७७॥
जातीचे हे मुसलमान । कार्यक्रम संतांसमान । धंदा हमालीचा करून । प्राक्तनाधीन वर्तती ॥१७८॥
यांचें चरित्र सविस्तर देतां । विषयांतर होईल ग्रंथा । मौलीसाहेब - चरित्रकथा । ठावी समस्तां नांदेडीं ॥१७९॥
शिरडीस जाणें जाणें ठरल्यावरी । मौलीसाहेब यांची फेरी । सहज शेटजींचे घरीं । स्वेच्छाचारीं जाहली ॥१८०॥
तयां उभयतां परस्पर । प्रेम होतें अपरंपार । फलपान - सुमनहार । यथोपचार अर्पिले ॥१८१॥
शेटजीस होऊनि प्रेरणा । दिधला मौलींस छोटा खाना । तेथील खर्चाची कल्पना । स्मरली तत्क्षणा गणुदासा ॥१८२॥
खर्चाची यादी आणविली । पईन सर्वःई धरली । तयाची मग एकंदर केली । बेरीज झाली बरोबर ॥१८३॥
तीन रुपये चौदाचे आणे । तंतोतंत अधिक ना उणें । तयाची पावती बाबांनीं देणें । आश्चर्य बहुगुणें सर्वत्रां ॥१८४॥
साई महाराज ज्ञानराशी । जाणे बैसोनियां मशिदीसी । भूत - भविष्यवर्तमानासी । कवण्याही देशीं घडो तें ॥१८५॥
भूतमात्रीं एकात्मता । असलियावीण साईसमर्था । येईल कां हा प्रकार अनुभवितां । अथवा सांगतां दुजियांतें ॥१८६॥
शिरडीपासूनि नांदेड दूर । दोहींमध्यें महदंतर । अनोळखी हे संत परस्पर । साईस ही तार यावी कसी ॥१८७॥
साईमहाराज तो मी एक । मौलीबुवा कोणी आणिक । भेदबुद्धीचा हा विवेक । नाहीं अनेकत्व उभयांत ॥१८८॥
मौलीबुवांच तोचि आत्मा । असे सर्वांचा सर्वांतरात्मा । परी या एकात्मतेच्या धर्मा । धन्य त्या वर्मा जाणे तो ॥१८९॥
बाह्या देहें जरी वियुक्त । अंतरीं दोघे नित्ययुक्त । ‘ते दोघे’ ही वाणी अयुक्त । कधींही विभक्त नव्हत ते ॥१९०॥
त्या दोघांचें एकज्ञान । एकप्राण एक अनुसंधान । दोघेही एक चैतन्यघन । समसमान वृत्तीनें ॥१९१॥
शिरडी - नांदेडीं महदंतर । त्या दोघांचें एक अंतर । एक प्राण एक शरीर । तेणें ही तार परस्परां ॥१९२॥
काय नवल हें साधुसंत । तारायंत्रें तारारहित । कुठें कांहींही घडो सृष्टींत । साद्यंत अवगत तयांतें ॥१९३॥
पुढें योग्य काळ लोटला । रातनजीस देव पावला । स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला । वृक्ष पालवला आशेचा ॥१९४॥
सुवेळीं कुटुंब बाळंत झालें । आशीर्वचन सत्य झालें । पुत्ररत्न पोटीं आलें । आनंदले रतनजी ॥१९५॥
पडतां बहुसाल अवर्षण । व्हावें अवचटा पर्जन्यवर्षण । तैसे हे शेटजी निवाले पूर्ण । पुत्रसंतानप्राप्तीनें ॥१९६॥
पुढें तो वंशवेल जो फुलला । यथाक्रम विस्तारत गेला । कन्या - पुत्रीं सुखें डवरला । सौख्य लाधला रतनजी ॥१९७॥
पुढेंही जात साईदर्शना । पावूनि तयांच्या आशीर्वचना । पूर्ण जाहल्या मनकामना । तुष्टले मना रतनजी ॥१९८॥
वसंतीं जरी आम्र सुफलित । सर्वचि फळें पव्क न होत । बारा मुलांत चार हयात । सुखें नांदत सांप्रत ॥१९९॥
यद्दच्छेनें जें जें घडावें । त्यांतचि ज्याचें चित्त सुखावे । ऐसे रतनजी गोड स्वभावें । खेद न पावले तिळभर ॥२००॥
आतां पुढील कथेचें सार । साईनें भरलें स्थिरचर । कोणीं कुठेंही बैसूनि स्थिर । घ्यावा साचार अनुभव ॥२०१॥
ठाणें शहरचा एक गरीब लाचार । उपनांव जयाचें चोळकर । कैसे तयाच्या भावार्थावर । जाहले गुरुवर प्रसन्न ॥२०२॥
पूर्वीं कधीं न पाहिलें देखिलें । तया साईंस कैसें नवसिलें । कैसे तयांचे मनोरथ पुरले । अनुभव दिधले कैसे त्यां ॥२०३॥
कायसें भजन प्रेमावीण । वाचणें पोथी अर्थावीण । देव कैंचा भावावीण । अवघा शीण तो सारा ॥२०४॥
कुंकुमतिलकावीण भाळ । अनुभवावीण ज्ञान फोल । नाहीं हे पुस्तकी विद्येचे बोल । अनुभवें तोल करावें ॥२०५॥
किमर्थ हा प्रबंध साईलीला । अनुबंध याचा ठावा न मजला । मजकरवीं जो साईंनीं लिहविला । ठावें तयांसीच प्रयोजा ॥२०६॥
शिवाय ग्रंथास लागे अधिकारी । मी तों साईंची करितों चाकरी । तयांची ही दफ्तरदारी । आज्ञाधारी तयांचा ॥२०७॥
श्रोते चातक तृषाकीर्ण । साई समर्थ स्वानंदघन । वर्षे अगाध कथाजीवन । तृषा शमन करावया ॥२०८॥
जिया सत्तेनें हे वाणी । जयांचें हें चरित्र वर्णी । तयांचिया पदरजकणीं । घेऊअ लोळणी हे काया ॥२०९॥
तोच या वाचेचा प्रवर्तविता । तोच निजकथेचा कथयिता । त्याचेच पायीं होवो स्थिरता । चंचल चित्ता माझिया ॥२१०॥
जैसें हें कायिक आणि वाचिक । तैसेंच भजन हें मानसिक । घडो मज अक्षय सुखदायक । दीन मी पाईक साईंचा ॥२११॥
चरित्रवदता आणि वदविता । जरी साईच नटला तत्त्वता । तरी काय भिन्न तच्छ्रोता । तोही न परता साईविण ॥२१२॥
दिसाया दिसे चरित्र केवळ । परी हा सकळ साईंचा खेळ । स्वयेंच होऊनि खेळिया प्रेमळ खेळ हा प्रबळ मांडिला ॥२१३॥
अगाध साईबाबाचरित्र । भक्तांसी अनुभव दावूनि विचित्र । करूनि मजला निमित्तमात्र । तुष्टवीत निजछात्र - समुदाय ॥२१४॥
चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा । निज परमामृताचा मेवा । भाग्यें आगळा तेणेंचि सेवावा । भक्तिभावाकरोनी ॥२१५॥
नवल गुरुकृपेचा महिमा । स्मरण रहावें भक्तां आम्हां । म्हणवूनियां ग्रंथपरिश्रमा । भक्तविश्रामार्थ सेविलें ॥२१६॥
आवडीं हें चरित्र गातां । उल्लसेल श्रवणसंपन्नता । कथानुवृत्त्यनुवादें भक्ता । भक्तिप्रेमळता वाढेल ॥२१७॥
श्रवण करितां रात्रंदिन । तुटेल मायामोहबंधन । निरसेल त्रिपुटीचें भान । सुखसंपन्न श्रोतेजन ॥२१८॥
धरूनि श्रीसाईचरण । हेमाड अनन्यभावें शरण । विसंबूं न पवे एकही क्षण । पायींच लोटांगण अखंड ॥२१९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । रतनजी - साईसमागमो नाम चतुर्दशोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥