बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (16:08 IST)

साईसच्चरित - अध्याय ४९

sai satcharitra chapter 49
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
साङ्गोपाङ्ग सद्नुरु स्तवणें । ठकले वेद आणि पुराणें  । तेथें मी अजाण नेणतेपणें । बरें राहणें निवान्त ॥१॥
खरें पाहतां धरावें मौन । हेंच कीं वस्तुत: सद्नुरुस्तवन । परी साईंचे एकेक गुण । पाडिती विस्मरण मौनाचें ॥२॥
धन्य साईंची अगाध लीला । पाहतां निवान्त राहवे न मजला । पव्कान्न गोड लागतां जिव्हेला । मनीं आठवला श्रोतृवृंद ॥३॥
तयांसीही पंक्तीस घ्यावें । जेणें निजरसानंद दुणावे । ऐसें माझिया घेतलें जीवें । तेणें ही रससोये निडारली ॥४॥
मोठें गोड खरें पव्कान्न । पंक्तीं नसतां स्नेही सज्जन । नावडे तें एकतयालागून । फिकें गोडपण तयाचें ॥५॥
साई सकळअवाप्तकाम । साई सकळसंतललाम । साई निजभक्त-विश्रामधाम । दुर्धरभवभ्रमनिवारक ॥६॥
अनिर्वाच्य तयाची लीला । वर्णवेना मम वाणीला । अतर्क्याची अतर्क्य कला । केवीं मजला आकळेल ॥७॥
कल्याणाचें जें कल्याण । तो हा साई निजकृपें जाण । देई निजकर्थचें स्मरण । ग्रंथ हा परिपूर्ण करावया ॥८॥
गाऊं जातां अगाध महिमान । समर्थ कोण कराया कथन । परा जेथें निघे परतोन । पश्यंती मध्यमा कोण कथा ॥९॥
तिघी जेथें नुघाडती वदन । चौथी वैखरी तेथें कोण । हें मी जाणें जरी संपूर्ण । तरी हें मन राहीना ॥१०॥
सद्नुरूचे पायीं न विनटतां । यथार्थ स्वरूप येईना हाता । संत श्रीहरिस्वरूप स्वत: । कृपाहस्ता प्रार्थावें ॥११॥
गुरुचरणाची आवडी । हेचि आपुली सर्वस्वजोडी । संतसहवासाची गोडी । प्रेमपरवडी लागो आम्हां ॥१२॥
जया पूर्ण देहाभिमान । तया न साजे ‘भक्त’ अभिधान । स्वयें जो पूर्ण निरभिमान । खरें भक्तपण त्याअंगीं ॥१३॥
जजया ज्ञातृत्त्वाचा ताठ । श्रेष्ठत्वाचा अभिमान लाठा । केवळ दंभाचा जो वसवटा । तयाची प्रतिष्ठा ती काय ॥१४॥
आपुल्याच गुरुची कीर्ति । अभागी जे प्रेमें न गाती । बधिर नसूनि जे नायकती । ते मंदमति मूर्तिमंत ॥१५॥
तीर्थ व्रत यज्ञ दान । यांहूनि थोर तपाचरण । त्यांहूनि अधिक । हरिभजन । निजगुरुध्यान सर्वाधिक ॥१६॥
साईच त्याचिया भक्तांचें ध्यान । साईच त्यांचें देवदेवतार्चन । साईच त्यांचें गुप्तनिधान । रक्षावें परी अकृपणत्वें ॥१७॥
यद अकदा येई मज आळस । परी न अंतर्यामीं साईंस । विसर पडतां कथानकास । देई मज वेळेस आठवण ॥१८॥
बसूं म्हणतां क्षण निवान्त ।  माझें कांहीं न चले तेथ । कथा ऐसी स्फुरे अकल्पित । लेखणी हातांत घेणें पडे ॥१९॥
ऐसिया त्याच्या अगाध कथा । ऐकवावया त्या निजभक्तां । आणिक माझिया निजस्वार्था । मज या सच्चरिता प्रवर्तविलें ॥२०॥
नाहींतरी संताचिया कथा । ज्याचा तोच रचिता लिहिता । तयाची ती स्फूर्ती नसतां । केवळ नीरसता पदोपदीं ॥२१॥
असो कृपाळू साईनाथ । प्रवेशूनि मन्मनाआंत । करवूनि घेतला आपुला ग्रंथ । माझेही मनोरथ पुरविले ॥२२॥
मुखीं श्रीसाईनामावर्तन । चित्तीं तयाचें वचनचिंतन । मनीं तयाचे मूर्तीचें ध्यान । पूर्ण समाधान येणें मज ॥२३॥
वदनीं श्रीसाईंचें नाम । अंतरीं श्रीसाईंचें प्रेम । ज्याचें साईप्रीत्यर्थ कर्म । ऋणाईत परम त्या साई ॥२४॥
तुटावया संसारबंधन । याहूनि नाहीं अन्य साधन । साईकथा परम पावन । सदा सेवन सुखदायी ॥२५॥
पायीं साईसी प्रदक्षिण । करा श्रवणीं सच्चरितश्रवण । सर्वांगीं द्या प्रेमालिंगन । डोळां घ्या दर्शन साईचें ॥२६॥
साष्टांगीं यावें लोटांगणीं । मस्तक ठेवावें तया चरणीं । जिभा लावावी तन्नामस्मरणीं । नासिकें अवघ्राणीं निर्माल्य ॥२७॥
आतां पूर्वकथानुसंधान । गताध्यायीं श्रोतयांलागून । चमत्कारप्रिय भक्तकथाकथन । कथीन हें वचन दीधलें ॥२८॥
स्वयें न स्वार्थ - परमार्थपरायण । नसतां  संतांचे अधिकाराची जाण । केलिया कोणीं तयांचें वर्णन । अविश्वासी मन जयाचें ॥२९॥
स्नेही कथितां साईंच्या गोष्टी । ऐके परी तो दोषैकद्दष्टी । तया न मिळतां स्वानुभवपुष्टी । कांहीं न सृष्टींत मानी तो ॥३०॥
हरी कानोबा नामाभिधान । स्नेह्यांसवें मुंबईहून । करावया साईंचें परीक्षण । निघाले पर्यटण करावया ॥३१॥
परी साईंची कलाकुसरी । प्रकाशे जो सकळांतरीं । तें लाघव ती नवलपरी । कोण निर्धारीं जाणील ॥३२॥
हरीभाऊ शिरडीस निघतां । करण कळलें साईसमर्था । केवळ चमत्काराचा भोक्ता । तितुकीच पात्रता तयाची ॥३३॥
तितुकीच तया दावी चुणूक । घेई आपुलासा करूनि निष्टंक । तयाच्याही श्रमाचें सार्थक । युक्तिप्रयोजक संत खरे ॥३४॥
कोपरगांवीं स्नेहीसमेत । हरीभाऊ बैसले टांग्यांत । गोदावरींत होऊनि सुस्नात । निघाले शिर्डीप्रत अविलंबें ॥३५॥
येतांच कोपरगांवाहून । हस्तपाद प्रक्षाळून । हरीभाऊ संतावलोकन । करावया जाण निघाले ॥३६॥
पायीं कोरें पादत्राण । माथां जरीचा फेटा बांधून । साईबाबांचें घ्यावया दर्शन । उत्कंठितमन हरिभाऊ ॥३७॥
मग ते येतां मशिदीसी । दुरूनि देखूनियां साईंसी । वाटलें सन्निध जाऊनि त्यांसी । लोटांगणेंसीं वंदावें ॥३८॥
परी पादत्राणांची अडचण । ठेवावया न निर्भयस्थान । तेथेंचि एक कोपरा पाहून । त्यांतचि तीं सारून ठेवियलीं ॥३९॥
मग ते वरती दर्शना गेले । प्रेमें साईंचे चरणां वंदिलें । उदीप्रसाद घेऊनि परतले । वाडयांत निघाले जावया ॥४०॥
पायीं घालूं जातां पायतण । मिळेना पाहतां शोधशोधून । परतले अनवाणी खिन्नवदन । आशा ते सांडून समूळ ॥४१॥
कारण तेथें मंडळी फार । येती जाती वारंवार । पुसावें तरी कोणास साचार । कांहींही विचार सुचेना ॥४२॥
ऐसें तयांचें दुश्चित मन । डोळियांपुढें पादत्राण । चित्तास पादत्राणचिंतन । सर्वानुसंधान पादत्राण ॥४३॥
हौसेसारिखें विकत घेतलें । पादत्राण गेलें हरलवेलं । अर्थात् कोण्या चोरानें चोरिलें । निश्चयें वाटलें तयांस ॥४४॥
असो पुढें केलें स्नान । पूजा नैवेद्यादि सारून । पंक्तीस बैसूनि केलें भोजन । परी न समाधान चित्तास ॥४५॥
सभामंडप साईंचें स्थान । तेथूनि साइंची द्दष्टि चुकवून । कोणी न्यावें माझें पायतण । आश्चर्य लहान हें काय ? ॥४६॥
लागली तयां हुरहुर । चित्त नाहीं अन्नपानावर । मंडळीसमवेत आले बाहेर । आंचवूं कर धुवावया ॥४७॥
इतुक्यांत एक मुलगा मराठा । हरवल्या पादत्राणाचा बाहुटा । लावूनि एका काठीचे शेवटा । पातला त्या ठाया अवचित ॥४८॥
मंडळी जेवूनि आंचवीत । मुलगा आला शोध करीत । म्हणे बाबा मज पाठवीत । काठी ही हातांत देउनी ॥४९॥
“हरी का बेटा जरी का फेटा” । ऐसा पुकार करीत जा बेटा । “याच त्या माझ्या” ऐशिया उत्कंठा । झोंबेल त्या देऊनि टाकाव्या ॥५०॥
परी जो आहे हरी का बेटा । आहे तयाचा जरीचा फेटा । आधीं हें निश्चित झालिया शेवटा । द्याव्या न बोभाटा करावा ॥५१॥
येतां ऐसा पुकार कानीं । ओळखोनि त्या वहाणा नयनीं । हरिभाऊ गेले धांवुनी । साश्चर्य मनीं जाहले ॥५२॥
आनंदाश्रु आले डोळां । हरिभाऊंस गहिंवर दाटला । देखूनि गेलेल्या पायतणाला । चमत्कारला अत्यंत ॥५३॥
म्हणती मुलास ये ये इकडे । पाहूं दे आण वहाणा मजकडे । पाहूनि वदे या तुज कोणीकडे । गिवसल्या रोकडें मज सांग ॥५४॥
मुलगा म्हणे तें मी नेणें । मजला बाबांची आज्ञा मानणें । ‘हरी का बेटा’ असेल तेणें । जरीचा फेटा दावणें मज ॥५५॥
तयासचि मी देईन वहाणा । मज इतराची ओळख पटेना । पटविल जो या बाबांच्या खुणा । तोच या वहाणा घेईल ॥५६॥
“अरे पोरा त्या माझ्याच वहाणा” । हरिभाऊ म्हणतां देईना । मग तो सकळ बाबांचिया खुणा । पटवी मना पोराच्या ॥५७॥
म्हणे पोरा मींच रे हरी । कान्होबाचा बेटा ही वैखरी । सर्वथैव आहे कीं खरी । मज सर्वतोपरी लागतसे ॥५८॥
आतां पाहीं फेटा जरीचा । फिटेल तुझें संशय मनींचा । मग मी ठरेन धनी वहाणांचा । दावा न इतरांचा यावरी ॥५९॥
झाली तेव्हां मुलाची समजूत । वहाणा दिधल्या हरिभाऊप्रत । पुरले तयाचे मनोरथ । साई हे संत अनुभविले ॥६०॥
आहे माझा फेटा जरी । ही काय मोठी नवलपरी । तो तों माझिये मस्तकावरी । सर्वतोपरी द्दश्यमान ॥६१॥
परी मी असतां देशांतरीं । शिर्डीस माझी पहिलीच फेरी । साईबाबांस कैसियेपरी । मन्नास हरि ठाऊक ॥६२॥
कान्होबा हा माझा पिता । कोणीं पाहिला सवरला नसतां । “का” या नामें तया उपलक्षितां । अतिआश्चर्यता वाटली ॥६३॥
पूर्वीं साईसंतमहत्ता । माझे स्नेही मजला सांगतां । अवमानिली मी त्यांची वार्ता । पश्चात्तापता आतां मज ॥६४॥
आतां मज येतां अनुभव । कळला साईबाबांचा प्रभाव । उरला नाहीं संशया ठाव । महानुभाव श्रीसाई ॥६५॥
जया मनीं जैसा भाव । हरिभाऊस तैसाचि अनुभव । संतपरीक्षण लालसास्वभाव । परमार्थ - हाव नाहीं मनीं ॥६६॥
साईसमर्थ महानुभाव । स्नेही सोयरे कथिती अनुभव । आपण स्वयें पहावा नवलाव । शिरडीस जावया कारण हें ॥६७॥
संतचरणीं वहावा जीव । तेणें गिवसावा देवाचा ठाव । मनीं नाहीं यत्किंचित डाव । सरडयाची धांव कोठवरी ॥६८॥
जाऊनियां संताच्या दारा । पाहूं आदरिलें चमत्कारा । तंव जोड पादत्राणाचा कोरा । आला कीं घरा घरपोंच ॥६९॥
नातरी क्षुल्लक पायतण । गेल्यानें काय मोठी नागवण । परी तदर्थ मनाची वणवण । तें सांपडल्यावीण राहेना ॥७०॥
संतप्राप्तीचे मार्ग दोन । एक भक्ति दुजा ज्ञान । ज्ञानमार्गींचे सायास गहन । भक्तीचें साधन सोपारें ॥७१॥
ऐसी सोपी सुलभ भक्ति । तरीही अवघे ती कां न करिती । तिजलाही महद्भाग्य संपत्ति । असतांच तत्प्राप्ति घडतसे ॥७२॥
कोटि जन्मांचें पुण्य असतें । तेव्हांचि संताची गांठी पडते । संतसमागमसौख्य घडतें । तेणेंच विकासते निजभक्ति ॥७३॥
आम्ही सर्व जाणों प्रवृत्ति । तेथेंचि आसक्ति नेणों निवृत्ति । ऐसी जेथें मनाची वृत्ति । ती काय भक्ति म्हणावी ॥७४॥
जैसी जैसी आमुची भक्ति । तैसी तैसी आम्हांसी प्राप्ति । हें तों केव्हांही घडणार निश्चितीं । येथें न भ्रांती तिळमात्र ॥७५॥
विषयभोगार्थ अहर्निशीं । आम्ही जमलों साईपाशीं । या आम्हांतें देणगीही तैसी । परमार्थियासी परमार्थ ॥७६॥
असो आतां आणीक एक । सोमदेवस्वामी नामक । करावया साईंची पारख । पातले प्रत्यक्ष शिरडींत ॥७७॥
सन एकोणीसशें सहा । उत्तरकाशीमाजी पहा । गृहस्थ भेटला भाईजींस हा । पांथस्थनिवहामाजी स्थित ॥७८॥
प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित । भाईजी त्यंचे बंधु विश्रुत । बद्रिकेदारयात्रा करीत । असतां हे भेटत मार्गांत ॥७९॥
बद्रिकेदार मागें टाकिलें । भाईजी मग खालीं उतरले । ठायीं ठायीं विसावे लागले । दिसले बसलेले पांथस्थ ॥८०॥
तयांमाजील एक असामी । तेच हे पुढें हरिद्वाराचे स्वामी । सर्वत्र विश्रुत याच नामीं । लगाले लगामीं बाबांच्या ॥८१॥
त्यांची ही कथा बोधप्रद । बाबांचें स्वरूप करील विशद । श्रवणकर्त्यां देईल मोद । निजानंद सर्वत्रां ॥८२॥
प्रातर्विधीस जातां भाईजी । भेटले मार्गीं हे स्वामीजी । गोष्टी बोलतां बोलतां सहजी । प्रेमराजी प्रकटली ॥८३॥
गंगोत्रीचा अध:प्रदेश । बुवा असतां उत्तरकाशीस । डेहराडूनहून । सत्तर कोस । तेथें हा सहवास जाहला ॥८४॥
लोटा घेऊनि बहिर्दिशेस । निघाले बुवा प्रात:समयास । भाईजीही तया स्थळास । त्याच कार्यास निघाले ॥८५॥
प्रथम उभयतां द्दष्टाद्दष्टी । पुढें मार्गांत परस्पर भेटी । परस्परांच्या कुशल गोष्टी । सुखसंतुष्टी चालल्या ॥८६॥
करूं लागतां विचारपूस । प्रेम आलें परस्परांस  । ठाव ठिकाणा एकमेकांस । पुसावयास लागले ॥८७॥
हरिद्वारीं तुमचा वास । नागपुरीं आम्हां निवास । कधीं जेव्हां त्याबाजूस । येणें झालियास दर्शन द्यावें ॥८८॥
यात्रा करीत याल जेव्हां । पुनीत करावें आमुचे गेहा । पुनर्दर्शन आम्हां घडवा । अल्प सेवा घ्या आमुची ॥८९॥
असूं द्यावें आमुचें स्मरण । लागावे आमुचे घरास चरण । हेंच आमुचें आहे विनवण । पुरवो नारायण ही इच्छा ॥९०॥
एकोणीसशें सहा सालीं । उत्तरकाशीचिया खालीं । परस्परांत हे भाषा बोली । होऊनि गेली इयापरी ॥९१॥
परस्परांचें ठाव ठिकाण । घेतलें उभयतांही पुसून । पाहूनि जवळ आलें मैदान । निघाले सोडून अन्योन्या ॥९२॥
जातां पांच वर्षांचा काळ । येतां साईसमागमवेळ । भाईजींच्या भेटीची तळमळ । लागली प्रबळ स्वामींस ॥९३॥
सन एकोणीसशें अकरा । आले स्वामीजी नागपुरा । तेथें श्रीसाईनाथांचे चरित्रा । परिसतां पवित्रा आनंदले ॥९४॥
देती भाईजी शिफारसपत्र । सुखें गांठावें शिर्डीक्षेत्र । ऐसी योजना ठरवूनि सर्वत्र । सोडिलें नागपुर स्वामींनीं ॥९५॥
उतरतां ते मनमाडावर । कोपरगांवची गाडी तयार । तेथें होऊनि टांग्यांत स्वार । आनंदनिर्भर दर्शना ॥९६॥
कोठेंही जा साधूंचें वर्तन । अथवा त्यांची राहणी - चलन । एकाचें एक एकाचें आन । नसतें समसमान कोठेंही ॥९७॥
एका संताचें आचरण । तें न दुजिया संता प्रमाण । योग्यायोग्यतेचें अनुमान । कराया साधन हे नव्हे ॥९८॥
आधीं जो जाई संतदर्शना । किमर्थ व्हावी हे तया विवंचना । पाहूं जातां तयांचे वर्तना । निजकल्याणा नागवण ॥९९॥
स्वामीजींचे मनाची रचना । तर्क कुतर्क उठती नाना । लांबूनि दिसतां शिर्डीच्या निशाणा । चालल्या कल्पाना स्वामींच्या ॥१००॥
तयांसवें असलेले जन । मशिदीचे कळसाचें निशाण । द्दष्टिपथांत येतां दुरून । करीत वंदन प्रेमानें ॥१०१॥
पुढें घडेल साईदर्शन । म्हणोनि जरी उत्कंठित मन । परी त्यांतें दिसलेलें निशाण । त्याचाही अवमान साहेना ॥१०२॥
निशाणदर्शनें प्रेमस्फुरण । हा तों सर्वत्र अनुभव जाण । हें तों भक्तिप्रेमलक्षण । कांहिंहि विलक्षण येथ नसे ॥१०३॥
परी स्वामींच्या कुत्सितमना । दुरूनि पाहूनियां त्या निशाणा । उठल्या कल्पनांवरी कल्पना । विचित्र रचना मनाची ॥१०४॥
पताकांची आवड मना । ही काय साधुत्वाची कल्पना । देवळावरी लावावें निशाणा । हा तों हीनपणा साधुत्वा ॥१०५॥
साधू मागे एणें माना । ही तों त्याची केवळ लोकेषणा । न येई ऐसियाचें साधुत्व मना । हा तों उणेपणा तयास ॥१०६॥
सारांश जैसा मनाचा ग्रह । साधुनिर्णयीं तैसाच आग्रह । झाला स्वामींच्या मनाचा निग्रह । नको मज अनुग्रह साईंचा ॥१०७॥
उगाच आलों मी येथवर । स्वामींस थोर उपजला अनादर । तेथूनि परतावयाचा निर्धार । केला मग साचार तत्काळ ॥१०८॥
लोकेषणेचा दुरभिमान । साधूस कशास पाहिजे मान । याहूनि मज दुजें अनुमान । निशाण पाहून होईना ॥१०९॥
निशाणें आपुला मोठेपणा । साधु हा आणितो निदर्शना । हाचि संतत्वासी उणेपणा । काय दर्शना जाणें म्यां ॥११०॥
घेतलिया हें ऐसें दर्शन । एणें कैसें निवावें मन । हें तों दंभध्वजप्रदर्शन । समाधान एणें ना ॥१११॥
म्हणती जावें माघारा । आल्या वाटे आपुले घरा । दिसेना हा विचार बरा । फजीत खरा झालों मी ॥११२॥
सहवासी मग म्हणती त्यांसी । इतके दूर आलां कशासी । केवळ निशाणें चित्तवृत्तीसी । खळबळ ऐसी कां झाली ॥११३॥
आतां आपण आलों जवळ । रथ पालखी घोडा सकळ । सरंजाम हा पाहतां निखळ । किती मग तळमळ लागेल ॥११४॥
परिसूनि स्वामी अधिकचि बिघडे । जया नगारे पालख्या घोडे । ऐसे साधु मिजासी बडे । म्यां काय थोडे देखिले ॥११५॥
ऐसे विचार येऊनि अंतरा । सोमदेवजी निघती माघारा । शिरडीचा विचार नाहीं बरा । रस्ता धरा कीं नदीचा ॥११६॥
मग बरोबरील वाटसरू । लागले तयांस आग्रह करूं । आलांत आपण येथवरू । नका हो फिरूं माघारा ॥११७॥
आल्यासारिखे चला कीं पुढें । नका करूं हे तर्क कुडे । हें निशाण जें मशिदीं उडे । साधूकडे ना संबंध ॥११८॥
या साधूस नलगे निशाण । नलगे लोकेषणा नलगे मान । ग्रामस्थांस हें आवडे भूषण । भक्ति प्रमाण कारण या ॥११९॥
पाहूं नक कीं तुम्ही निशाण । जाऊनि घ्या नुसतें दर्शन । राहूं नका तैं एक क्षण । जा कीं परतोन माघारा ॥१२०॥
इतुक्यांत येतां शिरडी जवळ । वाटलें उपदेश ऐकूनि तो सरळ । काढूनि टाकावी मनाची मळमळ । पुनश्च हळहळ नसावी ॥१२१॥
असो श्रीसमर्थदर्शनेंकरून । बुवा गेले विरघळून । प्रेम आलें डोळां भरून । कंठ सद्नदून दाटला ॥१२२॥
चित्त झालें सुप्रसन्न । नयन उल्हासें सुखसंपन्न । कधीं चरणरजस्नान । करीन ऐसें त्यां झालें ॥१२३॥
पहातां रूप तें नेटक । मना नयना पडलें टक । पाहातचि  राहिले टकमक । मोहें अटक पाडिली ॥१२४॥
कुतर्क मनींचे जिराले । चित्त दर्शनानंदीं विरालें । सगुणरूप नयनीं मुरालें । बुवा झाले तल्लीन ॥१२५॥
डोळां देखतां महानुभावा । परम आल्हाद सोमदेवां । आत्मारामा जाहला विसावा । वाटे वसावा हा ठाव ॥१२६॥
दर्शनेंच विकल्प मावळे । बुद्धि ठायींच ताटकळे । दुजेंपण समस्त विरघळे । ऐक्य जाहलें सबाह्य ॥१२७॥
वा़चेसि नि:शब्दत्वें मौन । निमेषोन्मेषरहित नयन । अंतर्बाह्य चैतन्यघन । समाधान समरसे ॥१२८॥
निशाणदर्शनें आधीं मुरडले । पुढें प्रेमोद्रेकें निडारले । सात्त्विक अष्टभावें उभडिले । वेढिले प्रेमें बाबांचे ॥१२९॥
जेथें मन पूर्ण रंगलें । तेंच आपुलें स्थान वहिलें । हे निजगुरूचे बोल आठवले । प्रेम दाटलें बुवांना ॥१३०॥
बुवा हळूहळू पुढें येती । तों तों महाराज रागास चढती । शिव्यांची त्या लाखोली वाहती । तों तों त्यां प्रीति द्विगुणित ॥१३१॥
समर्थ बाबांची करणी अचाट । तयांचा तों विलक्षण घाट । नारसिंहावताराचा थाट । आटोकाट आणिला ॥१३२॥
“थोतांड आमुचें आमुच्यापाशीं । राहो म्हणती चल जा घरासी । खबरदार माझ्या मशिदीसी । जर तूं येशील मागुता ॥१३३॥
जो लावितो मशिदीस निशाण । कशास व्हावें त्याचें दर्शन । हें काय संतांचें लक्षण । येथें न क्षण एक कंठावा” ॥१३४॥
असो पुढें साशंक चित्त । सभामंडपीं स्वामी प्रवेशत । दुरूनि पाहूनि साईंची मूर्त । स्वामींसी निवांत राहवेना ॥१३५॥
हा आपुलेच विचारांचा प्रतिध्वनी । शब्दश: तो आदळतां कानीं । बुवा शरमले स्थानींचे स्थानीं । अंतर्ज्ञानी महाराज ॥१३६॥
किती हो आपण अप्रबुद्ध । किती महाराज तरी प्रबुद्ध । किती त्या माझ्या कल्पना विरुद्ध । किती हें शुद्ध अंतर ॥१३७॥
साई कोणास देती आलिंगन । कोणास करिती हस्तस्पर्शन । कोणास देती आश्वासन । कृपावलोकन कोणास ॥१३८॥
कोणाकडे पाही हास्यवदन । कोणाच्या दु:खाचें करी सांत्वन । कोणास उदीप्रसाददान । करीत समाधान सकलांचें ॥१३९॥
ऐसें असतां मजवरील क्रोध । वाते हा मम वर्तनानुरोध । क्रोध नाहीं हा मजला बोध । होईल मोददायी तो ॥१४०॥
असो पुढें तैसेंच झालें । स्वामी बाबांपाशीं जे रमले । साईकृपें निर्मळ बनले । चरणीं ठेले निरंतर ॥१४१॥
साईभक्तिप्रभववीर्य । विरवो दुर्वासना मात्सर्य । उपजवो शांति - श्री - धैर्य । करो कृतकार्य निजभक्तां ॥१४२॥
गंधर्व यक्ष सुरासुर । इंहीं भरलें हें चराचर । त्या अखिल विश्वीं हा विश्वंभर । जरी निरंतर भरलेला ॥१४३॥
परी न स्वीकारितां आकार । ठाता सदैव निराकार । आम्ही मानव हे साकार । होता न उपकार लवमात्र ॥१४४॥
तात्पर्य धरोनि लीलाविग्रह । साई न करिते लोकसंग्रह । अथवा दुष्टदुर्जनमतनिग्रह । कैंचा अनुग्रह भक्तांवर ॥१४५॥
आला अध्याय संपावयाला । तों एक वृत्तांत मज आठवला । साईसदुपदेशाचा मासला । मानील त्याला हितकारी ॥१४६॥
वृत्तांत आहे अति लहान । स्मरण ठेवी तो कृतकल्याण । म्हणूनि श्रोतयां करितों विनवण । क्षण अंत:करण द्या मज ॥१४७॥
एकदां भक्त म्हाळसापती । नानसाहेब यांसमवेती । बैसले असतां मशिदीप्रती । परिसा चमत्कृति घडली ती ॥१४८॥
समर्थसाई - दर्शनोत्सुक । कोणी एक श्रीमान गृहस्थ । वैजापुनिवासी तेथ । परिवारान्वित पातले ॥१४९॥
पाहूनियां स्त्रियांचा गोषा । नाना संकोचले निज मानसा । स्वयें उठूनि द्यावें अवकाशा । वाटलें संतोषार्थ तयाम्च्या ॥१५०॥
म्हणून नाना उठूं सरती । तंव बाबा तयां वारिती । म्हणाले येणारे येतील वरती । त्वां स्वस्थ चित्तीं बैसावें ॥१५१॥
तेही आलेति दर्शनार्थ । यावें कांहीं नाहीं हरकत । ऐसें तयांस कोणी सुचवीत । येऊनि वंदीत साईंस ॥१५२॥
तयांमाजील एक नारी  । वंदूं जातां बुरखा सारी । पाहूनि सौंदर्यें अति साजिरी । नाना निजअंतरीं मोहिले ॥१५३॥
लोकांसमक्ष पाहण्या चोरी । पाहिल्यावीण राहवेना अंतरीं । वर्तावें काय कैसेपरी । मोहाची उजरी नावरे ॥१५४॥
बाबांची लज्जा मोठी अंतरीं । म्हणोनि मुख तें न करवे वरी । द्दष्टी जाऊं लागली चांचरी । सांपडे कातरीं तंव नाना ॥१५५॥
ही तों नानांची अंत:स्थिति । सर्वातर्यामी बाबा जाणती । इतरां काय तियेची प्रतीती । ते तों झगटती शब्दार्था ॥१५६॥
ऐसी नानांची वृत्ति बावरी । जाणूनि बाबा निजांतरीं । आणावया स्वस्थानीं माघारी । उपदेश जो करीत तो परिसा ॥१५७॥
“नाना किमर्थ गडबड्सी मनीं । ज्याचा निजधर्म तो स्वस्थपणीं । आचरतां आड यावें न कोणी । कांहीं न हानी तयांत ॥१५८॥
ब्रम्हादेव सृष्टी रचिता । आपण तयाचें कौतुक न करितां । व्यर्थ होऊं पाहील रसिकता । ‘बनतां बनेल’ ॥१५९॥
असतां पुढील द्वार उघडें । जावें कां मागील द्वाराकडे । एक शुद्ध अंतर जिकडे । तेथें न सांकडें कांहींही ॥१६०॥
कुढा भाव नाहीं अंतरीं । तयास काय कोणाची चोरी । द्दष्टि द्दष्टीचें कर्तव्य करी । भीड मग येथें धरिसी कां” ॥१६१॥
होते तेथें माधवराव । जात्या जयांचा चिकित्सक स्वभाव । निजजिज्ञासापूर्तीस्तव । पुसती त्यां भाव बोलाचा ॥१६२॥
ऐसें माधवरावें पुसतां । नाना वदले थांब रे आतां । सांगेत बबांचिया मनोगता । वाटेनें जातां वाडियातें ॥१६३॥
संपतां क्षेमकुशल वार्ता । अभिवंदून साईसमर्था । नान निजस्थानासी परततां । निघाले समवेता माधवराव ॥१६४॥
ते नानांस पुसती तात्काळ । नाना ‘बनतां बनतां बनेल’ । आदिकरूनि बाबांचे बोल । स्पष्टार्थ वदाल काय त्यांचा ॥१६५॥
अर्थ सांगावया होईना जीव । बहुत चालली उडवाउडव । तेणें अधिकचि संशयसमुद्भव । होई न माधवमन स्वस्थ ॥१६६॥
मग करूनियाम ह्रदय उघडें । नानांडीं जें घडलें तिकडे । तें साग्र माधवरावाचिया होडे । कथूनि कोडें उलगडिलें ॥१६७॥
काय बाब किती दक्ष । जावो कोणाचें कोठेंही लक्ष । ते तों स्वयें अंत:साक्ष । सर्व प्रत्यक्ष तयांतें ॥१६८॥
ऐसी ही त्रोटक अभिनव वार्ता । परिसतां साश्चर्य होईल श्रोता । पाहूं जातां येथील मथितार्था । स्थैर्य - गंभीरता बहुमोल ॥१६९॥
मन जातीचेंच चंचळ । होऊं न द्यावें उच्छ्टंखळ । होवो इंद्रियांची खळबळ । शरीर उतावीळ होऊं नये ॥१७०॥
इंद्रियांचा नाहीं विश्वास । विषयार्थ व्हावें न लालस । हळू हळू करितां अभ्यास । चांचल्यनिरास होईल ॥१७१॥
होऊं नये इंद्रियाधीन । तींही न सर्वथा राहती दाबून । विधिपूर्वक तयांचें नियमन । करावें पाहून प्रसंत ॥१७२॥
रूप हा तों द्दष्टीचा विषय । सौंदर्य वस्तूचें पहावें निर्भय । तेथें लाजेचें कारण काय । द्यावा न ठाय दुर्बुद्धीतें ॥१७३॥
मन करोनियां निर्वासन । ईशकृतीचें करा निरीक्षण । होईल सहज इंद्रियदमन । विषयसेवनविस्मरण ॥१७४॥
रथ न्यावया इष्टस्थानीं । सारथी जैसा मूळकारणी । तैसी ही बुद्धि हितकारिणी । दक्ष आकर्षणीं इंद्रियांच्या ॥१७५॥
सारथी करी रथनियमन । बुद्धि ही करूनि इंद्रियदमन । जावरी शरीरखैरगमन । अनिवार चंचलपण मनाचें ॥१७६॥
शरीर इंद्रियमनोयुक्त । ऐसिया जीवाचें जें भोक्तृत्व । तें संपतांच वैष्णवपद प्राप्त । ऐसें हें सामर्थ्य बुद्धीचें ॥१७७॥
चक्षुरादि इंद्रियनिचय । भिन्नभिन्न हयस्थानीय । रूपरसादि जे जे विषय । मार्ग ते निरयप्रवर्तक ॥१७८॥
यत्किंचित विषयाभिलाष । करी पारमार्थिक सुखा नाश । म्हणोनि त्यागा तो नि:शेष । तरीच तो मोक्ष तुझ लाघे ॥१७९॥
बाह्येंद्रियें जरी निवृत्त । असतां अंत:करण आसक्त । नाहीं जन्ममरणा अंत । विषय अत्यंत घातुक ॥१८०॥
लाधलिया विवेकी सारथी । विवेकें राखी लगाम हातीं । इंद्रियवाजी कुमार्गवर्ती । स्वप्नींही होती न लवमात्र ॥१८१॥
ऐसा मन:सामाधानपर । निग्रही दक्ष कुशल चतुर । भाग्यें लाधलिया सारथी चतुर । कैंचें दूर विष्णुपद ॥१८२॥
तेंच पद परब्रम्हा । ‘वासुदेव’ अपर नाम । तेंच सर्वोत्कृष्टपद परम । परंधाम परात्पर ॥१८३॥
असो झाला हा अध्याय पुरा । याहून गोड पुढील दुसरा । रिझवील सद्भक्तांच्या अंतरा । श्रवण करा क्रमानें ॥१८४॥
असो शेवटीं जगच्चलक । सद्नुरु जो बुद्धिप्रेरक । तयाचे चरणीं आभारपूर्वक । हेमाड मस्तक अर्पीतसे ॥१८५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । संतपरीक्षण - मनोनिग्रहणं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्याय: संपूर्ण ॥४९॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥