बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: रविवार, 10 मार्च 2024 (16:52 IST)

लोकसभा निवडणूक : मतदान कोण करू शकतो आणि कोण नाही

voting
येत्या काही दिवसांतच देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. देशांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या संपूर्ण प्रक्रियेत लाखोंच्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होतात.
 
त्याचप्रमाणे हजारो उमेदवारही निवडणुकीत आपलं नशीब आजमावतील.
 
भारताच्या राज्यघटनेनुसार ज्यांचं नाव मतदार यादीत आहे, असे लोकच मतदान करू शकतात.
 
मात्र, काही लोक असे असतात जे निवडणुकीत मतदान करूही शकत नाहीत आणि निवडणुकीतही उभे राहू शकत नाहीत.
 
आपल्या देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान कोण करू शकतो, कोण निवडणूक लढवू शकतो आणि कोण नाही? मतदानाचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ.
मतदानाचा अधिकार कोणाला?
भारताची राज्यघटना सर्व सज्ञान म्हणजेच 18 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार देते. मात्र, हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं आवश्यक आहे.
 
मत देण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे. म्हणजेच जी व्यक्ती भारताची नागरिक नाही ती मतदान करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचं नाव मतदार यादीतच नसेल, तरीही तुम्ही मतदान करू शकत नाही.
 
निवडणुकीसंबंधी गुन्हा किंवा गैरवर्तनप्रकरणी एखाद्या व्यक्तीला अपात्र घोषित करण्यात आलं असेल, तर ती व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकत नाही किंवा मतदानही करू शकत नाही.
 
एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असेल तर त्या व्यक्तीला मतदान करता येत नाही.
 
एखादी व्यक्ती एनआरआय असेल आणि तिने दुसऱ्या देशाचं नागरिकत्वही स्वीकारलं नसेल, तर तिला मतदानाचा अधिकार आहे. मात्र, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतल्यास मतदानाचा अधिकार संपुष्टात येतो.
 
एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल आणि न्यायालयाने तसं घोषित केलं असेल, तर ती व्यक्ती मतदार यादीत नाव दाखल करू शकत नाही. तिला मतदार ओळखपत्र दिलं जात नाही.
 
मतदानाचा अधिकार ज्यांना आहे, ते निवडणूक आयोगाकडून निश्चित केलेल्या केंद्रावर जाऊनच मतदान करू शकतात. इतर कोणत्याही केंद्रावर या अधिकाराचा उपयोग करता येत नाही.
 
निवडणूक कोण लढवू शकतं?
भारतीय राज्यघटनेच्या कलम 84-अ मध्ये खासदार बनण्यासाठीची पात्रता नमूद करण्यात आलीये.
 
त्यानुसार जी व्यक्ती भारताची नागरिक नाही, तिला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही.
 
लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षं निर्धारित करण्यात आली आहे. यापेक्षा कमी वयाची व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही.
 
लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 4 (डी) नुसार, ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये नाहीये, ती निवडणूक लढवू शकत नाही.
 
एखाद्या व्यक्तिला जर दोन वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल, तर ती निवडणूक लढवू शकत नाही.
 
मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं नोंदवायचं?
1 जानेवारीला वयाची 18 वर्षे पूर्ण करणारी, भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकते.
 
जिथे आपलं नाव नोंदवायचं आहे, त्या मतदारसंघाचं रहिवासी असणं हे आवश्यक आहे.
 
त्यासाठी तुम्हाला फॉर्म- 6 भरावा लागतो. हा फॉर्म बूथ लेव्हर ऑफिसर किंवा बीएलओकडून मिळतो.
 
तुम्ही https://voters.eci.gov.in/login वर जाऊन ऑनलाईनही हा अर्ज भरू शकता. त्यासंबंधीची सविस्तर प्रक्रिया इथे वाचा.
 
अनिवासी भारतीयांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फार्म-6A भरावा लागतो.
या फॉर्मवर आपल्याला अन्य माहितीसोबतच स्वतःचा आधार क्रमांकही द्यावा लागतो. अर्थात, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, ते पण फॉर्म भरू शकतात.
 
अर्जदाराला आपल्या वयाचा पुरावा देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राज्य शिक्षण मंडळाकडून दिलं जाणारं दहावी किंवा बारावीचं प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची प्रत जोडावी लागते.
 
मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मतदान केंद्रावर वेळोवेळी कँप लावले जातात. तिथे जाऊन मतदार यादीत आपलं नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो.
 
जर तुम्हाला यासंबंधी कोणतीही मदत हवी असल्यास तुम्ही 1950 वर फोन करू शकता.
 
मतदार यादीत जर तुमची माहिती चुकीची असेल तर कशी सुधारावी?
मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर जर त्यामध्ये कोणती चूक राहिली, तर तुम्ही फॉर्म-8 भरून त्यात सुधारणा करून घेऊ शकता.
 
फॉर्म-8 भरून मतदार आपल्या बदललेल्या पत्त्याचीही माहिती देऊ शकतात.
 
याशिवाय हाच फ़ॉर्म-8 भरून मतदार ओळखपत्रातही बदल करून घेता येऊ शकतात.
 
आपल्या अपंगत्वाबद्दलची माहिती देण्यासाठीही फॉर्म-8 भरावा लागतो.
 
अंध मतदार मतदानाचा अधिकार कसा बजावू शकतात?
विकलांग व्यक्तींच्या अधिकारासंबंधीच्या अधिनियम 2016 मधील कलम 11मध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा असाव्यात याची काळजी निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी.
 
मतदानाशी संबंधित उपकरणं, तंत्र त्यांना सहज समजतील अशी आणि त्यांना हाताळता येतील अशी असावीत.
 
मतदान केंद्रावर दृष्टिबाधितांसाठी ब्रेल लिपीमध्ये डमी मतपत्रिका दिली जाते. ती मतपत्रिका नीट हाताळल्यानंतर त्यांना मतदानासाठी मतदानासाठीच्या बॉक्समध्ये जाण्याची परवानगी दिली जाते.
त्यानंतर संबंधित मतदार ईव्हीएमवर ब्रेल लिपीमध्ये दिलेली माहिती आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराचा क्रमांक वाचून मतदान करू शकतो.
 
मतदान केंद्रावर, दृष्टिबाधित व्यक्तिंसाठी निवडणूक संचालन नियम, 1961 च्या नियम 49 (एन) नुसार एका सहकाऱ्याची सुविधाही देण्यात येते. किंवा असा मतदार बूथ स्वयंसेंवक किंवा पीठासीन अधिकाऱ्याचीही मदत घेऊ शकतो.
 
Published By- Priya Dixit