सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (10:38 IST)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार

Shetkari Mahasanman Nidhi Yojana  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ ही नवी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
 
आज (26 ऑक्टोबर) शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
 
या याजनेत राज्यातील जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे आज वितरण होणार आहे.
 
यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
 
ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातले 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं इथं आपण पाहणार आहोत.
 
प्रश्न 1 - ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे?
उत्तर – केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
 
आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.
 
प्रश्न 2 – या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?
उत्तर - पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.
 
प्रश्न 3- योजना कधीपासून व कशी लागू होणार?
उत्तर – केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता नोव्हेंबर 2023 दरम्यान जारी केला जाऊ शकतो.
 
दरम्यान, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर रोजी वितरित केला जाणार आहे.
 
प्रश्न 4 -किती शेतकऱ्यांना लाभ होणार?
उत्तर- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ राज्यातील जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
 
प्रश्न 5 – पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
उत्तर - पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
 
दुसरं म्हणजे ई-केवायसी करणं गरजेचं आहे.