ganesh chaturthi

124 डिग्रीच्या तापलेल्या जमिनीवर वीटभट्टी मजूर असे काम करतात

Updated: बुधवार, 10 जुलै 2019 (10:16 IST)
 
राम सूरत ज्या जागी उभे राहून काम करतात, तिथल्या जमिनीचं तापमान 110 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होतं. त्याच जमिनीलगतच्या 80 डिग्री सेल्सियस.
 
राम सूरत यांच्या अंगावर जेव्हा बीबीसीने तापमापक लावला तेव्हा तापमान 39 डिग्री सेल्सियसपासून सुरू होत 43 डिग्रीपर्यंत गेलं. संयुक्त राष्ट्र संघाच्या रिपोर्टनुसार शरीराचं तापमान 39 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त झाल्यास त्या माणसाचा जीव जाऊ शकतो.
 
या मजुरांमध्ये काही तास घालवल्यानंतरच बीबीसीच्या या पत्रकाराला डोळे जळजळणं, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. याशिवाय या मजुरांच्या कामाच्या ठिकाणी उभं राहून बोलताना उच्च तापमानामुळे बीबीसीच्या या पत्रकाराच्या बुटांचे सोल जळून गेले.
 
मग अशा ठिकाणी दिवसभर काम करणाऱ्यांच्या तब्येतीवर याचा किती परिणाम होत असेल.
 
याचं उत्तर देताना राम सूरत म्हणतात, "इथे काम करायला सुरुवात केली की लघवीच्या वेळी आग होते. हे काम सतत चालूच राहतं. सहा तासांच्या कामादरम्यान एक मिनीटही विश्रांती घेता येत नाही. हा त्रास होऊ नये म्हणून पाणी पिणं थांबवलं तर लघवी पांढरी व्हायला लागते."
 
"डॉक्टरला दाखवलं होतं. पण ते म्हणतात की हे सगळं भट्टीवर काम केल्याने होतंय. काम केलं नाही तर सगळं नीटही होतं. पण काम कसं सोडणार? आमच्याकडे पर्याय नाही दुसरा."
 
इतकं म्हणून राम सूरत पुन्हा आग विझू नये म्हणून भट्टीत कोळसा टाकायला जातात.
 
या अहवालानुसार वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर याचा सगळ्यात जास्त परिणाम होईल. हे कामगार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या तळागाळातले असतात आणि पुरेशी माहिती नसल्याने त्यांना सरकारी आरोग्य योजनांचाही फायदा घेता येत नाही.
 
सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हार्यनमेंटशी निगडीत असणारे निवित कुमार या अहवालाविषयी चिंता व्यक्त करताना म्हणतात, "यामध्ये फक्त 3.4 कोटी नोकऱ्या म्हटल्याचं मला आश्चर्य वाटतंय. येत्या काही काळात यापेक्षा कितीतरी जास्त लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे."
 
"वीटभट्टीवर 60-70 डिग्री सेल्सियस तापमानात कोणतीही विशिष्ट सुरक्षा उपकरणं न वापरता सलग काही तास काम करणं कठीण आहे. हे लोक जिथे उभे असतात त्याच्या खालचं तापमान सहाशे-सातशे डिग्री सेल्सियस असतं. अशात जर उन्हाळा वाढला तर अशी कामं करणं कठीण होईल."
 
हे लोक हातमोजे, मास्क किंवा सुरक्षेसाठीच्या इतर कोणत्याही विशिष्ट गोष्टी न घेता उघड्या हातांनी ही कामं करतात. कारण त्यांना आपल्या मुलांच्या पोटापाण्याची चिंता असते.


 
शेतमजूरांवर संकट?
पर्यावरण विषयक काम करणाऱ्या 'डाऊन टू अर्थ' या मासिकाच्या एका अहवालानुसार 2001 सालापासून दररोज साधारण 10 हजार लोक स्वतःची शेतीसोडून शेत मजुरीचं काम करत आहेत.
 
वाढत्या उकाड्याचा परिणाम या शेत मजुरांवर दिसायला लागल्याचं बीबीसीला आढळलं.
 
पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये इतर कोणाच्या तरी शेतामध्ये मजुरी करणारे साठ वर्षांचे श्रवण सिंग सांगतात की त्यांनी त्यांच्या हयातीत इतका उन्हाळा कधी पाहिला नाही.
 
श्रवण सिंह म्हणतात, "मी पुष्कळ उन्हाळे पाहिले. पण यावर्षी इतका उकाडा कधी पाहिला नाही. कालच माझ्या मुलीने थोडा वेळ काम केलं आणि तिला उलट्या-जुलाब होऊ लागले. औषधोपचार केले पण अशात काय करायचं? आम्ही रिकामे तर बसू शकत नाही."
 
"यावेळी पाऊस पडला असता तर आतापर्यंत पीक आमच्या खांद्यापर्यंत आलं असतं. पण पाऊस झाला नाही. आणि उन्हाळ्याची झळ तो सहन करणाऱ्यांनाच कळतेय. मजूर किती तापमानात राहून तांदळाचं पीक घेतो, हे एसीमध्ये राहणाऱ्यांना समजणार नाही."
 
दुपारच्या रोजगारावर गदा
हायवेच्या कडेला इतर परंपरागत रोजगार करणाऱ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी बीबीसीची टीम पोहोचली, तेव्हा तिथलं तापमान होतं 48 डिग्री सेल्सियस.
 
हायवेच्या कडेला मोटर सायकल दुरुस्त करणारे मोहम्मद मुस्तकीम सैफी सांगतात की गेली काही वर्षं दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अजिबात काम मिळत नाही. सैफी सांगतात, "उकाडा आता इतका वाढतोय की दिवसभर काही काम नसतं. माझं पूर्ण कुटुंब हेच काम करतं. पण आता कामच नाही. 12 वाजले की रस्त्यांवर शुकशुकाट होतो."
 
"येत्या काही वर्षांमध्ये जेव्हा उन्हाळा अजून वाढेल, तेव्हा काय होईल ते अल्लाच जाणे. कोण करणार आम्हाला मदत? मोदी सरकारकडून काहीच अपेक्षा नाही. आता फक्त अल्लाचाच सहारा आहे."
 
निवित कुमार सांगतात, "येत्या काही काळात उष्णता इतकी वाढेल की अशी पूर्वीसारखी कामं करणं कठीण होईल. अशात या सगळ्या उद्योगांना स्वतःत बदल घडवावा लागेल. म्हणजे वीट भट्ट्यांचं काही प्रमाणात यांत्रिकीकरण केलं तर या समस्येवरचा काही प्रमाणात तोडगा निघू शकतो. पण सरकारने याबाबत गंभीर विचार करायला हवा."
 
"पश्चिम उत्तर प्रदेशातल्या काही वीट भट्ट्यांनी आपल्या पद्धती बदलत मजुरांना आराम करण्यासाठी जागा तयार केल्या आहे. या भट्टयांचं उत्पादन पारंपरिक भट्ट्यांच्या तुलनेत बरंच जास्त होत आहे. अशात आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आता भविष्यामध्ये आपण जुन्या पद्धतींनुसार व्यवसाय करू शकत नाही. आपल्याला बदलायलाच हवं."
 
"भट्ट्या झिग-झॅग पद्धतीने चालवून प्रदूषण कमी करता येऊ शकतं. याशिवाय त्यांना आधुनिक फॅक्टरीचं स्वरून दिलं तर इथे लोकांना वर्षभरासाठी रोजगार मिळू शकतो."
 
नवीन रोजगार निर्मिती करणं ही भारतातल्या राजकीय पक्षांसाठी एक मोठी अडचण आहे.
 
अशात आता सवाल राहतो तो म्हणजे वाढत्या उन्हाळ्यामध्ये या पारंपरिक रोजगारांना धोका निर्माण झाला तर यावर अलंबून असणारे लोक स्वतःच आणि त्यांच्या मुलांचं पोट भरणार तरी कसं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments