गुरु तेगबहादूर
डॉ.यू.म.पठाण
ND
मख्खनशहा नावाचा एक शीख व्यापारी समुद्रमार्गे मालाची ने-आण करीत असे. तो निष्ठावंत शीख होता. एकदा जहाज बुडत असताना त्याने संकटाच्या वेळी आपण वाचलो तर गुरुला पाचशे मोहरा देऊ, असे म्हटले होते. बाबा बकाला गावात गुरुपदाबद्दल थोडेफार वादावादीचे वातावरण निर्माण झाले असताना मख्खनशाह पुढे झाला. त्याने गुरुपदावर हक्क सांगणार्या प्रत्येकाच्या पुढ्यात दोन-दोन मोहरा ठेवल्या. तेवढ्यावर प्रत्येकजण संतुष्ट झाला. मात्र त्यात गुरु तेगबहादूर नव्हेत. मख्खनशाहला कोणतरी गुरु तेगबहादूर हेही गुरुपदाचे वारस आहेत, असे सांगितल्यावरुन तो त्यांच्यासमोर गेला आणि त्याने त्यांच्यासमोर दोन मोहरा ठेवल्या. त्याबरोबर गुरु तेगबहादूरांनी विचारले, 'तू तर पाचशे मोहरा कबूल केल्या होत्यास, बाकीच्या कुठे आहेत?' त्यांनी असे विचारताच हेच आपले गुरु होत, हे मख्खनशाहने आणि इतरांनीही ओळखले व गुरु तेगबहादूरांना गुरुपदी वयाच्या ४३ वर्षी बसविण्यात आले. गुरु तेगबहादूरांनी त्या क्षणापासून शीखधर्माच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण व्यतीत केला. ते अमृतसरला गेले असताना त्यांच्या विरोधकांच्या कारस्थानामुळे परमपावन हरमंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. तरीही गुरु तेगबहादूरांनी आपल्या विरोधकांकडे क्षमाशील नजरेने पाहिले. शीख धर्माचा प्रसार केला.
हजारो सैनिक, फार मोठ्या प्रमाणात अनुयायी त्यांच्याबरोबर विविध ठिकाणी यात्रा करु लागले. त्या काळात काश्मिरी पंडितांना औरंगजेबाच्या जुलमी सत्तेने कासावीस करुन सोडले होते. ते काश्मिरी पंडित गुरु तेगबहादूर यांना शरण गेले. गुरु तेगबहादूरांनी औरंगजेबाला निरोप पाठवून 'आधी तेगबहादूरांना मुसलमान कर मग सगळे काश्मिरी पंडित मुसलमान होतील', असे कळविण्याची व्यवस्था केली. यानंतर औरंगजेबाच्या फौजेने गुरु तेगबहादूरांना अटक केली आणि क्षुल्लक कुरापत काढून त्यांचा शिरच्छेद करविला. ह्या घटनेला उद्देशून गुरु तेगबहादूरांचे चिरंजीव आणि शीख धर्माचे संवर्धक गुरु गोविंदसिंह यांनी 'सीस दिया पर सिर्र न दिया' असे उद्गार काढले. धर्मासाठी या थोर वीरपुरुषाने बलिदान केले आणि शीख संप्रदायात नवचैतन्य निर्माण झाले.
