शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (16:00 IST)

कोरोना: 'मृतदेह पाहिल्यानंतर स्वप्नं पडायची, घाबरायला व्हायचं'

सकाळचे 11 वाजले असतील. चेंबूरला राहणारे मुंबई पोलीस दलातील हवालदार ज्ञानदेव वारे नेहमीप्रमाणेच ड्युटीला जाण्याची तयारी करत होते.
तेवढ्यातच फोन खणखणला. "शिवडीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडलाय. तुम्ही येता का?"
 
"माझ्या गाडीत तीन मृतदेह आहेत, मी प्रायव्हेट गाडी पाठवतो," असं म्हणत वारेंनी दुसरी गाडी घटनास्थळी पाठवून दिली.
 
ज्ञानदेव वारे मुंबई पोलिसांच्या शववाहिनीचे ड्रायव्हर आहेत. अज्ञात मृतहेदांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आज जरा घाई-घाईतच ते घरातून निघाले.
 
"आज पाच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे आहेत," बाईकची किक मारताना वारे म्हणाले. या पाच मृत व्यक्तींमधील एका अज्ञात व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
 
गेली 20 वर्ष सलग वारे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत आणि कोरोना काळातही हे काम अविरत सुरू आहे.
"गेल्या वर्षभरात 500हून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत. यात 50 मृतदेह कोरोनासंसर्गामुळे झालेल्या अज्ञातांचे होते," असं वारे सांगतात.
 
दुपारी 12.30 च्या सुमारास वारेंनी ताडदेव पोलीस कॅम्पमधून शववाहिनी घेतली आणि निघाले मुंबईच्या केईएम रुग्णालयाकडे. "मी पुण्याचं काम करतोय. या मृतांचे नातेवाईक नसतात. मी त्यांचे अंत्यसंस्कार करतो," वारे म्हणतात.
 
वारेंनी गेल्या 20 वर्षात 50 हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी वारेंच्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करत, त्यांचा प्रशस्तीपत्रकही देऊन सन्मानही केला आहे. या सन्मानानंतर वारे म्हणतात, "माझ्या कामाचं चीज झालं."
मुंबई पोलिसांच्या शववाहिनीवर वारेंची नेमणूक 2001 साली झाली. पहिल्या दिवसाचा अनुभव वारे सांगतात, "खूप भीती वाटली होती. मृतदेह कधीच पाहिला नव्हता. एक महिना झोप आली नाही. बेचैन झालो होतो. स्वप्न पडायची. भरपूर घाबरलो होतो."
 
पोलिसांच्या शववाहिनीवर काम करणाऱ्यांची पाच वर्षानंतर बदली केली जाते. तुम्ही बदली का नाही स्वीकारलीत? असं विचारल्यावर ते सांगतात, "मला हे काम आवडलं. मला पोलीस दलात नोकरी करायची आहे. मग हे काम काय वाईट? आपल्या हाताने सत्कार्य होतंय, म्हणून मी बदली नाकारली."
 
कोरोनाकाळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना भीती वाटत नाही? विचारल्यावर वारे सांगतात, "भीती तर वाटतेच. कोव्हिडचे मृतदेह घेऊन येताना मला संसर्ग झाला तर? सोबत असलेल्यांना संसर्ग झाला तर? हा विचार सतत मनात असतो. माझ्यामुळे कुटुंबीयांना होण्याची भीती वाटते."
 
मुंबई पोलिसांच्या शववाहिनीवर वारेंसोबत मदतीसाठी दोन व्यक्ती मदतीसाठी ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची ड्युटी धकाधकीची! पेट्रोलिंग, गुन्ह्याचा तपास, नाकाबंदी दिवसरात्र फिल्डवरच. पण, वारे म्हणतात, या कामापेक्षा अंत्यसंस्काराच्या कामातच माझं मन रमतं.
 
ज्ञानदेव वारेंना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. कोरोनासंसर्गात सहव्याधी असलेल्या रुग्णांना जास्त धोका आहे. अशावेळी काळजी कशी घेतात, यावर वारे सांगतात, "मला मधुमेह आहे. त्यामुळे खास काळजी घ्यावी लागते. हात वारंवार स्वच्छ करतो. मास्क कायम असतं. सॅनिटायझरची बाटली कायम सोबत असते. सर्व काळजी घेऊन मी माझं काम करतो."
वारेंची नेमणूक दक्षिण मुंबईत आहेत. केईएम, सायन, सर जे.जे मार्ग, नायर आणि टीबी रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे वारेंचा नंबर प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना तोंडपाठ आहे.
 
"कोव्हिडमध्ये कोणी-कोणाशी बोलत नव्हतं. मी देखील घाबरलो होतो. लोक मरत होते. अज्ञात मृतदेह घेऊन जाणं, खूप जोखमीचं काम होतं."
 
रस्त्यावर अज्ञात मृतदेह आढळून आला की वारेंना फोन येतो. ते मृतदेह रुग्णालयात पाठतात आणि 15 दिवस नातेवाईक पुढे आले नाहीत तर, काही दिवसांनी मृतदेहावर अत्यंसंस्कार करतात.
 
"मला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. मी त्यांच्याकडून मृतदेहाचा हॅंडओव्हर घेतो आणि अज्ञात व्यक्तीच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करतो," असं वारे म्हणाले.
 
वारेंना रिटायर होण्यासाठी अजून सहा वर्ष बाकी आहेत. पण, निवृत्त होईपर्यंत हेच काम करण्याचा निर्धार वारे यांनी केलाय.
 
वारेंचा फोन सतत वाजत असतो. चेंबूरपासून कुलाब्यापर्यंत त्यांची हद्द आहे. त्यामुळे 35 पोलीस स्टेशन आणि रुग्णालयातून त्यांना मृतदेह नेण्यासाठी फोन येत असतात.
 
"कोव्हिडच्या काळात रविवार सोडून एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सारखे फोन यायचे. रस्त्यावर मृतदेह पडलाय. डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. हर्स व्हॅन पाहिजे. लोक, बॉडीला हात लावण्यासाठी घाबरायचे. खासगी गाड्या उपलब्ध नसल्याने खूप वेळ थांबावं लागायचं."
 
एक दिवस आधीच 16 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं वारे सांगतात.