शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

साईसच्चरित - अध्याय १०

sai satcharitra chapter 10
॥ श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो  नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
जो सर्वलोकहितीं रत । ब्रम्हास्वरू पीं नित्यस्थित । स्मरा तयातें अविरत । प्रेमभरित अंतरें ॥१॥
जयाच्या स्मरणमात्रेंच । उकले जन्ममरणांचा पेंच । साधनांत साधन तें हेंच । नाहीं वेंच कपर्दिक ॥२॥
अल्प प्रयासें अनल्प फळा । अनायासें हाता ये सकळ । जोंवरी हा इंद्रियगण अविकला । तोंवरी पळपळ साधावें ॥३॥
इतर देव सारे मायिक । गुरूचि शाश्वत देव एक । चरणीं ठेवितां विश्वास देख । ‘रेखेवर मेख मारी’ तो ॥४॥
जेथें सद्नुरुसेवा चोखट । संसाराचें समूळ तळपट । न्यायमीमांसादि घटपट । नलगे खटपट कांहींही ॥५॥
अधिभूत आणि आध्यात्मिक । तिसरें दु:ख तें आधिदैविक । तरुनि जाती भक्त भाविक । होतां नाविक सद्नुरु ॥६॥
तरूं जातां लौकिक सागर । विश्वास लागे नावाडियावर । तो तरावया भवसागर । निजगुरूवर ठेवावा ॥७॥
पाहोनि भक्तांची भाव - भक्ति । करितो करतलगत संवित्ति । ‘आनंदलक्षण’ मोक्षप्राप्ति । देतो हातीं लीलेनें ॥८॥
यद्दर्शनें ह्रदयग्रंथी । तुटे हो सर्व विषयनिवृत्ति । संचित - क्रियमाण क्षया जाती । गाऊं चरितीं तयातें ॥९॥
अष्टमाध्यायीं जाहलें कथन । नरजन्माचें प्रयोजन । नवमीं भिक्षावृत्ताचें गहन । गुजवर्णन परिसिलें ॥१०॥
बायज्ञाबाईची भाजीभाकर । खुशालचंदांचा समाचार । म्हाळसापती तात्यांचा शयनप्रकार । श्रवणसुखकर वानिला ॥११॥
आतां श्रोते दत्तचित्त । ऐका पुढील बाबांचें चरित । कैसे ते राहात कोठें निजत । कैसे विचरत अलक्षय ॥१२॥
केवढा लौकिक आयुदीय । हिंदूयवनां उभयां माय । वाघाबकर्‍याच्या विश्वासा ठाय । प्रेमें नि:संशय विहरती ॥१३॥
झाली पोटापाण्याची कहाणी । आतां कैसी साईंची रहाणी । कोठें ते निजत कोण्या ठिकाणीं । सादर श्रवणीं श्रोते व्हा ॥१४॥
चौहाती लांब लांकडी फळी । रुदं एक वीतचि सगळी । झोपाळ्यापरी आढयास टांगली । चिंध्यांहीं बांधिली उभयाग्रीं ॥१५॥
ऐशा फळीवरी बाबा निजत । उशापायथ्या पणत्या जळत । केव्हां चढत केव्हां उतरत । अलक्ष्य गति तयांची ॥१६॥
मान वांकवूनि वरती बैसती । किंवा तिच्यावर निद्रिस्त असती । परी ते केव्हां चढती केव्हां उतरती । नकळे ते गति कवणाही ॥१७॥
ऐसी चिंध्यांनीं बांधिली फळी । वजन बाबांचें कैसें सांभाळी । महासिद्धि असतां जवळी । नांवाला फळी केवळ ती ॥१८॥
अतिसूक्ष्म कण डोळां खुपे । तेथें अणिमावंत सुखें लपे । माशी कीड मुंगी या रूपें । संचार सोपे बाबांचे ॥१९॥
अणिमा जयाचे घरची दासी । वेळ कां तयातें होतां माशी । वसेल जो अधांतरीं आकाशीं । मात त्या कायसी फळीची ॥२०॥
अणिमा - महिमा - लघिमा आदि । अष्टसिद्धि नवनिधी । बद्धांजली उभ्या जयाच्या संनिधी । फळी त्या नुसती निमित्ता ॥२१॥
कीड मुंगी सूकर श्वान । पशु पक्षी मनुष्य जाण । राजा रंक थोर सान । समसमान पाही जो ॥२२॥
दिसाया जरी शिरडीनिवासी । बाहेर लोक्संग्रहाचा सोस । अंतरीं जरी परम निराश । बाहेर पाश भक्तांचा ॥२४॥
अंतरीं अत्यंत निष्काम । बाह्यत: भक्तार्थ अति सकाम । अंतरीं निजशांतीचें धाम । बाह्यप्रकाम संतप्त ॥२५॥
अंतरीं परब्रम्हास्थिति । बाहेर दावी पैशाचवृत्ति । अंतरीं अद्वैतप्रीति । बाह्यत: गुंती विश्वाची ॥२६॥
कधीं पाही प्रेमभावें । कधीं पाषाण घेऊनि धांवे । कधीं शिव्या - शापांतें द्यावें । कधीं कवटाळावें स्वानंदें ॥२७॥
कधीं शांत दांत उपरत । तितिक्षू सदा समाहित । आत्मस्थित आणि आत्मरत । प्रसन्नचित्त भक्तांसी ॥२८॥
एकासनीं नित्य लीन । नाहीं जयासी गमनागमन । सटका जयाचें दंडनिधान । तूष्ण्यवस्थान निश्चिंत ॥२९॥
नाहीं कीर्ति - वित्तेषणा । भिक्षाचर्य प्राणरक्षणा । करूनि ऐशिया योगारोहणा । कालक्रमणा करी जो ॥३०॥
प्रत्यक्ष संन्यासवेष यति । सटका तोचि दंड हातीं । ‘अल्ला - मालीक’ वाक्यानुवृत्ति । भक्तप्रीति अखंड ॥३१॥
ऐशी साईंची सगुणमूर्ति । मनुष्यरूपें अभिव्यक्ति । पूर्वपुण्यार्जित ही संपत्ति । अवचित हातीं लाधली ॥३२॥
तयासी जे मनुष्य भाविती । मंदभाग्य ते मंदमति । विचित्र जयांची दैवगति । तयां हे प्राप्ती कैसेनी ॥३३॥
साई आत्मबोधाची खाण । साई आनंदविग्रहपूर्ण । धरा कास तयाची तूर्ण । भवार्णव संपूर्ण तराया ॥३४॥
खरेंच जें अपार अनंत । भरलें आब्रम्हास्तंबपर्यंत । ऐसें जें निरंतर अभिन्न अत्यंत । मूर्तिमंत तें बाबा ॥३५॥
कलियुगाचा कालप्रसार । चार लक्ष बत्तीस हजार । भरतां स्थूलमानें पांच हजार । झाला अवतार बाबांचा ॥३६॥
येथें श्रोते आशंका घेती । ठावी नसतां जन्मतिथि । काय आधारें केलें हें निश्चितीं । सादर चित्तीं परिसिजे ॥३७॥
आनिर्वाण कृतसंकल्पेंसी । होऊनि शिरडीक्षेत्रनिवासी । कंठिलें साठ संवत्सरांसी । क्षेत्रसंन्यासी वृत्तीनें ॥३८॥
सोळा वर्षांचिया वयास । आरंभीं बाबा प्रकटले शिरडीस । तीन वर्षें ते समयास । करूनि वास होते ते ॥३९॥
तेथूनि मग जे कोठें सटकले । दूर निजामशाहींत आढळले । ते मग वर्‍हाडासमवेत आले । शिरडींत राहिले अक्षयी ॥४०॥
वीस वर्षें होतीं वयास । तेथूनि अखंड शिरडी - सहवास । तेथेंच साठ वर्षें वास । सर्वत्रांस हें ठावें ॥४१॥
शके अठराशें चाळीस । आश्विन शुद्ध दशमीस । विजयादशमीचे सुमुहूर्तास । बाबा निजवास  पावले ॥४२॥
एंव ऐशींचा आयुर्दाय । स्थूलमानाचा हा निश्चय । कीं शके सतराशें साठ होय । जन्मनिर्णय बाबांचा ॥४३॥
काळाच्या माथां देणार पाय । ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय । करवेल कधीं निश्चित काय । अवघड हें कार्य साधाया ॥४४॥
महात्मे नित्य स्वस्थानीं स्थित । जन्म आणि मरणविरहित । दिनमणीस कैंचा उदयास्त । तो तंव अचल स्वस्थ सदा ॥४५॥
शके सोळाशें तीन सालीं । रामदासांची समाधी झाली । पुरीं दोनही न शतकें गेलीं । उदया आली ही मूर्ति ॥४६॥
भरतभूमि यवनाक्रांत । हिंदू नृप पादाक्रांत । भक्तिमार्ग झाला लुप्त । धर्मरहित जन झाले ॥४७॥
तैं रामदास झाले निर्माण । शिवरायातें हातीं धरून । केलें यवनांपासून राज्यरक्षण । गोब्राम्हाण - संरक्षण ॥४८॥
पुरीं दोनही न शतकें गेलीं । पूर्वील घडी पुनश्च बिघडली । हिंदु - अविंधीं दुही पडली । ती मग तोडिली बाबांनीं ॥४९॥
राम आणि रहीम एक । यत्किंचितही नाहीं फरक । मग भक्तींच धरावी कां अटक । वर्तावें तुटक किमर्थ ॥५०॥
काय तुम्ही लेंकरें मूढ । बांधा हिंदु - अविंधांची सांगड । व्हा द्दढ सुविचारारूढ । तरीच पैलथड पावाल ॥५१॥
वादावारी नाहीं बरी । नको कुणाची बरोबरी । व्हा नित्य निजहिताचे विचारी । रक्षील श्रीहरी तुम्हांला ॥५२॥
योग - याग - तप - ज्ञान । हें सर्व हरिप्राप्तीचें साधन । असूनि हें जो हरिविहीन । व्यर्थ जनन तयाचें ॥५३॥
कोणी कांहीं केलिया अपकार । आपण न करणें प्रतिकार । करवेल तरी करा उपकार । उपदेश सार हा त्यांचा ॥५४॥
स्वर्थास तैसाचि परमार्थास । उपदेश हा हितावह बहुवस । उच्च नीच स्त्रीशूद्रांस । धोपट सकळांस हा मार्ग ॥५५॥
स्वप्नींच्या राज्याचें वैभव । जागें झालिया जैसें वाव । तैसाचि संसार केवळ माव । भावना ही तयाची ॥५६॥
देहादि सुखदु:खमिथ्यत्व । हेंचि जयाचें प्रपंचतत्व । निजानुसंधानें स्वप्न - भ्रमत्व । दवडोनि मुक्तत्व साधिलें ॥५७॥
पाहोनि शिष्याची बद्धता । अति कळवळा जयाचे चित्ता । कैसी लाधेल देहातीतता । हेचि चिंता अहर्निश ॥५८॥
अहंब्रम्हाकारवृत्ति । अखंडानंदाची मूर्ति । निर्विकल्प चित्तस्थिति । येई निवृत्ति विसाविया ॥५९॥
घेऊनियां टाळ विणे । दारोदार भटकणें । आल्या गेल्या केविलवाणें । हात पसरणें ठावें ना ॥६०॥
बहुत ऐसे असती गुरु । शिष्य करिती धरधरूं । देती बळेंचि कानमंतरू । सिंतरूनि वित्तार्थ ॥६१॥
शिष्यास धर्माचें शिक्षण । स्वयें अधर्माचें आचरण । त्याचेनि कैसें भवतरण । जन्म - मरण चुकेल ॥६२॥
आपुल्या धार्मिकत्वाची ख्याति । व्हावी झेंडे फडकावे जगतीं । हें लवही न जयाचे चित्तीं । ऐसी ही मूर्ति साईंची ॥६३॥
देहाभिमाना न जेथें वसती । शिष्याठायीं अत्यंत प्रीति । सदैव जेथें हेचि प्रवृत्ति । ऐसी ही मूर्ति साईंची ॥६४॥
नियत आणि अनियत गुरु । असती गुरु दो प्रकारु । एकेकाचा कार्यनिर्धारु । स्पष्ट करूं श्रोतियां ॥६५॥
दैवी संपत्ति परिपव्क करणें । निर्मल होणें अंत:करणें । एवढेंच अनियत गुरूचें देणें । मार्गीं लावणें मोक्षाच्या ॥६६॥
नियत गुरूशीं होतां सख्य । द्वैत जाऊनि होय ऐक्य । ‘तत्त्वमसि’ महाबाक्य । तयाची साक्ष तो दावी ॥६७॥
चराचरीं भरले गुरु । भक्तार्थ होती साकारु । सरतां अवतारकार्यभारू । निजावतारु संपविती ॥६८॥
या द्वितीय कोटींटील साई । चरित्र तयांचें वर्णूं मी कायी । जैसी तो मज बुद्धि देई । तैसेंचि होई लेखन हें ॥६९॥
लौकिकी विद्यांचे अनेक गुरु । स्वरूपीं स्थापी तोचि सद्नुरू । समर्थ तोचि जो दावी भवपारू । महिमा अगोचरू तयाचा ॥७०॥
जो जो जाई कराया दर्शन । तयाचें भूत भविष्य वर्तमान । साई न पुसतां करिती निवेदन । ऊण - खूण संपूर्ण ॥७१॥
ब्रम्हाभावें भूतमात्र । अवलोकी जो सर्वत्र । देखे समसाम्यें अरि - मित्र । भेद तिळमात्र नेणे जो ॥७२॥
निरपेक्ष आणि समदशीं । अपकारियांही अमृत वर्षीं । समचित्त उत्कर्षापकर्षीं । विकल्प ना स्पर्शी जयातें ॥७३॥
वर्ततां या नश्वर देहीं । देहगेहीं जो गुंतला नाहीं । दिसाया देही अंतरीं विदेही । तो येचि देहीं निर्मुक्त ॥७४॥
धन्य शिरडीचे जन । साईच जयांचें देवतार्चन । करितां अशन भोजन शयन । अखंड चिंतन साईंचें ॥७५॥
धन्य धन्य तयांची प्रेमळता । खळ्यांत परसांत कामें करितां । दळितां कांडितां डेरे घुसळितां । महिमा गातात बाबांचा ॥७६॥
आसनीं भोजनीं शयनीं । बाबांच्या नांवाची अक्षय स्मरणी । एका बाबांविण दुजा कोणी । देव ज्यांनीं नाठविला ॥७७॥
काय त्या बायांचा प्रेमा तरी । काय तयांचे प्रेमाची माधुरी । निर्मळ प्रेमचि कवन करी । विद्वत्ता न करी कवनस ॥७८॥
साधी सरळ भाषा खरी । विद्या नाहीं तिळभरी । त्यांतूनि जें कवित्व चमक मारी । मान चतुरीं डोलविजे ॥७९॥
खर्‍या प्रेमाचें आविर्भवन । तया नांव खरें कवन । तें या बायांच्या वाणीमधून । श्रोतीं पाहून घ्यावें कीं ॥८०॥
असेल साईबाबांची इच्छा । पूर्ण संग्रह लाधेल यांचा । पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा । अध्याय कवनांचा होईल ॥८१॥
असो निराकार भक्तकृपें । शिरडींत प्रकटलें साईरूपें । देहाहंकार - विकारलोपें । भक्तिस्वरूपें ओळखिजे ॥८२॥
अथवा भक्तांचें पुण्य फळलें । तें प्राप्तकाल वसत मेळें । साईरूपें पूर्ण अंकुरलें । फळा आलें शिरडींत ॥८३॥
अनिर्वाच्या फुटली वाचा । अजन्म्यासी जन्म साचा । अमूर्ताच्या मूर्तीचा साचा । करुणरसाचा ओतीव ॥८४॥
यशवंत आणि श्रीमंत । वैराग्यशाली ज्ञानवंत । ऐश्वर्य औदार्यमंडित । षड्‌गुणान्वित मूर्ति हे ॥८५॥
विलक्षण बाबांचा निग्रह । स्वयें जरी अपरिग्रह । अमूर्त तरी धरिती विग्रह । भक्तानुग्रह - कारणें ॥८६॥
काया तयांचा कृपाभाव । घेती भक्तांचा जडवूनि भाव । नाहीं तरी तयांचा ठाव । कोण देव गिंवसिता ॥८७॥
वाग्देवता जें वदूं न धजे । श्रवणही जें परिसतां लाजे । ऐसे बोल भक्तकल्याणकाजें । साईमहाराजें वदावे ॥८८॥
जया शब्दांचा अनुवाद करणें । तयांहून बरें मुकेंच असणें । परी न बरवें कर्तव्या चुकणें । म्हणोनि वदणें प्राप्त झालें ॥८९॥
भक्तकणवा बाबांची वाणी । वदती झाली अति लीनपणीं । “दासानुदास मी तुमचा ॠणी । निघालों दर्शनीं तुमचिया ॥९०॥
ही एक तुमचीच कृपा मोठी । झाली  मज तुमचे पायांची भेटी । किडा मी तुमचे विष्ठेपोटीं । धन्य मी सृष्टीं तेणेनी” ॥९१॥
काय बबांची ही लीनता । नम्रपणाची ही हौस चित्ता । काय ही उच्च निरभिमानता । शालीनता ही तैशीच ॥९२॥
वरील हे बाबांचे उद्नार । खरे म्हनूनि केले कीं सादर । कोणास वाटेल हा अनादर । तरी मी पदर पसरितों ॥९३॥
विटाळ झाला असेल वाचे । पापही टाळावया श्रवणाचें । आवर्तन करूं साईनामाचें । दोष सकळांचे जातील ॥९४॥
जन्मोजन्मींच्या आमुच्या तपा । फळ ती केवळ साईकृपा । तृषार्तासी जैसी प्रपा । तैसी अपार सुखदाती  ॥९५॥
जिव्हाद्वारा रस चाखिती । ऐसे समस्तां जरी भासती । परी ते चाखिलें हें नेणती । रसस्फूर्ति न रसनेसी ॥९६॥
जयासी नाहीं विषयस्फूर्ति । कैसे तरी ते विषय सेवितो । विषय जयांच्या इंद्रियां न शिवती । ते काय गुंतती विषयांत ॥९७॥
नयनद्वारें अवलोकिती । पदार्थ जे जे येतील पुढीती । परी ते अवलोकिले नेणती । स्फूर्ति देखती तेथ ना ॥९८॥
जैसी हनुमंताची गर्भकास । गोचर एक मातेस कीं रामास । मग तयाचे ब्रम्हाचर्यास । तुलना कवणास करवेल ॥९९॥
येथें माते न लिंगावलोकन । इतरांचें तैं काय कथन । बाबांचें ब्रम्हाचर्यही परम कठीण । पूर्णपण तें अपूर्व ॥१००॥
कांसे कौपीन लंगोटी । लिंग अजागलस्तन - कोटी । केवळ मूत्रविसर्गपरिपाटी । अवयवां पोटीं अवयव ॥१०१॥
ऐसी - रज - तमादि गुणां । सवें इंद्रियें खिळिलीं ठाणा । जरी लौकिकी कर्तेपणा । संगा कोणा नातळती ॥१०३॥
नि:संग चिन्मात्र आत्माराम । काम क्रोधां विश्रामधाम । बाबा सदैव निष्काम । अवाप्तकाम पूर्णत्वें ॥१०४॥
ऐसी तयांची मुक्तस्थिती । विषयही जयांस ब्रम्हा होती । पुण्यपापाचिया परती । पूर्ण - निवृत्तिस्थान तें ॥१०५॥
नानावल्लीनें ऊठ म्हणतां । गादी सोडून झाला जो परता । जया ठायीं देहाभिमानता । अथवा विषमता स्वप्नीं ना ॥१०६॥
इहलोकीं न प्राप्तव्य कांहीं । साध्य परलोकींही उरलें नाहीं । ऐसा हा केवळ लोकानुग्रही । संत ये महीं अवतरला ॥१०७॥
ऐसे हे संत करुणाघन । अवतारा येण्याचें प्रयोजन । परानुग्रहावीण ना आन । कृपाळू पूर्ण परहितीं ॥१०८॥
ह्रदय यांचें जैसें लोणी । अतीव मृदु म्हणती कोणी । परी संत द्रवतील पर - तापणीं । निजतापेंच पाझरण लोणिया ॥१०९॥
कफनी ठिघळ्यांची जयाचें वसन । तरट जयाचें आसनास्तरण । वृत्तिशून्य जयाचें मन । रौप्यसिंहासन काय त्या ॥११०॥
पाहोनि भक्तभावाकडे । तयास जरी गमलें तें सांकडें । तरीं ते लोटितां पाठीकडे । लक्षही तिकडे देती ना ॥१११॥
बाबा शिरडीसरोवरींचें कमळ । भक्त सेविती परिमळ । अभागी भेकांचे वांटयास चिखल । सर्व काळ कालविती ॥११२॥
कोणा न सांगे आसन । प्राणापान वा इंद्रियदमन । मंत्र तंत्र वा यंत्र - भजन । फुंकणें कान तेंही ना ॥११३॥
लौकिकीं दिसती लोकाचारी । परी अंतरींची आणिकपरी । अत्यंत दक्ष व्यवहारीं । न ये कुसरी दुजयातें ॥११४॥
भक्तार्थ धरिती आकार । तदर्थचि तयांचे विकार । हे संतांचे लौकिकाचार । जाणा साचार सकळिक ॥११५॥
साई महाराज संतनिधान । केवळ शुद्ध परमानंद - स्थान । तया माझें साष्टांग वंदन । निरभिमान निर्लेप ॥११६॥
महत्पुण्यपावन तें स्थान । जेथें महाराज आले चालून । गांठीं पूर्ण संचित असल्यावीण । ऐसें निधान दुर्लभ ॥११७॥
‘शुद्ध बीजाचिया पोटीं । येती फळें रसाळ गोमटीं’ । या प्रसिद्ध उक्तीची कसवटी । घेतली शिरडींत लोकांनीं ॥११८॥
तो ना हिंदू ना यवन । तया ना आश्रम ना वर्ण । परी करी समूळ निकृंतन । नि:संतान भवाचें ॥११९॥
अनंत अपार जैसें गगन । तैसें वाबांचें चरित्र गहन । तयांचेम तें यथार्थ आकलन । तयांवीण कोण करी ॥१२०॥
चित्ताचें काम चिंतन । क्षण न उगलें चिंतनावीण । विषय दिल्या त्या विषयचिंतन । गुरुचिंतन त्या गुरु दिधल्या ॥१२१॥
तरी सर्वैद्रियांचे करुनि कान । ऐकिलेंत जें गुरुमहिमान । तें सहज स्मरण सहज भजन । सहज कीर्तन साईचें ॥१२२॥
पंचाग्निसाधन यज्ञयाग । मंत्र - तंत्र - अष्टांगयोग । द्विजांसीच हे शक्य प्रयोग । काय उपयोग इतरांना ॥१२३॥
तैशा नव्हेत संतकथा । सकलां लाविती त्या सत्पथा । भवभयाची हरिती व्यथा । निज परमार्था प्रकटिती ॥१२४॥
संतकथा श्रवण मनन । परिशीलन वा निदिध्यासन । द्विज शूद्र वा स्त्रीजन । येणे पावन होतात ॥१२५॥
प्रेमचि नाहीं जयाचे ठायीं । ऐसा मानव । होणेंचि नाहीं । कोणाचें कांहीं कोणाचें कांहीं । अधिष्ठान पाहीं आनान ॥१२६॥
कोणाचे प्रेमाची जागा संतती । कोणाची ती धनमानसंपत्ति । देह गेह लौकिक कीर्ति । विद्याप्राप्ति कोणाची ॥१२७॥
प्रेम जें विषयीं वाटतें । तें सर्व जै एकवटतें । हरिचरणमुशींत जें आटतें । तैं तें प्रकटतें भक्तिरूपें ॥१२८॥
म्हणवूनि गेह प्रपंचाला सोपा । चित्त साईचरणीं समर्पा । मग तयाची होईल कृपा । उपाय सोपा हा एक ॥१२९॥
ऐसियाही अल्प साधनीं । महल्लाभ हो घडतो जनीं । तरी या श्रेयसंपादनीं । औदासीन्य कैसें पां ॥१३०॥
सहजीं श्रोतियां अंतरीं । आशंकेची उठेल लहरी । महल्लाभ अल्पोपायीं तरी । नादरिती कां बहुजन ॥१३१॥
आहे यासी एकचि कारण । लालसाही नुपजे भगवत्कृपेवीण । तोच भगवंत जैं सुप्रसन्न । प्रकटे श्रवणलालसाअ ॥१३२॥
तरी साईस जाई शरण । कृपा करील नारायण । श्रवणलालसेचें होईल जनन । स्वल्पसाधन हातीं ये ॥१३३॥
गुरुकथेचि सत्संगति । धरा उगवा संसारगुंती । यांतचि तुमचें सार्थक निश्चितीं । विकल्प चित्तीं न धरावा ॥१३४॥
सोडूनियां लाख चतुराई । स्मरा निरंतर ‘साई साई’ । ‘बेडा पार’ होईल पाहीं । संदेह कांहीं न धरावा ॥१३५॥
हे नाहींत माझे बोल । असती साईमुखींचे सखोल । मानूं नका हो हे फोल । याचें तें तोल करूं नका ॥१३६॥
कुसंग तेथूनि सर्व खोटा । तो महादु:खांचा वसौटा । नकळतचि नेईल अव्हांटा । देईल फांटा सौख्याला ॥१३७॥
एका साईनाथावांचून । अथवा एका सद्नुरूवीण । कुसंगाचें परिमार्जन । करील आन कवण कीं ॥१३८॥
कळवळ्याचें गुरुमुखांतून । निघालें जें गुरुवचन । करा करा भक्त हो जतन । कुसंगनिरसन होईल ॥१३९॥
सृष्टिजात डोळां भरतें । सौंदर्यलोलुप मन तैं रमतें । तीच द्दष्टी जैं मागें परते । तैं तीच रते सत्संगीं ॥१४०॥
इतुकें सत्संगाचें महिमान । समूळ निर्दळी देहाभिमान । म्हणूनि सत्संगापरतें साधन । पाहतां आन असेना ॥१४१॥
धरावा नित्य सत्संग । इतर संग नित्य सव्यंग । सत्संग एकचि निर्व्यंग । अंग प्रत्यंग निर्मळ ॥१४२॥
सत्संग तोडी देहासक्ति । एवढी बलवत्तर तयाची शक्ति । एथ एकदां जडल्या भक्ति । संसारनिर्मुक्ति रोकडी ॥१४३॥
भाग्यें घडल्या सत्संग । सहज उपदेश यथासांग । तत्क्षणीं विरे कुसंग । रमतें नि:संग मन तेथें ॥१४४॥
व्हावया परमार्थीं रिघाव । विषयविरक्ति एक उपाव । न धरितां सत्संगाची हाव । स्वरूपठाव लागेना ॥१४५॥
सुखापाठीं येतें दु:ख । दु:खापाठींच येतें सुख । सुखासी जीव सदा सन्मुख । तोचि विन्मुख दु:खासी ॥१४६॥
व्हा सन्मुख वा विन्मुख । होणार होतें आवश्यक । या उभय भोगांचा मोचक । संगचि एक संतांचा ॥४७॥
सत्संगेम नासे देहाभिमान । सत्संगें तुटे जन्ममरण । सत्संगें भेटे चैतन्यघन । ग्रंथिविच्छेदन तात्काळ ॥१४८॥
पावावया उत्तम गति । पावन एक संतसंगति  । शरण जातां अनन्यगति । निज विश्रांती आंदणी ॥१४९॥
नाहीं नाम नाहीं नमन । नाहीं भाव नाहीं भजन । तया कराया निजपरायण । संत महाजन अवतार ॥१५०॥
गंगा भागीरथी गोदा । कृष्णा वेण्या कावेरी नर्मदा । याही वांच्छिती साधूंच्या पदा । येतील कदा स्नानार्थ ॥१५१॥
जगाचीं पातकें स्वयें क्षालिति । परी तयांची पापनिवृत्ति । विना संतपदप्राप्ति । होईना ती कदापि ॥१५२॥
जन्मांतरींचें भाग्य उदेलें । महाराज साईंचे चरण जोडले । जन्ममरण ठायींच ठेलें । भवभय हरलें समस्त ॥१५३॥
आतां संत श्रोतेजन । केल्या श्रवणाचें करूं मनन । विसांवा घेऊं आपण । पुढील निरूपण पुढाकार ॥१५४॥
हेमाड साईंस शरण । मी तों तयांच्या पायींची वहाण । करीत राहीन कथानिरूपण । होईन सुखसंपन्न तितुकेनी ॥१५५॥
काय तें मनोहर गोमटें ध्यान । मशिदीचे कडेवर राहून । करीत एकेकां उदीप्रदान । भक्तकल्याणहेतूनें ॥१५६॥
संसार मिथ्या जयाचें ज्ञान । ब्रम्हानंदीं अखंड लीन । मन सदैव उफललें सुमन । साष्टांग नमन तयातें ॥१५७॥
डोळां जैं घाली ज्ञानांजन । ठायींच पाडी निजनिधान । ऐसें जया साईचें महिमान । साष्टांग वंदन तयातें ॥१५८॥
पुढील अध्याय याहूनि बरा । अंतरीं शिरतां श्रवणद्वारा । करील पुनीत सच्चरिते । श्रीसाईसमर्थमहिमानं नाम दशमो‍ऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥