शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (20:42 IST)

रुद्रांक्ष पाटील : बर्फाच्या गोळ्याची आवड त्याला 19व्या वर्षीच शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनपर्यंत घेऊन गेली

ANI
“मला शूटिंग बाबतीत काहीच माहिती नव्हतं. रेंज वरती गेल्यानंतर मला इतका बोरिंग वाटला गेम...”
रुद्रांक्ष पाटील नेमबाजीतल्या आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी हे सांगतो, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.कारण वयाची विशी गाठण्याआधीच ठाण्याच्या या मुलानं नेमबाजीचं एक सर्वोच्च शिखर सर केलं आहे. ते शिखर म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप अर्थात जागतिक नेमबाजी स्पर्धेचं सुवर्णपदक.
 
10 मीटर एयर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजीचा उगवता तारा म्हणून रुद्रांक्षकडे पाहिलं जातंय. सातत्यपूर्ण खेळ, अभ्यासू वृत्ती ही त्याची ओळख बनली आहे.
 
एकेकाळी बर्फाचा गोळा खायला मिळेल म्हणून शूटिंग रेंजवर जायला तयार होणारा रुद्रांक्ष आता ‘नेमबाजी माझी ‘लाईफस्टाईल’ झाली आहे’, असं सांगतो. पण हा टप्पा त्यानं कसा गाठला? ही त्याचीच कहाणी आहे.
 
महाराष्ट्राचा वर्ल्ड चॅम्पियन
14 ऑक्टोबर 2022, कैरो. जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल नेमबाजीची फायनल. रुद्रांक्ष पाटील आणि इटलीचा डॅनियल डेनिस सोलाझ्झो यांच्यातील सुवर्णपदकाच्या लढाईतला हा निर्णायक क्षण पाहा.
 
नेमबाजीत केवळ ‘परफेक्ट टेन’ असा लक्ष्यवेध साधून चालत नाही, तर त्यातही तुम्ही किती अचूक आहात हे मोजलं जातं.
 
तर त्या निर्णायक क्षणाला सोलाझ्झो पुढे होता आणि त्यानं 10.7 असा लक्ष्यवेध केला. साहजिकच इटालियन चाहत्यांनी जल्लोष केला पण त्या गोंगाटातही रुद्रांक्षनं 10.8 असा लक्ष्यवेध साधला.
 
आता जल्लोष करण्याची वेळ भारतीय चाहत्यांची होती. पुढच्या दोन-अडीच मिनिटांत रुद्रांक्षनं सोलाझ्झोला मान वर काढू दिली नाही आणि सुवर्णपदक पटकावलं.
10 मीटर एयर रायफल नेमबाजीत त्याआधी भारताकडून केवळ अभिनव बिंद्रानं 2006 साली झाग्रेबमध्ये अशी कामगिरी बजावली होती. म्हणजे नेमबाजीच्या या प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला रुद्रांक्ष केवळ दुसराच भारतीय ठरला.
 
विजयानंतर त्याचं सेलिब्रेशनही खूप काही सांगून गेलं. एकीकडे त्याचे भारतीय टीममेट्स टाळ्या वाजवत होते.
 
पण रुद्रांक्षच्या चेहऱ्यावर केवळ एक स्मितहास्य उमटलं, त्यानं आपली साईट आणि रायफल बाजूला ठेवली. प्रतिस्पर्ध्यांना शेकहँड केलं.
 
रुद्रांक्ष सांगतो, “खरं म्हणजे इतका काळ मी स्वतःच्या भावना दडवून ठेवल्या होत्या, की त्या क्षणाला त्या बाहेर आल्याच नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलो याचा आनंद आहेच, पण मला याचा जास्त आनंद होतो की मी स्वतःला इतकं नकारात्मक स्थितीतून बाहेर काढलं.”
 
पण या स्पर्धेआधी त्याला बरीच अडथळ्‌यांची शर्यतही पार करावी लागली होती.
रुद्रांक्ष सांगतो, “माझ्या तिन्ही गन्स मी जर्मनीतून जाऊन घेऊन आलो होतो स्पॉन्सर्सच्या खर्चातून. तिन्हीच्या तिन्ही मॅचच्या आधी खराब झाल्या होत्या.”
 
राष्ट्रीय स्पर्धा तेव्हा तोंडावर आली होती. मग तिन्ही गनमधले चांगलं काम करणारे पार्ट काढून त्यानं नवीन गन बनवली आणि ट्रेनिंग सुरू केलं. गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकही मिळवलं. पण कैरोला पोहोचल्यावर नवी समस्या उभी राहिली.
 
“शेवटच्या दिवशी माझी प्रॅक्टिस नेहमीसारखी खराब झाली. तर मला कळलं की गनचा एक स्क्रू लूज होता होता. मी स्वतःला पुश केलं परत ते पुश करता करता मला तिकडे गोल्ड आलं.”
 
रुद्रांक्ष नेमबाजीत भारताचा एकूण सहावा आणि 10 मीटर एयर रायफल प्रकारातला दुसराच वर्ल्ड चॅम्पियन ठरला.
 
जागतिक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून रुद्रांक्षनं 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा एक कोटाही निश्चित केला आहे.
 
गोळा खाण्यासाठी नेमबाजी
रुद्रांक्ष ठाण्यात लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील बाळासाहेब पाटील आयपीएस अधिकारी आहेत आणि पालघरमध्ये एसपी पदावर आहेत. तर आई हेमांगिनी नवी मुंबईत डेप्युटी आरटीओ पदावर आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच रुद्रांक्ष खेळाकडे वळला.
 
हेमांगिनी सांगतात, “मला स्वतःलाच खेळाची आवड आहे त्यामुळे मी ठरवलंच होतं की माझ्या दोन मुलांपैकी एखादा खेळात असावा.”
 
“मलाही स्वतःला आवड होती शूटिंगची त्यामुळे आम्ही ठरवलंच की मग ह्या गेम कडे वळायला हरकत नाही. तर मी त्याला कॅंपला त्या ठिकाणी घेऊन गेले तेव्हा तो जेमतेम चौथी का पाचवीलाच होता.”
 
सुरुवातीला रुद्रांक्षला नेमबाजी बिल्कुल आवडली नव्हती.
 
“मला शूटिंग बाबतीत काहीच माहिती नव्हतं. मला वाटलं ते पेंटबॉलसारखं शूटिंग आहे- असं इकडे तिकडे जाऊन एकमेकांना मारायच आहे. तिकडे रेंज वरती गेल्यानंतर मला इतका बोरिंग वाटला गेम. मी तर लगेच समर कँप झाल्यावर शूटिंग सोडून दिलं होतं. कोचने परत बोलवल्यावर मी परत तिकडे जायला लागलो.”
 
“फूडी असल्यामुळे मला रोज गोळा खायची इच्छा व्हायची. जेव्हा मी तिकडे ट्रेनिंग करायला जायचो तेव्हा मला सांगितले जायचे तू ट्रेनिंग केल्यावर तिकडे गोळा खाऊ शकतोस. पुढे जसजशी मेडल्स भेटत गेल्यावर माझा ऑटोमॅटिकली इंटरेस्ट वाढत गेला खेळामध्ये.”
 
विलेपार्ले इथे नेमबाजी प्रशिक्षण देणाऱ्या स्नेहल पापलकर कदम यांचा रुद्रांक्षच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याकडेच रुद्रांक्षनं आधी नेमबाजीचे धडे गिरवले.
 
स्नेहल सांगतात, “रुद्रांक्षच्या खेळात आणि खेळाविषयी दृष्टीकोनात मोठा फरक पडत गेला. त्याच्यात चांगली कामगिरी करण्याची स्वयंप्रेरणा विकसित होत गेली.
 
“रुद्रांक्ष कधी कुणाला नाही म्हणत नाही. सातत्य, चिकाटी आणि मेहनत हे त्याचे सर्वोत्तम गुण आहेत.”
 
या खेळात यशस्वी होण्यासाठी उत्तम तंत्र, संयम आणि वेळ महत्त्वाचा असतो असंही त्या नमूद करतात.
 
ठाण्यातच सरावाचा निर्णय
रुद्रांक्षला या गुणांसोबतच आईवडिलांचा विश्वास आणि पाठिंबाही लाभला आहे. रुद्रांक्षची प्रगती पाहता, प्रवासात जाणारा त्याचा वेळ वाचवण्यासाठी आईवडिलांनी एक मोठा निर्णय घेतला.
 
हेमांगिनी सांगतात, “ तो नववीतून दहावीत गेला, तेव्हा विलेपार्ले इथे स्नेहल मॅडम यांच्याकडेच प्रॅक्टिस करत होता. ठाण्यातून तिथे जायला दीड पावणे दोन तास आणि परत यायला दीड पावणे दोन तास, हे नववीत असताना आम्ही अनुभवलं होतं.”
 
इलेक्ट्रॉनिक लेनसाठी जेवढे पैसे लागणार होते, ते मोजल्यावर रेंजची फी वगैरे धरून येणारा खर्च दोन अडीच वर्षांत भरून निघेल, असं त्यांच्या लक्षात आलं.
 
त्यांनी मग ठाण्यातल्या मेजर सुभाष गावंड शूटिंग रेंजमध्येच सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे रुद्रांक्ष प्रशिक्षक अजित पाटील यांच्यासोबत सराव करू लागला.
अर्थात केवळ सगळ्या सुविधा मिळाल्या म्हणून कोणी मोठा खेळाडू बनत नाही, हे अजित पाटील नमूद करतात.
 
“तसं पाहिलं तर सुरुवातीच्या टप्प्यावर, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर पोहोचेपर्यंत कुठल्या सुविधा आहेत यानं फरक पडत नाही. रेंज कशी आहे, यापेक्षाही नेमबाजाचं तंत्र किती उत्तम आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. तुम्ही तंत्र जितकं सुधारता तितकं पुढे जाता.”
 
“रुद्रांक्ष सध्या ज्या शूटिंग रेंजवर सराव करतो, ती अजूनही तेवढी अत्याधुनिक किंवा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही. नेमबाज स्वतःला शूटिंगच्या किती जवळ नेतो आहे, हे महत्त्वाचं आहे.”
 
मनाची ताकद महत्त्वाची
पाटील सरांनी आधी कोल्हापुरात तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांसारख्या अव्वल नेमबाजांनाही ट्रेनिंग दिलं होतं. ते सांगतात की या खेळात मनाची कणखरता अतिशय महत्त्वाची असते.
 
याच मनाच्या ताकदीच्या जोरावर रुद्रांक्षनं राष्ट्रीय आणि ज्युनियर पातळीवर यश मिळवलं, 2022 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला, भारतासाठी ऑलिंपिक कोटा मिळवला आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही गाठलं.
 
मग 2023 साली कैरोत त्यानं वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन सुवर्ण तर भोपाळमधल्या विश्वचषकात दोन कांस्यपदकांची कमाई केली.
नेमबाजी हे आता रुद्रांक्षचं विश्व बनलं आहे, पण त्यापलीकडे त्याला कुटुंबियांसोबत वेळ घालवायला, इतर खेळातल्या खेळाडूंविषयी वाचायला आवडतं. तो वेगवेगळे खाद्यपदार्थही बनवून पाहातो.
 
“मी घरच्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करतो. आम्ही फिरायला जातो, वेगळ्या वेगळ्या हॉटेलला खायला जातो पिक्चर बघायला जातो.”
 
मिशन पॅरिस 2024
रुद्रांक्ष आता 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी तयारी करतो आहे. 10 मीटर एयर रायफलमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप पाठोपाठ आणि ऑलिंपिक सुवर्ण जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राचा आदर्श त्याच्यासमोर आहे.
 
रुद्रांक्षच्या आईवडिलांनी आणि प्रशिक्षकांनी मात्र त्याच्यावर कुठलंच अपेक्षांचं ओझं टाकायचं नाही, असं ठरवलं आहे.
 
त्याच्या पहिल्या प्रशिक्षक स्नेहल पापलकर कदम सांगतात, “मला वाटतं की रुद्रांक्षमधल्या नेमबाजाला जणू मी जन्म दिला आहे. एक आई आपल्या मुलाकडून काहीच अपेक्षा करत नाही. त्यानं नेहमीच माझ्या अपेक्षेच्या पलिकडचं यश मिळवून दाखवलं आहे. आता तो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो आहे, तर साहजिकच देशाला त्याच्याकडून अपेक्षा असतील. मला खात्री आहे की तो भारताची मान अभिमानानं उंचावेल.”
स्वतः रुद्रांक्षला जाणीव आहे की ही वाट सोपी नाही. तो सांगतो, “वर्ल्ड चॅम्पियनशिप आता झाली. आता महत्त्वाची गोष्ट ही की पुढच्या वर्षी माझा कसा फॉर्म येतोय.
 
“आजा माझा परफॉर्मन्स चांगला झाला तर याचा अर्थ आहे की मी बरोबर करतोय. जर नाही झाला, तर त्याचा अर्थ आहे की मी काहीतरी चुकीचं करतोय. मी शोधायचा प्रयत्न करतो की मी काय चुकीचं करतो आहे, त्याच्यात मी कशी सुधारणा करू शकतो आहे.”
 
तो खेळाशी किती एकरूप झाला आहे? रुद्रांक्ष सांगतो, “माझ्यासाठी नेमबाजी आता लाईफस्टाईल सारखी झाली आहे. मला आवडतं म्हणून करतो मी शूटिंग केवळ कर्तव्य म्हणून, कोणी सांगितलं म्हणून करत नाही.
 
"तुम्ही एक व्यक्ती म्हणून या प्रवासाचा आनंद कसा लुटू शकता, ते महत्त्वाचं आहे.”
 




















 
 
 
 
Published By- Priya Dixit