शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 27 जुलै 2021 (18:21 IST)

ऑलिंपिक : किती वजन उचलायचं हे गणित चुकलं आणि मल्लेश्वरीचं गोल्ड मेडल हुकलं…

ऋजुता लुकतुके
भारतासाठी ऑलिम्पिक मेडलचा इतिहास बघितला तर प्रत्येक मेडलची कहाणी ही प्रतिकूलतेवर कशी मात केली याची कहाणी आहे आणि त्यातच कर्णम मल्लेश्वरीचा जमाना ऑलिम्पिक खेळायला मिळालं तरी धन्यता मानावी असा होता.
 
मेडलची अपेक्षा स्वत: खेळाडूही ठेवायचे नाहीत आणि कोच तर अनेकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणून या स्पर्धांकडे बघायचे.
 
त्यातच 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये मल्लेश्वरीचं वजन वाढल्यामुळे तिला 54 किलोंवरून थेट 69 किलो वजनी गटात खेळावं लागलं. यामुळे तिच्यावर ऑलिम्पिकपूर्वी तंदुरुस्तीची काळजी न घेतल्याचे आरोपही झाले. तिच्या मॅचवर फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.
इतकं की, सिडनीमध्ये हजर असलेल्या 42 भारतीय पत्रकारांपैकी फक्त चारच मल्लेश्वरीच्या मॅचसाठी हजर राहिले. पण, उरलेल्यांनी फायनलचा थरारक शेवट मिस केला म्हणावं लागेल. कारण, मल्लेश्वरी आणि गोल्ड विजेत्या विनिंग लिन यांच्यात अंतर होतं फक्त अडीच किलो वजनाचं... तेव्हा नेमकं काय झालं होतं?
 
कर्णम मल्लेश्वरीची ऑलिम्पिक तयारी
आधी मल्लेश्वरी ज्या काळात वेटलिफ्टिंग खेळत होती तो काळही समजून घेतला पाहिजे. आता सिंधू, मेरी कोम यांना स्पर्धा आणि सरावादरम्यान चांगल्या सुविधा मिळतात. पण, तेव्हा ती परिस्थिती नव्हती.
 
एकतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूला वैयक्तिक क्रीडाप्रकारात मेडल मिळणं दुरापास्त. यापूर्वी फक्त खाशाबा जाधव आणि लिअँडर पेस यांनी ही किमया करून दाखवली होती.
 
क्रिकेट खेरीज इतर खेळाडूंभोवती वलयही नव्हतं. त्यामुळे क्रिकेटर सोडून इतर खेळाडू अक्षरश: तुमच्या आमच्यासारखे बस आणि ट्रेनने प्रवास करायचे.
 
जेव्हा सिडनीत हजर असलेल्या पत्रकारांनीही तिच्या मॅचला दांडी मारली
महिलांच्या वेटलिफ्टिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यापूर्वीच मल्लेश्वरीचा काळ उलटून गेला असं सगळ्यांना वाटत होतं. तिचं वय तेव्हा होतं 25 वर्षं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन गोल्डसह सलग चार मेडल जिंकली असली तरी तिचं शेवटचं मेडल होतं 1996चं आणि तेही 54 किलो वजनी गटात मिळवलेलं.
 
नंतर सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगचा समावेश होईपर्यंत तिचं वजन वाढलं होतं.
 
ती मेडलच्या जवळ जाईल असंही प्रत्यक्ष सिडनीमध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांना वाटलं नाही बहुतेक. कारण, तिच्या फायनल मॅचसाठी ऑलिम्पिक कव्हर करायला गेलेल्यांपैकी 38 पत्रकार चक्क गैरहजर राहिले.
पण, तो दिवस मल्लेश्वरीचा होता. तशी मल्लेश्वरीची शरीरयष्ठी खेळाडूला शोभणारी नाही. पण, तिच्यात भरपूर अंगमेहनतीची तयारी आणि आव्हान पेलण्याची जिद्द होती.
 
आताही मैदानाबाहेर घडणाऱ्या गोष्टींशी तिचं देणंघेणं नव्हतं. तिचं लक्ष मेडलसाठी स्नॅच आणि जर्क मिळून किती वजन उचलावं लागेल याकडे होतं. पण, वजनाच्या या गणितानेच तिचा घात केला.
 
वजनाचं गणित चुकलं नसतं तर गोल्ड मिळालं असतं…!
आधी स्नॅच प्रकार होता. मल्लेश्वरीची टक्कर चीनची विनिंग लिन आणि हंगेरीची एर्सबेट मार्कस यांच्याशी होती. स्नॅचमध्ये मल्लेश्वरीने सर्वाधिक 110 किलो वजन उचललं. ती पहिल्या तीनात होती. पण, अजून क्लीन अँड जर्क प्रकार बाकी होता. दोन्ही प्रकारात मिळून तुम्ही किती वजन उचलता यावर मेडल अवलंबून असतं.
 
अशावेळी तुम्हाला आणि तुमच्या कोचला मिळून काही गणितं करावी लागतात. आणि त्यावरून तुम्ही किती वजन उचलण्याचा प्रयत्न करणार हे आधी संयोजकांना सांगावं लागतं. सांगितलेलं वजन उचलू शकलात तर तेवढे पॉइंट मिळतात नाहीतर फाऊल ठरतो. असे तीन प्रयत्न तुम्हाला करता येतात. वर तुम्हाला याचाही अंदाज घ्यायचा असतो की प्रतिस्पर्धी किती वजन उचलेल.
 
कारण, सर्वाधिक वजन उचलणाऱ्या तीन खेळाडूंना अर्थातच मेडल मिळतं.
 
क्लीन अँड जर्क खेळताना प्रतिस्पर्धी विनिंगने पहिल्याच प्रयत्नांत 132.5 किलो वजन उचललं. आणि तिथेच मल्लेश्वरीचं मनातलं गणित बिघडलं. त्या दिवशी तिथं काय घडलं याचं वर्णन ESPN या जागतिक क्रीडा वाहिनीने असं केलं होतं,
 
"आता मल्लेश्वरीची पाळी आहे. आणि तिने चक्क 137.5 किलो वजन उचलायचं ठरवलं आहे. ती आणि तिच्या कोचने आज प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्पर्धेतून उडवून लावायचंच ठरवलेलं दिसतंय. कारण, एवढं वजन तिने उचललं तर ती इतर दोघींपेक्षा चक्क साडेपाच पॉइंट्सनी पुढे जाईल. बघूया काय होतं ते."
 
137 हे मल्लेश्वरीने आतापर्यंत उचललेल्या सर्वाधिक वजनापेक्षा तब्बल पाच किलो जास्त वजन होतं आणि त्यादिवशी तिला ते नाही जमलं. पण, वाईट या गोष्टीचं वाटतं की, तिने तिच्या क्षमतेत बसणारं 133 किलो वजन उचललं असतं तरी तिला गोल्ड मिळालं असतं. पण, गणितात काहीतरी गडबड झाली.
 
मॅचनंतर मल्लेश्वरीने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
"माझी आयुष्यभराची मेहनत होती ती. ब्राँझ मिळालं हे वाईट नाही झालं. पण, गोल्ड ते गोल्डच. माझ्या कोचनी वजनाचं गणित करण्यात काहीतरी गफलत केली. तेव्हा जर गोल्ड मिळालं असतं तर आज माझी गणना अभिनव बिंद्राच्या बरोबरीनं झाली असती."
 
गोल्ड हुकल्याचं शल्य तिला आहे. पण, वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. आणि तिच्यानंतर सायना, मेरी कोम, सिंधू आणि साक्षी अशी मालिकाच तयार झाली. या सगळ्यांना मल्लेश्वरीनेच स्वप्नं दाखवली. 2004मध्ये ती खेळातून निवृत्त झाली.
 
पण, आताच्या टोकिओ ऑलिम्पिकमध्येही भारताला पहिलं मेडल एका महिलेनं (मीराबाई चानूला 48 किलो वजनी गटात सिल्व्हर मिळालं आहे) आणि तेही वेटलिफ्टरने मिळवून दिलं याचा तिला अभिमान वाटतो.