Bail Pola 2022 कधी आहे बैल पोळा अमावस्या 2022, महत्व आणि पूजन विधि
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात.
पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांते तुपाने किंवा हळदीने शेकले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.
बैल पोळ्याचे महत्त्व
बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
कुठे- कुठे साजरा केला जातो बैलपोळा सण
बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रात येथील शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. पोळा अमावस्येला ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.
बैल पोळा पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.