बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (23:30 IST)

टोकियो ऑलिंपिक डायरी - न आलेलं वादळ, उन्हाचा तडाखा आणि पदकांची आशा

जान्हवी मुळे
येईल, येईल म्हणता म्हणता, टोकियोत वादळ काही आलं नाही. पाऊस पडला, पण पडला म्हणजे फक्त भुरभुरला. एवढ्याशा पावसातही टोकियोवासी सकाळी सकाळी छत्री, रेनकोट वगैरे घेऊनच बाहेर पडले होते. दिवसभर वारा होता आणि ढगाळ आकाश होतं, हा जरा दुहेरी दिलासा. एकतर कडक उन्हाचा तडाखा त्रास देतोच आणि दुसरं म्हणजे अशा तीव्र प्रकाशात कॅमेऱ्यानं चांगले शॉट्स घेता येत नाहीत.
मला माझ्या गावच्या पावसाळी हवेची आठवण मात्र झाली. बाकी आपल्याकडे असा हवामानखात्याचा अंदाज चुकला, की लगेच थट्टा केली जाते. तो अंदाजच असतो फक्त, तरीही.
 
इथे मात्र हवामानाच्या चुकलेल्या अंदाजावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. जपानमध्ये हे दिवस उन्हाळ्याचे आहेत त्यामुळे तापमान जरा जास्त आहे. त्यात हा बेटांनी बनलेला देश आहे, त्यामुळे इथे हवेत आर्द्रताही जास्त आहे.
 
साधारण मुंबईसारखं हवामान आहे म्हणा ना. म्हणजे मुंबईत होते तशी चिकचिक होत नाही, पण तरी डोकं तापेल एवढं गरम होतं. त्यात हे शहर दाटीवाटीनं वसलेलं आणि सगळीकडे काँक्रिटचे थर. त्यामुळे इथे उष्णता शोषून घेतील अशा हिरव्या जागाही कमी आहेत. अशी शहरं म्हणजे 'हीट आयलंड' बनतात. म्हणजे तापमान वाढलं की इथे उष्णता साठून राहते. साधारण तीस डिग्रीवरचं तापमान हे एरवी तसं सहन होण्यासारखं आहे. पण या उन्हात खेळणं अनेक खेळाडूंसाठी त्रासाचं बनलं आहे. विशेषतः टेनिससारख्या टर्फवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये हा त्रास नेहमीचा आहे. खेळाडूंना उष्माघात होऊ नये म्हणून टेनिसमध्ये विशेष ब्रेक घेण्याची सोय आता करण्यात आली आहे, ज्या वेळेचा वापर खेळाडू शॉवर घेण्यासाठीही करतात. इथेही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे उपाय केलेले दिसतायत. बहुतांश इनडोर हॉल्समध्ये एअर कंडिशनर आहेत. अर्थात त्यामुळे हॉलबाहेरच्या हवेत उष्णता वाढतेच. बाकी काही ठिकाणी खेळाडू पोर्टेबल एअर कंडिशनर, आईस क्यूब्ज, ओले टॉवेल्स वगैरेंचा आधारही घेताना दिसतायत. पत्रकारांना मात्र अशा सुविधा फारशा नसतात. त्यामुळे जिथे जायचं, तिथे टोपी, स्कार्फ, पाण्याची बाटली अशा गोष्टी जवळ ठेवायच्या हा माझा नियमच झाला आहे. कोण कुठून आलंय, यानंही उन्हाचा किती त्रास होतो यात फरक पडलेला दिसतो. म्हणजे परवा रेंजवर युरोपातून आलेले लोक धापा टाकतायत, आणि मी बिनधास्त फिरते आहे असं चित्र होतं. उन्हापेक्षाही सध्या न मिळालेल्या आणि हातून निसटलेल्या पदकांचा त्रास सध्या जास्त होतो आहे. पण थंड हवेच्या शिडकाव्यासारखं यश मिळेल अशी आशाही वाटते आहे