मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:31 IST)

एशियन चॅम्पियनशिप कुस्तीसाठी पाच मराठमोळ्या मल्लांची निवड!

asian-championship
औंध :(मनामा) बहारीन येथे 2 जुलै ते 10 जुलै अखेर होणाऱ्या 15 आणि 20 वर्षाच्या आतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पाच युवा मराठमोळ्या मल्लांची निवड झाली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकावण्यासाठी हे नवीन उमदे मल्ल सज्ज झाले आहेत. त्यांच्या कामगिरीकडे तमाम कुस्तीशौकिनांच्या नजरा लागल्या आहेत. लखनऊ (उत्तर प्रदेश) व सोनिपत (हरियाणा) येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली.
 
15 वर्षा आतील मुलींच्या संघात 36 किलो वजनगटात श्रावणी लवटे (कोल्हापूर) हिची निवड झाली आहे. श्रावणी दोनवडे (कोल्हापूर) येथे प्रशिक्षक संदीप पाटील यांच्याकडे सराव करते. 15 वर्षाच्या आतील मुलांच्या संघात कोकण विभागातून प्रथमच ग्रीको रोमन प्रकारात 52 किलो वजनी गटात प्रणय चौधरी ( ठाणे जिल्हा ) याने अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आणि भारतीय संघातील आपली स्थान निश्चित केले. प्रणय रुस्तम-ए- हिंद, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांच्याकडे सराव करीत आहे .
 
57 किलो गटात कुस्तीपंढरीच्या तुषार तुकाराम पाटील सरस ठरला. तुषार (कांदिवली मुंबई ) येथे प्रशिक्षक अमोल यादव व अजय सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.६२ किलो फ्री स्टाईल वजनगटात तनिष्क कदम (पुणे) याची निवड झाली आहे. तनिष्क पुणे येथे विजय बराटे यांच्याकडे सराव करीत आहे. 20 वर्षा आतील निवड चाचणी मध्ये 125 किलो आतील खुल्या गटात सोलापूरचा बिलवा मल्ल महेंद्र गायकवाड भारी ठरला. महेंद्र अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो .निवड झालेले मल्ल बहरीन येथे होणाऱ्या 15 व 20 वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी मल्ल आणि त्यांचे प्रशिक्षक यांचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, परिषदेचे पदाधिकारी, कुस्तीशौकिन यांनी अभिनंदन केले आहे.
उत्तर भारतीय मल्लांना चोख उत्तर
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीत हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यातील मल्लांचा वरचष्मा असतो. यावेळी महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा मल्लांनी उत्तर भारतीय मल्लांचे आव्हान मोडीत काढून तब्बल पाच जागावर वर्चस्व प्रस्थापित केले. उत्तर भारतीय मल्लांना चोख उत्तर दिल्याने युवा मल्लांचे सर्वत्र कौतुक होत आहे.