सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

टीम इंडिया हरली तरीही बेटिंग करणारे झाले मालामाल

- जो मिलर
भारत-न्यूझीलंडमधल्या अटीतटीच्या सेमीफायनलमधला तो क्षण. महेंद्रसिंग धोनी मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रोवर रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या वर्ल्डकपच्या आशा मावळल्या.
 
धोनी बाद झाल्यानंतर सगळा देश दुःखात बुडाला... एकाचा अपवाद वगळता - आर्यन.
 
आर्यन (मूळ नाव बदललेलं) हा व्यवसायानं तो एक बुकी आहे. त्याचे मुख्य गिऱ्हाईक स्थानिक व्यावसायिक आहेत. या सर्वांनी भारत न्यूझीलंडला हरवणार या विश्वासानं टीम इंडियावर भरपूर पैसे लावले होते.
 
या सर्वांच्या दुर्दैवानं टीम इंडिया हरली आणि आर्यनला जवळपास 7 हजार डॉलर्सहून अधिकचा नफा झाला.
 
पोलिसांनी घातलेल्या धाडसत्रानंतर दोन अन्य बुकींनी बीबीसीशी बोलण्यास नकार दिला. पण आर्यननं इंटरनेट कॉलच्या माध्यमातून संवाद साधण्यास सहमती दर्शवली. त्यासाठी त्यानं बेनामी अकाउंटचा वापर केला.
 
त्यानं घेतलेली खबरदारी रास्तच होती. भारतात अनेक क्षेत्रात सट्टा खेळणं हे लोकप्रिय असलं तरी त्याला कायदेशीर मान्यता नाहीये.
 
"भारतीयांसाठी जीव की प्राण असलेल्या क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे बुकींसाठी पर्वणीच असतो," आर्यन सांगत होता. "आपण पकडले जाऊ, अशी भीतीही या काळात मला कधीकधी वाटायची. पण जे होईल ते होईल," असा विश्वासही वाटायचा.
 
आम्हाला थोड्या दिवसांत जामीन मिळूनच जातो. IPLच्या वेळेस माझे काही मित्र पकडले गेले होते. मात्र त्यांना 10 ते 15 दिवसांत जामीन मिळाला. ते पुन्हा नव्या उत्साहानं याच व्यवसायात आले.
 
कसे होतात बेटिंगचे व्यवहार?
आर्यनच्या दाव्यावर कायदा मंत्रालय किंवा मुंबई पोलिसांचीही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांनी यावर कोणतंही भाष्य केलं नाही. आर्यनच्या आत्मविश्वासामुळं बेटिंगची पर्यायी व्यवस्था कशी चालत असेल, याचा अंदाज येत होता.
 
मी ओळखीतून आलेल्या गिऱ्हाईकांचाच विचार करतो, त्यानं सांगितलं. "हा व्यवसाय भरवशावर चालणारा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जोडले जाता आणि त्या व्यक्तीसोबतचा तुमचा व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण ही प्रामाणिक, पारदर्शक असते, तेव्हाच ती व्यक्ती इतरांना तुमच्याकडे पाठवते."
 
"अशापद्धतीनं तुमचं लोकांचं नेटवर्क बनत जातं. आधी तुमच्यासोबत 5 लोक असतील, नंतर 10, नंतर 15 अशी ही साखळी बनत जाते."
 
सध्या आर्यनचं बहुतांशी काम हे ऑनलाईनच चालतं. मोबाईल अॅप किंवा वेबसाईट्सच्या माध्यमातून हे काम सुरू असतं. अर्थात, हे काम काहीसं गुंतागुंतीचं आहे.
 
सट्ट्याचे व्यवहार हे डिजिटल झाल्यामुळे सरासरी दर कमी झाले आहेत. जेव्हा लोकांमध्ये पैशांची देवाणघेवाण प्रत्यक्षपणे व्हायची, तेव्हा सट्टाबाज अगदी 2 लाख डॉलर्सपर्यंतची रक्कम लावू शकत होते.
 
पण तरी आजही भारतात सट्ट्याचे व्यवहार अब्जावधी डॉलर्समध्ये होतात. हे आकडे प्रचंड अविश्वसनीय आहेत. 45 अब्ज डॉलर्स ते 150 अब्ज डॉलर्सपर्यंत ही उलाढाल होते.
 
प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट टीम खेळत असलेल्या प्रत्येक सामन्यावर जवळपास 19 कोटी डॉलर्सचा सट्टा लागत होता.
 
पैशाचा मोह
आकडेवारीत तफावत असेलही, पण भारतातील बेटिंगची इंडस्ट्री ही जगातील सर्वांत मोठ्या सट्टाबाजारांपैकी आहे, हे कुणीच नाकारणार नाही. युकेमध्ये बेटिंगला कायदेशीर मान्यता आहे. त्यापेक्षाही भारतातल्या सट्टा बाजारातली उलाढाल प्रचंड आहे.
 
व्यावसायिक क्रिकेटपटू किंवा क्रिकेटशी जवळून संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं कधी तुमच्याकडे सट्टा लावला होता का, या प्रश्नावर आर्यननं कोणतंही उत्तर दिलं नाही. मात्र IPLमधल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकारामुळं या खेळातील काही गोष्टी जाणीवपूर्वक बदलल्या गेल्याचं त्यानं मान्य केलं.
 
2013 मध्ये अनेक खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतल्याचा आरोप झाला होता. याच संबंधी दुसऱ्या एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी बुकींशी संबंधित असल्याच्या आरोपावरून भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली होती.
 
मॅच फिक्सिंग आणि बेकायदेशीर बेटिंगमध्ये गुंतल्याचं IPLमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्तींच्या समितीच्या निदर्शनास आलं.
 
बेटिंग कायदेशीर करण्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील, याची समीक्षा करण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं न्याय आयोगाला केली होती. कायदेशीर इंडस्ट्रीचं नियमन करून काळ्या पैशावर परिणामकारक नियंत्रण ठेवता येईल, असा विचार गेल्या वर्षी मांडण्यात आला होता.
 
न्याय आयोगानं परवानाधारक बुकींची साखळी तयार करण्याची आणि सट्टा लावणाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे नोंदणीक्रमांक देण्याचीही सूचना केली होती.
 
सट्टा कायदेशीर केल्यास रोजगार निर्मिती होईल तसंच बुकींना ताब्यात घेण्यासाठी मनुष्यबळाचा जो काही अपव्यय होतो, त्याला आळा बसेल असाही युक्तिवाद करण्यात आला होता.
 
सट्ट्याच्या रकमेवर कर?
"सट्ट्याला कायदेशीर मान्यता दिली तर सर्व व्यवहार खुलेपणानं होतील," असं मत सिद्धार्थ उपाध्याय यांनी व्यक्त केलं. ते स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य आहेत. उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्टेअर्स नावाची एक संस्थाही सुरू केली आहे.
 
कायदेशीर मान्यता मिळाल्यास या व्यवसायात कोण सहभागी आहे आणि कोण नाही, याची माहिती सर्वांना मिळेल आणि त्यामुळे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांनाही आळा बसेल, असंही उपाध्याय यांनी म्हटलं.
 
"हे करण्यासाठी सरकारनं अतिशय काटेकोर अशी कररचना आणि सशक्त नियामक यंत्रणा तयार करावी लागेल, हे मला मान्य आहे. मात्र प्रगत तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात ही काही अशक्य गोष्ट नाही."
 
कायदा केल्यामुळे सरकारला दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा महसूल कराद्वारे मिळेल, असंही उपाध्याय यांना वाटतं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्याच्या आधीच 60 हजार कोटींचा सट्टा लागला होता, असा दावा उपाध्याय यांनी केला.
 
"म्हणजेच बेटिंगवरील करामधून जे उत्पन्न मिळेल त्याचा वापर देशभरात क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी वापरता येईल. एका अर्थानं देशाच्या क्रीडा क्षेत्रालाच याचा लाभ होईल."
 
एखादी व्यक्ती किती रुपयांपर्यंत सट्टा लावू शकते, यावर कमाल मर्यादा असावी, अशी एक सूचना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं (FICCI) केली होती.
 
बेटिंग कायदेशीर करावं की नाही?
बेटिंग कायदेशीर करावं, अशी मागणी करणाऱ्यांना कदाचित राजकीय पाठिंबा मिळेल, पण तरीही सांस्कृतिक अडथळे असतीलच.
 
महाभारतामध्ये युधिष्ठिरांनं द्युतामध्ये सर्वस्व गमावलं होतं. अगदी तेव्हापासूनच सट्टा, जुगार याकडे हीन दृष्टीनं पाहिलं जातं. पण उपाध्याय म्हणतात, की देशातल्या अनेक राज्यांमध्ये सिगारेट्स आणि अल्कोहोल सहज उपलब्ध होतं. वास्तविक पाहता शीख धर्मात धूम्रपान निषिद्ध आहे. किंबहुना प्रत्येकच धर्म मद्यपान निषिद्धच मानतो.
 
भविष्यात सट्ट्याला कायदेशीर मान्यता मिळेल आणि तो हाय स्ट्रीटवर स्वतःचं दुकान सुरू करेल, अशी आशा आर्यनला आहे. पत्नी आणि लहान मुलीसाठी त्याला हे गरजेचं वाटतं.
 
मात्र जिंकलेल्या रकमेवर प्रचंड कर द्यावा लागू नये यासाठी अनेक सट्टाबाज आपल्याकडे रोख पैसे घेऊन येतीलच, असा त्याचा अंदाज आहे.
 
अशावेळी तो हे पैसे स्वीकारणार का? गालातल्या गालात हसत तो म्हणाला, "नक्कीच. पैसे कमवायला मलाही आवडतं."