रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:46 IST)

साईसच्चरित - अध्याय ३८

sai satcharitra chapter 38
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
सकलजगदानंदकरा । भक्तेष्टसंपादनतत्परा । चरणाश्रितत्रितापहरा । नमन गुरुवरा तव पायां ॥१॥
प्रणतपाला परमउदारा । शरणागतभक्तोद्धारा । करावया कोलोपकारा । त्वां अवतारा धरियेलें ॥२॥
जयजयाजी द्वैतदलना । जयजयाजी भक्तमनमोहना । जयजयाजी भवापहरणा । जय करुणाघना गुरुराया ॥३॥
कोठील भाग्य आलें फळा । जेणें हे चरण पाहिले डोळां । भोगिला समागमसुखसोहळा । गेली ती वेळा परती न ये ॥४॥
केवळ ब्रम्हाची जी मूस । ओतूनि शुद्ध स्वरूपरस । आकारली जी मूर्ति सुरस । तीच कीं संतवतंस साई ॥५॥
साई तोचि आत्माराम । तोचि पूर्णानंदधाम । स्वयें अवाप्त सकलकमा । करीत निष्काम भक्तांस ॥६॥
जो सर्वधर्मविधारक । ब्रम्हाक्षात्रतेज एक । तयांसह मृत्य़ूचा घोटक । लक्षण हें त्रोटक जयाचें ॥७॥
जन्ममरणादि संबंध । तोडी तडतडा जो हे बंध । तया मी जड अंध । साष्टांग वंदन करीतसें ॥८॥
गताध्यायीं अति आवडीं । अर्णिली साईनाथांची चावडी । आतां ये अध्यायीं हंडी । परिसा अखंडित सुखदायी ॥९॥
तान्हें बाळ खाऊं जाणे । काय खाऊं तें तें नेणे । दुध वा कवळ लावूनि भरवणें । काळजी ही घेणें मातेनें ॥१०॥
तैसीच माझी साईमाता । लेखणी लेववूनि माझिये हाता । लिहवूनि घेई हा प्रबंध आयता । आवडीं निजभक्तांकारणें ॥११॥
युगायुगाचें सिद्ध साधन । मानवधर्मशास्त्रीं वचन । कृतीं तप, त्रेतीं ज्ञान । द्वापरीं यज्ञ, दान कलीं ॥१२॥
सदा सर्वदा दानधर्म । क्षुधाशांती परम वर्म । अन्नदान नित्यनेम । कर्मांत कर्म हें आद्य ॥१३॥
होतां दोनप्रहरचे बारा । अन्नावीण जीव घाबरा । जैसें आपणा तैसेंच इतरां । जाणील अंतरा तोचि भला ॥१४॥
आचारधर्मामाजीं प्रधान । अग्रगण्य अन्नदान । पाहूं जातां तयाहून । कांहीं न आन श्रेष्ठत्वें ॥१५॥
परब्रम्हास्वरूप अन्न । त्यांतूनि भूतें होती निष्पन्न । अन्नचि जीवें जगाया साधन । अन्नांतर्लीन अवसानीं ॥१६॥
वेळीं अवेळीं येतां अतिथि । अन्नदानें सुखवावा गृहस्थीं । अन्नावीण जे माघारा लाविती । अचूक दुर्गती आमंत्रिती ॥१७॥
वस्त्रपात्रादिदानीं विचार । अन्नदानीं नलगे आधार । कोणी कधींही येवो दारावर । बरवा न अनादर तयाचा ॥१८॥
ऐसी अन्नदानाची महती । एतदर्थ प्रमाण श्रुती । म्हणूनि बाबाही अन्न संतर्पिती । लौकिकरीती आचरिती ॥१९॥
पैसा अडका इतर दान । अपूर्ण अन्नदानावीण । कायसे उडुगण शशीविहीन । शोभे कां पदकावीण हार ॥२०॥
षड्रसान्नीं जैसें वरान्न । पुण्यांत पुण्य अन्नदान । शिखर शोभे न कळसावीण । कमलविहीन सर तैसें ॥२१॥
भजन जैसें प्रेमावीण । कुंकुमावीण सुवाशीण । सुस्वरावीण गाण्याचा शीण । तक्र अलवण अस्वादू ॥२२॥
त्यांतही व्याधिष्ट शक्तिहीन । अंध पंगू बधिर दीन । तयांला आधीं घालावें अन्न । आप्तेष्ट जन त्यामागें ॥२३॥
आतां बाबांच्या हंडीची कल्पना । साधारणत: श्रोतयां मना । व्हावी म्हणोनि करितों यत्ना । जिज्ञासुजनाप्रीत्यर्थ ॥२४॥
मशिदीचिया अंगणांत । चूल एक मोठी रचीत । वरी विस्तीर्ण पातेलें ठेवीत । पाणी तें नियमित घालुनी ॥२५॥
कधीं ‘मिठ्ठे चावल’ करीत । कधीं पुलावा मांसमिश्रित । कधीं कणिकेचीं मुटकुळीं वळीत । वरान्नीं शिजवीत डाळीच्या ॥२६॥
कधीं करूनि कणिकेचे रोडगे । अथवा थापूनि कणिकेचे पानगे । सोडीत शिजत्या वरणांत अंगें । मुटकुळ्यांसंगें हळुवार ॥२७॥
मसाला वाटूनि पाटयावरती । स्वयें करीत पाकनिष्पत्ती । मुगवडया करूनि स्वहस्तीं । हळूच सोडिती हंडींत ॥२८॥
स्वर्गादि भुवनाचिया आशा । यज्ञार्थी करवूनियां पशुहिंसा । ब्राम्हाणही सेविती पुरोडाशा । सशास्त्र हिंसा ही म्हणती ॥२९॥
तैसेच मुल्लास आज्ञापून । करवूनि शास्त्रोक्त मंत्रोच्चारण । बाबाही करवीत अजाहनन । विधिविधानपुर:सर ॥३०॥
कधीं मोठी कधीं लहान । हंडीचे या प्रकार दोन । तियेमाजीं शिजवूनि अन्न । करवीत भोजन अन्नार्थियां ॥३१॥
पन्नास जणां पुरेसें अन्न । पुरवी जी ती हंडी लहान । जियेंत शंभर पात्रें जेवून । उरे जैं अन्न ती मोठी ॥३२॥
तदर्थ आपण वाणियाकडे । स्वयें जाऊनि ठरवीत आंकडे । उधारीची वार्ता न तिकडे । पैसे ते रोकडे हातावरी ॥३३॥
मीठ, मिरची, जिरें, मिरें । भाजीपाला नारळ खोबरें । स्वयें बाबा आणीत सारें । पूर्ण विचारें ठरवून ॥३४॥
स्वयें बैसूनि मशिदीतें। जातें मांडूनियां निज हातें । गहूं डाळ जोंधळियातें । बाबांनीं तेथें दळावें ॥३५॥
हंडीप्रीत्यर्थ मुख्य परिश्रम । बाबाच आपण करीत अविश्रम । मसाला वांटावयाचेंही कर्म । करीत कीं परम मनोभावें ॥३६॥
करावया सौम्य वा प्रखर । चुल्लीमाजील वैश्वानर । इंधनें हीं स्वयें खालवर । करीत वरचेवर बाबा ॥३७॥
डाळ घाळूनियां भिजत । स्वयें पाटयावर वाटूं लागत । हिंग जिरें कोथिंबीर मिश्रित । खमंग बनवीत खाद्य स्वयें ॥३८॥
तिंबूनिया कणकीचे गोळे । करूनि सव्वा हात वेटोळें । लाटूनियां मग तें सगळें । करीत पोळे विस्तीर्ण ॥३९॥
जोंधळ्याचें पीठ आंत । पाणी घालूनि प्रमाणांत । करूनियां तें तक्रमिश्रित । आंबीलही करीत हंडींत ॥४०॥
तीही आंबील अवघियांतें । परमप्रेमें बाबा हातें । वाढीत इतर अन्नासमवेतें । अति आदरें ते समयीं ॥४१॥
असो हंडी शिजली पूर्ण । ऐसी नीट पारख करून । चुल्लीखालीं उतरून । मशिदीं नेऊन ठेवीत ॥४२॥
विधिपूर्वक मौलवीहस्तें । फात्या देववून त्या अन्नातें । प्रसाद पाठवीत म्हाळसापतीतें । आणीक अतात्यांतें आरंभीं ॥४३॥
मग तेंशेष सकळ आन्न । बाबा वाढीत निजहस्तेंकरून । गरीब दुबळे तृप्त करून । सुख समाधान पावत ॥४४॥
ते अन्नार्थी यावत्तृप्ति । अन्न सेविती उल्लासवृत्ती । वरी बाबा आग्रह करिती । घ्या घ्या म्हणती प्रीतीनें ॥४५॥
काय तयांचें पुण्य गहन । जयां हें लाधलें तृप्तिभोजन । स्वयें बाबा ज्यां ओगरिती अन्न । काय ते धन्य भाग्याचे ॥४६॥
येथें सहज येईल आशंका । प्रसाद म्हणूनि बाबा लोकां । समांस अन्नही भक्तां अनेकां । नि:शंक मनें कां वांटीत ॥४७॥
तरी या शंकेचें निराकरण । करावया न लागे शीण । जयांस नित्याचें मांसाशन । तयांसीच हें अन्न वाढीत ॥४८॥
आजन्मांत नाहीं सहवास । तया स्पर्शूं न देती मांसास । कधींही न करिती हें साहस । प्रसादीं लालसा त्यां देती ॥४९॥
गुरु स्वयें प्रसाद देतां । सेव्यासेव्याचा विकल्प येतां । शिष्य पावे निजात्मघाता । अध:पातातें जाई ॥५०॥
या तत्त्वाची कोठवर जाण । जाहली आपुल्या भक्तांलागून । म्हणोनि थट्टाविनोदेंकरून । बाबा हें आपण अनुभवीत ॥५१॥
ये अर्थीची अल्प वार्ता । आठवली जी लिहिता लिहितां । श्रोतीं परिसिजे स्वस्थचित्ता । निजहितार्थालागून ॥५२॥
आली एकदां एकादशी । बाबा वदती दादांपाशीं । “कोर्‍हाळ्याहूनि सागोतीशी । आणविशी कां मजलागीं” ॥५३॥
तदर्थ साईंनीं रुपये काढिले । दादांपाशीं मोजूनि दिधले । “जातीनें जा” आज्ञापिलें । “तूंच हें केलें पाहिजे” ॥५४॥
नामें गणेश दामोदर । उपनाम जयांचें केळकर । जन जाणोनि ते वयस्कर । दादाच सर्व संबोधिती ॥५५॥
हरी विनायक साठयांचे श्वशुर । साईपदीं प्रेम अनिवार । ब्राम्हाण ब्रम्हाकर्मीं आदर । आचारविचारसंपन्न ॥५६॥
करितां रांत्रदिन निजगुरुसेवा । धणी न पुरे जयांच्या जीवा । तयांस या आज्ञेचा नवलावा । नकळे वाटावा कैसेनी ॥५७॥
जयाचीं गात्रें अविकळ । जया पूर्वाभ्यासाचें बळ । तयाचें मन कधीं न चंचळ । बुद्धिही अचळ गुरुपदीं ॥५८॥
धनधान्यवस्त्रार्पण । हेंच नव्हे दक्षिणादान । गुर्वाज्ञेचें अनुष्ठान । गुरुसंतोषण दक्षिणा ॥५९॥
कायावाचामनादिकांची । करी जो कुरवंडी सर्वांची । अंतीं जो साधी गुरुकृपेची । प्राप्ति तयाची निजश्रद्धा ॥६०॥
मग ती आज्ञा वंदूनि शिरीं । कपडे करूनि आले सत्वरी । निघाले जाऊं त्या गांवावरी । तंव माघारीं वोलाविलें ॥६१॥
“अरे ही खरेदी करावयास । कोणास तरी पाठवीनास” । म्हणाले “जाण्यायेण्याचा त्रास । उगी न सायास करावे” ॥६२॥
मग ती सागोती आणावयास । दादांनीं पाठविलें पांडू गडयास । इतुक्यांत बाबा वदती दादांस । पहा त्या समयास काय तें ॥६३॥
पांडू निघाला जावयास । पाहूनि लागला तो रस्त्यास । राहूं दे म्हणती आजचा दिवस । परतवीं तयास माघारा ॥६४॥
असो पुढें एक्या काळीं । आली हंडी बनविण्याची उकळी । चुलीवर डेग चढविली । सागोती रिचविली तियेंत ॥६५॥
तांदूळ धुऊनि टाकिले तींत । यथाप्रमाण पाणी घालीत । लांकडें सारूनि खालीं चुलींत । बाबा तीं फुंकीत बैसले ॥६६॥
गांव सगळा त्यांना अंकित । कोणीही आनंदें बसता फुंकीत । परी बाबांच्या आज्ञेविरहित । चालेना हिंमत कवणाची ॥६७॥
अन्नही रांधूनि आणावयास । आज्ञाच करण्याचा अवकाश । परम सोत्कंठ साईंचे दास । साईच उदास एतदर्थ ॥६८॥
उदास म्हणणें हेंही न सार्थ । स्वयंपाकीं जया स्वार्थ । तो इतरांतें कष्टवील किमर्थ । अन्नदानार्थ परकियां ॥६९॥
निजनिर्वाहा पोटापुरी । स्वयें जो मागे माधुकरी । हिंडे तदर्थ दारोदारीं । मागे भाकरी चतकोर ॥७०॥
तोच करावया अन्नदान । सोशील जेव्हां कष्ट आपण । तेव्हांच तयातें समाधान । राहीना अवलंबून कोणावरी ॥७१॥
शंभर पात्रांचा स्वयंपाक । होईल इतुकें पीठ कणीक । तांदुळ डाळ पाहूनि चोख । आणीत रोख बाबा स्वयें ॥७२॥
स्वयें सूप घेऊनि हातीं । वणियाचे दुकानीं जे जाती । व्यवहारीं चोख असावें किती । जन हें शिकती जयाचेनी ॥७३॥
वस्तु स्वयें हातीं घेऊनि । करीत दरदाम कसून । कोणी जाऊं न शके छकवून । गर्व हरून जातसे ॥७४॥
ऐसा हिशेबीं आव घालिती । पैही न तेथें जाऊं देती  । पांच मागतां दहा देती । दाम चुकाविती हातोहात ॥७५॥
स्वयें कामाची मोठी हौस । दुजियानें केलें न चले त्यांस । न धरती कधीं कुणाची आस । परी न त्रास कवणाचा ॥७६॥
हें एक तत्त्व बाबांपाशीं । होतें जागृत अहर्निशीं । म्हणून या हंडीचे कार्यासी । साह्य न कोणाशीं मगत ॥७७॥
हंडीच काय धुनीच्या लगत । सर्पणाचे खोलीची भिंत । पूर्वभागाची तीन चतुर्थ । स्वहस्तरचित बाबांची ॥७८॥
महादू करी कर्दमगारा । बाबा थापी घेऊनि निजकरा । रचीत विटांच्या भरावर थरा । भिंती उभारावयास ॥७९॥
आणीक बाबा काय न करिती । मशीद आपण स्वयें सारविती । हातीं कफनी लंगोट शिवती । आस न ठेविती कवणाची ॥८०॥
हंडींतूनि येतां वर । वाफा उसळत असतां भयंकर । अस्तनी सारूनि बाबा निजकर । घालूनि खालवर ढवळीत ॥८१॥
पाहूनि तपेलें खतखतलें । ढवळण्याचे योग्य झालें । नवल बाबा ऐसिया वेळे । अगाध लीले दावीत ॥८२॥
कोठें रक्तमांसाचा हात । कोठें तपेलें प्रखर रखरखीत । परी न भाजल्याची खूण यत्किंचित । न भयभीत मुखचर्या ॥८३॥
जो भक्तांचिया पडतां मस्तकीं । तात्काळ वारी त्रिताप समस्त कीं । तयासी कैसें दुखवावें पावकीं । महती न ठावुकी काय तया ॥८४॥
भिजली डाळ पाटयावरती । घालूनियां स्वयें निवडिती । स्वरीं वरवंटा घेऊनि वाटिती । मुगवडया बनविती निजहस्तें ॥८५॥
मग त्या हंडींत हळूच सोडिती । खालीं न लगाव्या म्हणुनी घाटिली । तयार होतां हंडी उतरिती । प्रसाद वांटिती सकळिकां ॥८६॥
सकळिकां कां म्हणतील श्रोते । साईबाबा तों यवन होते । मग ऐसिया अधर्माचरणातें । जाहए करविते कैसेनी ॥८७॥
या शंकेचें एकचि उत्तर । धर्म आणि अधर्म विचार । साईंपाशीं हें साचार । निरंतर जागत ॥८८॥
हंडींतील शिजलेले पदार्थ । घ्यावेत सर्वांनीं सेवनार्थ । ऐसा दुराग्रह यत्किंचित । साई न धरीत केव्हांही ॥८९॥
परी तो प्रसाद व्हावा प्राप्त । ऐसिया सदिच्छें जे जे प्रेरित । तयांची केवळ वासना पुरवीत । प्रपंच न करीत केव्हांही ॥९०॥
शिवाय ठावी कोणास ज्ञाती । मशिदीं वसती यवन म्हणती । परी तयांची आचरिती रीती । पाहूनि जाती कळेना ॥९१॥
भक्त जयास देव मानिती । जयाच्या ते पदरजीं लोळती । तयाची अवलोकिती काय जाती । परमार्थप्राप्ति धिक्  त्याची ॥९२॥
इहामुत्रीं जो बाणला विरक्ती । विवेक वैराग्य जयाची संपत्ति । काय तयाची पहाणें जाती । परमार्थप्राप्ति धिक् त्याची ॥९३॥
धर्मधर्मातीत स्थिती । जयाची शुद्ध आनंदवृत्ति । काय तयाची पाहणें जाती । परमार्थप्राप्ति धिक् त्याची ॥९४॥
ऐसें हें बाबांचें चरित । मी तों गाईं निजसुखार्थ । असेल कोणा श्रवणाची आर्त । पुरेलही भावार्थ तयाचा ॥९५॥
असो या कथेचें अनुसंधान । राहिलें मागेंच पहा परतून । बाबा दादांस अनुलक्षून । वदती अवधान द्या तेथें ॥९६॥
खारा पुलावा आहे केला । पाहिलास कां कैसा झाला । दादांनीं उपचारार्थ नांवाजिला । हो  हो चांगला म्हणूनि ॥९७॥
दादा पुराणे भक्त वरिष्ठ । स्नानसंध्यानियमनिष्ठ । पाहती सदा शिष्टाशिष्ट । तयां न हें इष्ट वाटलें ॥९८॥
नाहीं कधीं द्दष्टीं देखिला । नाहीं कधीं जिव्हे चाखिला । ऐसियास कैसा म्हणसी चांगला । म्हणती दादाला तंव बाबा ॥९९॥
काढ कीं रे डेगीचें पुढें म्हणती हात काढ । पळा घे हा ताटांत वाढ । सोंवळ्याची न धरीं चाड । उगीच बाड मारूं नको ॥१०१॥
संत म्हणतील शिष्यास बाट । कल्पनाच ही आधीं अचाट । संत कृपेनें भरले घनदाट । तयांची वाट त्यां ठावी ॥१०२॥
खर्‍या प्रेमाची उठतां लहरी । माताही घे चिमटा करीं । मग जैं बाळ आरोळी मारी । तंव तीच धरी पोटासीं ॥१०३॥
अभक्ष्य भक्षार्थीं जयाचें मन । तयाची वासना करिती शमन । तेंच करी जो मनाचें दमन । तयास अनुमोदन दे साई ॥१०४॥
ही आज्ञापालन - मीमांसा । जाई कधीं ती इतुकी कळसा । स्पर्शले जे न आजन्म मांसा । तयांचा भरंवसा डळमळे ॥१०५॥
पाहूं जातां वस्तुस्थिति । ऐसिया भक्ता कवणाहीप्रती । कधीं न बाबा स्वयें प्रवर्तविती । उन्मार्गवर्ती व्हावया ॥१०६॥
असो सन एकोणीसशें दहा । तया वर्षापूर्वीं पहा । योग हंडीचा वरचेवर हा । बहु उत्साहासमन्वित ॥१०७॥
तेथून पुढें मुंबाशहरीं । दासगणूंची आली फेरी । साईमाहात्म्य कीर्तनगजरीं । कोंदिलें अंतरीं सकळांच्या ॥१०८॥
तेव्हांपासूनि बाबांची महती । कळूनि आबालवृद्धांप्रती । तेथूनि जन जाऊं लागती । शिरडीं न गणती तयांची ॥१०९॥
पुढें पूजा पंचोपचार । नैवेद्याचे नानाप्रकार । सुरू झाले आहार - उपहार । दुपारतिपार बाबांस ॥११०॥
वरण भात शिरा पुरी । चपात्या चटणी कोशिंबिरी । नानाविध पंचामृत खिरी । अन्नसामुग्री लोटली ॥१११॥
यात्रा लोटली अपरिमित । जो तो दर्शना जाई धांवत । साईचरणीं नैवेद्य अर्पीत । क्षुधार्त संतृप्त सहजेंच ॥११२॥
होऊं लगले राजोपचार । ढाळूं लागले छत्रचामर । टाळ घोळ वाद्यगजर । भजकपरिवार वाढला ॥११३॥
महिमा वाढला सर्वत्र । गाऊं लगले स्तुतिस्तोत्र । पुढें शिरडी जाहलें क्षेत्र । परम पवित्र यात्रार्थियां ॥११४॥
तेणें हंडीचें कारण सरलें । नैवेद्य इतुके येऊं लागले । त्यांतचि फकीर फुकरे धाले । उरूं लागलें अन्न बहु ॥११५॥
आतां कथितों आणिक कथा । परिसतां आनंद होईल चित्ता । आराध्य वस्तूचा अनादर करितां । बाबा निजचित्ता अप्रसन्न ॥११६॥
करूनि कांहींतरी अनुमान । कोणी साईस म्हणती ब्राम्हाण । कोणी तया मुसलमान । ज्ञातिविहीन असतां तो ॥११७॥
नाहीं जयाचें ठावठिकाण । कवण्या ज्ञातीं केव्हां जनन । कवण माता पिता हे ज्ञान । मुसलमान ब्राम्हाण वा ॥११८॥
असता जरी मुसलमान । कैसें मशिदींत अग्न्याराधन । असतें का तेथ तुलसीवृंदावन । घंटावादन साहता का ॥११९॥
करूं देता शंखस्फोरण । सवादित्र कथा कीर्तन । टाळ घोळ मृदंगवादन । हरिनामगर्जन मशीदीं ॥१२०॥
असता जरी मुसलमान । मशिदींत स्वयें बैसून । करूं देता कां गंधचर्चन । तेथ सहभोजन करिता का ॥१२१॥
असता जरी मुसलमान । असते काय सविंध कान निजपल्लवचे दाम वेंचून । करिता का जीर्णोद्धारण देउळाचें ॥१२२॥
धारण करिता का स्नानोत्तर । महवस्त्र पीतांबर । उलट आराध्य दैवतीं अनादर । झालिया क्षणभर खषत नसे ॥१२३॥
ये अर्थींची बोधक कथा । आठवली जी लिहितां लिहितां । सादर करितों अतिविनीतता । स्वस्थचित्ता परिसिजे ॥१२४॥
पहा एकादा ऐसें घडलें । बाबा लेंडीहूनि परतले । मशिदीसी येऊनि बैसले । भक्त पातले दर्शना ॥१२५॥
त्यांतचि बाबांच्या बहुप्रीतीचे । होते भक्तवर चांदोरकर साचे । आले भुकेले दर्शनाचे । बिनीवाल्यांचे समवेत ॥१२६॥
नमस्कारोनि साईनाथां । सन्मुख बैसले ते उभयतां । चालल्या असतां कुशलवार्ता । बाबा अवचितां रगावले ॥१२७॥
म्हणती नान अतुजकदून । व्हावें कैसें हें विस्मरण । हेंच काय त्वां केलें संपादन । मजसवें दिन घालवूनि ॥१२८॥
त्वां जी माझी केली संगती । अखेर तिची हीच का गती । ऐसी कैसी भ्रमली मती । यथानिगुती मज सांग ॥१२९॥
परिसोनि नाना अधोवदन । मनीं विचारिती कोपकारण । होईना कांहींही आठवण । मन उद्विग्न जाहलें ॥१३०॥
चुकलें कोठें कांहीं कळेना । कोपास कांहीं कारण दिसेना । परी कांहीं तरी जाहल्याविना । बाबा न कोणा दुखविती ॥१३१॥
म्हणोनि बाबांचे पाय धरिले । बहुतांपरी विनविलें । अखेर नानांनीं पदर पसरिले । पुसिले भरले कां रागें ॥१३२॥
“वर्षानुवर्ष माझी संगती । असतां तुझी हे का गती  । काय झालें तुझिया मती” । बाबा वदती नानांतें ॥१३३॥
“कोपरगांवीं कधीं आलां । वृत्तांत काय वाटेसी घडला । मार्गांत मध्यें कोठें उतरलां । तांगा हांकिला कीं थेट ॥१३४॥
नवल कांहीं घडलें वाटे । साद्यंत परिसावें ऐसें वाटे । सांग पां झालें काय कोठें । असो मोठें सान वा” ॥१३५॥
ऐसें परिसतां नाना उमजले । तात्काळ त्यांचें तोंड उतरलें । जरी बोलावया मनीं शरमले । तरी तें केलें निवेदन ॥१३६॥
लपवालपवी न चले येथ । मनांत केलें हें निश्चित । मग जें घडलें तें साद्यंत । नाना सांगत बाबांतें ॥१३७॥
असत्य चालेना साईंप्रती । असत्यें नाहीं साईंची प्राप्ति । असत्यें जाणें अधोगति । अंतीं दुर्गती असत्यें ॥१३८॥
गुरुवंचन महादुष्कृति । पापास नाहीं तया निष्कृति । जाणोनि नाना बाबांप्रती । घडलेलें कळविती साद्यंत ॥१३९॥
म्हणती प्रथम तांगा ठरविला । थेट शिरडीचा ठराव केला । गोदातटींचा दत्त अंतरला । बिनीवाल्यांना त्यायोगें ॥१४०॥
बिनीवाले दत्तभक्त । लागतां दत्तमंदिर मार्गांत । उतरावें खालीं आलें मनांत । दर्शनार्थ दत्ताच्या ॥१४१॥
परी होती मजला घाई । मींच तयांतें केली मनाई । शिरडीहून परततां पाहीं । घेतां हें येईल दर्शन ॥१४२॥
ऐसा होऊनि उतावेळ । शिरडीस यावया होईल वेळ । म्हणोनि केली म्यां टाळाटाळ । भेट हेळसिली दत्ताची ॥१४३॥
पुढे करितां गोदास्नान । कंटक मोठा पायीं रुतून । मार्गीं अत्यंत जाहला शीण । काढिला उपटून प्रयत्नें ॥१४४॥
तंव बाबा देती इषारा । “बरी ही नव्हे ऐसी त्वरा । सुटलासि कांटयावरी तूं बरा । करूनि अनादरा दर्शनीं ॥१४५॥
दत्तासारिखें पूज्य दैवत । असतां सहज मार्गीं तिष्ठत । अभागी जो दर्शनवर्जित । मी काय पावत तयासी” ॥१४६॥
आतां असो हंडीची वार्ता । मशिदीमाजीं साईसमवेता । काय ती अपराण्हभोजन - पावनता । भक्तप्रेमळता साईंची ॥१४७॥
माध्यान्हपूजा झालियावरती । प्रत्यहीं होतां बाबांची आरती । भक्तजन जंव माघारा परतती । उदी तंव देती समस्तां ॥१४८॥
मशिदीचिया धारेवरती । बाबा येऊनि उभे ठाकती । भक्तगण अंगणीं तिष्ठती । चरण वंदती एकेक ॥१४९॥
पायांवरी ठेवुनी डोई । जो जो सन्मुख उभा राही । तया एकेका भाळीं ते समयीं । लावीत साई उदीतें ॥१५०॥
‘आतां समस्तीं लहानथोरीं । जावें जेवाया आपुलाल्या घरीं । वंदूनि बाबांची आज्ञा ही शिरीं । जन माघारीं परतत ॥१५१॥
फिरतां मग बाबांची पाठ । पडदा ओढीत यथा परिपाठ । ताटावाटयांचा खणखणाट । होई मग थाट प्रसादाचा ॥१५२॥
साईकरस्पर्शें पूत । नैवेद्यशेष मिळावा परत । म्हणोनि मार्गप्रतीक्षा करीत । कित्येक बैसत अंगणीं ॥१५३॥
येरीकडे निंबरानिकट । बाबा जंव बैसती करूनि पाठ । दोहीं बाजूंस पंक्तींचा थाट । आनंद उद्भट सकळिकां ॥१५४॥
जो तो आपापला नैवेद्य सारी । साई समर्थांचिया पुढारीं । तेही मग एका ताटाभीतरीं । निजकरें करीत एकत्र ॥१५५॥
तें बाबांच्या हातीचें शित । लाधाया पाहिजे भाग्य अमित । जेणें भोक्ता सबाह्या पुनीत । सफल जीवित तयाचें ॥१५६॥
वडे अपूप सांजोर्‍या पुरिया । कधीं शिखरिणी घारगे फेणिया । विविध शाका खिरी कोशिंबिरीया । बाबा मग बरविया एकवटती ॥१५७॥
एणें विधी मग तें अन्न । बाबा करीत ईश्वरार्पण । मग शामा - नानांकडून । ताटें भरभरून वाढवीत ॥१५८॥
पुढें एकेकास बोलावून । आपुलेपाशीं बैसवृन । परमानंदें प्रीतीकरून । आकंठ भोजन करवीत ॥१५९॥
खमंगघृतें जो सुखाडला । पोळीवरान्न इंहीं मिसळिया । ऐसा करूनि गोड काला । बाबा सकळांला वाढीत ॥१६०॥
सेवितां हा प्रेमाचा काला । काय गोडी ब्रम्हानंदाला । भोक्ता बोटें चोखीत निघाला । अखंड धाला तृप्तीनें ॥१६१॥
कधीं मांडे पूर्णपोळिया । कधीं पुरिया शर्करे घोळलिया । कधीं बासुंदी शिरा सांजोरिया । वाढिती गुळवरिया स्वादिष्ट ॥१६२॥
कधीं शुभ्र अंबेमोहोर । तयावरी वरान्न सुंदर । घृत लोणकढें स्वादिष्ट रुचिर । शाखापरिकर वेष्टित ॥१६३॥
लोणचें पापड आणि रायतें । नानापरींचीं भजीं भरितें । व्कचिदाम्लदधितक्रपंचामृतें । धन्य ते सेविते दिव्यान्ना ॥१६४॥
जेथें भोक्ता श्रीसाईनाथ । भोजनाची त्या काय मात । भक्त तेथ आकंठ जेवीत । ढेंकरही देत तृप्तीचे ॥१६५॥
ग्रासोग्रासीं समाधान । तुष्टि - पुष्टि - क्षुधानाशन । ऐसें तें गोड सुग्रास अन्न । परम पावन प्रेमाचें ॥१६६॥
ग्रासोग्रासीं नाम समस्त । दिव्यान्नाच्या आहुती देत । पात अणुमात्र रितें न होत । ओगरिलें जात वरिचेवरी ॥१६७॥
जया पव्कान्नीं जयां आसक्ति । प्रेमें वाढिती तयांस तीं तीं । कितीएकांस आम्ररसीं प्रीती । रस त्यां वाढिती प्रीतीनें ॥१६८॥
ऐसें हें अन्न वाढावयासी । नानासाहेब निमोणकरांसी । अथवा माधवराव देशपांडयांसी । बाबा प्रतिदिवशीं आज्ञापीत ॥१६९॥
तयांचाही नित्य नेम । नैवेद्य वाढणें हेंचि काम । तदर्थ करीत अति परिश्रम । परमप्रेमसमन्वित ॥१७०॥
भात सुग्रास जिरेसाळी । जैसी मोगरियाची कळी । वरी तुरीची दाळी पिवळी । घृत पळी पळी समस्तां ॥१७१॥
वाढितां ये आमोद घमघमित । चटणियांसीं भोजन चमचमित । अपव्क अरुचिर नाहीं किंचित । यथेष्ट निश्चित जेविती ॥१७२॥
त्या स्वानंदताटींच्या शेवया । सप्रेम भक्तीचिया कुरडिया । शांतिसुख स्वानुभविया - । वांचून जेवावया कोण ये ॥१७३॥
‘हरिरन्नं हरिर्भोक्ता’ । हरीच रसाची चवी चाखिता । धन्य तेथील अन्न वाढिता । धन्य तो सेविता दाताही ॥१७४॥
या सर्व गोडियेचें जें मूळ । ती एक निष्ठा गुरुपदीं प्रबळ । गोड नव्हे शर्करा गूळ । गोड ती समूळ श्रीश्रद्धा ॥१७५॥
ऐसें नित्यश्रीर्नित्यमंगळ । खीर शिरा काल्याची चंगळ । पात्रीं बसल्यावर टंगळमंगळ । चाले न अंमळही तेथें ॥१७६॥
परोपरीची पाकनिष्पत्ति । सेवूनि होतां उदरपूर्ति । विना - दध्योदन नाहीं तृप्ति । नसल्यास मागती तक्र तरी ॥१७७॥
एकदां स्वच्छ तक्राचा प्याला । जो गुरुरायें निजहस्तें भरिला । प्यावया मज प्रेमें दिधला । म्यां जंव लाविला ओठास ॥१७८॥
शुभ्र स्वच्छ तक्र द्दष्टीं । पाहोनि जाहली सुखसंतुष्टी । लावितां तो प्याला ओष्ठीं । स्वानंदपुष्टी लाधलों ॥१७९॥
आधींच पव्कान्नीं धालें पोट । तेथ हें होईल कैसेन प्रविष्ट । आशंका ऐसी घेतां क्लिष्ट  । घुटका तो स्वादिष्ट लागला ॥१८०॥
पाहोनि ऐसा मी संकोचित । बाबा अति काकुळती वदत । “पिऊन घे रेतें समस्त” । योग न हा परत जणुं गमला ॥१८१॥
असो पुढें आलीच प्रचीती । तेथूनि पुढें दों मासांतीं । बाबा आपुला अवतार संपविती । खरेंच पावती निर्वाण ॥१८२॥
आतां तया ताकाची तहान । भागवावया मार्ग न आन । विना साईकथामृतपान । तेंच कीं अवलंबन आपुलें ॥१८३॥
हेमाड साईनाथांसी शरण । साईच देतील पुढां जें स्मरण । तेंचि कीं होईल कथानिवेदन । श्रोतीं निजावधान राखावें ॥१८४॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । हंडीवर्णनं  नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥