शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

साईसच्चरित - अध्याय ३

sai satcharitra chapter 3
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: । श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: । श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: । आतां पूर्वकथेची संगती । साई पूर्ण आश्वासन देती । म्हणती “आपुली संपूर्ण अनुमती । चरित्रस्थिती वर्णावया ॥१॥
तुम्ही आपुलें कार्य करा । मनीं यत्किंचितही न कचरा । विश्वास पूर्ण मद्वचनीं धरा । निर्धार करा मनाचा ॥२॥
केलिया मल्लीलेचें लेखन । होईल अविद्यादोषनिरसन । भक्तीभावें करितां श्रवण । प्रपंचभान मावळेल ॥३॥
उठतील श्रवणसागरावरी । भक्तिपेमामृताच्या लहरी । बुडिया देतां उपराउपरी । येतील करीं बोधरत्नें” ॥४॥
ऐकोनि नि:शंक झालें मन । साईपदीं केलें नमन । मग हें चरित्रलेखन । यथास्मरण आरंभीं ॥५॥
हे शब्द येतांच बाबांचे ओठीं । तीच बांधिली शकुनगांठी । घडूनि येणार आतां हे गोष्टी । मी तों वेठीचा बिगारी ॥६॥
पहा अगम्य हरीची लीला । त्यावीण न कळे ती अन्याला । श्रुति शास्त्र वेद मुकावला । थांग लागला ना कोणा ॥७॥
शास्त्रविशारद वेदवादी । प्रज्ञावंत पंडितादि । घटपटादिवादप्रवादी । यांच्या नादीं भरूं नका ॥८॥
हरी निजभक्तांचा केला । भाळ्या - भोळियांचा भुकेला । प्रेमालागीं समूळ विकला । सदा हठेला दांभिकां ॥९॥
“यांतचि तुमचें कल्याण आहे । माझेंडी अवतारसार्थक्य हें । माझी तों घोकणी नित्य पाहें । काळजी वाहें हेच मी ॥१०॥
वरी एक सांगतों शामा । प्रेमें घेईल जो मन्नामा । तयाच्या मी सकल कामा । पुरवीं प्रेमा वाढवीं ॥११॥
मग जो गाई वाडेंकोडें । माझें चरित्र माझे पावडे । तयाचिया मी मागें पुढें । चोहींकडे उभाचि ॥१२॥
जे जे भक्त मजकारणें । असतील विनटले जीवें प्राणें । तयांसी या कथाश्रवणें । आनंद होणें सहजीच ॥१३॥
कोणींही केल्या माझें कीर्तन । तयासी देईन आनंदघन । नित्य सौख्य समाधान । सत्य वचन मानावें ॥१४॥
जो मजलागीं अनन्य शरण । विश्वासयुक्त करी मद्भजन । माझें चिंतन माझें स्मरण । तयाचें उद्धरण ब्रीद माझें ॥१५॥
माझें नाम माझी भक्ती । माझें दफ्तर माझी पोथी । माझें ध्यान अक्षय चित्तीं । विषयस्फूर्ती कैंची त्या ॥१६॥
कृतांताच्या दाढेंतून । काढीन मी निजभक्ता ओढून । करितां केवळ मत्कथा श्रवण । रोगनिरसन होईल ॥१७॥
कथा करा सादर श्रवण । त्यावरी करा पूर्ण मनन । मननावरी निदिध्यासन । समाधान पावाल ॥१८॥
‘अहं सोहं’ जाईल विरोन । उन्मन होईल श्रोतियांचें मन । चित्त होईल चैतन्यघन । अनन्य परिपूर्ण श्रद्धेनें ॥१९॥
‘साई साईति’ नामस्मरण । करील सकल कलिमल दहन । वाणीश्रवणगतपापभंजन । एक लोटांगण घालितां” ॥२०॥
कार्य जरी नव्हे सामान्य । आज्ञा केली शिरसामान्य । बाबांसारिखा असतां वदान्य । कां पां दैन्य आदरावें ॥२१॥
कोणा हातीं बांधविलीं राउळें । कोणसी कीर्तनरंगीं लाविलें । कोणासी तीर्थयात्रे धाडिलें । मज बैसविलें लिहावया ॥२२॥
अवध्यापरीस मी पामर । कवण्या गुणें हा करुणासागर । दयाघन ओळला मजवर । मी तर कांहीं जाणेंना ॥२३॥
हाचि गुरुकृपेचा नवलावा । कीं जेथ कांहीं न लव ओलावा । तेथेंही निबर तरु फुलावा । दाट उफलावा अप्रयासें ॥२४॥
कोणी पुढें बांधितील मठ । कोणी देवालयें कोणी घाट । आपण घेऊं धोपट वाट । चरित्रपाठ साईंचा ॥२५॥
कोणी सत्कारपूर्वक अर्चन । कोणी करिती पादसंवाहन । उत्कंठित झालें माझें मन । गुणसंकीर्तन करावें ॥२६॥
कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥२७॥
अनधिकारी उघड उघड । चिंध्या भाराभर एक ना धड । तेथें ऐसें हें अवजड । कार्य अवघड घ्यावें कां ॥२८॥
यत्न न करितां उगें बसावें । आज्ञाभंगपातकी व्हावें । आज्ञापालन करूं जावें । तरी व्हावें हें कैसें ॥२९॥
समर्थ साईंची निजस्थिती । यथार्थ वर्णाया कोणा गती । स्वयेंत भक्तार्थ कृपा करिती । तरी ते वदविती स्वयेंचि ॥३०॥
वाणीची जेथ न चले धांव । तेथें मीं कां बांधिली हांव । ऐसें बोलावयासी वाव । ठेविला न ठाव कवणातें ॥३१॥
उचलिली जेव्हां हातीं लेखण । बाबांनीं हरिलें माझें मीपण । लिहिती आपुली कथा आपण । ज्याचें भूषण त्याजला ॥३२॥
हें तों संतचरित्रलेखन । संतावीण करील कोण । बाबांच्या अतर्क्य गुणांचें आकलन । गगना आलिंगनदानासम ॥३३॥
अतिगहन तयांचें महिमान । वर्णावयासी मी मतिहीन । त्यांनींच उचलूनि आपुलें आपण  । निर्मुक्तवचन व्हावें कीं ॥३४॥
बाबा जरी मी जन्मत: ब्राम्हाण । तरी श्रुतिस्मृतिनेत्रविहीन । जरी हें या जन्मा दूषण । परी मज भूषण आपुलें ॥३५॥
श्रुतिस्मृति हे ब्राम्हाणनयन । काणा तो जो एकें हीन । अंधचि तो जो उभयविहीन । हीन दीन तैसा मी ॥३६॥
आपण मज अंधाची काठी । असतां मज काय आटाटी । टेकीत टेकीत पाठी । धोपट वाटे चालेन ॥३७॥
आतां पुढारा काय करावें । मज पामरा नाहीं ठावें । आपणचि बुद्धिदायक व्हावें । संपादावें निजकार्य ॥३८॥
मुके बृहस्पतीसम बोलती । पंगू मेरूपर्वत लंघिती ही । जयांची अतर्क्य शक्ति । तयांची युक्ती त्यां ठावी ॥३९॥
मी तों केवळ पायांचा दास । नका करूं मजला उदास । जोंवरी या देहीं श्वास । निजकर्यास साधूनि घ्या ॥४०॥
आतां आपण श्रोते जन । जाणितलें जी ग्रंथप्रयोजन । साईच लिहिता लिहविता आपण । भक्तकल्याणाकारणें ॥४१॥
कैसा वाजेल पावा कीं पेटी । चिंता नाहीं उभयां पोटीं । ही तों वाजवित्या आटाटी । आपण कष्टी कां व्हावें ॥४२॥
कीं जें चंद्रकांत स्रवत । तें काय तया पोटीचें अमृत । ती तों चंद्राची करामत । चंद्रनिर्मित चंद्रोदयं ॥४३॥
किंवा सागरा ये भरती । ती काय त्याची निजकृती । तीही चंद्रोदयाचे हातीं । सागरकृति नव्हे ती ॥४४॥
असो टाळोनि भंवरे खडक । सागरीं नावा चालाव्या तडक । म्हणोनि जैसे लालभडक । दीप निदर्शक लाविती ॥४५॥
तैशाचि साईनाथांच्या कथा । ज्या गोडीनें हिणवितील अमृता । भवसागरींचे दुस्तर पंथा । अति सुतरता आणितील ॥४६॥
धन्य धन्य या संतकथा । श्रवणद्वारें अंतरीं रिघतां । बाहेर निघे देहाभिमानता । द्वंद्ववार्ता नुरेचि ॥४७॥
जंव जंव यांचा ह्रदयीं साठा । तंव तंव विकल्प पळे बारा वाटा । ज्ञानसंचय होय लाठा । उतरे ताठा देहाचा ॥४८॥
बाबांच्या शुद्ध यशाचें वर्णन । प्रेमें तयाचें श्रवण । होईल भक्तकश्मलदहन । सोपें साधन परमार्था ॥४९॥
मायातील ब्रम्हा काय । काय तत्तरणार्थ उपाय । कर्मधर्माचरणें हरि हा प्रिय । कैसेनि होय निजभक्तां ॥५०॥
आत्यंतिक क्षेम तें काय । भक्ति मुक्ति विरक्ति काय । वर्णाश्रमधर्म वस्तु अद्वय । इत्यादि विषय अति गूढ ॥५१॥
एतदर्थ जयांतें गोडी । तयांनीं पुरवाया निज आवडी । ज्ञानोबा-एकनाथादिकृत ग्रंथपरवडी । सुखनिरवडी सेवावी ॥५२॥
कृतयुर्गी ‘शम-दम’ । त्रेतीं ‘जयन’ द्वापारीं ‘पूजन’ । कलियुगीं ‘नामकथाकीर्तन’ । स्वल्प साधन परमार्था ॥५३॥
ब्राम्हाणादि चारी वर्ण । सर्वांसी साधन गुरुकथाश्रवण । असो स्त्री शूद्र वा जातिहीन । हें एक साधन सकळांतें ॥५४॥
असेल जयाचे पुण्य पदरीं । तोच या कथा श्रवण करी । कोणास येतील निद्रालहरी । तयांही श्रीहरी जागवील ॥५५॥
व्हावे विषयभोग अनवरत । ते न लाभतां ते दीनचित्त । तयांसीही हें संतकथामृत । विषयनिर्मुक्त । करील ॥५६॥
योग याग ध्यान धारणा । करूं जातां प्रयास नाना । आयास नलगे या कथाश्रवणा । एका अवधानावांचून ॥५७॥
ऐसी ही साईची कथा निर्मळ । परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ । जळतील पंचमहापापें प्रबळ । जातील समूळ विलयाला ॥५८॥
आम्हां भवपाशीं जखडिलें । तेणें निजरूप वेढिलें । श्रवणें ते वेढे होतील ढिले । स्वरूप पहिलें लाधेल ॥५९॥
व्हावें कथांचें आमरण स्मरण । घडावें तयांचें नित्य परिशीलन । होवो भवदवार्ता शांतवन । समाधान जीवांचें ॥६०॥
वाचतां परिसतां भक्तिभावें । सहज साईचें ध्यान व्हावें । सगुणरूप डोळां दिसावें । चित्तीं ठसावें द्दढतर ॥६१॥
येणें घडावी सद्नुरुभक्ति । पावावी संसारीं विरक्ति । जडो गुरुस्मरणीं प्रीति । होवो मति निर्मल ॥६२॥
ऐसीच बुद्धि धरोनि मनीं । कृपा केली साईनाथांनीं । मज निमित्ता पुढें करोनी । स्वयें करणी हे केली ॥६३॥
ओटीं तुडुंब लागली ओढी । वासरावीण पान्हा न सोडी । हे तों धेनूतें उपज खोडी । तैशीच आवडी साईची ॥६४॥
मज चातकाचेनि आशे । आनंदघन ही माउली वर्षे । पुरवूनि माझिया अल्प तृषे । भक्त प्रकर्षें निववील ॥६५॥
काय भक्तिपेमाचें कौतुक । मातेस लागे बाळाची भूक । तयानें न पसरितांही मुख । नाथकूचुक ते कोंदी ॥६६॥
कोण जाणे तिचे शीण । लेंकुरा न त्याची जाण । न पुसतां निज माउलीवीण । अन्य कोण दे थान ॥६७॥
बाळकासी घालितां लेणें । बालक त्यांतील स्वारस्य नेणे । तें कौतुक एक माताच जाणे । तैसेंच करणें सद्भुरूचें ॥६८॥
हा माझा बाळाचा लळा । पुरवील कोण सुखसोहळा । माउलीवीण कोणास कळवळा । तो जिव्हाळा दुर्मिळ ॥६९॥
सन्मातेच्या पोटीं येणें । महद्भाग्यें देवाचें देणें । दु:ख सोसूनि जन्म देणें । बाळक नेणे हें कांहीं ॥७०॥
असो ये अर्थीं आणीक वचन । बोलिले बाबा करवितों श्रवण । अहो जी आपण श्रोते सज्जन । आदरें अवधान देइजे ॥७१॥
सन कोणीसशें सोळा सालीं । चाकरी सरकारी पुरी झाली । यथायोग्य पेन्शन बसली । बारी आली शिरदीची ॥७२॥
गुरुपौर्णिमेचा तो दिवस । भक्त मिळाले गुरुपूजेस । अण्णा स्वयंस्फूर्ति विनविती बाबांस । करिती शिफारस ती परिसा ॥७३॥
अण्णांस माझी मोठी काळजी । बाबांच्या समोर करिती अजीजी । यांच्या वाढत्या संसारामाजी । कृपा करा जी यांजवर ॥७४॥
लावा कीं यांस दुजी नोकरी । ही पेन्शन काय पडेल पुरी । अण्णासाहेबांची चिंता निवारी । ऐंसी करीं कांहीं गा ॥७५॥
बाबा तंव वदती प्रत्युत्तरीं । “मिळेल मेळी तयासी नोकरी । करावी आतां माझी चाकरी । सुख संसारीं लाधेल ॥७६॥
ताटें याचीं भरलीं सदा । यावज्जीव न रितीं कदा । भावें मत्पर होतां सर्वदा । हरतील आपदा तयाच्या ॥७७॥
कांहीं लेलें काय झालें । म्हणती जन ते समजा चळले । धर्भाचरण जयांनीं वर्जिलें । तयांस पहिलें वर्जावें ॥७८॥
समोर येतां बाजूसी जावें । महा भयंकर ते समजावे । त्यांच्या छायेसही न रहावें । पडल्या सहावे कष्टही ॥७९॥
आचारहीन शीलभ्रष्ट । विचारहीन कर्मनष्ट । देखेना जो इष्टानिष्ट । केवीं तो अभीष्ट पावेल ॥८०॥
लाग्याबांध्यावीण विशेषीं । कोणी न येई आपुलेपाशीं । श्वान सूकर कां माशी । हडहड कुणासी करूं नये ॥८१॥
येथूनि पुढें भक्तिभावा । करावी यानें माझी सेवा । करुणा येईल देवाधिदेवा । अक्षय ठेवा लाधेल ॥८२॥
मग ही पूजा करावी कैसी । मी कोण कैसा जाणावा भरंवसीं । साईचा तो देह विनाशी । ब्रम्हा अविनाशी सुपूज्य ॥८३॥
मी तों अष्टधा - प्रकृतिरूपानें । भरलों आहें चौं बाजूनें । हेंचि अर्जुनासी भगवंतानें । गीताव्याख्यानें निवेदिलें ॥८४॥
यावन्नामरू पाकृति । स्थावर जंगमात्मकही जगती । मीचि नटलों अष्टधा प्रकृति ही । एक चमत्कृति माझीच ॥८५॥
ॐ प्रणव हा माझा वाचक । वाच्य तयाचा मीचि एका । विश्वाकार वस्तु अनेक । त्यांतही मी एक भरलेला ॥८६॥
आत्मभिन्न वस्तु नाहीं । तेथें कामना कशाची पाहीं । मीचि अवघा ठायीं ठायीं । भरलों दाही दिशांतीं ॥८७॥
परिपूर्ण सर्वत्र एणें भावें । मी माझें हें जेथ विरावें । तया कामनीय काय असावें । सर्वीं वसावें सर्वस्वीं ॥८८॥
कामना या बुद्धींत उगवती । आत्मयासीं संबंध न धरिती । साईमहाराज निजात्ममूर्ति । कामनास्फूर्ति तेथें कैंची ॥८९॥
कामनांचे नाना प्रकार । मी कोण हें कळतांचि सार । विरोनि जाती जैसी गार । रविकरनिकरसंतप्त ॥९०॥
मनबुद्धयादि इंद्रियांसकट ॥ नव्हे मी स्थूल विराट । नव्हे मी हिरण्यगर्भ अप्रकट । साक्षी मी जुनाट अनादि ॥९१॥
एवं गुणइंद्रियांपरता । नाहीं मज विषयतत्परता । नाहीं मजवीण ठाव रिता । कर्ता करविता मी नव्हे ॥९२॥
मनबुद्धयादि इंद्रियगण । अवघा जड ही जेथें ओळखण । तेथेंच ‘विरक्ति’ प्रकटेल जाण । सारील आवरण ज्ञानाचें ॥९३॥
स्वरूपाचें जें विस्मरण । तेंचि मायेचें अवतरण । शुद्ध पूर्णानंद स्मरणं । तोचि मी चैतन्यघनरूप ॥९४॥
त्या मजकडे फिरविणें वृत्ति । तीच सेवा तीच ‘मद्भक्ति’ । चिदानंद मी होतां प्रतीती । शुद्ध स्थिती तें ‘ज्ञान’ ॥९५॥
अयमात्मा ब्रम्हा । प्रज्ञानमानंदं ब्रम्हा । जगन्मिथ्यत्वें जगद्भ्रम । सत्यत्वें ब्रम्हा तो हा मी ॥९६॥
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । वासुदेवोऽहमोमन्वित । सत्य श्रद्धाभक्तिसहित । पूजन स्वहित हें माझें ॥९७॥
ऐसें मी कोण तें समजून । करावें माझें यथार्थ पूजन । वरी व्हावें अनन्य शरण । जावें समरसून मजमाजीं ॥९८॥
नदी जातां समुद्रा शरण । येईल कां ती पुन्हां परतोन । उरेल कां वेगळें नदीपण । देतां आलिंगन अर्णवा ॥९९॥
स्नेहयुक्त कार्पासवाती । भेटूं जातां दीपकज्योती । स्वयें पावे दिव्य दीप्ती । तैसीचि गती संतपदीं ॥१००॥
अल्ला - मालीक चैतन्यघन । यावीण चित्ता नाहीं चिंतन । शांतनिरपेक्षसमदर्शन । तयाचें मीपण तैं कैंचें ॥१०१॥
निर्ममत्व निरहंकृति । निर्द्वंद्वत्व निष्परिग्रहस्थिति । याही चार गुणांची जैं वस्ती । मीपण स्थिति तैं कैंची ॥१०२॥
तात्पर्य हे आठही गुण । साईआंगीं असतां संपूर्ण । मीपणासी तैं कैंचें स्थान । सेवूं मीपण तैं कैसें ॥१०३॥
विश्वीं भरलें जयाचें मीपण । तयाचाचि अंश माझेंही मीपण । करावें साईपदीं समर्पण । हीच संपूर्ण मम सेवा ॥१०४॥
माझी सेवा माझें भजन । अनन्यपणें मजसी शरण । तो होय मद्रूप जाण । भगवंतवचन भागवतीं ॥१०५॥
कीटकीसही भ्रमरध्यान । तेणें ती लाधे भ्रमरपण । शिष्यही करितां निजगुरुभजन । निजगुसमान तो होय ॥१०६॥
समान शब्दें जें वेगळेपण । तेंही न साहे गुरु एक क्षण । गुरुत्व नव्हे शिष्यावीण । शिष्यत्वा अभिन्न गुरुपण” ॥१०७॥
असो पूजा जयाची आज्ञापिली । तो मी कोण ही व्याख्या केली । पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली । ओघासी आली ती कथितों ॥१०८॥
शिरडीसी आला एक रोहिला । तोही बाबांचें गुणांसी मोहिला । तेथेंचि बहुत दिन राहिला । प्रेमें वाहिला बाबांसी ॥१०९॥
शरीरें पुष्ट जैसा हेला । स्वैरवर्ती न जुमानी कोणाला । फक्त कफनी पायघोळ आंगाला । येऊनि राहिला मशिदींत ॥११०॥
दिवस असो वा निशी । मशिदीसी वा चावडीसी । कलमे पढे उंच स्वरेंसीं । अति आवेशीं स्वच्छंद ॥१११॥
महाराज शांतीचा पुतळा । ग्रामलोक फार कंटाळला । मध्यरात्रीसही त्याचा टकळा । अडथळा सकळां झोंपेला ॥११२॥
दिवसा खपावें उन्हातान्हांत । शेतांत अथवा रानावनांत । रात्रींही झोंप नाहीं निवांत । लोक नितांत कदरले ॥११३॥
नसेल होत बाबांना ताप । लोकांचें तों मोठें पाप । नाहीं रात्रीं सुखाची झोंप । आला संताप रोहिल्याचा ॥११४॥
इकडे आड तिकडे विहीर । धरावा कोठवरी तो धीर । रात्रंदिन ही किरकीर । मोठी फिकीर त्यां पडली ॥११५॥
रोहिला आधींचि माथेफिरू । वरी बाबांचा बळकट धीरू । होता त्याहूनिही अनावरू । मग तो थोरू जाहला ॥११६॥
चढेल आणि ताठर झाला । लोकांवरी तोंड टाकूं लगला । निस्सीम बेफाम उरफाटला । गांवही फिरला तयावर ॥११७॥
अत्यंत मायाळू साईमाउली । शरणागतासी पाठीसी घाली । म्हणूनि गांवीची सर्व मंडळी । काकुळती आली बाबांसी ॥११८॥
परी बाबा न लक्ष देती । ग्रामस्थांसीच उलट वदती । नका सतावूं रोहिल्याप्रती । तो मज अति प्रिय वाटे ॥११९॥
या रोहिल्याची बाईल घरघुशी । नांदूं न घटे तयापाशीं । यावया टोंके ती मजपाशीं । चुकवूनि त्यासी ते विवशी ॥१२०॥
नाहीं रांडेला पडदपोशी । लाजलज्जा लाविली वेशीं । हांकूनि बाहेर घालितां तिजसी । बलात्कारेंसीं घर घुसे ॥१२१॥
ओरडूं थांबे तेचि संधी । शिरूं पाहे रांड दुर्बुद्धी । तो ओरडतां ती पळे त्रिशुद्धी । सुखसमृद्धी मज तेणें ॥१२२॥
जावें न कोणीं त्याच्या वाटे । ओरडूं द्या मुक्तकंठें । तयावीण मज रात्र न कंठे । सौख्य मोठें त्याचेनी ॥१२३॥
याची ही ओरड एणेंपरी । आहे मज बहु हितकारी । ऐसा हा रोहिला परोपकारी । बहु सुखकारी मजलागीं ॥१२४॥
ओरडूं द्या त्यासी यथेष्ट । त्यांतचि आहे माझें इष्ट । नातरी ती रोहिली दुष्ट । देईल कष्ट मजलागीं ॥१२५॥
स्वयेंचि मग जैं थकेल । आपोआप स्वस्थ राहील । कार्यभाग तुमचा साधेल । भजही न बाजेल ती रांड ॥१२६॥
ऐसें म्हणतां महाराज । खुंटला मग तेथें इलाज । बाबांच्या मनीं नाहीं गजबज । काय मग काज आम्हांतें ॥१२७॥
आधींचि रोहिल्यासी उल्हास । वरी हा आला फाल्गुनमास । कलमे पढतां कंठशोष । असमसाहस मांडिला ॥१२८॥
जन समस्त आश्चर्यापन्न । केवढे बाबा क्षमासंपन्न । जेणें व्हावें मस्तक भिन्न । तेणेंचि तल्लीन ते होती ॥१२९॥
काय भयंकर ती ओरड । घशासी कैसी नव्हे कोरड । बाबांची परि एकचि होरड । नका दरडावूं तयाला ॥१३०॥
दिसाया रोहिला वेडा पीर । परी बाबांवरी अत्यंत आदर । कलमे निजधर्मानुसार । हर्षनिर्भर पढे तो ॥१३१॥
वाणी हळुवार किंवा मोठी । कोणास याचा विचार पोटीं । स्फुरणासवें उठाउठी । गर्जत उठी हरिनाम ॥१३२॥
निसर्गदत्त घर्घर स्वर । ‘अल्लाहो अकबर’ नामगजर । कलमे पढे आनंदनिर्भर । नित्य निरंतर रोहिला ॥१३३॥
जयासी हरिनामाचा कंटाळा । बाबा भीती तयाच्या विटाळा । म्हणती उगा कां रोहिल्यास पिटाळा । भजनीं चाळा जयातें ॥१३४॥
‘मद्भक्ता यत्र गायंति’ । तिष्ठें तेथें मी उन्निद्र स्थितीं । सत्य करावया हे भगवदुक्ति । ऐसी प्रतीति दाविली ॥१३५॥
ओलें कोरडें मागूनि खाईल । नातरी उपाशीही राहील । तया रोहिल्यासी कैंची बाईल । कोठूनि जाईल बाबांशीं ॥१३६॥
रोहिला कफल्लक दिडकीस भारी । कैंचें लग्न कैंची नारी । बाबा बाळब्रम्हाचारी । कथा ही सारी मायिक ॥१३७॥
करीना कां कंठशोष । बाबांसी कलम्यांचा संतोष । ऐकत राहतील अहर्निश । निद्रा तें विष तयांपुढें ॥१३८॥
कोठें कलम्यांची प्रबोध वाणी । कोठें ग्रामस्थांचीं पोकळ गार्‍हाणीं । तयांसी आणावया ठिकाणीं । बतावणी ही बाबांची ॥१३९॥
हाचि अभप्राय एणें रीती । बाबांनीं सकळां दाविली प्रतीती । रोहिल्याची आवडे मज संगती । नामीं प्रीति तयातें ॥१४०॥
द्दश्य द्रष्टा आणि दर्शन । अवघेंचि जया चैतन्यघन । तो असो ब्राम्हाण वा पठाण । समसमान दोघेही ॥१४१॥
एकदां माध्यान्हीं आरती झाली । मंडळी स्वस्थानीं जावया परतली । बाबांच्या मुखावाटे जी निघाली । मधुर वचनावली ती ऐका ॥१४२॥
“कुठेंही असा कांहींही करा । एवढें पूर्ण सदैव स्मरा । कीं तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा । मज निरंतरा लागती ॥१४३॥
येणें निदर्शित ऐसा जो मी । तोचि मी सर्वांच्या अंतर्यामीं । तोचि मी ह्रदयस्थ सर्वगामी । असें मी स्वामी सकळांचा ॥१४४॥
भूतीं सबाह्याभ्यंतरीं । भरूनि उरलीं मी चराचरीं । हें सकळ सूत्र ईश्वरी । सूत्रधारी मी त्याचा ॥१४५॥
मी सकळ भूतांची माता । मी त्रिगुणांची साम्यावस्था । मीचि सकलेंद्रियप्रवर्ता । कर्ता धर्ता संहर्ता ॥१४६॥
लक्ष लावी जो मजकडे । नाहीं तयासी कैंचेंही सांकडें । तोचि माझा जैं विसर पडे । माया कोरडे उडवी तैं ॥१४७॥
द्दश्यजात हें मत्स्वरूप । कीड मुंगी रंक भूप । हें स्थिर जंगम विश्व अमूप । हेंचि निजरूप बाबांचें ” ॥१४८॥
काय मौजेचा हा इशारा । भेद नाहीं संतां ईश्वरा । अभेदरूपें चराचरा । विश्वोद्धारा अवतार ॥१४९॥
होणें जरी गुरुपदी लीन । तेणें करावें गुरुगुणगायन । अथवा करावें गुरुकथाकीर्तन । अथवा श्रवण भक्तीनें ॥१५०॥
साधकें ऐसें करावें श्रवण । श्रोता श्रव्य जाई विरोन । प्रकट होईल चैतन्यघन । मन उन्मन पावेल ॥१५१॥
असतां जरी गर्क संसारीं । पडली संतकथा कानावरी । यत्न न करितां तिळभरी । कल्याणकारी ती स्वभावें ॥१५२॥
मग ती भक्तिभावें परिसतां । केवढें श्रेय चढेल हाता । श्रोतां विचार करावा चित्ता । आपुल्या निजहिताकारणें ॥१५३॥
जडेल तेणें गुरुपदीं प्रेम । वाढेल क्रमें आत्यंतिक क्षेम । नलगे दुजी निष्ठा नेम । होईल परम कल्याण ॥१५४॥
मना लावितां ऐसा निर्बंध । वाढेल कथाश्रवणछंद । सहज तुटतील विषयबंध । परमानंद प्रकटेल ॥१५५॥
ऐकूनि बाबांची मधुर वाणी । निर्धार केला मीं निजमनीं । एथूनि पुढें नरसेवा त्यागुनी । गुरुसेवनींचि असावें ॥१५६॥
परी मनासी लागली हुरहुरी । ‘मिळेल मेली तया नोकरी’ । हें जें बाबा वदले जत्तरीं । प्रत्यंतरीं येणार कीं ॥१५७॥
शब्द बाबांचा खालीं पडेल । हें तों सहसा कधींही न घडेला । नरसेवेचा संबंध जडेल । परी न जोडेल हित मोठें ॥१५८॥
स्वयंस्फूर्ति अण्णांची पृच्छा । खरी तथापि माझी ही इच्छा । नव्हती ऐसें नाहीं अनिच्छा - । प्रारब्धभोगेच्छा ही नव्हे ॥१५९॥
माझ्याही पोटीं नोकरी व्हावी । संसारनिर्वाहसोय लागावी । सांईही बोटानें गूळ दाखवी । परी पाजवी औषध ॥१६०॥
तें औषध या गुळाचे आशें । पिऊनि धालों भाग्यवशें । नोकरीही अकल्पित लागली कासे । द्रव्याभिलाषें स्वीकारिली ॥१६१॥
गूळ झाला तरी शेवट । खातां खातां येणार वीट । बाबांच्या उपदेशमधाचें बोट । चाखितां चोखट वाटलें ॥१६२॥
नोकरी नव्हती चिरस्थायी । चालूनि गेली आलिया पायीं । बाबांनीं बसविलें ठायींचे ठायीं । सौख्य अनपायी भोगावया ॥१६३॥
हें विश्व संपूर्ण चराचर भगवत्स्वरूपचि साचार । परी भगवंत विश्वाहूनही पर । परात्पर परमात्मा ॥१६४॥
ईश्वर प्रपंचेंसी अभिन्न । प्रपंच ईश्वरेंसीं भिन्न । प्रपंच तेथूनि चेतनाचेतन । तया अधिष्ठान ईश्वर ॥१६५॥
भगवंताचीं पूजास्थानें । अष्टप्रकार असती जाणें । प्रतिमा स्थंडिलादि आनानें । सर्वां तुळणें गुरू श्रेष्ठ ॥१६६॥
कृष्ण स्वयें ब्रम्हा पूर्ण । तोही धरी सांदीपनीचरण । म्हणे करितां सद्नुरुस्मण । मी नारायण संतुष्टें ॥१६७॥
मजहूनि मज सद्रुरुस्तवन । आवडे कीं सहस्रगुण । ऐसें सद्नुरूचें वरिष्ठपण । महिमान गहन तयाचें ॥१६८॥
गुरुभजना जो पाठिमोरा । तो एक अभागी पापी खरा । भोगी जन्मम्रणयेरझारा । करी मातेरा स्वार्थाचा ॥१६९॥
मागुती जन्म मागुती मरण । हें तों लागलें नित्य भ्रमण । म्हणूनि करूंया कथाश्रवण । निजोद्धरण संपादूं ॥१७०॥
संतमुखींच्या सहज गोष्टी  । अविद्येच्या तोडिती गांठी । तारक होती अतिसंकटीं । म्हणूनि पोटीं सांठवूं ॥१७१॥
नकळे कैसा येईल वेळ । घालूनि देतील कैसा मेळ । हा अल्लामियाचा सर्व खेळ । प्रेमळ प्रेक्षक ॥१७२॥
गांठीसी नसतां प्रज्ञाबळ । काय म्हणावें हें दैव सबळ । जे मी लाधलों साई गुरु प्रबळ । हाही एक खेळ तयाचा ॥१७३॥
निवेदिलें ग्रंथ-प्रयोजन । कथिलें मज दिधलें जें आश्वासन । जेणें मत्परत्व आणि मत्पूजन । काय तें दिग्दर्शन जाहलें ॥१७४॥
आतां आपण श्रोतेजन । कराल पुढील अध्यायीं श्रवण । समर्थ साईनाथांचें अवतरण । शिरडींत कैसेन जाहलें ॥१७५॥
लहान थोर तुम्ही सगळे । हें साईंचें चरित्र आगळें । होऊनि क्षणैक संसारावेगळे । परिसा भोळे भाविक हो ॥१७६॥
स्वयें जरी निर्विकारी । साई नटनाटकी अवतारी । वर्ते मायाकार्यानुसारी । जैसा व्यवहारीं प्रापंचिक ॥१७७॥
‘समर्थ साई’ या अल्प मंत्रें । ध्याती जयाचीं पदें पवित्रें । हालवी जो भक्तभवमोक्षसूत्रें । पावन चरित्रें तयाचीं ॥१७८॥
एवंच पावन साईचरित्र । वाची तयाचें पावन वक्त्र । श्रोतयांचे पावन श्रोत्र । होईल पवित्र अंतरंग ॥१७९॥
प्रेमें करितां कथाश्रवण । होईल भवदु:खांचें हरण । ओळेल साई कृपाघन। प्रकटेल संपूर्ण शुद्धबोध ॥१८०॥
लय विक्षेय कषाय । रसास्वाद हे श्रवणा अपाय । दूर सारा हे अंतराय । श्रवण सुखदायक होईल ॥१८१॥
नलगे व्रत उद्यापन । नलगे उपवास शरीरशोषण । नलगे तीर्थयात्रापर्यटन । चरित्रश्रवण एक पुरे ॥१८२॥
प्रेम असावें अकृत्रिम । जाणिलें पाहिजे भक्तिवर्म । सहज लाधेल परमार्थ परम । नासेल विषम अविद्या ॥१८३॥
नलगे इतर साधनीं शीण । करूं हें साईचरित्र श्रवण । संचित आणि क्रियमाण । अल्पप्रमाणही नुरवूं ॥१८४॥
कृपण वावरो कवण्याही गांवा । चित्तासमोर पुरलेला ठेवा । जैसा तयासी अहर्निशीं दिसावा । तैसाचि वसावा साई मनीं ॥१८५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ग्रंथप्रयोजनानुज्ञापनं नाम तृतीयोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥