शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (12:41 IST)

Nag Panchami 2021 नागपंचमी शुभ वेळ, पूजा विधी, मंत्र, नियम व कथा

नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.
 
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या वर्षी, पंचमीची तारीख 12 ऑगस्ट रोजी दुपारी 03.24 पासून सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी सकाळी 1.42 पर्यंत राहील. आचार्यांच्या मते नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ 13 ऑगस्ट रोजी सकाळी 5:49 ते सकाळी 8.28 पर्यंत असेल.

नागपंचमी पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्मांहून निवृत्त व्हावे.
अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे.
पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी.
त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी.
नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा.
या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

नागपंचमी मंत्र
या दिवशी अष्टनागांच्या या मंत्राचा जप केला पाहिजे.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनंजयौ ॥
एतेऽभयं प्रयच्छन्ति प्राणिनां प्राणजीविनाम् ॥
 
नागपंचमीचे नियम
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.
 
कहाणी नागपंचमीची
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
 
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!
 
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.
 
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.