बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (16:06 IST)

उत्तर प्रदेश निकालानंतर योगी आदित्यनाथ भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झालेत का?

5 फेब्रुवारी 2002. लालकृष्ण आडवाणी यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार येऊन 3 वर्षं झाले होते. तोपर्यंत गृहमंत्री असलेले आडवाणी याच दिवशी देशाचे उपपंतप्रधान झाले होते.
 
वाजपेयी-आडवाणींच्या त्या काळात वाजपेयी भाजपचे नंबर एकचे नेते तर आडवाणी नंबर दोनचे नेते अशी स्थिती होती. पण 5 फेब्रुवारी 2002 या दिवशी ते पुढचे नंबर एकचे नेते असतील यावर अधिकृतपणे मोहोर उमटली होती. पुढे जाऊन 2009 च्या लोकसभा निवडणुकांसाठी आडवाणी पंतप्रधानपदाच उमेदवार झाले आणि नंबर 2 वरून नंबर एकवर पोहोचण्यात यशस्वी झाले होते.
 
पण आडवाणी नंबर एकच्या पदावर जाताच नंबर दोनचं पद कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू झाली. 2009 मध्ये आडवाणी पंतप्रधान तर होऊ शकले नाहीत. शिवाय त्यांनी विरोधी पक्षनेतेपदसुद्धा स्वीकारलं नाही. ते गेलं सुषमा स्वराज यांच्याकडे.
 
त्याच काळात कथित 2जी आणि कोळसा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग सरकारला बेजार करून सोडलं होतं. त्यानंतर अण्णा हजारेंच्या आंदोलनानं यूपीए-2च्या विरोधात मोठी लाट तयार केली.
 
केंद्रीय स्तरावर एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे गुजरातमध्ये 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना घवघवीत यश आलं. सलग तिसऱ्यांदा ते गुजरातची विधानसभा निवडणूक जिंकले.
 
या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत लालकृष्ण आडवाणीच भाजपचे नंबर एकचे नेते होते. त्या खालोखाल सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्याकडे पाहिलं जात होतं.
पण 2012 च्या नरेंद्र मोदींच्या विजयानं हे चित्र पुरतं पालटलं होतं. नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू झाली आणि त्यातच जून 2013 मध्ये भाजपची गोव्यात कार्यकारीणी झाली आणि मोदींना 2014 च्या निवडणुकांचं प्रचार प्रमुख करण्यात आलं. पुढे काय घडलं याचा इतिहास सर्वश्रूत आहे.
 
लोकसभेतल्या विरोधीपक्ष नेत्या म्हणून पंतप्रधानपदावर तुमचा पहिला दावा आहे, असं दिग्विजय सिंग यांनी सुषमा स्वराज यांना एका कार्यक्रमात बोलून दाखवलं. पण त्यावर सुषमा स्वराज यांना काहीच उत्तर देता आलं नाही. पक्षातलं दुसऱ्या आणि अपेक्षित असलेलं पहिल्या क्रमांकाचं स्थान गमावल्याचं शल्य त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हा स्पष्ट दिसत होतं.
 
हा झाला इतिहास.
 
पण त्याची पुनरावृत्ती आता 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांनंतर घडणार का याची चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात रंगली आहे.
 
आता पात्र बदलली आहेत. सध्या भाजप आणि सरकार या दोन्ही ठिकाणी अमित शहा मोदींनंतर सर्वांत मोठे नेते आहेत. तर योगी आदित्यनाथ भाजपच्या पटलावर उदयाला येणारे नवे नेते दिसून येत आहेत.
 
मोदींच्या पहिल्या सरकारच्या काळात फक्त पक्ष सांभाळणारे अमित शहा दुसऱ्या कार्यकाळात आता थेट सत्तेत सहभागी आहेत. सरकारमध्ये मानलं जाणारं दुसऱ्या क्रमांकाचं गृहमंत्रिपद सध्या त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये सध्या तरी ते निर्वावादपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण पक्षातल्या दुसऱ्या क्रमांकाचं काय?
भाजपचे पक्षाध्यक्ष सध्या जे. पी. नड्डा आहेत. पण पक्षावर वचक मात्र शहांचाच आहे.
 
त्यांच्या या वर्चस्वाला मात्र आता योगींच्या रुपानं आव्हान देणारी व्यक्ती समोर आली आहे का?
 
इंडिया टुडे वृत्तसमुह वेळोवेळी मूड ऑफ द नेशन सर्व्हे करत असतो. त्यांच्या 2021च्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पुढचे पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.
 
24 टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती. तर 11 टक्के लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली होती.
 
महत्त्वाचं म्हणजे या सर्व्हेत अमित शहा यांचा सहावा क्रमांक आहे. त्यांच्या नावाला 7 टक्के लोकांनी पसंती दिली होती. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या सर्व्हेत शहांच्या पुढे होते.
 
याच इंडिया टुडे वृत्तसमूहच्या मूड ऑफ द नेशनच्या 2022 च्या सर्व्हेत 49 टक्के लोकांनी योगींच्या नावाला यूपीचे पुढचे मुख्यमंत्री पसंती दिली होती.
 
निवडणुकांच्या निकालांनंतर योगी उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालंय.
 
या विजयामुळे योगी आदित्यनाथ आता आपसूक भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत की त्यांची दुसऱ्या क्रमांकासाठीची लढाई सुरू झाली आहे?
 
बीबीसी हिंदीचे संपादक राजेश प्रियदर्शी यांच्या मते, "या निवडणुकीच्या आधीपासूनच योगींचे समर्थक त्यांना दुसऱ्या क्रमांकाच्या रेसमध्ये असल्याचं पाहात आहेत. ते या निवडणुकीत हारले असते तर स्थिती वेगळी असती. पण ते पुन्हा सत्तेत येत असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या रेसमध्ये ते कायम आहेत."
 
"पण हेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की इतिहासात पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. जवळपास 100 आमदारांनी योगींच्या विरोधात विधानसभेत विरोधप्रदर्शन केलं होतं. अशा स्थितीतही योगी एक मजबूत नेता म्हणून पुढे आले आहेत," याची आठवण प्रियदर्शी करून देतात.
 
दुसऱ्या सत्तेत आलेले योगी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना कसे हाताळतात यावर पुढची गणिती अवलंबून आहेत, असं राजेश प्रियदर्शी सांगतात.
 
त्याचवेळी अमित शाह यांच्या भाजपमधल्या दुसऱ्या क्रमांकाला सध्यातरी कुठलाही धोका नसल्याचं मत निस्तुल्ला हेब्बार व्यक्त करतात. त्या द हिंदूच्या पॉलिटिकल एडिटर आहे.
 
त्या सांगतात, "योगींची दुसऱ्या क्रमांकाची दावेदारी मजबूत झाली असती जर भाजप फक्त यूपीत जिंकली असती. ता भाजप उत्तराखंड आणि मणिपूरमध्येसुद्धा जिंकली आहे. गोव्यात त्यांची स्थिती ठिक आहे. त्यामुळे याकडे मोदींचा विजय म्हणून पाहिलं जाईल. लोकांनी मोदींकडे पाहून मतदान केल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीनं योगींना भाजपच्या इतर अनुभवी मुख्यमंत्र्यांच्या पंकतीमध्ये आणून बसवलं आहे. "
 
या निकालांमुळे अमित शहांचं वजन वाढल्याचं त्यांना वाटतं.
 
"अमित शाहांनी ज्या पद्धतीने निवडणुकीची यंत्रणा राबवली त्यातूनच भाजपचा या राज्यांमध्ये विजय झाल्याचं स्पष्ट आहे. या विजयांमध्ये शहांनी मोठा रोल प्ले केला आहे. त्यामुळे त्यांची दुसरी जागा कायम आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता आणून दिली आहे. ते सतत काम करत आहेत. त्यांचा निवडणुका जिंकून देण्याचं सातत्य कायम आहे," असं हेब्बार सांगतात.
 
रेवती लॉल एक मुक्त पत्रकार आहेत. त्या उत्तर प्रदेशमध्येच राजकीय पत्रकारिता करतात.
तिथल्या सामाजिक, जातीय आणि आर्थिक स्थितीला जवळून अनुभवलेल्या रेवतींना मुळात हा भाजपमधला नंबर एक आणि दोन कोण हा प्रश्नच चुकीचा वाटतो.
 
त्या सागंतात, "भाजपमध्ये नंबर एकला कोण आहे आणि नंबर दोनला कोण आहे यावरून काहीच फरक पडत नाही. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. यातून प्रत्यक्ष समाजातल्या स्थितीत काहीच बदल होणार नाही. जमिनी स्तरावर कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याने फरक पडतो. लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पण, आपण त्याच त्याच राजकीय मुद्द्यांमध्ये अडकून पडत आहोत."
 
आपण त्याच त्याच राजकीय मुद्द्यांमध्ये अडकून पडले आहोत की देशाच्या सामाजिक आणि राजकीय ड्रायव्हिंग फोर्सकडे दुर्लक्ष करत आहोत, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
 
पण एवढं मात्र नक्की आहे की भाजपमध्ये कायमच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा राहीली आहे. इतिहास हेसुद्धा सांगतो की दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती पहिल्या क्रमांकाला जातेच असं नाही. शिवाय स्पर्धेत आणि चर्चेत नसलेलं नावसुद्धा अचानक डार्क हॉर्स ठरतं हेसुद्धा तितकंच खरं आहे...