मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:08 IST)

साईसच्चरित - अध्याय १३

Sai Satcharitra Marathi adhyay 13
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम; ॥
आकारें सूत्रमय अति लाहन । अर्थगांभीर्यें अति गहन । व्यापकत्वें बहु विस्तीर्ण । संकीर्ण तरी तितुकेच ॥१॥
ऐसे ते बाबांचे बोल । अर्थें तत्त्वें अति सखोल । कल्पांतींही नव्हती फोल । समतोल आणि अनमोल ॥२॥
पूर्वापरानुसंधान रहावें । यथाप्राप्तानुवर्ती व्हावें । नित्य तृप्त सदा असावें । नसावें सचिंत कदापि ॥३॥
“अरे जरी मी झालों फकीर । घर ना दार बेफिकीर । बैसलों एका ठायीं स्थिर । सारी किरकिर त्यागुनी ॥४॥
तरी ती माया अनिवार । मलाही गांजी वरचेवर । मी विसरें परी तिजला न विसर । मज ती निरंतर कवटाळी ॥५॥
आदिमायाच ते हरीची । त्रेधा उडविते ब्रम्हादिकांची । तेथ मज दुबळ्या फकीराची । वार्ता कैंची तिजपुढें ॥६॥
हरीच होईल जेव्हां प्रसन्न । तेव्हाम्च होईल ते विच्छिन्न । विना अविच्छिन्न हरिमजन । मायानिरसन नोहे पां” ॥७॥
ऐसी ही मायेची महती । भक्तांलागीं बाबा कथिती । सेवेंचि व्हावया तन्निवृत्ति । भजनस्थिति वानिती ॥८॥
संत माझी सचेतन मूर्तीं । कृष्ण स्वयें म्हणे भागवतीं । कोणा न ठावी ही स्पष्टोक्ति । उद्धवाप्रती हरीची ॥९॥
म्हणोनि भक्तकल्याणार्थ । दयाघन साईसमर्थ । वदते झाले जें सत्य सार्थ । परिसा अतिविनीत होऊनी ॥१०॥
“पाप जयांचें विलया गेलें । ऐसे जें पुण्यात्मे वहिले । तेचि माझे भजनीं लागले । खूण लाधले ते माझी ॥११॥
‘साई साई’ नित्य म्हणाल । सात समुद्र करीन न्याहाल । या बोला विश्वास ठेवाल । पावाल कल्याण निश्चयें ॥१२॥
नलगे मज पूजासंभार । षोडश वा अष्टोपचार । जेथें भाव अपरंपार । मजला थार ते ठायीं” ॥१३॥
ऐसे बाबा वेळोवेळां । बोलूनि गेले भक्तजिव्हाळा । आतां आठूनि त्या प्रेमळ बोला । करूं विरंगुळा मनासी ॥१४॥
ऐसा हा दयाळू साईसखा । शरणागतांचा पाठिराखा । भक्तकैवार घेऊनि निका । नवल विलोका केलें तें ॥१५॥
दवडूनि चित्ताची अनेकाग्रता । करोनि तयाची एकाग्रता । परिसावी ही नूतन कथा साग्रता । कृतकार्यता होईल ॥१६॥
साईमुखींची अमृतवृष्टि । तीच जेथें पुष्टि तुष्टि । कोण कंटाळे शिरडीचे कष्टीं । निजहितद्दष्टि ठेविल्या ॥१७॥
गताध्यायीं अनुसंधान । दिधलें एका अग्निहोत्र्यालागून । ब्रम्हीभूत - निजगुरुदर्शन । आनंदसंपन्न त्या केलें ॥१८॥
आतां हा अध्याय त्याहूनि गोड । भक्त एक क्षयी रोड । दिधली तया आरोग्याची जोड । मोडूनि खोड स्वप्नांत ॥१९॥
तरी एका भाविकजन । होऊनियां दत्तावधान । साईनाथचरित्र गहन । कल्मषदहनकारक जें ॥२०॥
पुण्यपावन हें चरित्र । जल जैसें गंगेचें पवित्र । धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र । इहपरत्रसाधक तें ॥२१॥
पाहूं अमृतांची उपमा देऊन । परी अमृत काय गोड याहून । अमृत करील प्राणरक्षण । जन्मनिवारण चरित्र हें ॥२२॥
जीव म्हणती सत्ताधीश । करील जें जें जेईल इच्छेस । ऐसें जयाचे वाटे मनास । कथानकास या परिसावें ॥२३॥
जीव जरी खरा स्वतंत्र । सुखालागीं कष्टतां अहोरात्र । पदरीं पडतें दु:ख मात्र । हें तों चरित्र सत्तेचें ॥२४॥
दु:खें टाळावयालागीं । असतां सावधान जागोजागीं । तीं त्या धुंडीत लागवेगीं । त्याचीच मागी घेतात ॥२५॥
वारूं जातां गळां पडती । झाडूनि टाकितां अधिक लिपडती । वाउगी जीवाची धडपड ती । अहोराती तो शीण ॥२६॥
जीव जरी खरा स्ववश । तरी तो असता पूर्ण सुखवश । दु:खाचा एक लवलेश । रेसभरही नातळता ॥२७॥
पापा न आचरितां कधीं । पुण्याचीच करिता समृद्धि । सुखाचीच संपादितां वृद्धि । स्वतंत्र बुद्धि म्हणवोनि ॥२८॥
परी जीव नाहीं स्वतंत्र । पाठीं लागलें कर्मतंत्र । तयाचा खेळचि विचित्र । हातीं कळसूत्र कर्माचें ॥२९॥
पुण्याकडे लक्ष जाय । पापाकडे ओढिती पाय । सत्कर्माचा शोधितां ठाय । कुकर्मीं काय आतुडे ॥३०॥
पुणें जिल्ह्यांतील जुन्नरामाजीं । नारायणगांवचा पाटील भीमाजी । तयाची कथा आतां परिसा जी । रसराजीच अमृताची ॥३१॥
भीमाजी घरचा सुखसंपन्न । आल्यागेल्या घाली अन्न । कधीं न ज्याचें मन खिन्न । प्रसन्नवदन सर्वदा ॥३२॥
अद्दष्टाचे विलक्षण संजोग । न कळतां होती लाभ - वियोग । चालूनि येती कर्मभोग । नसते रोग उद्भवती ॥३३॥
इसवी सन एकोणीसशें नव भीमाजीस पीडी दुर्दैव । होय कफक्षय रोगोद्भव । प्रादुर्भाव ज्वराचा ॥३४॥
य़ेऊं लागला असह्य खोकला । ज्वरही फार वाढूं लागला । दिवसेंदिवस बळावत गेला । निराश झाला भीमाजी ॥३५॥
तोंडास फेंस सर्वदा येणें । मचूळ आणि रक्ताचे गुळणे । पोटांत अक्षयी कळमळणें । जीव तगमगणें राहीना ॥३६॥
शेजे खिळिला दुखणाईत । गळालीं गात्रें चालला वाळत । उपायांची झाली शिकस्त । झाला तो त्रस्त अत्यंत ॥३७॥
अन्नपान कांहीं न रुचे । पेजपथ्य कांहीं न पचे । तेणें अस्वस्थ कांहीं न सुचे । हाल जिवाचे असह्य ॥३८॥
देवदेवस्की झाली सारी । हात टेकिले वैद्य - डॉक्टरीं । पाणी सोडिलें जीविताशेवरी । पडला विचारीं भीमाजी ॥३९॥
पाटील झाले उद्विग्न चित्तीं । दिसती थोडे दिसांचे सोबती । उत्तरोत्तर फारचि थकती । दिवसगती लागले ॥४०॥
आराधिली कुलदेवता । तीही देईना आरोग्यता । जोशी पंचाक्षरी समस्तां । थकले पुसपुसतां पाटील ॥४१॥
कोणी म्हणती अंगरोग  । काय तरी हा दैवयोग । वाटे ओढावला पुरा भोग । निरुपयोग मनुष्ययत्ना ॥४२॥
डॉक्टर झाले हकीम झाले । उपचार करितां टेकीस आले । कोणाचें कांहींच न चाले ॥ प्रयत्न हरले सकळांचे ॥४३॥
पाटील अत्यंत कदरले । म्हणती देवा म्यां काय केलें । कांहींच कां उपयोगा न आलें । पाप असलें कैंचे हें ॥४४॥
देव तरी कैसा विलक्षन । सौख्य - भोगत्या एकही क्षण । आपुलें होऊं नेदी स्मरण । नवल विंदान तयाचें ॥४५॥
मग तयाच्याचि जैं येई मना । संकटपरंपरा धोडितो नाना । करवूनि घेई आपुल्या स्मरणा । ‘नारायणा धांव’ म्हणवी ॥४६॥
असो कळवळ्याचा धांवा ऐकिला । देव तात्काळ गहिंवरला । बुद्धि उपजली भीमाजीला । पत्र नानाला वाटला ॥४८॥
तोचि त्यांचा शुभशकुन । तेंचि रोगाचें निरसन । पुढें सविस्तर पत्र लिहून । नानांस त्यांनीं पाठविलें ॥४९॥
नानासाहेबांचें स्मरण । तेंच साईनाथांचें । स्फुरण । उद्भवलें रोगनिवारणकारण । अतर्क्य विंदन संतांचें ॥५०॥
हो कां कालचक्राची रचना । तेथही दिसते ईश्वरी योजना । यास्तव कोणी अन्यथा कल्पना । करूनि वल्गना न करावी ॥५१॥
बरी वाईट क्रिया सारी । ईश्वर तेथींचा सूत्रधारी । तोचि तारी तोचि मारी । कार्यकारी तो एक ॥५२॥
पाटील लिहिती चांदोरकरांस । औषधें खातां आला त्रास । कदरलों मी या जीवितास । जग उदास वाटतें ॥५३॥
डॉक्टरांनीं आशा सोडिली । व्याधी दु:साध्य ऐसी ठरविली । हकीमवैद्यांची बुद्धी थकली । उमेद खचली माझीही ॥५४॥
तरी आतां एक विनंति । आहे आपुले चरणांप्रती । व्हावी मज आपुली भेट निश्चिती । ही एक चित्तीं असोसी ॥५५॥
चांदोरकरांनीं पत्र वाचिलें । त्यांचेंही मन खिन्न झालें । भीमाजी पाटील बहु भले । नाना द्रवले अंतरीं ॥५६॥
उत्तरीं कळविती एकचि उपाय । साईबाबांचे धरावे पाय । हाचि केवळ तरणोपाय । बाप माय तो एक ॥५७॥
तीच कनावळू सर्वांची आई । हांकेसरसी धांवत येई । कळवळूनि कडिये घेई । जाणे सोई लेंकरांची ॥५८॥
क्षयरोगाची कथा काय । महारोग दर्शनें जाय । शंका न धरीं तिळप्राय । घट्ट पाय धरीं जा ॥५९॥
जो जें मागे त्या तें देई । हें ब्रीद जयानें बांधिलें पायीं । म्हणोनि म्हणतों करीं गा घाई । दर्शन घेईं साईंचें ॥६०॥
भयांमाजीं मोठें भय । मरणापरिस दुजें काय । घट्ट धरीं जा साईंचे पाय । करील निर्भय तो एक ॥६१॥
दु:सह्य पाटलाची व्यथा । पातली प्राणांतिक अवस्था । कधीं भेटेन साईनाथा । कधीं कार्यार्था साधेन ॥६२॥
ऐसा पाटील झाला बावरा । म्हणे सरसामान आवरा । उदयीक सत्वर तयारी करा । वाट धरा शिरडीची ॥६३॥
येणेंप्रमाणें द्दढनिश्चयेंसीं । निरोप पुसूनि सकळिकांसी । महाराजांचे दर्शनासी । निघाले शिरडीसी पाटील ॥६४॥
घेतले आप्तजन बरोबरी । भीमाजी निघाले झडकरी । उत्कंठा फाराचि अंतरीं । शिरडी सत्वरी कैं देखें ॥६५॥
मशिदीच्या चौकाशेजारीं । गाडी आली पुढले द्वारीं । चौघांहीं वाहूनियां करीं । भीमाजी वरी आणिले ॥६६॥
नानासाहेभ समवेत होते । माधवरावही आले तेथें । ज्या माधवरावांचिया हातें । सुगम पद तें सर्वत्रां ॥६७॥
पाटील पाहोनि बाबा वदती । “शामा हे चोर आणूनि किती । घालशी माझे अंगावरती । काय हें कृति बरी का” ॥६८॥
साईपदीं ठेविला माथा । भीमाजी म्हणे साईनाथा । कृपा करीं मज अनाथा । दीनानाथा सांभाळीं ॥६९॥
देखूनियां पाटलाची व्यथा । दया उपजली साईनाथा । तेसरसी शमली दु:खावस्था । पाटील चित्ता विश्वासला ॥७०॥
पाहूनि भीमाजी अस्वस्थ । कृपासागर साई समर्थ । हेलावला अपरिमित । बोले सस्मितमुख तेव्हां ॥७१॥
“बैस आतां सोडीं खंत । खंत न करिती विचारवंत । झाला तुझिया भोक्तृत्वा अंत । पाय शिरडींत टाकितां ॥७२॥
आकंठ संकटार्णवीं बुडाला । हो कां महद्दु:खगर्तेंत गढला । जो या मशीदमाईची पायरी चढला । सुखा आरूढला तो जाणा ॥७३॥
फकीर येथींचा मोठा दयाळु । करील व्यथेचें निर्मूळु । प्रेमें करील प्रतिपाळु । तो कनवाळु सकळांचा ॥७४॥
यालागीं तूं स्वस्थ पाहीं । भीमाबाईच्या सदनीं राहीं । आराम तो एका - दो दिसांही । जा कीं होईल तुजप्रति” ॥७५॥
जैसा एकादा आयुष्यहीन । पावे सुदैवें अमृतसिंचन । लाधे तात्काळ पुनरुज्जीवन । तैसें समाधान पाटिला ॥७६॥
ऐकूनि साईमुखींचें वचन । मरणोन्मुखा अमृतपान । किंवा तृषार्ता लाधावें जीवन । तैसें समाधान पाटिला ॥७७॥
प्रति पांच मिनिटांस । रक्ताच्या गुळण्या येत मुखास । बाबा सन्मुख एक तास । बैसतां निरास पावल्या ॥७८॥
केलें न व्यथेचें परीक्षण । पुसिलें न तदुद्भाकारण । केवळ कृपानिरीक्षण । रोगोन्मूलन तात्काळ ॥७९॥
कृपानिरीक्षण होतां पुरे । वाळल्या काष्ठा येती कोंभरे । वसंतावीण फुलती तुरे । तें फळीं डवरे रमणीय ॥८०॥
रोग काय आरोग्य काय । पुण्यपापाचा होतां क्षय । ज्याचें त्यानें भोगिल्याशिवाय । अन्य उपाय चालेना ॥८१॥
केवळ भोगेंच तयासी क्षय । जन्मजन्मांतरीं हाचि निश्चय । गोगिल्यावीण अन्य उपाय । निवृत्तिदायक नाहींच ॥८२॥
तथापि भाग्यें संतदर्शन । हें एक व्याधीचें उपशमन । व्याधिग्रस्त मग व्याधींचें सहन । दु:खेंवीण सहज करी ॥८३॥
व्याधी दावी भोग दारुण । संत ठेवी द्दष्टि सकरुण । तेणें भोक्तृत्व दु:खावीण । संत निवारण करितात ॥८४॥
केवळ बांबांचा शब्द प्रमाण । तेंचि औषध रामबाण । एकदां कृष्ण श्वान भक्षितां दध्योदन । जाहलें निवारण हिमज्वराचें ॥८५॥
कथेंत वाटतील आडकथा । परी या संकलित श्रवण करितां । दिसूनि येईल समर्पकता । स्मरणदाताही साईच ॥८६॥
“माझी कथा मीच करीन” । साईच गेले आहेत बोलून । त्यांनींच या कथांची आठवण । दिधली मजलागून ये समयीं ॥८७॥
बाळा गणपत नामें एक । जातीचा शिंपी मोठा भाविका । येऊनि मशिदींत बाबांसन्मुख । अति दीनमुख विनवीत ॥८८॥
काय ऐसें म्यां केलें पाप । कां हा सोडीना मज हिंवताप । बाबा झाले उपाय अमूप । हलेना तत्राप अंगींचा ॥८९॥
तरी आतां मी करूं काय । जाहलीं सर्व औषधें कषाय । आपण तरी सांगा उपाय । कैसेनि जाय हा ताप ॥९०॥
तंव दया उपजली अंतरीं । बाबा वदत प्रत्युत्तरीं । उपाय त्या हिमज्वरावरी । ती नवलपरी परिसावी ॥९१॥
“दहींभाताचें कांहीं कवळ । लक्ष्मीआईच्या देवळाजवळ । काळ्या कुत्र्यास खाऊं घाल । बरा होशील तात्काळ” ॥९२॥
बाळा भीतभीतचि गेला । घरीं जाऊनि पाहूं लागला । झांकूनि ठेविला भात आढळला । दहींही लाधला शेजारीं ॥९३॥
बाळा मनीं विचार करी । दहींभात मिळाला तरी । काळाच कुत्रा वेळेवरी । देउळाशेजारीं असेल का ॥९४॥
परी ही बाळाची उगीच चिंता । निर्दिष्ट स्थळीं जाऊनि पोहोंचतां । कृष्ण श्वान एक पुच्छ हलवितां । समोर येतां देखिलें ॥९५॥
पाहूनि ऐसा हा योग जुळला । बाळास मोठा आनंद जाहला । दहींभात खाऊं घातला । वृत्तांत कळविला बाबांस ॥९६॥
सारांश हा जो प्रकार घडला । कोणी कांहींही म्हणो तयाला ॥ तेव्हांपासूनि हिमज्वर गेला । आराम जाहला बाळास ॥९७॥
ऐसेच बापूसाहेब बुट्टी । थंडी जाहली होती पोटीं । जुलाब होत पाउठोपाउठीं । उलटीवर उलटी एकसरा ॥९८॥
सर्वौषधांनीं कपाट भरलें । परी एकही न लागू पडलें । बापूसाहेब मनीं घाबरलें । बहुत पडले विचारीं ॥९९॥
जुलाब उलटया होऊन होऊन । बापूसाहेब जाहले क्षीण । नित्यनेम बाबांचें दर्शन । घावया त्राण नुरलें त्यां ॥१००॥
गोष्ट गेली बाबांचे कानीं । आणवूनि बैसविलें सन्मुख त्यांनीं । म्हणाले खबरदार आतांपासुनी । मलविसर्जनीं जातां नये ॥१०१॥
वांतीही राहिली पाहिजे ठिकाणीं । तयांसन्मुख हालवूनि तर्जनी । पुनश्च पूर्ववत तयां अनुलक्षुनी । म्हटलें बाबांनीं तैसेंच ॥१०२॥
तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा । दोन्ही व्याधींनीं घेतला भेदरा । केला पहा तात्काळ पोबारा । जाहला आराम बुट्टींस ॥१०३॥
एकदां गांवीं वाख्याचा उद्भव । असतां जाहला तयांस उपद्रव । वांती रेच यांचा समुद्भव । कळमळला जीव तृषाकुल ॥१०४॥
पाशींच होते डॉक्टर पिल्ले । तयांनीं उपाय सर्व वेंचले । शेवटीं जेव्हां कांहींच न चले । मग ते गेले बाबांकडे ॥१०५॥
होतें जैसें जैसें घडलें । साईचरणीं सर्व निवेदिलें । कॉफी द्यावी कीं पाणी चांगलें । विचरिती पिल्ले बाबांस ॥१०६॥
तंव बाबा वदती तयांला । “खा दूध. बदाम, घाला । अक्रोडपिस्त्यांसह तयांला । प्यावयाला द्या तरण” ॥१०७॥
तेणें तयाची राहील तहान । होईल सत्वर व्याधिहरण” । सारांश ऐसें हें पाजितां तरण । उपद्रवनिरसन जाहलें ॥१०८॥
“खा अक्रोड पिस्ते बदाम” । येणें पटकीसपडावा आराम । शब्दचि बाबांचा विश्वासधाम । शंकेचें काम ना तेथें ॥१०९॥
आळंदीचे एक स्वामी । साईसमर्थ - दर्शनकामी । आले एकदां शिरडीग्रामीं । पातले आश्रमीं साईंच्या ॥११०॥
होतां तयांस कर्णरोग । तेणें अस्वास्थ्य निद्राभंग । करवितांही शस्त्रप्रयोग । कांहीं न उपयोग तिळमात्र ॥१११॥
ठ्णका लागे अनावर । चाले न कांहीं प्रतीकार । निघावयाचा केला विचार । गेले आशीर्वाद मागावया ॥११२॥
अभिवंदूनि साईपदां । पावूनियां उदीप्रसादा । स्वामी मागत आशीर्वादा । कृपा सर्वदा असावी ॥११३॥
माधवराव देशपांडयांनीं । कानाप्रीत्यर्थ केली विनवणी । “अल्ला अच्छा करेगा” म्हणुनी । महाराजांनीं आश्वासिलें ॥११४॥
ऐसा आशीर्वाद लाधुनी । स्वामी परतले पुण्यपट्टणीं । पत्र आले आठां दिसांनीं । ठणका तत्क्षणींच राहिला ॥११५॥
सूज मात्र कायम होती । शस्त्रप्रयोग करावा म्हणती । पुन्हां तो प्रयोग करावा ये अर्थीं । आलों मुंबईप्रती मागुता ॥११६॥
गेलों पुढील डॉक्टरांकडे । नकले बाबांना पडलें सांकडें । डॉक्टर पाही जों कानाकडे । सूज कोणीकडे लक्षेना ॥११७॥
शस्त्रप्रयोग - आवश्यकता । डॉक्टर म्हणे नलगे आतां । स्वामींची हरली दुर्धर चिंता । विस्मय समस्तां वाटला ॥११८॥
ऐशीच आणीक एक कथा । ओघास आली जी प्रसंगवशता । ती सांगूनि श्रोतयां आतां । अध्याय आतोपता घेऊं हा ॥११९॥
सभामंडपाची फरसी । बांधूं आरंभिली जे दिवसीं । त्यासाघीं आठ दिन महाजनींसी । जाहली मोडसी दुर्धर ॥१२०॥
जुलाब होऊं लागले फार । मनींचे मनीं बाबांवर भार । करीनात औषध वा उपचार । अत्यंत बेजार जाहले ॥१२१॥
साई पूर्ण अंतर्ज्ञानी । जाण होते महाजनी । म्हणवूनि हें अस्वास्थ्य तयांलागुनी । केलें न त्यांनीं निवेदन ॥१२२॥
येईल जेव्हां तयांचे मनीं । करितील निवारण आपण होऊनी । ऐसें पूर्ण विश्वासुनी । व्याधी सोसूनि राहिले ॥१२३॥
भोग भोगूं आपण सकळ । परी न पूजेसी पडावा खळ । हीच एक इच्छा प्रबळ । सर्वकाळ काकांस ॥१२४॥
जुलाब कितीदां आणि केव्हां । प्रमाणातीत झाले जेव्हां । चुकूं नये आरतिसेवा । म्हणूनि तेव्हां काय करिती ॥१२५॥
तांब्या एक पाण्यानें भरला । अंधारांतही लागेल हाताला । ऐसे जागीं मशिदीला । एका बाजूला ठेवीत ॥१२६॥
स्वयें बैसत बाबापाशीं । चरणसंवाहन करावयासी । हजर नित्य आरतीसी । नित्यनेमेंसीं चालवीत ॥१२७॥
आली जरी पोटांत कळ । तांब्या होताच हाताजवळ । पाहूनि जवळ एकांतस्थळ । होऊनि निर्मळ परतत ॥१२८॥
असो फरसी करावयासी । आज्ञा मागतां बाबांपासीं । दिधली पहा ति तात्याबासी । वदत तयांसी काय पहा ॥१२९॥
“जातों आम्ही लेंडीवर । लेंडीवरून परत्ल्यावर । करा आरंभ बरोबर । या फरशीचे कार्यास” ॥१३०॥
पुढें बाबा परत आले । आसनावरी जाऊनि बैसले । पादसंवाहन सुरू केलें । येऊनि वेळेवर काकांनीं ॥१३१॥
कोपरगांवाहून तांगे थडकले । मुंबईकडील भक्त पातले । पूजासंभारसहित चढले । येऊनि अभिवंदिलें बाबांस ॥१३२॥
इतर मंडळीसमवेत । अंधेरीचे पाटीलही येत । घेऊनि पूजा - पुष्पाक्षत । वाट पाहत बैसले ॥१३३॥
इतक्यांत खालीं पटांगणांत । रथ जेथें ठेवीत असत । कुदळ मारूनि बरोबर तेथ । फरशीची सुरवात जाहली ॥१३४॥
ऐकिला तो आवाज मात्र । बाबांनीं ओरड केली विचित्र । धरिला तात्काळ नृसिंहावतार । नेत्रटवकार भयंकर ॥१३५॥
कोण मारतो कुदळीचा फटका । करितों तयाला कंबरेंत लटका । बोलत उठलेच घेऊनि सटका । भीतीचा धडका समस्तां ॥१३६॥
कुदळ टाकूनि मजूर पळाला । जो तो उठूनि धांवत सुटला । काकांचाही जीव दचकला । तों हातचि धरिला बाबांनीं ॥१३७॥
म्हणती जातोस कुठें बैस खालीं । इतक्यांत तात्या लक्ष्मी आलीं । तयांसही शिव्यांची लाखोली । मनसोक्त वाहिली बाबांनीं ॥१३८॥
अंगणाबाहेर जी मंडळी । तयांसही शिवीगाळ केली । इतक्यांत भाजल्या भुईमुगांची थैली । ओढूनि घेतली पडलेली ॥१३९॥
बाबा असतां त्वेषावेशीं । पळाले जे भीतीनें चौपाशीं । एकाद्याची ती मशिदीसी । पिशवी असेल कीं पडलेली ॥१४०॥
दाणे असतील पक्का शेर । मूठमूठ काढूनि बाहेर । चोळूनियां हातावर । मारूनि फुंकर साफ करीत ॥१४१॥
मग ते स्वच्छ झालेले दाणे । महाजनींकडून खावविणें । एकीकडेस शिव्याही देणें । एकीकडे चोळणें सुरूच ॥१४२॥
खाऊनि घे म्हणत म्हणत । स्वच्छ दाणे हातावर ठेवीत । कांहीं आपणही तोंडांत टाकीत । पिशवी संपवीत ये रीती ॥१४३॥
दाणे संपतां म्हणती आण । पाणी लागली मज तहान । काका आणिती झारी भरून । स्वयें तें पिऊन पी म्हणती ॥१४४॥
काका पितां तयांस वदती । झाली जा तुझी बंद बृहती । मेले कुठें ते बामण म्हणती । जा तयांप्रती घेऊनि ये ॥१४५॥
असो पुढें मंडळी आली । मशीद पूर्वींप्रमाणें भरली । फरशीस पुन: सुरवात झाली । मोडशी थांबली काकांची ॥१४६॥
जुलाबावर हें काय औषध । परी औषध तो संतांचा शब्द । देतील तो जो मानी प्रसाद । तया न अगद आणीक ॥१४७॥
हरदा शहरचे एक गृहस्थ । पोटशूळ - व्याधिग्रस्त । चवदा वर्षें जाहले त्रस्त । उपाय समस्त जाहले ॥१४८॥
नाम तयांचें दत्तोपंत । कर्णोपकर्णीं ऐकिली मात । शिरडींत साई महासंत । दर्शनें हरतात अपाय ॥१४९॥
परिसूनियां ऐसी कीर्ति । गमन केलें शिरडीप्रती । चरण साईंचे माथां वंदिती । करुणा भाकिती तयांतें ॥१०५॥
बाबा चौदा वर्षें भरलीं । पोटशूळें पिच्छा पुरविली । पुरे आतां परमावधि झाली । शक्ति न उरली भोगावया ॥१५१॥
केल अन कोणाचा घातपात । अवमानिलीं न मायतात । नाठवे पूर्वजन्मींची मात । जेणें हे होतात कष्ट मज ॥१५२॥
केवळ संतप्रेमावलोकन । संतप्रसाद - आशीर्वचन । येणेंच होय व्याधिनिरसन । नलगे आन कांहींही ॥१५३॥
तैसाच अनुभव दत्तोपंतां । बाबांचा कर पडतां माथां । विभूती - आशीर्वाद लाधतां । आराम चित्ता वाटला ॥१५४॥
मग महाराजांनीं तयांस । ठेवूनि घेतलें कांहीं दिवस । हळूहळू पोटशूळाचा त्रास । गेला विलयास समूळ ॥१५५॥
असो ऐसे हे महानुभाव । काय वानूं मी तयांचा प्रभाव । परोपकृति हा नित्य स्वभाव । जयां सद्भाव चराचरीं ॥१५६॥
गाऊं जातां हें शब्दस्तोत्र । एकाहूनि एक विचित्र । आतां पूर्वानुसंधानसूत्र । भीमाजीचरित्र चालवूं ॥१५७॥
असो बाबा उदी मागविती । भीमाजीस थोडी देती । थोडी तयाच्या कपाळाला फांसिती । शिरीं ठेविती निजहस्त ॥१५८॥
जावया बिर्‍हाडीं आज्ञा झाली । पाटील निघाले पायचालीं । गाडीपर्यंत आपुले पाउलीं । गेले हुशारी वाटली ॥१५९॥
तेथूनि निर्दिष्ट जागींच जात । स्थान जरी होतें होतें संकोचित । परी तें बाबांहीं केलें सूचित । हेंच कीं महत्त्व तयाचें ॥१६०॥
चोपण्यांनीं नवथर चोपिली । म्हणूनि जमीन होती ओली । तरी बाबांची आज्ञा मानिली । सोई लाविली तेथेंच ॥१६१॥
गावांत मिळती जागा सुकी । भीमाजीच्या बहुत ओळखी । परी स्थान जें आलें बाबांचे मुखीं । सोडूनि आणिकीं नव जाणें ॥१६२॥
तेथेंच दोन पाथरिले गोण । वरी पसरूनियं अंथरूण । करूनियां स्वस्थ मन । केलें शयन पाटलानें ॥१६३॥
तेच रात्रीं ऐसें वर्तलें । भीमाजीस स्वप्न पडलें । बाळपणीचें पंतोजी आले । मांरू लागले तयातें ॥१६४॥
हातीं एक वेताची काठी । मारमारोनि फोडिली पाठी । सवाई मुखोद्नत व्हावयासाठीं । केलें बहु कष्टी शिष्यातें ॥१६५॥
सवाई तरी होती कैंची । जिज्ञासा प्रबळ श्रोतयांची । म्हणूनि अक्षरें अक्षर तीचि । देतों समूळचि परिसिली जी ॥१६६॥
 
( सवाई )
 
“जीस गमे पद अन्य गृहीं जर ठेवियलें जणुं सर्पशिरीं । वाक्य जिचें अति दुर्लभ ज्यापरि दुर्मिळ तें धन लोभिकरीं । कांतसमागम तेंच गमे सुखपर्व नसे जरि वित्त घरीं । शांत मनें निजकांतमतें करि कृत्य ‘सती’ जनिं तीच खरी ॥”
 
परी हें शासन कशासाठीं । हे तों कांहींच कळेना गोठी । पंतोजी टाकीना वेताटी । पेटला हट्टीं अनिवार ॥१६७॥
लगेच पडलें दुसरें स्वप्न । तें तों याहूनि विलक्षण । कोणी एक गृहस्थ येऊन । छाती दडपून बैसला ॥१६८॥
हातीं घेतला वरवंटा । वक्ष:स्थळाचा केला पाटा । प्राण कासावीस आले कंठा । जणुं बैकुंठा निघाले ॥१६९॥
स्वप्न सरलें लागला डोळा । तेणें मनास थोडा विरंगुळा । उदयाचला सूर्य आला । जागा झाला पाटील ॥१७०॥
हुशारी वाटे अपूर्व मना । समूळ मावळे रोगाची कल्पना । पाटा वरवंटा छडीच्या खुणा । आठव कोणा पहाण्याची ॥१७१॥
स्वप्नास जन आभास म्हणती । परी कधीं ये उलट प्रतीति । तेच मुहूर्तीं रोगोच्छित्ति । दु:खनिवृत्ति पाटिला ॥१७२॥
पाटील मनीं बहु धाला । कीं वाटे पुनर्जन्म झाला । मग तो हळू हळू निघाला । दर्शनाला बाबांचे ॥१७३॥
पाहोनि बाबांचे मुखचंद्रा । पाटिलाचे आनंदसमुद्रा । भरतें दाटलें आनंदमुद्रा । नयनां तंद्रा लागली ॥१७४॥
प्रेमाश्रूंचे वाहती लोट । पायांवरी ठेविलें ललाट । वेतशासन ह्रदयस्फोट । परिणाम स्पष्ट सुखकरी ॥१७५॥
या उपकारासी उतराई । होईन मी पामर काई । हें तों अशक्य म्हणवूनि पाईं । केवळ डोई ठेवितों ॥१७६॥
एणेंच माझी भरपाई । याहूनि अन्य उपाय नाहीं । अचिंत्य अतर्क्य हे नवलाई । बाबा साई आपुली ॥१७७॥
असो ऐसे ते पवाडे गात । पाटील महिना राहिले तेथ । पुढें नानांचे उपकार स्मरत । होऊनि कृतार्थ परतले ॥१७८॥
ऐसे ते भक्तिश्रद्धान्वित । पाटील आनंदनिर्भरचित्त । साईकृपा कृतज्ञतायुक्त । वरचेवर येत शिरडीस ॥१७९॥
दोन हात एक माथा । स्थैर्य श्रद्धा अनन्यता । नलगे दुजें साईनाथा । एक कृतज्ञता ते व्हावी ॥१८०॥
होतां कोणी विपद्‌ग्रस्त । सत्यनारायणा नवसित । तयाचें साङ्ग व्रत आचरत । संकटनिर्मुक्त होत्साता ॥१८१॥
तैसेंच पाटील सत्य - साईव्रत । तैंपासाव करूं लागत । प्रत्येक गुरुवारीं सदोदित । सुस्नात व्रतस्थ राहुनी ॥१८२॥
जन सत्यनारायणकथा । पाटील अर्वाचीन भक्तलीलामृता । दासगणूकृत साईचरिता । सप्रेमता वाचीत ॥१८३॥
त्या पंचेचाळीस ग्रंथाध्यायीं । गणूदास भक्तां अनेकां गाई । त्यांतील साईनाथ अध्यायत्रयी । सत्यसाईकथा ती ॥१८४॥
व्रतांमाजीं उत्तम व्रत । पाटील ही अध्यायत्रयी वाचीत । पावले सौख्य अपरिमित । स्वस्थचित्त जाहले ॥१८५॥
आप्तइष्टबंधूसमेत । पाटील मिळवूनि सोयरे गोत । करीत नेमें सत्य - साईव्रत । आनंदभरित मानसें ॥१८६॥
नैवेद्याची तीच सवाई । मंगलोत्सव तैसाचि पाही । तेथें नारायण येथें साई । न्यून नाहीं उभयार्थीं ॥१८७॥
पाटिलानें घातला पाठ । गांवांत पडला तोच परिपाठ । या सत्य - साईव्रताचे पाठ । लागोपाठ चालले ॥१८८॥
ऐसे हे संत कृपाळ । प्राप्त होतां उदयकाळ । दर्शनें हरिती भवजंजाळ । काळही मागें परतविती ॥१८९॥
आतां येथूनि पुढील कथा । वर्णील एकाची संततिचिंता । संतासंतांची एकात्मता । चमत्कारता प्रकटेल ॥१९०॥
नांदेड शहरींचा एक रहिवासी । मोठा श्रीमंत जातीचा पारसी । मिळवील बाबांचे आशीर्वादासी । पुत्र पोटासी येईल ॥१९१॥
मौलीसाहेब तेथील संत । तयांची खूण बाबा पटवीत । पारसी मग आनंदभरित । गेला परत निजग्रामा ॥१९२॥
अति प्रेमळ आहे कथा । श्रोतां परिसिजे स्वस्थचित्ता । कळोनि येईल साईची व्यापकता । तैसीच वत्सलता तयांची ॥१९३॥
पंत हेमाड साईंसी शरण । संतां श्रोतयां करितो नमन  । पुढील अध्यायीं हें निरूपण । सादर श्रवण कीजे जी ॥१९४॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । भीमाजीक्षयनिवारणं नाम त्रयोदशोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥