बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

साईसच्चरित - अध्याय ६

sai satcharitra chapter 6
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
असो परमार्थु वा संसारू । जेथें सद्नुरु कर्णधारू । तेंचि तारूं पैलपारू । नेऊनि उतारू लावील ॥१॥
सुद्नुरु-शब्दें वृत्ति उठतां । साईच प्रथम आठवती चित्ता । उभेच ठाकती सन्मुखता । ठेविती माथां निजहस्त ॥२॥
धुनीमाजील उदीसमन्वित । पडे जंव मस्तकीं वरदहस्त । ह्रदय स्वानंदें उलूनि येत । प्रेम ओसंडत नेत्रांतुनी ॥३॥
नवलगुरुहस्तस्पर्शविंदान । प्रलयाग्नींतही न होई जो दहन । त्या सूक्ष्मदेहाचें करी ज्वलन । भस्मीभवन करस्पर्शें ॥४॥
चुकूनि देवाची कथा वार्ता । निघाल्या उठे तिडीक माथां । वाचा प्रवाहे बाष्कळता । तयाही स्थिरता लाधावी ॥५॥
शिरीं ठेवितां करकमल । अनेका जन्मींचे परिपव्क मल । जाती धुवूनि होती निर्मल । भक्त प्रेमळ साईंचे ॥६॥
रूप पाहातां तें गोमटें । परमानंदें कंठ दाटे । नयनीं आनंदा पाझर फुटे । ह्रदयीं प्रकटे अष्टभाव ॥७॥
सोहंभावास जागवीत । निजानंदास प्रकटवीत । ठाय़ींच मीतूंपणा विरवीत । सामरस्यें अद्वैत मिरवी ॥८॥
वाचूं जातां पोथीपुराण । पावलोपावलीं सद्नुरुस्मरण । साईच नटे रामकृष्ण । करवी श्रवण निजचरित्र ॥९॥
परिसूं बैसतां भागवत । कृष्णचि साई नखशिखांत । वाटे गाई तें उद्धवगीत । भक्तनिजहित साधाया ॥१०॥
सहज बसावें करूं  वार्ता । तेथेंही साईनाथांची कथा । अकल्पितचि आठवे चित्ता । योग्य द्दष्टांता द्यावया ॥११॥
कागद घेऊनि लिहूं म्हणतां । अक्षरीं अक्षर येई न जुळवितां । परी तोचि जेव्हां लिहवी स्वसत्ता । लिहितां लिहितां लिहवेना ॥१२॥
जंव जंव अहंभाव डोकावत । निजकरें तया तळीं दडपीत । वरी करोनि निज शक्तिपात । शिष्यास कृतार्थ करीत ते ॥१३॥
काया - वाचा - मनें येतां । लोटांगणीं साई समर्था । धर्मार्थ-काम-मोक्ष हाता । चढती न मागतां आपैसे ॥१४॥
कर्म ज्ञान योग भक्ती । या चौमार्गीं ईश्वरप्राप्ती । जरी हीं चार चौबाजूं निघती । तरीही पोंचविती निजठाया ॥१५॥
भक्ती ही बाभुळवनींची वाट । खांचा खळगे अति बिकट । एकपावली परी ती नीट । हरीनिकट नेई कीं ॥१६॥
कांटा टाळूनि टाका पाय । हाचि एक सुलभ उपाय । तरीच निजधाम पावाल निर्भय । निक्षूनि गुरुमाय वदे हें ॥१७॥
मनाचे मळे जैं भक्तीं शिंपिलें । वैराग्य खुले ज्ञान फुले । कैवल्य फळे चित्सुख उफळे । अचूक चुकलें जन्ममरण ॥१८॥
मूळ परमात्मा स्वयंसिद्ध । तोचि सच्चिदानंद त्रिविध । उपाधियोगें झाला प्रबुद्ध । प्रकट बोध भक्तार्थ ॥१९॥
जैसा तो या त्रैगुण्यें व्यक्त । मायाही होऊनि क्रियाप्रयुक्त । सत्त्व-रज-तमा चाळवीत । करी सुव्यक्त निजगुण ॥२०॥
मृत्तिकेचा विशिष्ट आकार । तया नाम घट साचार । घट फुटतां नाम रूप विकार । निघूनि पार जातात ॥२१॥
हें अखिल जग मायेपासाव । परस्परां कार्यकारणभाव । मायाचि प्रत्यक्ष सावयव । होऊनि उद्भवली जगरूपें ॥२२॥
जगाआधीं मायेची स्थिती । पाहूं जातां नाहीं व्यक्ति । परमात्मरूपीं लीन होती । परम अव्यक्तीं संचली ॥२३॥
व्यक्त्त होतांही परमात्मरूप । अव्यक्त तरी ही परमात्मरूप । एवंच ही माया परमात्मरूप । अभेदरूप परमात्मीं ॥२४॥
मायेनें तमोगुणापासून । केले जडपदार्थ निर्माण । निर्जीव चलनवलनशून्य । क्रिया पूर्ण ही प्रथम ॥२५॥
मग मायेच्या रजोगुणीं । परमात्मचिद्नुणाचि मिळणी । होतां उघडली चैतन्यखाणी । स्वभावगुणीं उभंयांचे ॥२६॥
पुढें या मायेचा सत्त्वगुण । करी बुद्धितत्त्व निर्माण । तेथ परमात्म्याचा आनंदगुण । मिसळतां खेळां संपूर्णता ॥२७॥
एवं माया महाविकारी । क्रियोपाधि जों न स्वीकारी । पूर्वोक्त पदार्थांतें न करी । त्रिगुण तोंवरी अव्यक्त ॥२८॥
गुणानुरूप क्रिया कांहीं । न करितां माया व्यक्त नाहीं । राहूं शके अव्यक्त पाहीं । स्वयें जैं सेवी अक्रियत्व ॥२९॥
माया कार्य परमात्म्याचें । जग हें कार्य त्या मायेचें । ‘सर्वं खल्विदं ब्रम्हा’ - त्वाचें । ऐक्य तिहींचें तें हेंचि ॥३०॥
ऐसी जे हे अभेदप्रतीति । कैसेनि प्राप्त होय निश्चितीं । ऐसी उत्कटेच्छा जया चित्तीं । वेद श्रुति पहावी ॥३१॥
सारासार विचारशक्ति । वेदशास्त्र-श्रुति-स्मृती । गुरु-वेदांत-वाक्यप्रतीति । परमानंदप्राप्ति दे ॥३२॥
‘माझिया भक्तांचे धामीं । अन्नवस्त्रास नाहीं कमीं’ । ये अर्थीं श्रीसाई दे हमी । भक्तांसी नेहमीं अवगत ॥३३॥
‘मज भजती जे अनन्यपणें । सेविती नित्याभियुक्तमनें । तयांचा योगक्षेम चालविणें । ब्रीद हें जाणें मी माझें’ ॥३४॥
हेंचि भगवद्नीतावचन । साई म्हणती माना प्रमाण । नाहीं अन्नावस्त्राची वाण । तदर्थ प्राण वेंचूं नका ॥३५॥
देवद्वारीं मान व्हावा । देवापुढेंचि पदर पसरावा । तयाचाच प्रसाद जोडावा । मान सोडावा लौकिकीं ॥३६॥
काय लोकीं मान डोलविली । तितुक्यानें का भरसी भुली । आराध्यमूर्ति चित्तीं द्रवली । घर्में डवडवली पाहिजे ॥३७॥
हेंचि ध्येय लागो गोड । सर्वेंद्रियीं भक्तीचें वेड । इंद्रियविकारां भक्तीचे मोड । फुटोत कोड मग काय ॥३८॥
सदैव ऐसें भजन घडो । इतर कांहींहीं नावडो । मन मन्नामस्मरणीं जडो । विसर पडो अवघ्याचा ॥३९॥
नाहीं मग देह-गेह-वित्त । परमानंदीं जडेल चित्त । मन समदर्शी आणि प्रशांत । परिपूर्ण निश्चित होईल ॥४०॥
सत्संग केलियाची खूण ॥ वृत्तीसी पाहिजे समाधान । नानाठायीं वसे जें मन । तें काय ‘सल्लीन’ म्हणावें ॥४१॥
तरी होऊनि दत्तावधान । श्रोतं भावार्थे परिसिजे निरूपण । करितां हें साईचरित्र श्रवण । भक्तिप्रवण मन होवो ॥४२॥
कथासंगतीं होईल तृप्ति । लाधेल चंचलमना विश्रांति । होईल तळमळीची निवृत्ति । सुखसंवित्ति पावाल ॥४३॥
आतां पूर्वील कथानुसंधान । मशीदीचें जीर्णोद्धरण । रामजन्माचें कथाकीर्तन । चालवूं निरूपण पुढारां ॥४४॥
एक भक्त गोपाळ गुंड । जयासी बाबांची भक्ति उदंड । मुखीं बाबांचें नांव अखंड । काळखंडण ये रीती ॥४५॥
तयासी नव्हतें संतान । पुढें साईप्रसादेंकरून । पावता झाला पुत्ररत्न । चित्त प्रसन्न जाहलें ॥४६॥
झालें गोपाळ गुंडाचें मानस । यात्रा एक अथवा उरूस । भरवावा शिर्डीग्रामीं वर्षास । होईल उल्हास सर्वत्रां ॥४७॥
तात्या कोते दादा कोते । माधवरावादि प्रमुख जनांतें । रुचला विचार हा सकळांतें । तयारीतें लागले ॥४८॥
परी या वार्षिक उत्सवालागून । आधीं एक नियमनिर्बधन । जिल्हाधिकारी यांचें अनुमोदन । करणें संपादन आवश्यक ॥४९॥
तदर्थ उद्योग करूं जातां । गांवीं जो एक कुळकर्णी होता । कुत्सितपणें उलटा जातां । आला मोडता कार्यांत ॥५०॥
कुळकर्णी जो आडवा पडला । पहा कैसा परिणाम आला । यात्रा भरूं नये शिर्डीला । हुकूम झाला जिल्ह्याचा ॥५१॥
परी ही यात्रा भरावी शिर्डींत । बाबांचेंही हेंचि मनोगत । आज्ञा पूर्ण आशीर्वादयुक्त । होती तदर्थ झालेली ॥५२॥
ग्रामस्थांनीं पिच्छा पुरविला । जिवापाड यत्न केला । अधिकारियांनीं हुकूम फिरविला । मान राखिला सकळांचा ॥५३॥
तेव्हांपासू नि बाबांच्या मतें । यात्रा ठरविली रामनवमीतें । व्यवस्था पाहती तात्या कोते । यात्रा येते अपरंपार ॥५४॥
त्याच रामनवमीचे दिसीं । भजनपूजन समारंभेंसीं । तासे चौघडे वाजंत्रेंसीं । यात्रा चौपासी गडगंज ॥५५॥
वर्षास दोन नवीं निशाणें । समारंभें होईअ मिरवणें । मशिदीचे कळसास बंधाणें । तेथेंचि रोवणें अखेर ॥५६॥
त्यांतील एक निमोणकरांचें । दुजें निशाण दामू अण्णांचें । मिरवणें होतें थाटामाटाचें । फडकतें कळसाचे अग्रभागीं ॥५७॥
पुढें रामनवमीचा उत्सव । उरुसापोटीं कैसा समुद्भव । परिसा तें कथानक अभिनव । स्वानंदगौरव शिर्डीचें ॥५८॥
शके अठराशें तेहतीस सालीं । रामनवमी प्रथम झाली । उरुसापोटीं जन्मास आली । तेय़ूनि चालली अव्याहत ॥५९॥
प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म । तेथूनि या कल्पनेचा उगम । करावा रामजन्मोपक्रम । लाधेल परम कल्याण ॥६०॥
तेथपर्यंत केवळ उरूस । यात्रा भरत असे बहुवस । त्यांतूनि हा जन्मोत्सव सुरस । आला उदयास ते सालीं ॥६१॥
एकदां भीष्म स्वस्थचित्त । वाडियामाजीं असतां स्थित । काका पूजासंभारसमवेत । जावया मशिदींत उद्युक्त ॥६२॥
अंतरीं साईदर्शन - काज । वरी उरुसाचीही मौज । काका आधींच एक रोज । शिर्डींत हजर उत्सवार्थ ॥६३॥
पाहूनियां समय उचित । भीष्म तेव्हां काकांस पुसत । सद्‌वृत्ति एक मनीं स्फुरत । द्यात का मदत मजलागीं ॥६४॥
येथें वर्षास भरतो उरूस । रामजन्माचा हा दिवस । तरी जन्मोत्सव संपादायास । आहे अनायास ही संधी ॥६५॥
काकांस आवडला तो विचार । घ्या म्हणाले बाबांचा होकार । आहे तयांच्या आज्ञेवर । कार्यासी उशीर नाहीं मग ॥६६॥
परी उत्सवा लागे कीर्तन । उभा राहिला तोही प्रश्न । खेडेगांबीं हरिदास कोठून । ही एक अडचण राहिली ॥६७॥
भीष्म म्हणती कीर्तनकार । तुम्ही धरा पेटीचा स्वर । राधाकृष्णाबाई तयार । सुंठवडा वेळेवर करितील ॥६८॥
चला कीं मग बाबांकडे । विलंब हें शुभकार्या सांकडें । शुभासी जैं शीघ्रत्व जोडे । साधे रोकडें तैं कार्य ॥६९॥
चला आपण पुसावयास । आज्ञा कीर्तन करावयास । ऐसें म्हणतांच मशिदीस । दोघे ते समयास पातले ॥७०॥
काका आरंभ करितां पूरेतें । बाबाच जाहले प्रश्न पुसते । काय वाडयांत चाललें होतें । सुचेना तें काकांना ॥७१॥
तात्काळ बाबा भीष्माप्रती । तोच प्रश्न अन्यरीतीं । कां बुवा काय म्हणती । म्हणवूनि पुसती तयांतें ॥७२॥
तेव्हां काकांस आठव झाला । उद्दिष्टार्थ निवेदियेला । विचार बाबांचे मनास रुचला । निश्चित केला उत्सव ॥७३॥
दुसरे दिवशीं प्रात:समयाला । पाहूनि बाबा गेले लेंडीला । सभामंडपीं पाळणा बांधिला । थाट केला कीर्तनाचा ॥७४॥
पुढें वेळेवरी श्रोते जमले । बाबा परतले मीष्म उठले । काका पेटीवर येऊन बैसले । बोलावूं पाठविलें तयांना ॥७५॥
‘बाबा बोलाविती तुम्हांस’ । ऐकतां काकांचे पोटीं धस्स । काय झालें न कळे मनास । कथेचा विसर ना होवो ॥७६॥
ऐकूनि बाबांचें निमंत्रण । काकांची तेथेंचि झाली गाळण । बाबा कां बरें क्षुब्ध मन । निर्विन्घ कीर्तन होईल ना ॥७७॥
पुढें चालती मागें पहाती । भीत भीत पायर्‍या चढती । मंदमंद पाउलें पडती । चिंतावर्तीं बहु काका ॥७८॥
बाबा तयांस करिती विचारणा । कशास येथें बांधिला पाळणा । कथातात्पर्य आणि योजना । ऐकून मना आनंदले ॥७९॥
मग तेथें जवळ निंबर । तेथूनि घेऊनि एक हार । घाटला काकांच्या कंठीं सुंदर । मीष्माकरितां दिला दुजा ॥८०॥
पाळण्याचा प्रश्न परिसतां । उपजली होती मोठी चिंता । परी गळां तो हार पडतां । सर्वांस निश्चिंतता जाहली ॥८१॥
आधींच भीष्म बहुश्रुत । विविधकथापारंगत । कीर्तन जाहलें रसभरित । आनंद अपरिमित श्रोतयां ॥८२॥
बाबाही तैं प्रसन्नवदन । जैसें दिधलें अनुमोदन । तैसाचि उत्सव घेतला करवून । कीर्तनभजनसमवेत ॥८३॥
रामजन्माचिया अवसरीं । गुलाला बाबांच्या नेत्रांभीतरी । जाऊनि प्रकटले बाबा नरहरी । कौसल्येमंदिरीं श्रीराम ॥८४॥
गुलालाचें आला कोप । प्रत्यक्ष नरसिंहाचें रूप । सुरू झाले शिव्याशाप । वर्षाव अमूप जाहला ॥८६॥
पाळण्याचे होतील तुकडे । राधाकृष्णा मनीं गडबडे । राडील कैसा धड हें सांकडें । येऊनि पडे तिजलागीं ॥८७॥
सोडा सोडा लवकर सोडा । पाठीसी लागतां तिचा लकडा । काका सरकले पुढां । पाळणा सोडावयातें ॥८८॥
तंव तों बाबा अति कावले । काकांचिया अंगावर धांवले । पाळणा सोडणें जागींच राहिलें । वृत्तीवर आले बाबाही ॥८९॥
पुढें दुपारीं आज्ञा पुसतां । बाबा काय वदले आश्चर्यता । एव्हांच कैंचा पाळणा सोडितां । आहे आवश्यकता अजून ॥९०॥
ही आवश्यकता तरी कसली । अन्यथा नव्हे साई-वचनावली । विचार करितां बुद्धि स्फुरली । साङ्गता न झाली उत्सवाची ॥९१॥
येथवरी उत्सव झाला । दुसरा दिन जों नाहीं उगवला । नाहीं उगवला । नाहीं झाला जों गोपाळकाला । उत्सव सरला न म्हणावें ॥९२॥
एणेंप्रमाणें दुसरे दिनीं । गोपाळकाला कीर्तन होऊनी । पाळणा मग सोडायालागुनी । आज्ञा बाबांनीं दीधली ॥९३॥
पुढील वर्षीं भीष्म नव्हते । बाळाबुवा सातारकरांतें । कीर्तनार्थ आणविणें होतें । जाणें कवठयातें तयांना ॥९४॥
म्हणूनि बाळाबुवा भजनी । प्रसिद्ध ‘अर्वाचीन तुका’ म्हणूनि । घेऊनि आले काका महाजनी । उत्सव त्यांहातूनि करविला ॥९५॥
हेही जरी मिळाले नसते । काकाच कीर्तनार्थ उभे रहाते । दासगणू कृत आख्यान त्यांतें । पाठचि होतें नवमीचें ॥९६॥
तिसरे वर्षीं सातारकर । बाळाबुवांचेंच शिर्डीवर । आगमन जाहलें वेळेवर । कैसें सादर परिसा तें ॥९७॥
ऐकूनि साईबाबांची कीर्ति । दर्शनकाम उद्भवला चित्तीं । परी मार्गांत पाहिजे संगती । लाभेल केउती ही इच्छा ॥९८॥
बाळाबुवा स्वयें हरिदास । सातार्‍याकडे मूळ रहिवास । मुंबापुरीं परेळास । होता निवास ये समयीं ॥९९॥
बिर्‍हाड सिद्धाकवठें म्हणून । सातारा जिल्ह्यांत देवस्थान । तेथें रामनवमीचें कीर्तन । वर्षासन बुवांस ॥१००॥
आषाढीची एकादशी । रामनवमी चैत्रमासीं । या दोन वार्षिक उत्सवांसी । बाळाबुवांसीं संबंध ॥१०१॥
बादशाही सनद पाहतां । बडे बाबांचे खर्चाकरितां । रुपये चतुर्विंशती शतां । मूळ व्यवस्था संस्थानीं ॥१०२॥
असो या दोन उत्सवांलागीं । रुपये त्रिंशत बुवांची बिदागी । परी ते वर्षीं कवठयास मरगी । पडले प्रसंगीं ग्रामस्थ ॥१०३॥
तेणें रामनवमी राहिली । बुवांस तेथूनि पत्रें आलीं । यावें आतां पुढील सालीं । ग्रामचि खालीं झालासे ॥१०४॥
सारांश रामाची सेवा चुकली । बिदागीही जागीं राहिली । शिर्डीस जावया संधी फावली । भेट घेतली दीक्षितांची ॥१०५॥
दीक्षित बाबांचे परम भक्त । शिरडी - गमनाचा मनोगत । पुरेल त्यांनीं आणितां मनांत । स्वार्थ परमार्थ साधेल ॥१०६॥
पंचवार्षिक कवठयाची प्राप्ति । एकाच उत्सवीं बाबा देती । बाळाबुवा कां न आनंदती । आभारी होती बाबांचे ॥११७॥
असो पुढें एके दिवशीं । दासगणू येतां शिर्डीसी । देवविला प्रार्थूनि बाबांसी । उत्सव प्रतिवर्षीं तयांस ॥११८॥
तेथूनि पुढें हा कालवरी । होताहे जन्मोत्सव गडगजरीं । अन्नसंतर्पण आकंठवरी । महारापोरीं आनंद ॥११९॥
समाधीच्या महाद्वारीं । मंगल वाद्यांचिया गजरीं । साई - नामघोष अंबरीं । आनंदनिर्भरीं कोंदाटे ॥१२०॥
जैसी यात्रा वा उरूस । तैसेंच स्फूरलें गोपाळ गुंडास । कीं त्या जीर्ण मशिदीस । रूप गोंडस आणावें ॥१२१॥
मशिदीचाही जीर्णोद्धार । व्हावा आपुले हस्तें साचार । भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार । पाषाण तयार करविले ॥१२२॥
परी हा जीर्णोद्धारयोग । नव्हता वाटे गुंडाचा भाग । या विशिष्ट कार्याचा सुयोग । आला मनाजोग पुढारा ॥१२३॥
वाटे बाबांच्या होतें मनीं । करावें हें नानांनीं । फरसबंदी मागाहुनी । करावी काकांनीं तदनंतर ॥१२४॥
तैसेंचि पुढें घडूनि आलें । आधीं आज्ञा मागतां थकले । म्हाळसापतीस मध्यस्थी घातलें । अनुमोदन दिधलें बाबांहीं ॥१२५॥
असो जेव्हां मशिदीसी । निशींत एका झाली फरसी । तेथूनि मग दुसरेच दिवशीं । बाबा गादीसीं बैसले ॥१२६॥
अकरा सालीं सभामंडप । तोही प्रचंड खटाटोप । केवढा तरी महाव्याप । जाहला थरकांप सकळिकां ॥१२७॥
तेंही कार्य येचि रीतीं । ऐसीच सकल परिस्थिति । असतां पूर्ण केलें भक्तीं । एके रात्रींत सायासें ॥१२८॥
रात्रीं प्रयासें खांब दाटावे । सकाळीं बाबांनीं उपटूं लागावें । अवसर साधूनि पुन्हां चिणावे । ऐसें शिणावें सकळिकीं ॥१२९॥
सर्वांनी घालावी कास । करावा रात्रीचा दिवस । पुरवावा मनाचा हव्यास । अति सायास सोसूनि ॥१३०॥
आधीं येथें उघडें आंगण । होतें इवलेंसें पटांगण । सभामंडपा योग्य स्थान । जाहलें स्फुरण दीक्षितां ॥१३१॥
लागेल तितुका पैका लावून । लोहाचे खांब कैच्या आणून । बाबा चावडीसी गेलेसे पाहून । काम हें साधून घेतलें ॥१३२॥
भक्तांनीं रात्रीचा करावा दिवस । खांब चिणावे करूनि सायास । चावडींतूनि परतण्याचा अवकाश । लागावें उपटण्यास बाबांनीं ॥१३३॥
एकदां अत्यंत कोपायमान । एका हातीं तात्यांची मान । दुजियानें एका खांबास हालवून । उपटून काढूं पहात ॥१३४॥
हाल हालवूनि केला ढिला । तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला । कांडें लावून पेटवूनि दिला । खड्डय़ांत टाकिला त्वेषानें ॥१३५॥
तया समयींचे ते डोळे । दिसत जैसे अनल गोळे । सन्मुख पाहील कोण त्या वेळे । धैर्य गेलें सकळांचें ॥१३६॥
लगेच खिशांत हस्त घातला । रुपया एक बाहेर काढिला । तोही येथेंचि निक्षेपिला । जाणों तो केला सुमुहूर्त ॥१३७॥
शिव्याशापांचा वर्षाव झाला । तात्याही मनीं बहु घाबरला । प्रसंग बहु बिकट आला । प्रकार घडला कैसा हा ॥१३८॥
जन लोक विस्मयापन्न । हें काय आज आहे दुश्चिन्ह । तात्या पाटलावरील हें विन्घ । होईल निवारण कैसें कीं ॥१३९॥
भागोजी शिंद्यानें धीर केला । हळूहळू पुढें सरकला । तोही आयताच सांपडला । यथेष्ट घुमसिला बाबाहीं ॥१४०॥
माधवरावही हातीं लागले । तेही विटांचा प्रसाद पावले । जे जे मध्यस्थी करावया गेले । वेळींच अनुग्रहिले वाबांहीं ॥१४१॥
बाबांपुढें जाईल कोण । केबीं तात्याची करावी सोडवण । म्हणतां म्हणतां क्रोधही क्षीण । झाला शमन बाबांचा ॥१४२॥
तात्काळ दुकानदार बोलाविला । जरीकांठी फेटा आणविला । स्वयें तात्याचे डोक्यास बांधविला । शिरपाव दिधला जणूं त्यास ॥१४३॥
आश्चर्यचकित लोक झाला । काय कारण या रागाला । किमर्थ तात्यावरी हा हल्ला’ । केला गिल्ला बाबांनीं ॥१४४॥
कोपास चढले किंनिमित्त । क्षणांत पाहतां प्रसन्नचित्त । यांतील कारण यत्किंचित  । कोणासही विदित होईना ॥१४५॥
कधीं असत शांतचित्त । प्रेमें गोष्टी वार्ता वदत । कधीं न लागतां निमिष वा निमित्त । क्षुब्ध चित्त अवचित ॥१४६॥
असो ऐशा या बाबांच्या गोष्टी । एक सांगतां एक आठवती । सांगूं कोणती ठेवूं कोणती । प्रपंचवृत्ती बरवी ना ॥१४७॥
करवे न मजही आवड निवड । जैसी जिला मिळेल सवड । तैसी ती श्रोतयांची होड । श्रवणकोड पुरवील ॥१४८॥
पुढील अध्यायीं करावें श्रवण । वृद्धमुखश्रुत पूर्वकथन । साईबाबा हिंदू कीं यवन । करूं निरूपण यथामति ॥१४९॥
दक्षिणामिषें घेऊनि पैसा । जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा । धोती पोती खंडदुखंडसा । देह कैसा दंडीत ॥१५०॥
कैसे परार्थ वेठीत कष्ट । निवारीत भक्तसंकट । पुढील अध्यायीं होईल स्पष्ट । श्रोते संतुष्ट होतील ॥१५१॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । रामजन्मोत्सवादि कथनं नाम षष्ठोध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्रुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥