बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 11 जुलै 2024 (08:14 IST)

वारीमध्ये माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो

pandharpur yatra
आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले. मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. डॉक्टर गोडबोले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर. कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं. आणि डेक्कनला बंगला. प्रॅक्टिस जोरात चालली होती. आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच. या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली. दोघांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही. माणूस एकदम उमदा.  एवढा यशस्वी डॉक्टर असूनही अहंकाराचा स्पर्श नाही. एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात तसा. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं. त्यावेळी या माणसाला अजून जवळून पाहता आलं. हसत खेळत, मिश्किल टिप्पण्या करत आलेल्या पेशंटचा अर्धा आजार पळवून लावत ते. हॉस्पिटल मध्ये दोन बेड राखीव ठेवले होते. अगदी गरीब रुग्णांसाठी. उगीच महागड्या चाचण्या नाही. अव्वाच्या सव्वा बिल नाहीत. सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला. वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत. हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी, दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत. जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत. गरजूंवर मोफत उपचार करत. शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत. या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहत. त्यांच्यात बसून जेवत खात. गप्पा मारत. हे सगळं मला त्यांच्या मदतनिसाने सांगितलं. म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं. फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली. 
 
माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो. गप्पांच्या ओघात मी म्हणालो, " डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे. इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची ते ही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोप्पं नाही. परत या कानाची त्या कानाला खबर नाही. खरंच ग्रेट आहात तुम्ही!" डॉक्टर हसले. म्हणाले, " यामागे काही कारण आहे. तुला इच्छा असेल तर ऐकवतो." मी म्हणालो, " सांगा ना डॉक्टर. मला खूप उत्सुकता आहे." डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. " दहा वर्षांपूर्वी मी असा नव्हतो. प्रॅक्टिस चांगली चालली होती. भरपूर पैसा कमवत होतो. फार्म हाऊस, फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो. हॉटेलिंग,  परदेश वाऱ्या, मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिम्बॉलच्या मागे धावत होतो. फोटो काढायचे. त्यांचं प्रदर्शन भरवायच. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची. आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या हे आयुष्य होतं माझं. अशातच डोक्यात आलं वारीच्या मार्गावर फोटो काढावेत.  माझा महागडा कॅमेरा घेऊन मी गाडी घेऊन निघालो. रस्त्यात अनवाणी चालणारे, पावसात भिजणारे, मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी, असे वेगवेगळे फोटो काढत होतो. ते वारकरी माझ्याशी गप्पा मारायला बघायचे. मला त्यांच्यात जेवायला बोलवायचे. भजनाला बोलवायचे. पण त्या गरीब फाटक्या माणसांमध्ये मिसळण माझ्या स्टेटसला शोभणार नव्हतं. मी त्यातल्या त्यात एखादं चांगलं हॉटेल बघून जेवायचो. झोपायचो. अशाच एका मुक्कामी मला आबा पाटील भेटले. सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत, गप्पा मारत, अभंग म्हणत त्यांच्या बरोबरीने पडतील ती कामं करत होते. मी फोटो काढत असताना ते माझ्याजवळ आले. स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा आग्रह करू लागले. मी झिडकारून लावल्यावरही न रागावता माझ्याशी बोलत राहिले. पण मी फार प्रतिसाद दिला नाही. नंतरही अधून मधून ते भेटत राहिले मला. शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुंवाधार पाऊस सुरू झाला. आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली. मी पावसात उभा राहून काही करता येतय का ते बघितलं. पण गाडी काही सुरू झाली नाही. मी मात्र चिंब भिजलो होतो. शेवटी कॅमेरा गाडीत ठेऊन गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो. गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो. कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत. त्यामुळे तसच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं. थंडी वाजून ताप भरला.  गावाकडे यायच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं. तसाच कुडकुडत बसलो होतो. तेवढयात आबा पाटील देवळात शिरले. माझी अवस्था बघून माझ्याजवळ आले. म्हणाले कपडे तरी बदलून घ्या. म्हटलं गाडीत आहेत. तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो. पण विचार केला कोण कुठला अडाणी माणूस हा !  याला गाडीची चावी कशी देऊ ?

त्यांना माझे विचार कळले असावेत. त्यांनी त्यांच्या गाठोड्यातला सदरा आणि धोतर काढून दिलं. म्हणाले हे घाला. ओले बसू नका. मी नाईलाजाने कपडे बदलले. त्यांनी त्यांच्याकडची तापाची गोळी दिली. मी जेवलो का याची चौकशी केली. मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला. मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यानी चूल पेटवली होती. त्यातच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली. खाऊन गोळी घेतल्यावर मला थोडं बरं वाटलं. पाटील बाजूलाच बसून राहिले होते. आता मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली. कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो किती वर्ष वारी करताय? तर म्हणाले आई बापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून. एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी. माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती. त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो, “मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलंत.” ते हसले आणि म्हणाले, “आज साठ पासष्ट वर्ष वारी करतो आहे. अशा कारणांवरून रागावलो तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची. वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो. इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो. माणसं कळायला लागतात. आपण कुठे आहोत ते ही समजतं. एकमेकाशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात. मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते. दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं. वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो. मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात रहात नाही. आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना ! इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात. दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते. आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.” त्यांचं हे बोलणं ऐकून मी खजील झालो होतो. आता परत ताप चढायला लागला होता. घरी जाणं गरजेचं होतं. पण गाडी चालवायची ताकद माझ्यात नव्हती. आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला. मग मला म्हणाले रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची. मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले माझा मुलगा येतोय गाडी घेऊन. मी म्हणालो, “तुमच्याकडे गाडी आहे ?” ते हसायला लागले. म्हणाले, :तीन आहेत. भली मोठी शेती आहे. फळबागा आहेत. एक मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. गावातच  प्रॅक्टीस करतात. दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवेनवे प्रयोग करतो. तो आल्यापासून पिकं जोमदार येतात. फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो”. माझं तोंड अजूनच वासलं. एवढं सगळं असूनही तुम्ही या लोकांबरोबर राहता खाता? ते म्हणाले, “अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत. स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं”. रात्री गाडी आली. मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले. मी म्हणालो, “अहो उद्या तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाचं. तुम्ही कशाला येता. वारी अर्धवट राहील तुमची. पांडुरंग रागवेल.” तसे खोखो हसत म्हणाले, “अहो देव आहे तो. रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा? मुलगा गाडी चालवेल. तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल? म्हणून येतो. आणि दर्शनाच म्हणाल तर तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही. तुम्ही निर्धास्त रहा.” मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बाप लेक लगेच घरी निघाले. आग्रह करूनही थांबले नाही. दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, “तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला.” मी स्तब्ध झालो. त्या एका वारीनी माझं आयुष्य माझी मतं संपूर्ण बदलून टाकली. माझ्या विचारांची मलाच लाज वाटायला लागली. तेव्हापासून मी बदललो. आणि दरवर्षी वारीत जाऊन त्या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो. जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली.” 
 
डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो. नकळत पांडुरंगाला हात जोडले. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला.  विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !

- सोशल मीडिया साभार