बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (16:09 IST)

साईसच्चरित - अध्याय ५०

sai satcharitra chapter 50
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
जन्मदाते मायतात । यांचिया उपकारा नाहीं अंत । मानवदेह दिधला मजप्रत । उपजलों न जंत त्यां पोटीं ॥१॥
झालों न सळ मातेच्या उदरा । अंध पंगू काणा तोतरा । उपजलों ना मुका बहिरा । जन्मलों पुरा सुपिंड ॥२॥
जयाचे देव वंदी चरण । ऐसा जो उत्तम ब्राम्हाणवर्ण । तेथ मी ईश्वरकृपें अवतीर्ण । जाहलों पूर्ण दैवाचा ॥३॥
जन्मोजन्मीं मातापिता । कोटयनुकोटी जन्म घेतां । परी या जन्ममरणा चुकविता । तयाची दुर्मिळता अनिवार ॥४॥
जन्मदाता तोही पिता । दुजा मौंजीबंधनकर्ता । तिजा अन्नप्रदानें पाळिता । चौथा भयभीता सोडविता ॥५॥
जगीं हे सर्व समसमान । परी कृपाळू सद्नुरुवीण । खरा जनक नाहीं आन । नवलविंदान परिसावें ॥६॥
जननीगर्भीं वार्यनिक्षेपिता । योनिद्वारा जन्मदाता । हा तों केवळ लौकिकी पिता । सद्नुरु जनिता अलौकिक ॥७॥
तो न वेंचितां वीर्याचा कण । नीचयोनिद्वारावीण । देऊनियां निजपुत्रा । जनन । अनुग्रह पूर्ण करवीत ॥८॥
नमो त्या जन्ममरणनिवर्तका । करुणाघना ज्ञानप्रकाशका । वेदगुह्य सच्चित्प्रतिपादका । सर्वव्यापका गुरुवर्या ॥९॥
नमो संसारतमदिनकरा । आत्मानुभवसंतशेखरा । भक्तचित्तचकोरचंद्रा । कल्पतरुवरा गुरुवर्या ॥१०॥
अगाध गुरुरायाचें महिमान । वर्णितां गळे वाचेचा अभिमान । बरें असावें मुकियासमान । खालवोनि मान गुरुचरणीं ॥११॥
पूर्वजन्मीं अनवच्छिन्न । नसतां कोणी तप:संपन्न । होई न तया संतदर्शन । त्रितापनिरसनकारक ॥१२॥
परमार्थ मोक्ष वा निजहित । साधावें ऐसा जयासी हेत । तेणें व्हावें संतांचे अंकित । उणें न यत्किंचित मग तया ॥१३॥
धन्य धन्य सत्संगती । काय वर्णावी तिची महती । तियेपासाव विवेकविरक्ति । परमशांति सद्भक्तां ॥१४॥
साई केवळ चैतन्यमूर्ती । अव्यक्तचि ते आले व्यक्तीं । काय त्यांची निर्विषयस्थिति । कोण निश्चितीं वानील ॥१५॥
भक्त भावार्थी श्रोते प्रेमळ । तयांलागीं तोचि कनवाळ । प्रेमें वदे निजचरित रसाळ । केवळ जें राऊळ तयांचें ॥१६॥
शिरीं जयाचा पडतां कर । अहंभावाचा होई चूर । सोहंभावाचा चाले गजर । आनंदनिर्भर द्दश्यजात ॥१७॥
काय मज पामरा शक्ति । वानावया तयांची कीर्ति । ज्याचा तोच भक्तप्रीतीं । प्रकटवी पोथी कृपेनें ॥१८॥
लोटांगण त्या साईचरणां । अभिवंदन श्रोतृगणां । नमन साधुसंत - सज्जना । प्रेमालिंगन सकळिकां ॥१९॥
सहज लीलेनें वार्ता सांगती । जया गर्भीं संपूर्ण नीती । जयाचें लेणें नित्यशांती । महानुभाव ध्याती ज्या ॥२०॥
सूर्या उपमितां नाहीं सोई । कीं तो सूर्य अस्तास जाई । चंद्रा उपमूं तरी तो क्षयी । सदैव संपूर्ण साई हा ॥२१॥
तया चरणीं हेमाड विनीत । प्रेमें श्रोतयांलागीं विनवीत । परिसा जी कथा श्रद्धायुक्त । दत्तचित्त आवडीनें ॥२२॥
भूमी उत्तम नांगरून । बीज ठेविलें आहे पुरून । परी न वर्षतां तुम्ही कृपाघन । पीक निर्माण होईल का ॥२३॥
पडतां संतकथा कानीं । पातकांची नुरे कहाणी । पुण्यें अंकुरती कथाश्रवणीं । घ्या ह्या पर्वणीचा लाभ ॥२४॥
सलोकतादि चारी मुक्ति । नलगे तेथें आम्हां आसक्ति । जडो त्या साईंची निश्चळ भक्ति । परम प्राप्ति हीच आम्हां ॥२५॥
आम्ही मुळींच नाहीं बद्ध । काय आम्हां मुक्तीचा संबंध । होवो संतभक्तीचा उद्बोध । तेणेंच कीं शुद्ध अंतर ॥२६॥
जेथें न मीतूंपणस्फूर्ति । ऐसी जे कां ‘सहजस्थिति’ । आम्हां व्हाबी ते अभेदभक्ति । हेंचि साईंप्रति मागूं ॥२७॥
आतां श्रोतयां हीच विनंती । वाचूं घेतां ग्रंथ हातीं  ।  वाच्य - वाचन वाचकव्यक्ति । एकात्मस्थिति देखावी ॥२८॥
सोडूनि द्यावें हेमाडपंता । कीं तो  न कर्ता या सच्चरिता । केवळ भक्तांचिया निजहितार्था । कारण निमित्ता तो एक ॥२९॥
दैवें लाधला शिंपा त्यागिती । त्यांचे हातींचें गेलें मोतीं । काय कीजे अश्वत्थोत्पत्ति । व्हावें न स्वार्थीं उदास ॥३०॥
येथें शब्दमात्रा शब्दविता । नाहीं कोणी साईपरता । तोचि श्राव्य श्रवण श्रोता । ही एकात्मता न ढळावी ॥३१॥
ना तरी तें नाहीं वाचन । श्रवणीं सादर नाहीं कान । जेथें न वृत्ति एकतान । पारखी कवण शब्दार्था ॥३२॥
श्रवणीं धरा निरभिमानता । श्रोतेही साईच भावावें चित्ता । तरीच त्या श्रवणाची सार्थकता । अखंड अद्वैतता राखावी ॥३३॥
तेव्हांच सकल इंद्रियप्रवृत्ती । साईरूप होतील निश्चितीं । जळीं जळतंरगस्थिति । ऐसिया वृत्तीं समरसती ॥३४॥
तरीच ज्ञानियां परमार्थबोध । विनोदियांतें विनोदामोद । कविताकोविदां पदप्रबंध । ग्रंथीं या आनंद सर्वत्रां ॥३५॥
असो पूर्वीं या सच्चरितीं । अध्याय एकोनचत्वारिंशतीं । एका निजोत्तम भक्ताप्रती । समर्थ जो करिती उपदेस ॥३६॥
असतां ते भक्त बाबांपाशीं । भगवद्नीता - चतुर्थाध्यायासी । आरंभापासून आवर्तनासी । होते ते समयासी करीत ॥३७॥
एकीकडे चरणसेवा । मुखें हळूच पाठ म्हणावा । म्हणतां संपतां तेहतिसावा । घेतला चौतिसावा म्हणावया ॥३८॥
निश्चळमनें लय लावुनी । म्हणत होते मनींचे मनीं । परी नसतां कळेसें जनीं । असणार कोठुनी काय तरी ॥३९॥
म्हणूं घेतां चौतिसावा । आलें साईनाथांचिया जीवा । आतां येथें अनुग्रह करावा । सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा ॥४०॥
तया भक्ताचें नाम नाना । तंव बाबा म्हणती तयांना । “नाना कायरे पुटपुटसी मना । स्पष्ट रे कां ना वदसी मुखें ॥४१॥
केव्हांपासून मुखानें पाहें । कांहीं पुटपुट चालली आहे । परी आवाज परिस्फुट नोहे । ऐसें हें गुह्य काय कीं रे” ॥४२॥
मग नाना वदती स्पष्ट । करीत आहें गीतेचा पाठ । इतरां न व्हावी कटकट । आहे ही पुटपुट तदर्थ ॥४३॥
असो ती झाली लोकांची गोष्ट । परी मजसाठीं बोल पां स्पष्ट । तुझा तुला तरी कळे कां पाठ । पाहूं दे नीट वदले श्री ॥४४॥
मग ‘तद्विद्धि प्रणिपातेन’ । उच्चस्वरें हा श्लोक म्हणून । दाविला नानांहीं प्रणिपात करून । ऐकतां समाधान बाबांस ॥४५॥
पुढें या श्लोकाचा अर्थ पुसतां । पूर्वाचार्यकथित अर्था । यथासाङ्ग नानांहीं कथितां । बाबांनीं माथा डोलविला ॥४६॥
पुन्हां नानास करिती प्रश्न । ‘उपदेक्ष्यंति ते ज्ञानं’ । नाना पाहीं हा तृतीय चरण । करीं पां मनन तयाचें ॥४७॥
त्यांतील ‘ते’ या अक्षरापाठीं । ‘अ’ कारार्थीं अवग्रहापोटीं । अज्ञानपदें अर्थपरिपाटी । होते का उफराटी पाहीं पां ॥४८॥
शंकरानंद ज्ञानेश्वर । आनंदगिरी आणि श्रीधर । मधुसूदनादि भाष्यकार । करिती ज्ञानपर । जो अर्थ ॥४९॥
तो मान्य आहे जिसा सकळिकां । तैसाच आहे मजही ठावुका । परी अवग्रहें होणारिया कौतुका । जाणूनियां व्यर्थ का मुकावें ॥५०॥
ऐसें म्हणून साई कृपाघन । भक्तचकोरचातकाकारण । वर्षले जे बोधामृतकण । झालें निरूपण पूर्वींच ॥५१॥
परी या साईलीलेचे वाचक । सर्वांसी या अर्थाचें कौतुक । वाटलें नाहीं कांहीं साशंक । राहिले आश्चर्यकारक हें ॥५२॥
असो तयांचें समाधान । जेणें होईल सप्रमाण । असा आणीक अल्प प्रयत्न । करितों ‘अज्ञान’ - समर्थना ॥५३॥
बाबांस कोठील संस्कृत ज्ञान । ऐसीही शंका घेईल कोण । संतां न अनधीत कांहींही जाण । शंकेचें कारण आणीकचि ॥५४॥
अहो ‘एकेन ज्ञातेन । सर्वं हि विज्ञातं भवति’ प्रमाण । कोणा न मान्य हें श्रुतिवचन । तें अपरोक्षज्ञान साईंस ॥५५॥
जैसा करतलस्थित आमलक । तैसें आमूळ विश्व ज्यां देख । तया संतां काय ना ठाऊक । सविताही प्रकाशक ज्यांचेनी ॥५६॥
जयातें हें एक ज्ञान । तयास कोठें उरलें अज्ञान । तया विद्याजात अवगत जाण । महत्त्व कोण संस्कृता ॥५७॥
असो या लीलेचे कांहीं वाचक । म्हणती “नाना अप्रामाणिक । त्यांचा हा स्वकपोलकल्पित अप्रयोजक । अज्ञानव्यंजक अवग्रह ॥५८॥
त्यांनींच रचिलें हे थोतांड । अवग्रहान्वित अज्ञानकांड । उगीच उठविला हा वादवितंड । निजज्ञान अखंड मिरवावया ॥५९॥
नसताचि अवग्रह केला प्रस्थापित । ज्ञानाचे जागीं अज्ञान काढीत । ऐसा कांहीं तरी विपरीत । लावीत ते अर्थ गीतेचा” ॥६०॥
परी पाहतां वस्तुस्थिती । विचार करितां सूक्ष्म चित्तीं । साईलीला एकोनचत्वारिंशतीं । कांहीं न विसंगती कथेंत ॥६१॥
असोत कोणाच्या कांहींही कल्पना । प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना । परी तयांनीं केलेलिया कथना । वृथा वल्गना न म्हणावें ॥६२॥
सोडूनियां नानांचा द्वेष । वाचकीं न होतां विकारवश । दूर सारितां द्दष्टीचे दोष । दिसेल अशेष निर्दोष ॥६३॥
साईलीला उत्तमोत्तम । अध्याय एकोनचत्वारिंसत्तम । वाचिल्यावीण या अध्यायीं निर्गंम । होणार नाहीं सुगमपणें ॥६४॥
भगवद्नीता श्रीकृष्णमुखीं । चतुर्थाध्यायीं ज्ञानमुखीं । चतुस्त्रिंसत्तम श्लोकीं । अज्ञानोन्मुखी प्रवचन ॥६५॥
“तद्विद्धि प्रणिपातेन । परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यंति ते ज्ञानं । ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:” ॥६६॥
हा तो गीतेचा मूळ श्लोक । यांतील तृतीय चरणीं देख । ज्ञानपदाआधीं अवग्रह एक । ‘अज्ञान’ निदर्शक निघतसे ॥६७॥
नाणितां मना अवग्रह । ‘ज्ञान’ हें पद ये नि:संदेह । तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह । तो अर्थ संग्राह्य सर्वत्रां ॥६८॥
‘ज्ञानादेव तु कैवल्यं’ । हें श्रुतिवचन सर्वत्रां मान्य । तरी ज्ञानचि तत्त्वज्ञां उपदेश्य । बंधन हें अनावश्यक त्यां ॥६९॥
मी आत्मा साक्षी निर्मळ । शुद्ध बुद्ध मुक्त केवळ । प्रत्यग्भूत चैतन्य सोज्ज्वळ । अद्वयानंद अढळत्वें ॥७०॥
परंतु मी नव्हे अज्ञान । अज्ञानाचें कार्यही मी न । ‘अयमात्मा ब्रम्हा’ मी जाण । ‘प्रज्ञानमानंद’ निधान मी ॥७१॥
‘अहं ब्रम्हास्मि’ नित्यस्फुरण । शुद्ध ‘विद्या’ ते हेच जाण । मी पापी अभागी दैवहीन । या वृत्तीची खाण ‘अविद्या’ ॥७२॥
या मायेच्या पुरातन शक्ति । एकीचे पायीं बंधस्थिति । दुजीपासव बंधनिर्मुक्ति । या जीवाप्रती अनादि ॥७३॥
नामरूपाचा सकळ भ्रम । हा तों अवघा मायासंभ्रम । अनिर्वचनीय माया परम । मोठी दुर्गम तरावया ॥७४॥
कल्पनेचें जें जें स्फुरण । तेंच मायेचें निवासस्थान । बद्धमुक्त स्थितीचें जनन । कल्पनेमधून निश्चित ॥७५॥
‘ज्ञानादेव तुकैवल्यं’ । अबाधित हें श्रुतिप्रमेय । परी न होतां पापकर्मक्षय । ज्ञानाचा उदय अशक्य ॥७६॥
जया बाणलें शुद्धज्ञान । संकल्पें त्यास त्यागिलें जाण । तया नाहीं मायेचें बंधन । विकारां स्थान तें नव्हे ॥७७॥
शुकासारिखा परमज्ञानी । विकल्पें झाली तयाही हानी । अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी । तें गुरूवांचुनी निरसेना ॥७८॥
प्रवेशतां विकल्प ज्ञानीं । होय ज्ञानियाही अभिमानी । विटे कांजीच्या थेंबें दुधाणी । होतसे घाणी दुग्धाची ॥७९॥
म्हणोनि ‘ अज्ञान’ समजावें आधीं । तन्निरासें मन:शुद्धि । होतांच प्रकटेल ‘ज्ञान’ निरवधि । अभेदसमाधि लाधेल ॥८०॥
जया द्रव्यवैभवध्यान । विषयसेवनीं अतृप्त मन । स्त्रीपुत्रांचें अखंड चिंतन । तयाचें ज्ञान अज्ञानचि ॥८१॥
ऐसा धनसुतदारामोहित । ज्ञानी असतां नेणे निजहित । म्हणोनि जोंवर भक्तीविरहित । अज्ञानावृत ज्ञान त्याचें ॥८२॥
जीवजात अज्ञानयुक्त । अज्ञानांतूनि होऊनि मुक्त । ज्ञानी आणिक ज्ञानातीत । होणें तें निश्चित ब्रम्हारूप ॥८३॥
अज्ञान जातां प्रकटे ज्ञान । क्षमाशाली तो सज्ञान । गेला न जोंवर देहाभिमान । तोंवर तो आधीन प्रकृतीचे ॥८४॥
रामकृष्णादि जे जे अवतार । संतसनकादि शिष्टप्रवर । तयांच्या आज्ञेची प्रकृति किंकर । जियेनें तदितर भुलविले ॥८५॥
ह्रदयस्थ असतां सर्वांभूतीं । कोणी नेणे स्वरूपस्थिति । ऐसी या मायेची अतर्क्य स्थिति । आवरणशक्ति अगाध ॥८६॥
तरी ‘मी कर्ता मीचि भोक्ता’ । सोडिल्यावीण ही खोटी अहंता । तया ह्रदयस्था शरण न रिघतां । निजनिर्मुक्तता लाभेना ॥८७॥
नित्यानित्यवस्तुविवेचन । श्रवणमनननिदिध्यासन । करा व्हा शमदमादिषट्‌कसंपन्न । तेणेंच निवर्तन अज्ञाना ॥८८॥
जग मजहूनि सारें भिन्न । मी तों परिमित परिच्छिन्न । ‘देह तोचि मी’ हें भान । हें तों अज्ञान निर्भेळ ॥८९॥
ज्ञानप्रतिपादक वेदान्तशास्त्र । तेथ अनुबंधचतुष्टय प्रकार । परम कारुणिक भाष्यकार । वर्णिती विस्तारपूर्वक ॥९०॥
‘अधिकारी’ ‘विषय’ ‘संबंध’ तीन । अनुबंध चवथा म्हणजे ‘प्रयोजन’ । प्रयोजनाचें होतां विवेचन । अज्ञाननिवर्तन तैं कळतें ॥९१॥
जीवब्रह्माची जी ऐक्यता । तोच मुख्य ‘विषय’ या  वेदान्ता । त्या ऐक्यप्रमेयांतर्गत जी अज्ञानता । तन्निवर्तता तें ‘प्रयोजन’ ॥९२॥
त्या  मूलाज्ञानाची निवृत्ति । तीच कीं स्वरूपानंदप्राप्ति । म्हणोनि करूनि युक्तिप्रयुक्ति । अज्ञानोच्छित्ति आवश्यक ॥९३॥
जों न भेदाचें निरसन । तों न कोणीही सज्ञान । देहाभिमानियाचें ज्ञान । पूर्ण ‘अज्ञान’ त्या नांव ॥९४॥
स्वयें मिरवी सज्ञान । करी अविहित कर्माचरण । जळो त्याचें जागेपण । तो कुंभकर्ण निद्रिस्त ॥९५॥
वेदबाह्य ज्याचें वर्तन । न करी वर्णाश्रमपरिपालन । तयाच्या चित्तशुडीचें साधन । अविद्यानिरसन हें एक ॥९६॥
सत्त्वादि त्रिगुणत्रिप्रकारें । शब्दादि विषय नानाविकारें । उपस्थ आणि जिव्हाद्वारें । ब्रम्हादि सारे ठकियेले ॥९७॥
जगज्जंगम प्राणिजात । अनादिअविद्यामायापरिवृत । रागद्वेषादि विकारें मोहित । अज्ञानावृत हे सर्व ॥९८॥
अविद्येमाजी जीव बद्ध । त्याचें प्रकटावया रूप शुद्ध । अविद्या-काम-कर्मबंध । तुटला संबंध पाहिजे ॥९९॥
दुग्धें तुडुंब गळती सड । तेथेंच घट्ट चिकटले गोचिड । परी तया अशुद्धीं आवड । दुग्धाची चाड काय तया ॥१००॥
पहा दर्दुर आणि भ्रमर । कमळ सुंदर दोघांचें घर । परी परागीं भ्रमरा विहार । दर्दुरा आहार चिखलाचा ॥१०१॥
सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा । अज्ञानाकडे मूर्खाचा ओढा । अज्ञानचि वाटे ज्ञान मूढा । ज्ञानाचा पाढा काय तया ॥१०२॥
होतां अविद्येचें निर्मूलन । स्वयें प्रकटे ब्रम्हाज्ञान । म्हणूनि अविद्येचें प्रतिपादन । आवश्यक जाण आरंभीं ॥१०३॥
एका ब्रम्हाज्ञानासमान । नाहीं पवित्र त्रिजगीं आन । त्याच्याच उपदेशा अत्यंत मान । त्यावीण जीवन निष्फळ ॥१०४॥
बुद्धयादिकांचा चेष्टाविषय । ब्रम्हा हें असतें ऐसें कार्य । तरी एकादें तरी इंद्रिय । तें हें होयसें दाखवितें ॥१०५॥
ब्रम्हातत्त्व बुद्धिग्राही । ‘बुद्धिग्राह्यमतींद्रिय’ पाहीं । ऐसें स्मृति गर्जतांही । श्रुतीस तें नाहीं संमत ॥१०६॥
बुद्धयादिकांचा झाल्या अभाव । ग्रहणकारणचि झालें वाव । मग ब्रम्हाचा अस्तित्वभाव । उरला न ठाव मानावया ॥१०७॥
करणगोचर जें जें कांहीं । तें तें आहे इतर नाहीं । हें तों सर्वत्र प्रसिद्ध पाहीं । ब्रम्हा कदाही असतां नये ॥१०८॥
ऐसा होईल याचा अर्थ । परी तेणें होईल अनर्थ । सूक्ष्मतारतम्यपरंपरार्थ । बुद्धिही सत् निरंतर ॥१०९॥
होईना कां तिचाही प्रलय । तेथेंही ती वसे सत्प्रत्यय । आत्मा विश्वाचें मूळ नि:संशय । अस्तित्वनिष्ठ लय सर्व ॥११०॥
खडा मारितां घटावरती । आकारविलयें खापर्‍या उरती । घटाकारा जरी निवृत्ति । खापर्‍या अनुवृत्तिदर्शक ॥१११॥
जरी  घटकार्याचा ध्वंस । घटास्तित्वा नाहीं नाश । खापर्‍या कारण अनुवृत्तीस । कार्यास्तित्वांश तेणेंपरी ॥११२॥
शून्यत्वीं ज्याचें पर्यवसान । ऐसें न केव्हांही कार्यप्रविलापन । अस्तित्वनिष्ठ लय हें प्रमाण । सत्‌ - प्रत्ययलीन सद्बुद्धि ॥११३॥
सर्व तीर्थें व्रतें पावन । पावनाहूनि पावन ज्ञान । तया ब्रम्हाज्ञानावांचून । भजनपूजन निरर्थक ॥११४॥
अविद्येनें चित्त मलिन । त्या चित्ताचें मलक्षालन । नाहीं ईशभक्तीवांचून । भक्तीवीण ज्ञान उपजेना ॥११५॥
म्हणूनि आधीं अज्ञान जाण । तयाचा बोध तयाचें निरूपण । होतां होईल तब्दंधनिरसन । भक्तीच प्रमाण तयातें ॥११६॥
पायाळाचे डोळां अंजन । पडतां देखे भूमिगत धन । तेवीं भक्तीचें होतां अवलंबन । अज्ञाननिरसन ज्ञानोदय ॥११७॥
ज्ञान तेंच स्वरूपप्राप्ति । तया मूळ अज्ञाननिवृत्ति । घडल्यावांचूनि ईशभक्ति । मायेची शक्ति अनिवार ॥११८॥
ज्ञानाज्ञानाची भेसळ । अज्ञान वेंचूनि काढावें निखळ । खडे टाकूनि घ्यावे तांदूळ । आधणीं निवळ वैरावया ॥११९॥
भूतीं भगवंत ठायीं ठायीं । ज्ञानयज्ञादि - उपासनांहीं । विश्वतोमुख कृश्णा जो पाही । अज्ञान दाही ज्ञानास्तव ॥१२०॥
आतां ज्ञानयज्ञाचें स्वरूप । “अहं ब्रम्हास्मि” जेथील यूप । पंचमहाभूतें यज्ञमंडप । जीवेश्वरभेद पशु तेथें ॥१२१॥
पंच इंद्रियें पंच प्राण । हेंच यज्ञाचें उपचारभरण । मनबुद्धीचिया कुंडांमधून । प्रदीप्तीकरण ज्ञानाग्नीचें ॥१२२॥
यज्ञकर्ता जीव यजमान । करी अज्ञानघृतावदान । आत्मानंदरसीं निमग्न । अवभृथस्नान जीवा घडे ॥१२३॥
तात्पर्य अज्ञानघृतावांचून । कदा न प्रकटे ज्ञानहुताशन । जीवेश्वरभेदातें जाळून । अभेदज्ञान प्रकट करी ॥१२४॥
स्वच्छ आदर्श मलाच्छादित । वन्हिप्रकाश धूमावृत । तैसें कामक्रोधाभिभूत । अज्ञानें तिरोहित तें ज्ञान ॥१२५॥
चंद्रबिंबा राहु ग्रासी । अथवा शैवाल जैसें जलासी । तैसें स्वयंप्रकाश ज्ञानासी । आच्छादी कैसी ही माया ॥१२६॥
मोठमोठया ज्ञात्यांची मती । भ्रष्ट होऊनि जाती अधोगती । उपाय माहिती परी न तगती । आचरण करिती यथेच्छ ॥१२७॥
डोळस असतां अंध होती । संग सोडूनि नि:संग वर्तती । तेही बळें कुसंगें नाडती । आचरण करिती यथेच्छ ॥१२८॥
वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती । करूं नये तें अचूक करिती । जिया वस्तूची चिळस घेती । तीच स्वीकारिती प्रिय म्हणुनी ॥१२९॥
प्रयत्नें जे पापें चुकविती । तेही अद्दष्टें पापांत पडती । काय म्हणावें ऐसिये स्थिती । ही काय ज्ञाती ज्ञान्याची ॥१३०॥
जरी मोठा ज्ञानी झाला । नेच्छी पापाचे सावलीला । तरी तो कार्याकार्यज्ञतेला । भुले दीपाला पतंगसा ॥१३१॥
पाप करणें हें अज्ञान । याची तया पूर्ण जाण । परी हा काम प्रवृत्तिकारण । करी ना गुमान तयाची ॥१३२॥
हेम अवघें क्रियाजात । केवळ एका कामाचें चेष्टित । काम सर्वानर्थां हेत । तोच कीं परिणत क्रोधरूपें ॥१३३॥
कामगतीस जैं अवरोध । तैंच तो काम होई क्रोध । पदोपदीं हा मोक्षास विरुद्ध । ज्ञानप्रतिबंधक ही वृत्ति ॥१३४॥
कामक्रोध यांचा त्रास । जडलाच आहे या जीवास । ब्रम्हास्वरूपा जवळपास । ज्ञानाचे पंक्तीस वास यांचा ॥१३५॥
पाण्यावाचूनि बुडवितात । अग्नीवांचूनि जाळितात । शस्त्रावांचूनि मारतात । दोरावीण करितात बंधन ॥१३६॥
तयांपुढें ज्ञानीही न टिकत । ज्ञानियां करिती पैजेनें चित । महाप्रलय करण्याचें सामर्थ्य । नकळतां ग्रासीत प्राणिया ॥१३७॥
चंदनाचे वृक्षामुळीं । जैसीं काळसर्पाचीं वेटोळीं । तैसीं कामक्रोधांची खोळी । वरूनि वेटोळी ज्ञानगर्भा ॥१३८॥
इंद्रियें बुद्धि आणि मन । हीं त्या कामाचें आयतन । तयांच्या योगें जीवाचें ज्ञान । झांकूनि मोहन घाली तया ॥१३९॥
जरी तुम्हां पाहिजे चंदन । तरी सर्पाचें करा कंदन । कामक्रोधांचें सारूनि आवरण । साधावें निधान ज्ञानाचें ॥१४०॥
न करितां सर्पाचें कंदन । लाभेल काय कवणा चंदन । कृष्णसर्प संहारिल्यावीण । पुरलेलें धन लाभेल कां ॥१४१॥
तैसें परतत्त्व आत्मज्ञान । तें पदरीं पडावया कारण । प्रकृतिजवनिका - निस्सारण । हें एकचि साधन तदर्थ ॥१४२॥
म्हणोनि आधीं इंद्रियनियमन । तेणें काम - क्रोधां निर्दळण । जीव कामक्रोधांआधीन । अज्ञान आवरण ज्ञानास ॥१४३॥
देहाहूनि इंद्रियें सूक्ष्म । मन तयांहूनि सूक्ष्म परम । बुद्धि मनाहूनही सूक्ष्मतम । बुद्धीहूनि सूक्ष्म परमात्मा ॥१४४॥
सर्वसंसारधर्मवर्जित । ऐसें हें परात्पर परम सत । तो हा परमात्मा परमहित । तेंच अमृत निजरूप ॥१४५॥
शुद्ध बुद्ध नित्य मुक्त । तेंच तत्त्व अभेदस्थित । तेंच परमानंदभूत । प्रत्यग्भूत चैतन्यातें ॥१४६॥
जया नाम पंचीकरण । तेंच कीं मायारूपदर्शन । अध्यारोपापवादैकसाधन । व्हावया प्रबोधन तयाचें ॥१४७॥
अपंचीकृत पंचमहाभूतें । पंचतन्मात्रा वदती ज्यांतें । तत्कार्य प्राणेंद्रियमनोबुद्धीतें । ‘सूक्ष्म’ - शरीरता येते आत्मयाची ॥१४८॥
पहा पंचीकृत पंचभूतें । तेथूनि विराट उदया येतें । तया आत्म्याचे ‘स्थूल’ देहातें । ‘विराट’ ज्ञाते वद्तात ॥१४९॥
स्थूल - सूक्ष्म - शरीरां कारण । केवळ स्वस्वरूपाज्ञान । तेंच साभास ‘अव्याकृत’ जाण । शरीर ‘कारण’ आत्म्याचें ॥१५०॥

हें कारणशरीर रव्यात । जें चैतन्यप्रतिबिंबयुत । केवलाज्ञाना कारणभूत । अव्याकृत अव्यक्त ज्या नाम ॥१५१॥
आत्म्याचें अज्ञान तें या कारण । ना निरवयव ना सावयव ना उभय जाण । केवळ ब्रम्हात्मैकत्वज्ञान । तेणेंच कीं निरसन या देहा ॥१५२॥
स्वस्वरूपीं अवस्थान । तयासीच ‘मोक्ष’ अभिधान । यावीण मोक्ष नाहीं आन । स्वरूपावस्थान तो मोक्ष ॥१५३॥
केवल ब्रम्हात्मैकत्व - ज्ञान । जाहल्या होईल अज्ञाननिरसन । म्हणूनि अज्ञान समजावया जाण । तयाचें निरूपण आवश्यक ॥१५४॥
अविद्येनें शबल झालें । तेणें ब्रम्हा शबलत्व आलें । तया ‘सत’ हें नाम ठेविलें । ऐसें तें पावलें वाच्यत्व ॥१५५॥
जरी अतींद्रिय मूळचें वहिलें । ‘बुद्धिग्राह्य’ वाचेनें केलें । तेव्हांच तें मनीं प्रविष्टलें । आकारा आलें  ॐ कारें ॥१५६॥
या ॐ कारब्रम्हाचें ध्यान । सवें करितां ईश्वरस्मरण । होई जयाचें देहावसान । पावे जनन सार्थक ॥१५७॥
असो या वाच्य - ब्रम्हापासाव । अव्यक्ताचा प्रादुर्भाव । अव्यक्तापासूनि महतत्तत्त्व । उपजे अहंभाव त्यापोटीं ॥१५८॥
पंचतन्मात्रा अहंकारीं । पंचमहाभूतें त्यामाझारीं । पंचमहाभूतांचिया उदरीं । जग विर्धारीं जन्मलें ॥१५९॥
अविद्यामायारूपदर्शन । तेंच या जगाचें रूपलक्षण । या अविद्येचें कराया निरसन । अज्ञानविवेचन आवश्यक ॥१६०॥
अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ । जें चिन्मात्र स्वरूप केवळ । त्याहूनि वेगळें जें तें ‘शबल’ । दोघांची भेसळ करितां न ये ॥१६१॥
लक्ष्य ब्रम्हा जाणा निराळें । वाच्याहून तें अत्यंत निराळें । म्हणून हीं अज्ञानाचीं पडळें । उपदेशबळें सारावीं ॥१६२॥
निद्रेमाजी पडतां स्वप्न । डोळे नसतां डोळस मन । स्वयें देखे अखिल त्रिभुवन । अविद्याकारण या सर्वां ॥१६३॥
पाहूं जातां वस्तु एक । परी आभासे ती आणिक । रज्जु भासे सर्प देख । रजत शुक्तिके - गर्भांत ॥१६४॥
पहा सूर्याचे किरण केवळ । जन म्हणे तया ‘मृगजळ’ । परी हा केवळ मायेचा खेळ । ज्ञानीही हतबळ इजपुढें ॥१६५॥
पेटलेलें कोलीत हातीं । जेव्हां कोणी गरगर फिरविती । अग्निकंकण द्दष्टोत्पत्तीं । येतें ही ख्याती मायेची ॥१६६॥
पाहूं जातां अग्नि खरा । अलातचक्रा नाहीं थारा । तैसाच हा मायामोहपसारा । नसतिया संसारा उत्पादी ॥१६७॥
ऐसिया निर्धारें गेलिया भ्रम । संसार तेव्हांच पावे उपरम । मी देह माझें कलत्र धाम । व्यर्थ परिश्रम हा सारा ॥१६८॥
पुत्रपश्वादि तृष्णापाशा । इंहीं वेष्टिले जाऊनि अशेष । म्हणविती ज्ञानी पंडितेश । सुख न लवलेश गांठीस ॥१६९॥
शास्त्रकुशल प्रज्ञावान । दुजा नाहीं आपणासमान । अंतरीं मोठा हा अभिमान । असमाधानकारक ॥१७०॥
हेच माया वा अज्ञान । अथवा अविद्या - प्रकृतिप्रधान । आरंभीं ज्ञानी यांचेंच निरसन । करितां मग ज्ञान उपतिष्ठे ॥१७१॥
ज्ञान हें तों स्वयंप्रकाश । करणें नलगे याचा उपदेश । अज्ञानाचा होतां निरास । ज्ञानोल्लास प्रकटेल ॥१७२॥
तेज:पुंज एकादें रत्न । जातां केरा - मातींत दाटून । गेलीं वर्षांचीं वर्षें लोटून । बुजालें स्मरण तयाचें ॥१७३॥
कर्मधसंयोगप्राप्ती । कदाकाळीं लागतां हातीं । वाटे हरपली समूळ दीप्ती  । दगडमातीसंगतीं ॥१७४॥
पुढें तें स्वच्छ घासतां । वरील काटमाती जातां । पावे तें पूर्वील तेज:पुंजता । तैसीच अवस्था ज्ञानाची ॥१७५॥
माती - काट तें अज्ञान । याच अज्ञानें आवृत ज्ञान । करितां काट - मातीचें निरसन । उजळेल रत्न सहजेंच ॥१७६॥
पापकर्मविनाशक । नित्यानित्यवस्तुविवेक । तोचि सत्त्वशुद्धिप्रदायक । तोचि उत्पादक ज्ञानाचा ॥१७७॥
हें जग मायेचा बाजार । खर्‍या नकली वस्तु अपार । खर्‍या म्हणूनि नकली घेणार । ऐसें गिर्‍हाईक फार तेथें ॥१७८॥
तरी निवडावी कैसी नकली । भल्याभल्यांची बुद्धि थकली । जिये लक्षणीं आणावी भुली । तीं तंव समजलीं पाहिजेत ॥१७९॥
म्हणोनि सवें लागे पारखी । नकली कां दिसे खर्‍यासारखी । हे तो दावील देखादेखीं । जाईल शेखीं अज्ञान ॥१८०॥
अज्ञान जातां राहील ज्ञान । होईल सहजचि मायानिरसन । उरेल तीचि सद्वस्तू जाण । नलगे प्रमाण प्रत्यक्षा ॥१८१॥
सोज्ज्वल जरी बुद्धीचे डोळे । कल्पनातिमिरें असती झांकोळले । हें तिमिर उपदेशें पळे । उरे जें सगळें तें ज्ञान ॥१८२॥
वस्तुत: जरी मार्गीं माळ । द्दष्टी देखतां सांजवेळ । माळ असतां भासला व्याळ । अज्ञानपडळ कारण त्या ॥१८३॥
खिशामाजील गुप्त दीप । उजळितां झाला अज्ञानलोप । प्रकट झालें खरें स्वरूप । व्यालत्व आपाप मावळलें ॥१८४॥
म्हणोनि अज्ञानाचा अपाय । घालवावया उपदेश उपाय । तदर्थ ज्ञानीं झिजवोनि काय । अज्ञान तें काय उपदेशिती ॥१८५॥
असतां प्रपंचीं वर्तमान । प्रसंगें प्रारब्धें जें आपन्न । तें भूतकार्य अज्ञानजन्य । आधीं हें ज्ञान आवश्यक ॥१८६॥
‘सत्यं ज्ञानमनंतं ब्रम्हा ।’ अविद्या माया सकळ भ्रम । या जैं होईल उपरम । तैंच संभ्रम ज्ञानाचा ॥१८७॥
ज्याचा गेला न देहाभिमान । तयासी कोण म्हणे सज्ञान । अभिमानाचेम अधिष्ठान । त्या नांव अज्ञान मूर्तिमंत ॥१८८॥
जयास म्हणती मायेचा पूर । जयामाजी हें जगत चूर । तो हा देखत भूलसंसार । अज्ञान मूलाधार तयास ॥१८९॥
अज्ञानापासाव याचा उद्भव । अज्ञानजनित याचें वैभव । एकत्वीं जो अनेकत्वभाव । तयाचा ठाव अज्ञान ॥१९०॥
किंचित् प्रकाश किंचिदंधार । ऐसिया समयीं मार्गींचा दोर । दोरचि असतां भासे विखार । भय अपार वाटतसे ॥१९१॥
सर्पाभास केवळ अज्ञान । त्या अज्ञानें झांकिलें ज्ञान । न होतां हें अज्ञाननिरसन । होईना मन निर्भय ॥१९२॥
कोणास भासे सुमनमाळा । कोणास दिसे दंड डोळां । एवंच हा भासचि सगळा । भ्रांतीच्या अवकळा अनिवार ॥१९३॥
केवळ आगमवचनानुसारी । जो आस्तिक्यश्रद्धानुकारी । तोच ब्रम्हाज्ञानाधिकारी । नास्तिक जन्मजन्मांतरीं नेणेच ॥१९४॥
विश्व हें विपरीतदर्शियां भ्रम । त्यांचा न फिटे जन्ममरणक्रम । ब्रम्हातत्त्व तयां जें दुर्गम । तें अत्यंत सुगम अधिकारियां ॥१९५॥
येथें न कामीं येई प्रवचन । अथवा अनेक वेदस्वीकरण । अथवा न मेधा ग्रंथार्थधारण । ग्रंथावलोकन बहुश्रुतता ॥१९६॥
शब्दें होईल शब्दज्ञान । तेणें कां होईल वस्तुविज्ञान । बुद्धि अतिविवेकसंपन्न । वस्तु न तदधीन केव्हांही ॥१९७॥
श्रुतींनीं मोठी बांधिली हाव । परी न लाधतां वस्तूचा ठाव । परतल्या ऐसें वस्तूचें वैभव । खुंटली धांव जाणिवेची ॥१९८॥
षडदर्शनें टेकीस आलीं ॥ अद्यापि वादच करीत राहिलीं । आत्मवस्तु ठायींच ठेली । शब्दा न आकळली केव्हांही ॥१९९॥
झाले मोठे शब्दपंडित । वस्तुसूर्यापुढें खद्योत । एकदां झालिया वस्तु प्राप्त । मावळे समस्त शब्दजाल ॥२००॥
जगीं पहा अंधारे रातीं । दीपप्रकाशें क्रिया चालती । परी सूर्योदय होतां प्रभातीं । उपेक्षिती दीपातें ॥२०१॥
तरी जें नव्हे वाचेचा विषय । होईल कैसें तरी उपदेश्य । म्हणोनि अज्ञाननिरसन ध्येय । असावें आख्येय वक्त्यातें ॥२०२॥
एक अस्तित्वबुद्धया उपासन । तेणेंच आत्मा होऊनि प्रसन्न । करी निजतत्त्वभाव - प्रकाशन । होई उपलभ्यमान उपासकां ॥२०३॥
आत्म्याचे ठायीं परमात्मध्यान । दोन्हीमाजी अभेदानुसंधान । येणेंपरी करितां उपासन । आत्माचि प्रसन्न उपासकां ॥२०४॥
तयां नाहीं अन्य साधन । तेणेंचि व्हावें लागे प्रसन्न । साधक पाहूनि आत्मप्रवण । आत्मा त्या आपणचि करी कृपा ॥२०५॥
होतां ग्रंथाची विषयसमाप्ति । वक्ते श्रोतयां सदैव प्रार्थिती । श्रवणश्रमार्थ क्षमा मागती । ही शिष्टरीति सर्वत्र ॥२०६॥
तैसें नव्हे या सच्चरितीं । कर्तृत्व याचें न माझे माथीं । स्वयें साईच निजकथा लिहविती । लेखणी मज हातीं देऊन ॥२०७॥
म्हणूनि नव्हे मी ग्रंथकर्ता । येथें न श्रांत कोणी मजकरितां । क्षमा कीजे श्रोतीं म्हणतां । आदळे माथां कर्तृत्व ॥२०८॥
मज नाहीं येथें भूषण । किंवा नातळे अंगा दुषण । जेथें साईच कर्ता आपण । तयाचेनि संपूर्ण हा विषय ॥२०९॥
घेऊनि साईंचें अनुज्ञापन । केलें त्यांनीं जैसें कथन । तैसें तैसें मीं केलें लेखन । अज्ञानविवेचन श्रवणार्थ ॥२१०॥
प्रकट कराया निजवैभव । आपुला प्रताप आपुला गौरव । प्रवेशोनि मजमाजी स्वयमेव । विषयार्थ गुरुदेव प्रकाशी ॥२११॥
देईल जो या ग्रंथा दूषण । अथवा त्याचें मानी जो भूषण । ते दोघे मज वंद्य पूर्ण । निजनारायणस्वरूप ॥२१२॥
भक्ताचिया परमहिता । स्वयें निर्मोनि निजचरिता । हेमाडाचिया धरोनि हाता । कथा लिहविता श्रीसाई ॥२१३॥
जयाचा शरीरपरिग्रह । केवळ करावया लोकानुग्रह । खंडावया कुतर्क दुराग्रह । लोकसंग्रह रक्षावया ॥२१४॥
म्हणोनि हेमाड तया चरणीं । अनन्यभावें येई लोटांगणीं । पुढील रसाळ कथांच्या श्रवणीं । व्हावें श्रोतृगणीं सावचित्त ॥२१५॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अज्ञाननिरसनं नाम पंचाशत्तमोऽध्याय: संपूर्ण ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥