सर्वोत्तम खेळापासून मी दूर नाही - सायना नेहवाल
गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी पुनरागमन करणे अशक्य होते. तो काळ माझ्यासाठी अवघड होता. दरम्यानच्या काळात खेळातील काही बाबींचा मला विसर पडला. पूर्वीसारखा खेळ होण्यासाठी अजून काही काळ लागेल, पण मला खात्री आहे की, सर्वोत्तम खेळ होण्यापासून मी आता फार दूर नाही, अशा शब्दांत सायना नेहवालने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
इंगेज ४ मोअरच्या वतीने आयोजित इल्डवाईस ब्रेन आऊट मधील एका कार्यक्रमादरम्यान सायनाने स्पष्ट केले की, अलीकडच्या काही सामन्यांत तिला निसटते पराभव पत्करायला लागले. काही वेळा तर तिसर्या गेममध्ये मी अठरा गुणांपर्यंत मजल मारली होती. जेव्हा तुम्ही दुखापतीनंतर कोर्टवर येता तेव्हा तुमच्या मनात दुखापतीचा विचार असतो. मी त्याला अपवाद नाही. त्याविषयी आमचा विचार सुरू आहे. सायनाच्या मते एखाद्या स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले तर पूर्वीप्रमाणे ती पुन्हा स्पर्धा जिंकू शकेल. जिंकण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची आहे, असे तिला वाटते. अलीकडच्या काळात पाठोपाठ स्पर्धा असल्यामुळे तंदुरुस्तीवर परिणाम होतो असे सायनाने सांगितले. सध्या ती जागतिक क्रमवारीचा विचार करणार नसून जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विजयी होण्याचा निर्धार सायनाने केला आहे.