मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:10 IST)

सायना, सिंधू यांना पहिल्या फेरीत बाय

येत्या 21 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल महिला खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे ही स्पर्धा होणार आहे.
 
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडची साब्रिना जॅकेट आणि युक्रेनची नताल्या व्होल्तसेख यांच्यातील विजयी खेळाडूशी झुंज द्यावी लागेल. तर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूसमोर कोरियाची किम हो मिन्ह आणि इजिप्तची हादिया होस्नी यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान असेल.
 
दोन सुपर सेरीज स्पर्धा जिंकणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतसमोर सलामीच्या फेरीत रशियाच्या सर्गेई सिरांतचे आव्हान आहे. तसेच सिंगापूर स्पर्धेत पहिले सुपर सेरीज विजेतेपद पटकावणाऱ्या बी. साई प्रणीथला पहिल्या फेरीत हॉंगकॉंगच्या वेई नानशी लढत द्यावी लागेल. साई प्रणीथला या स्पर्धेत 15वे मानांकन देण्यात आले आहे.
 
राष्ट्रीय महिला विजेत्या ऋतुपर्णा दाससमोर सलामीला फिनलंडच्या आयरी मिकेलाचे आव्हान आहे. तसेच तन्वी लाडला पहिल्या फेरीत इंग्लंडच्या च्लो बिर्चशी लढत द्यावी लागणार आहे. भारताचा आणखी एक गुणवान खेळाडू अजय जयरामसमोर सलामीच्या फेरीत ऑस्ट्रियाच्या लुका रॅबरचे आव्हान आहे. तर समीर वर्माला पहिल्या फेरीत स्पेनच्या पाब्लो ऍबियनशी झुंज द्यावी लागेल.