स्वाइन फ्लू बळींची संख्या २१
स्वाइन फ्लूचा कहर वाढत चालला असून आज पुण्यात तीन जणांचा बळी या रोगाने घेतला आहे. यात एका ९ महिन्याच्या अर्भकाचा आणि ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेचा आणि ३७ वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. सायबरसिटी बंगलोरमध्येही स्वाईन फ्लू पोहोचला असून तिथे एक बळी घेतला आहे. त्यामुळे आता स्वाईन फ्लू बळींची संख्या आता २१ वर गेली आहे. स्वाभिमान कांबळे हे नऊ महिन्यांचे अर्भक सह्याद्री मुनोत हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूला बळी पडले. या हॉस्पिटलला सरकारने स्वाइन फ्लूवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. या आठवड्याच्या सुरवातीलाच या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मात्र, त्याची प्रकृती बिघडतच गेली. त्याला ससून हॉस्पिटलमध्येही अनेकदा तपासणीकरीता नेण्यात आले. पण त्याचा उपयोग जाला नाही. याशिवाय पुण्यातल्याच केईएम हॉस्पिटलमध्ये ७९ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. भारती गोयल असे या महिलेचे नाव आहे. याशिवाय नारायणगावच्या अर्चना कोल्हे या महिलेनेही आज पुण्याच्या ससून रूग्णालयात प्राण सोडले. आठ ऑगस्टला त्यांना गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्रातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या आता १६ वर पोहोचली असून एकट्या पुण्यात १३ बळी गेले आहेत.