बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (15:02 IST)

निखत, नीतू, स्विटी आणि लवलिनाः भारताच्या महिला बॉक्सर्सनी सुवर्णाक्षरांनी असा लिहिला इतिहास

12 व्या वर्षी निखत झरिन निजामाबादमध्ये एका अँथलेटिक्स स्पर्धेसाठी गेली होती. तेव्हा ती सर्वांत लहान वयाची धावपटू होती आणि ती अथलेटिक्समधील इतर खेळांत सहभागी होत असे.बॉक्सिंगशिवाय इतर खेळांत तिनं सहभाग घेतला खरा, पण तिचं लक्ष एका गोष्टीवर गेलं. ते म्हणजे बॉक्सिंग. तिनं आपल्या वडिलांवा विचारलं, बॉक्सिंग फक्त मुलंच खेळतात का?...
 
या प्रश्नापासून तिचा बॉक्सिंगप्रवास सुरू झाला.
 
गेल्या रविवारी म्हणजे 26 मार्च 2023 रोजी दिल्लीमधील इंदिरा गांधी क्रीडासंकुलात निखतने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं.
 
याच स्पर्धेत तीन इतर महिला बॉक्सर्सनी सुवर्णपदकं मिळवली. निखतने व्हीएतनामच्या थी टाम हिला 5-0 असं पराभूत केलं.
 
सलग दुसऱ्या वर्षी निखतने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे.
 
त्याचबरोबर लवलिना बोरगोहाईनं 75 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करला पराभूत करुन पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवलं.
 
तत्पुर्वी नीतू घनघसने 48 किलो वजनी गटात आणि स्वीटी बुराने 81 किलो गटात सुवर्णपदक मिळवलं. याबरोबरच या खेळाडूंना 82.7 लाख रुपयांचा धनादेशही बक्षीस रुपात मिळाला.
 
याबद्दल बोलताना भारतीय मुष्टियोद्धा संघाचे अध्यक्ष अजय सिंह म्हणाले, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे. गेला काही काळ सातत्याने आपण चांगला खेळ करत आहोत. आज जो आत्मविश्वास पाहायला मिळाला तो यापूर्वी कधीही पाहायला मिळाल नाही. काही खेळाडूंनी राऊंड गमावल्यावरही शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष सुरू ठेवला होता.”
 
भविष्यात खेळाडूंकडून आणखी चांगल्या खेळाची अपेक्षा करताना ते म्हणाले, ज्या खेळाडूंना सध्या जिंकता आलं नाही त्यांच्यामध्ये आगामी काळात वर्ल्ड चॅँपियन होण्याची क्षमता आहे. यातीलच काही खेळाडू ऑलिंपिक आणि जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी होतील.”
 
2006मध्येही असेच यश
2006 साली भारत प्रथमच जागतिक बॉक्सिंग चॅँपियनशिपचं यजमानपद भूषवत होता. तेव्हा 46 किलो वजनी गटात मेरी कोम, 52 किलोत सरिता देवी, 63 किलोत जेनी आरएल आणि 75 किलो वजनी गटात लेखा कोसीने सुवर्णपदकं मिळवली होती.
 
भारतीय महिला बॉक्सर्सनी जागतिक स्तरावर चमकण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
त्यानंतर एमसी मेरी कोम सहावेळा वर्ल्ड् चॅम्पियन झाली. तिच्या यशामुळे भारतात महिला बॉक्सिंग लोकप्रिय झालं.
2012 च्या लंडन ऑलिपिंकमध्ये पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा खेळ म्हणून समावेश झाला. त्या ऑलिपिंकमध्ये मेरी कोमने कांस्यपदकही मिळवलं.
 
परंतु त्यानंतर या प्रवासात अडथळेही आले. 2012च्या डिसेंबरमध्ये निवड प्रक्रियेतील अनियमिततेबद्दल तक्रारी झाल्यावर जागतिक बॉक्सिंग संघाने भारतीय संघाची मान्यता रद्द केली. त्यानंतर 4 वर्षांनी खेळण्यासाठी संघ पुन्हा तयार व्हायला चार वर्षं गेली.
 
या काळात भारतीय बॉक्सर्सचं भविष्य अधांतरीच होतं. भारतात देश स्तरावर स्पर्धांचं आयोजन होत नव्हतं आणि इंटरनॅशनल स्पर्धांत ते भारतीय ध्वजाखाली खेळू शकत नव्हते.
 
2016 साली नवा आधार
2016 साली स्पाइस जेट विमानकंपनीचे संस्थापक आणि सीईओ अजय सिंह यांच्या नेतृत्वात भारतीय बॉक्सिंग संघाची नव्याने निर्मिती झाली. त्यानंतरच भारतीय बॉक्सर्सच्या करियरची गाडी रुळावर आली.
 
अजय सिंह यांच्या नेतृत्वात संघामध्ये पायाभूत सोयी अधिक चांगल्या झाल्या तसंच एक व्यावसायिक दृष्टिकोन विकसित झाला. राज्य आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिपची सुरुवात झाली.
त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं युग सुरू झालं.
 
भारतीय बॉक्सर्सना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ मिळू लागला. बॉक्सर्सना अधिकाधिक संधी मिळू लागली आणि परदेशात शिबिरांचे आयोजन होऊ लागलं.
 
थोडीशी मदत मिळाल्यावर आपण काय करू शकतो हे महिला बॉक्सर्स दाखवून देऊ लागल्या.
 
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर
बॉक्सिंगमध्ये जागतिक क्रमवारीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे,
 
अमेरिका, तुर्कस्थान, क्युबा, ब्रिटन आणि आयर्लंड यासारख्या बॉक्सिंगमध्ये दबदबा असणाऱ्या देशांपेक्षा ही चांगली कामगिरी आहे.
 
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने बॉक्सर्सचा मोठा संघ पाठवला त्यात 5 पुरुष आणि 4 महिला खेळाडू होत्या.
 
त्यात 69 किलोग्राम गटात लवलिना बोरगोहाईने भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला बॉक्सर्सनी उत्कृष्ठ खेळ करुन दाखवला.
 
2022मध्ये महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला तीन पदकं मिळाली. निखत, मनिषा मौन आणि प्रवीण हु़ड्डा यांनी ही पदकं मिळवली होती.
 
भारताला यजमानपद
यावर्षी भारताकडे यजमानपद होतं आणि देशांतर्गत प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी खेळाडूंना मिळाली होती. तसंच जवळपास 100 कोटी रुपयांची बक्षीसही पणाला लावली होती.
 
भारताने सर्व 12 प्रकारांत आपला एकेक खेळाडू उतरवला होता.
 
संघ निवड़ीवरुन झालेला वाद, रशिया आणि बेलारुसला खेळण्याची संधी दिली म्हणून 11 देशांनी घातलेला बहिष्कार आणि या स्पर्धेला ऑलिंपिक पात्रता दर्जा न मिळणं या गोष्टी भारतीय खेळाडूंच्या खेळासमोर फिक्या ठरल्या.
 
दोनवेळा जागतिक युवा चॅम्पियनशिप जिंकणारी नीतू घनघस भिवानीची आहे.
 
तिने 2022मध्ये राष्ट्रकूल खेळात सुवर्णपदक जिंकलं होतं. 2023च्या बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीच्या तीन लढती तर तिनं अशा जिंकल्या की रेफरीना मॅच थांबवावी लागली.
 
सेमी फायनलमध्ये तिच्यासमोर अलुअ बल्किबेकोवा होती. तिनं गेल्या वर्षी नीतूला पराभूत केलं होतं.
 
त्याचा बदला नीतूने 3-2 असा घेतला आणि अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्सैईकानला 5-0 असे पराभूत केलं.
 
या विजयानंतर नीतू म्हणाली, गेल्यावर्षीही मी पदक जिंकू शकले नव्हते त्यामुळे मी उणिवा दूर करण्यासाठी काम केलं आणि भारतीय प्रेक्षकांसमोर खेळून पदक मिळवलं.
 
स्वीटी बुरा आणि लवलिना बोरहोगाई
स्वीटी बुराला 9 वर्षांनंतंर सुवर्णपदक मिळलां आहे. 2014मध्ये सिटी चॅम्पिअनशिपमध्ये तिनं रजत पदक मिळवलं होतं.
 
कोरोनाच्या काळात ती बॉक्सिंग सोडून कबड्डी खेळण्याच्या विचारात होती. परंतु बॉक्सिंगपासून काही महिने दूर राहिल्यावर बॉक्सिंगवरच आपलं जास्त प्रेम असल्याचं तिच्या लक्षात आलं. सुवर्णपदकासाठी तिनं वँग लीना ला पराभूत केलं.
 
बुरा सांगते, जागतिक चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण होणं रोमांचकारक आहे. लढत चांगली झाली. मी माझ्या ठरलेल्या योजनेप्रमाणे खेळले, स्पर्धा रंगत गेली तसा माझा खेळा चांगला होत गेला, शरीरानंही योग्य साथ दिली.
लवलिनाचचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. ऑलिपिंकमध्ये तिनं कांस्य पदक जिंकलं होतं आणि 2018 आणि 2019 मधील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तिनं कांस्य पदकं मिळवली होती.
 
ऑलिपिंकनतंर 2022च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रिमिअर क्वार्टर राऊंडच्या पुढे जाऊ शकली नव्हती. तसेच बर्मिंगहॅम राष्ट्रकूल खेळातही तिचा प्रवास क्वार्टर फायनलमध्येच थांबला होता.
 
लवलिनाने यावेळेस जास्त वजनी गटात उतरण्याचा निर्णय घेतला आणि चांगला खेळ केला. ते तितकसं सोपं नव्हतं. अंतिम सामन्यात तर एक राऊंड गमावूनही तिनं पुन्हा खेळ सावरला.
 
सामना जिंकल्यावर ती म्हणाली, “माझी स्पर्धा मजबूत अशा बॉक्सर्सशी होती. त्यानुसार आम्ही रणनिती ठरवली होती. पहिले दोन राऊंड आक्रमक खेळ केल्यानंतर शेवटच्या राऊंडमध्ये प्रतिहल्ल्यावर लक्ष द्यायचं होतं. 2018 आणि 2019मध्य़े मी कांस्यपदक जिंकलं होतं. आता पदकाचा रंग बदललेला पाहून बरं वाटतंय.”
 
निखतचं आव्हान आणि तो प्रश्न
निखत झरिनने वजनी गट बदलला आणि 50 किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. याच गटातून ती आता पॅरिस ऑलिपिंकमध्ये सहभागी होऊ शकते.
 
गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकूल खेळात सुवर्णपदक जिंकल्यावर सर्वांचं लक्ष निखतवर होतं. मात्र तिच्यासमोर अनेक आव्हानं होती.
 
एकतर तिने वजनी गट बदलला होता. तसेच तिला 12 दिवसांत 6 सामने खेळायचे होते.
करिअरच्या सुरुवातीला ती थोडी मेरी कोमच्या छायेत होती मात्र मिळालेल्या संधीचा फायदा घेणं तिनं शिकून घेतलं आहे.
 
आक्रमकपणे बॉक्सिंग करणारी निखत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलीय
 
नगुएमविरोधात झालेल्या सामन्यातील दुसऱ्या राऊंडमध्ये तिच्या ओठाला जखम झाली, वेदनाही होत्या.
 
सामन्यानंतर ती म्हणाली, "वरच्या ओठातून रक्त येत होतं. अशावेळेस डॉक्टरांना बोलावून काही वेळ खेळ थांबवतात. पण मला कोणतीही जोखिम पत्करायची नव्हती. मी आणखी जोर लावला. चल निखत, तू करू शकतेस, जोर लाव असं मी स्वतःशीच म्हटलं. शेवटपर्यंत श्वास टिकवत खेळायचं होतं त्यामुळे जास्त जोर लावला."
 
अंतिम सामन्यातही निखतने चांगला खेळ केला आणि सुवर्णपदक मिळवलंच
 
अनेक वर्षांपूर्वी तिनं आपल्या वडिलांना जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तिनेच अधिक चांगल्याप्रकारे दिलं, असं म्हणावं लागेल.
 
Published By- Priya Dixit