सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (09:45 IST)

कोजागरी पौर्णिमा माहिती, महत्त्व आणि पूजा विधी

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. या रात्री औषधींचे सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असे सांगितले जाते. 
 
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.
 
धार्मिक महत्तव
मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली. तसेच साक्षात लक्ष्मीदेवी या रात्री चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत जागरण करणार्‍यावर प्रसन्न होते. 
 
लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगीतली आहे.
 
द्वापार युगात वृंदावनमध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात, अशी मान्यता आहे.
 
आरोग्यशास्त्र दृष्ट्या महत्त्व
या दिवशी चंद्र प्रकाशात मसाला दूध किंवा खीर ठेवतात. यात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे मानले जाते. 
 
अस्थमा, दमा असणाऱ्याकरीता ही रात्र अत्यंत उपयोगी समजली जाते. या रात्री दम्याचे औषध खीरीत मिसळून चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. आजारी व्यक्तीद्वारे पहाटे 4 वाजता खिरीचा प्रसाद ग्रहण केले जाते. रोग्याला संपुर्ण रात्र जागरण करावे लागते. औषध ग्रहण केल्यावर 2 कि.मी. चालणे आरोग्याकरता लाभदायक ठरते. 
 
पूजा ‍विधी
शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. 
 
या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.
 
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.
 
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।
 
दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
 
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात.